सरत्या वर्षांत ‘कलाभान’ या सदरातून जागतिकीकरणोत्तर कलेची चर्चा कशी झाली आणि बाजारकेंद्री कलेला कलावंतांनी दिलेल्या प्रतिसादाची नोंद कशा प्रकारे घेतली गेली, याचा हा आढावा..
कलाभान हे सदर लोक वाचत. त्यांना काही प्रश्न पडत. सदरात मांडलेले काही प्रश्न कुणाकुणाला नीट कळत नसत. या सदरापुरतंच बोलायचं तर- त्या न कळलेल्या प्रश्नांपैकी ‘भारतीयते’चा मुद्दा आज कसा पाहायचा आणि त्या मुद्दय़ानंतर काय, हा प्रश्न (सदरातल्या लेखांच्या क्रमापुरता) अलीकडचा होता आणि तो न कळल्याच्या तक्रारी आल्या. गेल्याच आठवडय़ात, ‘भारतीयता म्हणजे आजच्या संदर्भात काय, याचा शोध नेहमी सुरू ठेवावा लागणारच. या प्रकारे, बदललेल्या भारतीय वास्तवाचा शोध अनेकांनी घेतला, हे त्यांच्या चित्रांतून दिसतंही आहे. तो शोध सन १९९०नंतरच्या बाजारकेंद्री कलाव्यवहारामुळे दबला असेल, पण संपलाय कुठे?’ अशा अर्थाचे मुद्दे या सदराच्या जागेत मांडून महेंद्र दामले यांनी हा विषय कळेल असा केला आहे.
इथून आता आपल्याला पुढली चर्चा करायची आहे. ‘भारतीयते’चा विषय दामले यांनी चांगला धसाला लावला. ‘कलाभान’ हे सदर आता संपुष्टात येणार आहे. त्यामुळे या सदरातील लेखांची धावती उजळणी करणं हे ‘बाजारकेंद्री कलेचं काय करायचं?’ याच्या चर्चेइतकंच इथे- आत्ता आवश्यक वाटतं आहे.   
‘बाजारकेंद्री’ हा शब्द अर्थवाही आहे आणि नापसंती-दर्शकसुद्धा. त्यातला अर्थ असा की, बाजार हेच कलाव्यवहाराच्या वर्तुळाचं केंद्र आहे. आजचा- म्हणजे सन १९९०नंतरचा कलाव्यवहार बाजाराभोवती फिरतो आहे. नापसंतीचा भाग असा की, खरंतर असं नसायला हवं. १९९०नंतर व्यवहाराच्या सर्वच क्षेत्रांत जे बदल शिरत गेले, ते दडपवून टाकणारे आहेत.
‘असं नसायला हवं’ हे जागतिकीकरणाच्या अनेक व्यवहारांबद्दल म्हणून झालेलं आहे, ती बाजू लावून धरणारे पुष्कळ विचारकर्ते-कार्यकर्ते आहेत. आणखी जास्त संख्येनं लोक (जागतिकीकरणोत्तर परिस्थितीबद्दल) म्हणतात की ‘हे दडपवून टाकणारं आहे’. मग हे असे लोक दडपून जातात. ते करत काहीच नाहीत, पण परिस्थितीला पटापटा शरण जातात. हे शरणागत लोक अवतीभोवती सहज दिसू शकतात. आणखी तिसऱ्या प्रकारचे लोक म्हणजे शरण तर जायचं नाही, पण ‘समजा ही परिस्थिती म्हणजे आपली शत्रू आहे तर मग शत्रूचा आणि त्याच्या डावपेचांचा अभ्यास तरी करू’ आणि ‘एवढय़ा शत्रुवत् परिस्थितीला झिडकारण्याचे कोणते मार्ग आत्ता सहज दिसताहेत ते तरी मोजू’ अशा विचारानं पावलं उचलणारे. हे तिसऱ्या मानसिकतेचे लोक बहुतेकदा फक्त संवादक किंवा अभ्यासक असतात; त्यांच्यात कार्यकर्ते नसतात. महाराष्ट्रातल्या चित्रकला/ दृश्यकला क्षेत्रापुरतं बोलायचं तर ‘कलाभान’ हे सदर तिसऱ्या मानसिकतेचं आहे आणि शिक्षण क्षेत्रात कार्य करणारे दामले हे ‘असं नसायला हवं’ या (पहिल्या) मानसिकतेचे सक्रिय प्रतिनिधी ठरतात. याखेरीज चौथ्या मानसिकतेची (३+१=४) कल्पना वाचकांना कदाचित करता येईल.
तिसऱ्या- म्हणजे बाजारकेंद्रीपणाचा बाऊ न करणाऱ्या मानसिकतेतून ‘कलाभान’ लिहिलं गेलं. त्यामुळे इथं कायम कोणत्या ना कोणत्या आर्ट गॅलरीत प्रदर्शित झालेले, जर्मनीच्या कासेल शहरातलं डॉक्युमेंटा हे दर चार वर्षांनी भरणारं महाप्रदर्शन आणि व्हेनिस किंवा आणखी कुठल्या शहरातलं द्वैवार्षिक प्रदर्शन (बिएनाले) इथं कलाकृती प्रदर्शित करण्याची संधी मिळालेले, यांचीच उदाहरणं घेतली गेली आणि त्यांचीच चर्चा झाली. बहुतेक सर्व उदाहरणं ही लेखकानं पाहिलेली, अनुभवलेली होती. आजच्या काळात कलाकृती अनुभवण्याचा मार्ग हा अशा प्रदर्शनांतूनच जातो, याची जाणीव इथे करून द्यायला हवी. काही अपवाद आहेत. शिल्पा गुप्तानं लोकल गाडय़ांत फिरून रक्ताच्या रंगाचं एक द्रावण लोकांना दिलं होतं, त्या द्रावणाला ‘ब्लेम’ हे नाव आहे आणि समाजातले निरनिराळे घटक (किंवा घटक एकमेकांना निरनिराळे मानून) कसा दोषारोप करतात हे या कलाकृतीचं इंगित आहे, याबद्दलचा ‘समाजचित्रांचे फटकारे’ हा लेख (२३ सप्टेंबर) किंवा मराठी नियतकालिकांच्या पानांमधूनच अधिक दिसणारी श्रीधर अंभोरे यांची रेखाचित्रं (चित्र वाईट कसं ठरवणार?- २५ फे ब्रुवारी) यांबद्दल ‘कलाभान’मध्ये लिहिलं गेलं. पण हे अपवादच ठरणार, कारण चित्रकलेचं विक्रीपर प्रदर्शन करणारी कलादालनं- गॅलरी ही संस्था आता आपल्या व्यवस्थेचा भागच झाली आहे. अशा गॅलऱ्यांत समाजाच्या अधिकाधिक जवळ जाणाऱ्या कलाकृती कशा मांडायच्या याचा विचार करणारे चित्रकार कोण आहेत, त्यांनी काय केलं, याचा विचार सप्टेंबरातील ‘कलाभान’-लेखांमध्ये अधिक झाला होता. राजकीय जाणिवेची कला जागतिकीकरणात (आणि प्रदर्शनांत!) असू शकते का? कुठे आहे? त्यात चांगलं काय आहे? राजकीय जाणिवा आणि ‘भावविश्व’ यांची सांगड घालणारी (म्हणूनच) कलाकृती आज कोण करतं आहे? हे प्रश्न जुलै महिन्यातल्या तीन लेखांमध्ये महत्त्वाचे ठरले होते. यापैकी अखेरच्या- ‘राजकीय जाणिवांची कला- आग्रहापासून असण्याकडे’ – या लेखात (२९ जुलै) मात्र, राजकीय जाणिवेनं काहीच न सांगता नुसतं असणं हे आजच्या कलेचं लक्षण बनतं आहे, असा निरीक्षणाअंती आलेला निष्कर्ष मांडलेला होता.
स्त्रीचित्रण आणि आत्मचित्रण यांची जी सांगड सिंडी शर्मन (अमेरिका), एन. पुष्पमाला (बंगळुरू/ दिल्ली), शादी घदिरियान (इराण) आणि मानसी भट्ट (मुंबई) यांनी घातली, त्याबद्दल चार लेख एप्रिल महिन्यात प्रसिद्ध झाले. फोटोग्राफी, परफॉर्मन्स आर्ट अशा माध्यमांचा वापर या चौघी करत आहेत, त्यातून नेपथ्य- वेषभूषा, रंगभूषा आणि दिग्दर्शन ही व्यवधानं निरनिराळी न राहता ‘दृश्यनिर्मिती’चा भाग होताहेत, असं निरीक्षण होतं. पण या चौघींमुळे जी स्त्रीरूपं दिसली, ती काळाचा आणि समाजाचा चेहरा आहेत, हा धागा कायम होता. घदिरियान यांच्या कामाची विस्तृत चर्चा करणाऱ्या लेखाचं नावच ‘समाजाचा चेहरा’ (२९ एप्रिल) असं होतं.
खा-उ-जा (खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण) धोरणांचा मानवी जगण्यावर आणि स्व-कल्पनेवर होणारा दूरान्वित परिणाम म्हणजे ‘वस्तूकरण’. केवळ स्त्रीचं वस्तूकरण नव्हे.. (ते तर जागतिकीकरणाआधी ज्या कुठल्या व्यवस्था होत्या, त्यांमध्येही होतंच).. आता जगण्याचं वस्तूकरण, त्यातून जाहिरातींमधले थेट संदेश आणि चित्रांमधल्या आशयाचा संवेदनाव्यवहार यांमधला फरक अधिक तीव्र होणं, हा फरक तीव्र कसा आहे हे सांगण्याच्या नादात पॉप आर्टनं जाहिरातींच्या लोकप्रियतावादी भूमिका अंगीकारणं, त्यातून वस्तू आणि माणूस यांच्यात विचित्र ‘फेटिश’सारखा संबंध निर्माण होणं आणि याउलट- प्रभाकर बरवे यांच्यासारख्या चित्रकार भारतीय संवेदनशीलतेतून (आणि वस्तूकरणाच्या झळा भारतात पसरण्याआधी) वस्तूंना दिलेला चित्रप्रतिसाद यांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न ‘कलाभान’ने मे महिन्यात केला होता. हादेखील जागतिकीकरणोत्तर प्रवृत्तींच्या निरीक्षणाचा एक प्रकार. निरीक्षणातून वस्तूकरण रोखलं जाणार नाही. जाऊ शकत नाही. पण मुद्दा चर्चेत येऊ शकतो. तो आला, असं पुढे इंटरनेटवरल्या एका चर्चास्थळावर दिसलं होतं.
कलाविषयक चर्चा करताना नेहमी हळवंच राहायचं, कला हा ‘सॉफ्ट’ विषय मानायचा, ही प्रवृत्ती आपल्याकडे फार आहे. त्या प्रवृत्तीला खिजवणं हा जर मार्ग असेल, तर कलाभाननं फारच अत्यल्प प्रमाणात का होईना, तो पत्करला कधी कधी. पण त्याहीपेक्षा जास्त वेळा, ते जे काही हळवे भाग आहेत, त्यामधल्या चर्चाना निराळं वळण देता येतं का असा प्रयत्न ‘कलाभान’नं काही महिन्यांत केला. वर्तमानपत्री कलाविषयक सदरालाही काही हेतू (प्रसिद्धीपेक्षा निराळा) असू शकतो, त्या हेतूला लेखकाच्या राजकीय-सामाजिक भूमिकांचे आयाम असू शकतात, एवढं जर कुणाला कळलं असेल, तरी भरपूर झालं. कलाव्यवहाराबद्दलची- ‘कलासमाज’ किंवा ‘आर्ट पब्लिक’ या शब्दाची चर्चा करताना आजचा कलासमाज बाजारकेंद्रित्वाला शरण गेलेला आहे का, या शंकेची विविध रूपं (ऑक्टोबरचे चार लेख) प्रकट झाली होती. जागतिकीकरणाच्या काळात कलेच्या प्रदर्शनीयतेचा विस्तार होत गेल्यामुळे कलासमाज वाढला असं प्रथमदर्शनी दिसतं, पण वाढले आहेत ते या कलासमाजाला लोंबकळणारे लोक, असं निरीक्षण ‘कलासमाजाला लोंबकळणारे लोक’ या शीर्षकाच्या लेखात (२१ ऑक्टोबर) होतं.
भारतीयतेची चर्चा म्हणाल, तर तिचा धागा पहिल्या लेखापासून अनेकदा येत होता. ‘भारतीयता’ हे मूल्य आहे की नाही, याबाबत कलाभाननं भूमिका स्पष्ट केली नाही, असं या अनेक लेखांतून दिसेल. प्रस्तुत लेखकाच्या मते कलेत भारतीयता हे जर मूल्य असेल तर ते समाजाभिमुखता, राजकीय जाणिवा यांच्यासारखंच एक मूल्य आहे. त्याला सर्वोच्च वगैरे कलेपुरतं तरी मानता येणार नाही. वस्तूकरणाबद्दलच्या निरीक्षणांतून अवचित बरवेंची भारतीयता भिडण्याचा प्रसंग एकदा (२३ मे) आला, तेव्हा बरं वाटलं. पण कुठल्याही एकाच मूल्याला कलेचा विचार बांधला जाऊ शकत नाही.
कलेला देश-काल नसतो हे विधान अलंकारिक अर्थानंच खरं आहे. सांस्कृतिक संदर्भ असतातच. त्या संदर्भाची वाटणी बऱ्यापैकी देशनिहाय झालेली असल्याच्या काळात आपण जगतो आहोत. तेव्हा संस्कृतीला अगदी पाकिस्तान नावाचासुद्धा देश कलाविचारापुरता चालतो. जागतिकीकरणोत्तर बाजारात कलेचा संसार टिकताना पुन्हा देशांना महत्त्व आल्याचं दिसतं आहे, ते या सांस्कृतिक संदर्भाच्या वैविध्यामुळे आणि त्या संदर्भाची नीटसपणे देशनिहाय मांडणी झालेली असल्यामुळे. तेव्हा आता या सांस्कृतिक संदर्भाचंसुद्धा वस्तूकरण होतंय की काय, अशी भीती आहे. वेफर्सच्या स्वादांवरले देशांचे उल्लेखही इथं आठवून पाहा!
पण त्या भीतीसोबतच, कुणीतरी दृश्यकलावंत या वस्तूकरणाला नक्की उत्तर देईल, असा विश्वासही सर्वानीच बाळगायला हवा. नाहीतर कलाभानही होतं कधीतरी असं म्हणण्यात काहीच अर्थ नाही.

Story img Loader