बडय़ा खत-कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि भारतीय खत-उद्योगाच्या संघटनेचे सहअध्यक्ष असलेल्या शरद नांदुर्डीकर यांचा पिंड अभियंत्याचा. माहिती-तंत्रज्ञान वा वित्तीय क्षेत्रांपेक्षा उत्पादनक्षेत्र महत्त्वाचं आहे, अशा विश्वासानिशी त्यांची वाटचाल सुरू आहे..
ओरिसातील परदीप फॉस्फेटस् ही १९८१ साली स्थापन झालेली आणि दोन दशकांत पूर्णपणे गाळात गेलेली सार्वजनिक उपक्रमातील कंपनी. अन्न सुरक्षेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी खतांची कमतरता पडू नये म्हणून डाय अमोनियम फॉस्फेट, अमोनियम फॉस्फेट सल्फेट, म्युरिएट ऑफ पोटॅश, झिपमाईट आदींचे उत्पादन करणारा भारतातील दुसरा सर्वाधिक क्षमतेचा हा कारखाना जन्मत:च आर्थिकदृष्टय़ा कुपोषणग्रस्त ठरला. वीस वर्षांनंतर एकूण तोटा सातशे कोटींवर पोहोचल्याने शेवटी फेब्रुवारी २००२ मध्ये सरकारचे २० टक्के भागभांडवल ठेवून हा उद्योग अरुण शौरींच्या निर्गुतवणूक मंत्रालयाने झुआरी इंडस्ट्रीज आणि रॉक फॉस्फेट या कच्च्या मालाचा पुरवठा करणाऱ्या मारोक फॉस्फेटस् लिमिटेड यांच्या संयुक्त उपक्रमाला विकला. सरकारने विकलेल्या खतांच्या अनेक कंपन्या तोटय़ातच होत्या, तर सरकारच्या ताब्यातील खत कंपन्याही बंद पडल्या होत्या. अशा प्रतिकूल पाश्र्वभूमीवर परदीप फॉस्फेटस्ने र्निगुतवणुकीनंतरच्या अवघ्या चार वर्षांमध्ये कात टाकली. या कायापालटात कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शरद नांदुर्डीकर यांचा सिंहाचा वाटा आहे.
या कारखान्याच्या र्निगुतवणुकीसाठी झालेल्या पाहणीपासून विविध कामगार संघटनांचा झालेला उग्र विरोध (बेमुदत उपोषण, आंदोलने), कारखान्यासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनीच्या रास्त मोबदल्यावरून न्यायालयात प्रलंबित असलेले दावे, वार्षिक सात लाख टन क्षमता असताना जेमतेम दोन-अडीच लाख टन होणारे उत्पादन, कामचुकार व अप्रामाणिक कर्मचारी, रोज ४० लाखांहून जास्त होणारा तोटा अशी सर्वच आघाडय़ांवर आव्हाने होती. असा इतिहास असलेल्या आजारी परदीप फॉस्फेटस्ची जबाबदारी नांदुर्डीकरांकडे देण्यात आली. परदीप फॉस्फेटस्चा सौदा होण्यापूर्वी झुआरी इंडस्ट्रीजच्या दिल्लीतील सायमन इंडिया या अशाच डबघाईला आलेल्या कंपनीचे नांदुर्डीकर व्यवस्थापकीय संचालक होते. परदीपचा कारभार दिल्लीत बसून चालवणे शक्यच नसल्याने त्यांनी भुवनेश्वर गाठले. सरकारी कंपन्यांची मालमत्ता निर्गुतवणुकीत विकत घेणारे चोर असतात, असा सर्वसामान्यांचा समज असतो, पण आपले व्यवस्थापन खतनिर्मिती क्षेत्रातील असून कारखाना व्यवस्थित चालवायला आलो असल्याचा संदेश त्यांनी ठोस पावले उचलून दिला. ओरिसाचे तत्कालीन महसूल सचिव रामचंद्र राव यांच्या मदतीने भूमी अधिग्रहणाशी संबंधित सर्व दस्तावेज काढून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दोन-तीन महिन्यांत भरपाईच्या रकमेवर तडजोडी केल्या. कंपनीतल्या सर्वच जुन्या कर्मचाऱ्यांना काढून टाकले नाही; पण कामचुकारांना वठणीवर आणले आणि काहींना घरचा रस्ताही दाखविला. कंपनी चांगली चालली नाही तर समाजातील वैयक्तिक पतप्रतिष्ठाही घसरते, ही भावना कर्मचाऱ्यांमध्ये बिंबविली. सततच्या तोटय़ामुळे नियमानुसार रोखलेली वेतनवाढ लागू केली. पगारवाढ आणि बढतीचा संबंध कामगिरीशी जोडला. चांगले व्यवस्थापन आणि प्रामाणिकतेतून कर्मचाऱ्यांमध्ये स्वाभिमान आणि आत्मविश्वास बाणवला. कारखान्याच्या उत्पादन क्षमतेत वाढ करीत चार वर्षांत उत्पादनाचा आकडा १३ लाख टनांवर नेऊन ठेवला. कंपनीचे ग्राहक असलेले शेतकरी आणि आसपासच्या परिसरातील लोकांमध्ये चांगुलपणाची भावना निर्माण केली. एकदा कंपनी चांगली चालली की सर्व भागधारकांचा फायदा होतो, पुरवठादारांचा व्यवसाय वाढतो, अशी सकारात्मकता सर्व संबंधितांच्या मनावर ठसवली. परदीप फॉस्फेटस्ला पहिल्या दोन वर्षांत कॅश प्रॉफिट, तिसऱ्या वर्षांत बुक प्रॉफिट आणि दोन वर्षांनंतर बीआयएफआरमधून पूर्णपणे मुक्त करण्यात यश मिळवूनच नांदुर्डीकर दिल्लीला परतले. ‘आता सरकारला आमच्या कंपनीतील २० टक्के भांडवल काढण्याची इच्छा नाही,’ असे नांदुर्डीकर गमतीने सांगतात.
योगायोगाने, पाच दशकांपूर्वी शरद नांदुर्डीकर यांचे वडीलही जळगावमध्ये रासायनिक खतांचा व्यवसाय करीत. कारकिर्दीच्या उत्तरार्धात आपल्यालाही याच व्यवसायात उतरावे लागेल, याची ४५ वर्षांपूर्वी आयआयटी पवईतून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये बीटेक झालेल्या शरद नांदुर्डीकर यांना पुसटशीही कल्पना नव्हती.
जळगावमध्ये जन्मलेल्या नांदुर्डीकर यांचे आजोबा बांधकाम कंत्राटदार होते. जळगावच्या नवी पेठेत त्यांचे टुमदार घर होते. शेठ लालजी नारायणजी सार्वजनिक हायस्कूल आणि मूळजी जेठा महाविद्यालयात प्री डिग्री सायन्सपर्यंत त्यांचे शिक्षण जळगावात झाले. नांदुर्डीकर यांच्या पत्नी (मूळच्या मंगला नाडकर्णी) जन्माने कोल्हापूरच्या असल्या तरी त्यांचेही कुटुंब जळगावातच स्थायिक झालेले. नांदुर्डीकर आणि त्या एकाच महाविद्यालयात शिकायला होत्या. मूळजी जेठामध्ये रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख असलेल्या त्यांचे वडील मधुसूदन नाडकर्णी यांनी नांदुर्डीकर आणि आणखी दोन विद्यार्थ्यांना आयआयटीची परीक्षा देण्यासाठी प्रेरित केले. एवढेच नव्हे तर त्या परीक्षेसाठी रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांची आपल्या सहकारी प्राध्यापकांच्या मदतीने त्यांच्याकडून तयारी करून घेतली. मंगला आणि शरद नांदुर्डीकर यांच्या त्या काळात जमलेल्या केमिस्ट्रीचे नंतर प्रेमविवाहात रूपांतर झाले. आयआयटीतून बाहेर पडल्यानंतर तीन वर्षांनी, १९७० साली नांदुर्डीकर पवईतच लार्सन अँड टूब्रोमध्ये रुजू झाले. कालांतराने एल अँड टीच्या पहिल्या स्ट्रॅटेजिक बिझनेस युनिटचे प्रमुख बनले. व्यवस्थापनाची पदवी घेतल्यामुळे व्यवसायाचे विविध पैलू शिकायला मिळाले. सिमेंट, धातू उद्योग, केमिकल प्रोसेसिंग, वीजनिर्मितीचे ईपीसी प्रकल्प हाताळण्याचा प्रदीर्घ अनुभव त्यांना लाभला. लुर्गी इंडिया लिमिटेड या जर्मन कंपनीत सीईओ म्हणून संधी मिळाल्याने १९९३च्या डिसेंबरमध्ये ते दिल्लीत आले. त्या वेळी त्यांच्या पत्नी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख होत्या, पण नांदुर्डीकरांना दिल्ली गाठता यावी म्हणून त्यांनी स्वत:च्या करिअरची चिंता केली नाही.
१९९८ साली ते झुआरीच्या सायमन इंडियामध्ये आले. अर्थात गेल्या १९ वर्षांपासून दिल्ली, भुवनेश्वर आणि पुन्हा दिल्लीत वास्तव्याला असलेल्या नांदुर्डीकरांची पाळेमुळे मात्र ठाण्यातच घट्ट झाली आहेत. त्यांच्या दोन्ही मुली, जावई आणि भाऊ ठाण्यातच स्थायिक झाल्या आहेत. थोरल्या कन्या अश्विनी कुंटे वित्तीय व्यवसायात आहेत, तर त्यांचे पती मकरंद यांचा व्यवसाय आहे. धाकटी कन्या रुता आयसीआयसीआय फौंडेशनमध्ये काम करतात आणि त्यांचे पती राजेश कानडे सिमेंट कंपनीत आहेत. दोघेही भाऊ, शशिकांत आणि सुहास ठाण्यातच वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये स्थिर झाले आहेत. बहीण सुनंदा आणि त्यांचे पती विलास बोंद्रे अबुधाबीला राहतात.
नांदुर्डीकर यांनी पुढची तीन वर्षे सायमन इंडिया आणि परदीप फॉस्फेटस् या दोन्ही कंपन्यांच्या वाढीवर लक्ष केंद्रित केले आहे. तेवढा काळ दिल्लीतच राहून, नव्या पिढीकडे सूत्रे सोपवून निवृत्तीनंतर ठाण्यात स्थायिक व्हायचे आहे. मात्र, जळगावला वर्षांतून किमान एकदा जाऊन बालक मंदिरातील मित्रांना भेटल्याशिवाय त्यांना बरे वाटत नाही.
दिल्ली आणि मुंबईत कामाच्या संस्कृतीत बरीच तफावत आहे आणि कार्यसंस्कृतीत मुंबईच्या व्यावसायिकतेची बरोबरी देशातले कोणतेही शहर करू शकत नाही. अगदी घरकाम करणाऱ्या बाईचेही वेळापत्रक ठरलेले असते, असे ते आवर्जून नमूद करतात. वक्तशीरपणा, व्यावसायिकता, काम करण्याची वृत्ती मुंबईबाहेर क्वचितच बघायला मिळते. अर्थात, कुठल्याही शहरातील चांगलेवाईट दोष शोधण्यात काही अर्थ नाही. दिल्लीत लहानशी अन्याय्य गोष्टही खपवून घेतली जात नाही, पण महाराष्ट्रात त्याकडे कानाडोळा केला जातो. आपल्याकडे मध्यमवर्गातील मुले डॉक्टर किंवा इंजिनीअर फार तर चार्टर्ड अकौंटंट होतात, पण दिल्लीतील मुले मोकळ्या मनाने व उघडय़ा डोळ्यांनी जगाकडे बघतात. दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश घेण्याचा, आयएएस, आयएफएस, आयपीएस होण्याचा आणि विदेशी भाषा शिकण्याचा ‘आऊट ऑफ द बॉक्स’ विचार करतात, याचे त्यांना कौतुक वाटते.
हाडाचे इंजिनीअर असल्याने नांदुर्डीकर इंजिनीअरिंगचे शिक्षण घेऊन दुसऱ्या क्षेत्राकडे वळणाऱ्या व्यावसायिकांविषयी खूष नाहीत. तुम्ही जे शिकला त्याचा उपयोग व्हायला हवा. हे भान जायला नको. मधल्या १०-१५ वर्षांमध्ये १०-१५ वर्षे माहिती तंत्रज्ञान आणि वित्तीय सेवांची इतकी हवा झाली की, या दोन्ही क्षेत्रांकडे असंख्य दर्जेदार इंजिनीअर्स वळले. त्यामुळे अनेक बडय़ा कंपन्यांच्या मधल्या व्यवस्थापनात पोकळी निर्माण झाली. आयआयटी आणि अन्य अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये चांगले इंजिनीअर तयार होऊन अन्य क्षेत्रांत गेल्यामुळे भारतातल्या भारतातच ब्रेन ड्रेन झाले आणि चीनच्या तुलनेत आपण उत्पादन क्षेत्रात मागे पडत गेलो. चीनमध्ये उद्योगात आणि संशोधनात झपाटय़ाने वाढ झाली, पण आपल्याकडे उत्पादनाला आणि त्यातील संशोधनाला हवे तसे महत्त्व मिळाले नाही. पायाभूत सुविधा क्षेत्रात संधी नसल्यामुळे अभियंते दुसऱ्या क्षेत्राकडे वळले. हा समाजाचाही दोष आहे. ही नवसंस्कृती उद्योग, सरकारमधील लोकांनी बदलायला हवी. शिक्षण संस्था, उद्योगातील ज्येष्ठ व्यक्ती आणि सरकारने ते दूर करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. आजही आपण उत्पादन क्षेत्र, उद्योगातील संशोधन आणि कृषी क्षेत्राकडे लक्ष दिले, तर रोजगाराच्या बहुतांश समस्या दूर होतील, असे त्यांना वाटते.
मुंबई सोडून दिल्लीत आल्यामुळे नांदुर्डीकरांच्या कारकीर्दीला कलाटणी लाभून त्यांची व्यावसायिक भरभराट झाली. वयाच्या ४८व्या वर्षी एका कंपनीचे संचालक होऊ शकले. आयुष्याच्या नव्या वळणावर वेगवेगळ्या गोष्टी हाताळायला मिळाल्या. भुवनेश्वरमध्ये ते भारतीय उद्योग महासंघाचे (सीआयआय) अध्यक्ष झाले. मोठय़ा पदावर असल्यामुळे परदेश दौऱ्यांमध्ये पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या शिष्टमंडळांमध्ये जाण्याची संधी मिळाली. सीआयआयच्या कृषी आणि अन्न प्रक्रियेवरील टास्क फोर्सचे अध्यक्ष झाले. फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडियाचे सहअध्यक्ष झाले. शिवाय गेल्या सात वर्षांपासून या संस्थेच्या पर्यावरणावरील सल्लागार समितीचेही ते अध्यक्ष आहेत. दिल्लीतील कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात संपर्क वाढविणाऱ्या व्यासंगी पत्नीमुळे तसेच शास्त्रीय संगीताच्या आवडीतून व्यवसायाबाहेर मोठा मित्रसंग्रह झाला. व्यवसायाव्यतिरिक्त कला, साहित्य, संगीत अशा नवनव्या क्षेत्रांचा जवळून परिचय झाला. महाराष्ट्रात दुर्मीळ असलेले कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, ना. धों. महानोरांसारख्या अनेक नावाजलेल्या व्यक्तींचा सहवास लाभला. हे व्यावसायिक आणि वैयक्तिक सौख्य मुंबईत सहजासहजी मिळाले नसते, याविषयी त्यांच्या मनात शंकाच नाही.
हाडाचा अभियंता
बडय़ा खत-कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि भारतीय खत-उद्योगाच्या संघटनेचे सहअध्यक्ष असलेल्या शरद नांदुर्डीकर यांचा पिंड अभियंत्याचा. माहिती-तंत्रज्ञान वा वित्तीय क्षेत्रांपेक्षा उत्पादनक्षेत्र महत्त्वाचं आहे, अशा विश्वासानिशी त्यांची वाटचाल सुरू आहे..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 16-03-2013 at 01:03 IST
मराठीतील सर्व राजधानीवर मराठी मोहोर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi face expert engineer sharad nandurdikar in capital of india