‘लाँग मार्च आणि भारतीय चळवळी’ हे केशव आचार्य यांचे पत्र (लोकमानस, २ सप्टेंबर) वाचले. आपल्याकडे बंदसाठी धाकदटपशा आणि हिंसाचार केला जातो, हे आचार्य यांचे निरीक्षण पटले. धाकदटपशा होतो, याचे कारण असे की ज्या गोष्टीसाठी बंद केला जातो ते कारण सर्व समाजाच्या हिताचे नसते. उदाहरण द्यायचे झाले तर आसाराम बापूवर करण्यात आलेल्या आरोपाचा आणि त्यांच्या अटकेचा विरोध म्हणून लोकांनी रास्ता रोको, रेल रोको केले. या आंदोलकांची संख्या खूपच कमी होती.
आचार्य यांच्या पत्राचा मुख्य भर अमेरिकेतील समतावादी चळवळीला मिळालेल्या पाठिंब्यावर आहे. मार्टनि ल्यूथर किंग यांचा लाँग मार्च ही मानवी हक्कांसाठी चालू असलेली एक चळवळ होती, ज्यामध्ये ७० ते ८० टक्के हे कृष्णवर्णीय लोक होते आणि हेच त्यांच्या एकीचे कारण होते आणि म्हणून ती चळवळ एवढी मोठी होती. अमेरिकेत दोनच गट होते काळे आणि गोरे त्यातही १५ ते २० टक्के गोऱ्या लोकांनी माणुसकी दाखवून चळवळीत सहभाग घेतला. भारतासारखी जाती-धर्माची क्लिष्ट बंधने किंवा ती जपू पाहणारे सनातनी विचार अमेरिकेत त्या वेळीही नव्हते आणि आताही नाहीत, हे लक्षात घेतले पाहिजे.
ज्याप्रमाणे उदारमतवादी विचार दाखवून अमेरिकेत नागरी हक्क कायदा आणि मतदानाचा अधिकार कायदे केले एवढे उदारमतवादी विचार किंवा धोरण भारतातील सुशिक्षित उच्चवर्णीयांनी इथल्या बहुसंख्याबद्दल इतिहासात दाखवले किंवा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे का? याच कारणामुळे आंबेडकरांनी आरक्षणाची तरतूद घटनेत केली आणि मार्टनि ल्यूथर यांना आरक्षणाची गरज वाटली नाही.
इथे मला हेही सांगावेसे वाटते की इथल्या जातिव्यवस्थेमुळे होत असलेले अन्याय-अत्याचार जगातील इतर कुठल्याही गुलामगिरीपेक्षा किंवा वर्णद्वेषापेक्षा भयानक असे होते, हे डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या लेखणीतून दाखवून दिले आहे. एक कृष्णवर्णीय अमेरिकेत राष्ट्रप्रमुख म्हणून निवडून येते आणि जगाने ज्ञानाचे द्योतक मानलेल्या डॉ. आंबेडकरांना मात्र येथील जनतेने नीट समजून घेतलेले नाही. भारताला खरेच स्वत:ला अमेरिकेच्याही पुढे जायचे असेल तर इथल्या लोकांना विचारपरिवर्तन करावे लागेल, एक तर आरक्षणाची गरज समजून घ्यावी लागेल किंवा अशी व्यवस्था निर्माण करावी लागेल, जेणेकरून इथल्या शोषित, गरीब समाजाला आरक्षणाची गरज भासणार नाही.
– राहुल रं. दंडगे, (विद्यार्थी, टाटा समाज विज्ञान संस्था) मुंबई
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा