संत नामदेव किंवा रामदास हे संतगण खर्चाची व्यवस्था कोणी केली म्हणून पंजाबपर्यंत गेले, असे झाले नाही. संत साहित्याच्या नावाने उठताबसता गौरवोद्गार काढीत हिंडणाऱ्या मराठी साहित्यिकांना मात्र ‘आपुले आपण यजमान’ हे तत्त्व मान्य नसावे. ढळढळीत अर्थसाह्य़ापेक्षा राजकारणी आणि कुठकुठले संस्थाचालक वा उद्योजक यांची चोरटी मदत गुपचूप स्वीकारूनच साहित्य संमेलन यंदाही साजरे होणार, असे दिसते..
यापुढे मराठी साहित्य व्यवहार आणि राजकारण यांतील अधिक घृणास्पद काय ते ओळखणे दिवसेंदिवस अधिकाधिक अवघड होत जाणार असे दिसते. दररोज नित्यनवा यजमान शोधत हिंडण्याच्या साहित्यिकांच्या भिक्षुकी वृत्तीत याचे कारण दडलेले आहे. साहित्यिकांच्या या लाचार वृत्तीचा बरोबर फायदा काही सांस्कृतिक बनिये उचलतात आणि या मंडळींची सरबराई करण्याच्या मिषाने आपलीही पोळी उत्तमपणे भाजून घेतात, हे आता साहित्य व्यवहारांचे ओशाळे गुपित आहे. पंजाबातील घुमान येथे होऊ घातलेल्या कथित साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जे काही उद्योग सुरू आहेत, त्यातून याचाच प्रत्यय येतो. हे घुमान या मंडळींनी कोठून शोधून काढले? संत नामदेव या घुमानपर्यंत आले होते आणि त्यांच्या वास्तव्याच्या खुणा आजही तेथे जपल्या जात आहेत, म्हणून या घुमानची निवड करण्यात आल्याचे सांगितले जाते. परंतु संत नामदेव यांना तेथे येण्यासाठी कोणत्याही यजमानाची गरज लागली नव्हती, हा मुद्दा या संदर्भात लक्षात घेण्याजोगा. स्वत:च्या हिमतीवर, स्वत:च्या पदरास खार लावून संत नामदेव पंजाबात गेले होते. समर्थ रामदास यांचेदेखील या प्रदेशात भ्रमण झाले होते. पंजाबी संतवाङ्मयात या दोघांच्याही अभंगांना मानाचे स्थान आहे. त्याचे एक कारण त्यांच्या नि:स्पृहतेत आहे. खर्चाची व्यवस्था कोणी केली म्हणून हे संतगण त्या परिसरात गेले, असे झाले नाही. संत साहित्याच्या नावाने उठताबसता गौरवोद्गार काढीत हिंडणाऱ्या मराठी साहित्यिकांना मात्र आपुले आपण यजमान हे तत्त्व मान्य नसावे. त्याचमुळे घुमान येथील नियोजित साहित्य संमेलनासाठी कोणा टोल कंत्राटदाराचे साह्य़ घेण्यात या मराठी सारस्वतांस काही गैर वाटले नसावे. गिरीश गांधी आणि संजय नहार या दोघांच्या हाती साहित्य संमेलन आयोजकांनी आपल्या नाडय़ा सुपूर्द केल्या आहेत. परंतु या दोघांचेही मराठी साहित्यात काय योगदान हा प्रश्न कोणाला पडल्यास ते गैर ठरणार नाही. गांधी यांची नागपुरातील राजकीय वर्तुळात ऊठबस असते आणि या अशा मंडळींची उपयुक्तता साहित्यिक आणि राजकारणी या दोघांसाठी महत्त्वाची असते. यजमानकीच्या शोधात असणाऱ्या साहित्यिकांची या अशा मंडळींमुळे सर्व सोय होते आणि साहित्याशी दूरान्वयानेही संबंध न येणाऱ्या राजकारण्यांना प्रतिमा संवर्धनासाठी त्यांच्यामुळे एक हक्काचे व्यासपीठ मिळते. दोघांच्याही गरजा या अशा लोकांकडून तुडुंब भागवल्या जात असल्यामुळे अशांच्या बाबत मौन पाळणेच साहित्यिक पसंत करतात. न जाणो फट म्हणता एखाददुसरा पुरस्कार हातचा जायचा! एवढा धोका पत्करणे मराठी सारस्वतास परवडणारे नाही. दुसरे संजय नहार हे एक स्वयंसेवी संस्था चालवतात. या अशा संस्थांचे चालकत्व हे अलीकडच्या काळात भरभक्कम आर्थिक आधार आणि प्रसिद्धी, राजमान्यता मिळवून देणारे असते. खेरीज, हे स्वयंसेवी कारण पुढे करीत सरकारदरबारी उच्चपदस्थांच्या जवळ पोहोचता येते. याचीही गरज उभयतांना असतेच. कारण अशा संस्थांना मदत केल्याने आपले सामाजिक उत्तरदायित्व पूर्ण केल्याचे लटके समाधान राजकारण्यांना मिळते आणि तसे ते मिळवणाऱ्या राजकारण्यांची प्रतिमा उजळवण्याचे काम या संस्थांना करता येते. अशा तऱ्हेने हा परस्परांच्या सोयीचा मामला असल्याने तो वर्षांनुवर्षे बिनबोभाटपणे सुरू आहे. अलीकडच्या काळात त्यात साहित्यिक वर्ग येऊन मिळाला असल्याने अशा उचापतखोरांचा परीघ वाढतच जाताना दिसतो. पुरस्कर्त्यांच्या शोधात बारमाही असणाऱ्या साहित्यिक आणि त्यांच्या संस्थांची गरज अशांकडून पुरवली जात असल्याने सगळय़ांचेच फावते आणि मराठी सारस्वतांच्या अंगणात अवघा आनंदीआनंद पसरतो.
तसा तो आता घुमानात घुमेल. वास्तविक साहित्य व्यवहारास पुरस्कर्त्यांची गरज लागणे यात वावगे काहीही नाही. इंग्रजी भाषेत अशा लिटफेस्टांचे अलीकडच्या काळात चांगलेच पेव फुटलेले आहे. यातील सहभागी साहित्यिकांची सरबराईदेखील पुरस्कर्त्यांच्या जिवावरच होत असते. परंतु मराठी आणि अन्य यातील फरक हा की मराठीसारखा चोरटेपणा या साहित्योत्सवांत नसतो. कंपन्या, बँका, वित्तसंस्था यांच्याकडून रीतसर अर्थसाह्य़ मागून त्याच्या जिवावरच हे उद्योग पार पडत असतात. अन्य भाषकांना जे जमते ते मराठीजनांस का जमू नये? अन्य भाषकांच्या तुलनेत आपल्याच साहित्य व्यवहारांत संशयास्पद व्यक्ती आणि पुरस्कर्ते का असावेत? आणि समजा मराठीस असे पुरस्कर्ते मिळत नसतील तर सरहद ओलांडण्यासाठी नको त्यांच्या नादाला लागायची मुळात गरजच काय? मराठीचे भले होण्यासाठी अन्य राज्यांत वा देशांत साहित्य संमेलने भरणे अत्यावश्यक आहे की काय? एरव्ही मराठी भाषा अंथरूण पाहूनच पाय पसरावेत असा नेमस्त सल्ला देतच असते. मग तो साहित्य व्यवहारास का लागू नाही? नाही गेले साहित्य संमेलन या राज्याची वेस ओलांडून तर काय मोठे आकाश कोसळणार आहे या भाषेवर? तेव्हा हे असले उद्योग करण्यापेक्षा जेवढे काही परवडते आहे, तितक्यातच जमेल तितकी साहित्यिक मौज करणे यातच शहाणपणा नव्हे काय?
या व्यवहारात रमलेली बरीचशी मंडळी याचे उत्तर नाही असे देतील. याचे कारण त्यांना साहित्य व्यवहारातील कलात्मकतेशी काहीही देणेघेणे नाही. उटपटांगगिरी हेच त्यांचे कार्यक्षेत्र. त्याचमुळे या अशा व्यवहारांच्या केंद्रस्थानी असलेल्या, सांस्कृतिक माहेरघर म्हणवून घेणाऱ्या पुण्यातील साहित्य संस्था निवडणुकीत दुसऱ्याचीच खोटी स्वाक्षरी करून निवडणूक लढण्याचा प्रयत्न प्राध्यापक म्हणवून घेणारा करतो आणि या प्रकरणात कारवाईचा आग्रह धरण्याऐवजी ते मिटवण्यासाठीच हे सरस्वतीपूजक प्रयत्न करतात. साहित्याने समाजजीवनास दिशा देणे अपेक्षित असते. परंतु स्वत:ची ही अशी दशा करून घेतल्यावर ही मंडळी समाजास सोडा, स्वत:ला तरी काय दिशा देणार? इंग्लंडला वा अमेरिकेला गेल्यावर कोणी तरी यांच्या मोफत राहण्याहिंडण्याची सोय करतो म्हणून अशा व्यक्तीला हे साहित्य संमेलनातून डोक्यावर घेऊन हिंडणार. परदेशात सोडाच, पण नवी दिल्लीत जाणाऱ्या साहित्यिकांना हिंडण्यासाठी मोटारगाडी देणाऱ्याच्या ऋ णाची परतफेड म्हणून त्यास विचारवंत ठरवण्यासही मागेपुढे न पाहणाऱ्यांचा हा वर्ग. त्यांच्या संमेलनासाठी पुरस्कर्ता लागतो. पण तसा पुरस्कर्ता नसेल तर शेजारच्या अहमदनगर जिल्ह्य़ात नृशंस दलित हत्याकांडामागील वास्तव शोधण्यासाठी आपली वेस ओलांडावी असे काही या साहित्यिकांना वाटत नाही. या घुमान साहित्य संमेलनासाठी म्हणे पुणे, मुंबई आणि अर्थातच स्वागताध्यक्षांचे नागपूर येथून विमाने भरभरून साहित्यिक, पत्रकारांना नेण्याची तयारी सुरू आहे. जवखेडा हत्याकांडातील बळींचे अश्रू पुसण्यासाठी असा काही यजमान नसल्यामुळे तेथे कोणी फिरकले नाही. इतकेच काय, तेथे जे झाले त्यावर या अ. भा. साहित्यिकांनी काही भूमिका घेतली असेही घडलेले नाही. हे सगळेच हिणकस म्हणावे असे आहे आणि यात सुधारणा होते आहे, असेही नाही.
संत नामदेव यांचे स्मरण महाराष्ट्रात राहूनही करता येते, त्यासाठी घुमानला जायची गरज काय, असा प्रश्न साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी विचारला आहे. साहित्य व्यवहारांत वयपरत्वे येणारे ज्येष्ठत्व कर्णिक यांच्याकडे आले आहे आणि खांद्यावरच्या शालीनतेने कर्णिक ते वसूलही करीत असतात. तेव्हा त्यांनाही घुमानला जाऊन करणार काय, असा प्रश्न पडला असेल तर तो निदान कोमसापला तरी विचारार्थ वाटावयास हरकत नाही. बाकी या सारस्वताच्या अंगणात अन्य सर्व गप घुमानच राहून एक दौरा पदरात पाडून घेण्यात धन्यता मानतील यात शंका नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा