भावनांवरही चालणारे राजकारण, त्याचे आर्थिक पैलू, त्याचा तळातील माणसावर आणि मातीतील माणसावर म्हणजे शेतकऱ्यांवर होणारा परिणाम यांचा वेध घेणाऱ्या नव्या पाक्षिक सदरातील हा पहिला लेखांक, वाढत्या आकांक्षांबद्दलचा..
साबरमतीच्या निळ्याशार पाण्यावरून सीप्लेनने उड्डाण करून पंतप्रधानांनी गुजरातच्या आपल्या प्रचारदौऱ्याची सांगता केली. भारताच्या इतिहासात प्रथमच एखाद्या राजकीय नेत्याने आपल्या प्रचारदौऱ्याची सांगता अशा दिमाखदार पद्धतीने केली असेल. ते दृश्य पाहताना आपल्या मनात कोणत्या भावना आल्या? आपण नरेंद्र मोदींच्या राजकारणाचे समर्थक असू वा विरोधक असू, पण आपली चिकित्सक बुद्धी मध्ये न आणता या दिमाखदार उड्डाणाच्या दृश्याने आपल्या मनात तात्काळ उमटलेली भावनिक प्रतिक्रिया कोणती? या प्रश्नाचे उत्तर महत्त्वाचे आहे. कारण राजकारणात भावना महत्त्वाच्या असतात आणि सीप्लेनचे उड्डाण ही लोकांच्या आकांक्षांना प्रतिसाद देणारी राजकीय रणनीती होती.
पंचवीस वर्षांपूर्वी असे कोणत्या राजकीय नेत्याने केले असते, तर त्याच्यावर टीकेचा भडिमार झाला असता. देशात एवढी गरिबी आहे, शेतकरी दैन्यावस्थेत आहे आणि अशा वेळी आपले पंतप्रधान अमेरिकी विमानातून अशा श्रीमंती चनीचे प्रदर्शन करीत आहेत, अशा टीकेची झोड उठवण्यात आली असती. या उड्डाणाला लागलेल्या खर्चावर, सीप्लेन परदेशी बनावटीचे असण्यावर, पायलटदेखील परदेशी असण्यावर टीका झाली असती. अशी किरकोळ टीका या वेळीही झाली, पण ती अगदीच किरकोळ होती. राहुल गांधींना याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनीदेखील अशा प्रकारची टीका करण्याचे टाळले.
तीच गोष्ट बुलेट ट्रेनची. सरकारी पशाचा प्राधान्यक्रम बुलेट ट्रेन हा असायला हवा की आणखी काही, असे प्रश्न उपस्थित केले गेले आहेत, पण गुजरातच्या निवडणुकीत मात्र काँग्रेसने हे प्रश्न उपस्थित करणे टाळले. अन्यथा ‘‘बुलेट ट्रेनच्या विरोधकांना बलगाडीतून प्रवास करणारा भारत हवा आहे’’ हे मोदींनी एकदाच वापरलेले वाक्य त्यांना वारंवार वापरता आले असते.
१९९०च्या आर्थिक सुधारणांनंतरचा भारत हा आकांक्षांचा स्फोट झालेला भारत आहे, हे नरेंद्र मोदींना माहीत आहे आणि आकांक्षावादी राजकारणात (अॅस्पिरेशनल पॉलिटिक्स) नरेंद्र मोदी यांनी आपल्या विरोधकांना नेहमीच बॅकफूटवर टाकले आहे. हे आकांक्षावादी राजकारण एका गृहीतावर आधारलेले असते. समाजातील आर्थिकदृष्टय़ा तळातील लोकांना काही आपण कधी काळी सीप्लेनमध्ये किंवा बुलेट ट्रेनमध्ये बसू असे वाटत नसते, पण या गोष्टी त्यांच्यासाठी गतिमानतेचा संदेश देत असतात. आपण सीप्लेनमध्ये नाही बसणार, पण आपण या गतिमान अर्थव्यवस्थेचा भाग असल्यामुळे आपणही लवकरच आपल्या आजच्या वाईट आर्थिक परिस्थितीतून बाहेर पडू अशी आशा आणि उत्साह त्यांच्या मनात असतो. या प्रक्रियेचे अर्थतज्ज्ञ अल्बर्ट हर्षमन यांनी बोगद्याच्या रूपकाद्वारे उद्बोधक विश्लेषण केले आहे, पण त्या रूपकाकडे वळण्याआधी आपण सुरुवातीला उपस्थित केलेल्या प्रश्नाकडे पुन्हा वळू.
सीप्लेनचे उड्डाण सर्वानाच आश्वासक वाटले असेल का? काही लोकांना- उदाहरणार्थ गुजरातेतील ग्रामीण गरिबांना, शेतकऱ्यांना सीप्लेनने नाराज तर केले नसेल ना? आपल्या हलाखीच्या परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर ही रणनीती त्यांना जखमेवर मीठ चोळणारी तर वाटली नसेल ना? या प्रश्नाचे निश्चित उत्तर नाही देता येणार, पण हा प्रश्न उपस्थित करणे सयुक्तिक आहे; कारण गुजरातेतील ग्रामीण जनतेच्या नाराजीचा भाजपला मोठा फटका बसला आहे हे नाकारून चालणार नाही.
हर्षमन यांचे ‘बोगदा’ रूपक
विषम समाजव्यवस्थेत लोकांच्या आशा-आकांक्षा कधी पल्लवित होतात आणि कधी त्यांचे निराशेत रूपांतर होते याचे विश्लेषण अल्बर्ट हर्षमन यांचे रूपक नेमकेपणाने करते. कल्पना करा, की तुम्ही वाहनात बसून बोगद्यातून जाणाऱ्या दुपदरी रस्त्याने प्रवास करता आहात आणि ट्राफिक जाम झाला आहे. तुमची नजर पोहोचेल तिथपर्यंत वाहने खोळंबली आहेत. अचानक तुमच्या शेजारच्या रस्त्यावरील वाहतूक सुरू होते. सुरुवातीला तुम्हाला हे आश्वासक वाटते. म्हणजे तुम्ही जरी अजून जागचे हलले नसाल तरी निदान रस्ता मोकळा तर झाला आहे. तेव्हा आपल्या रस्त्यावरील वाहतूकदेखील सुरू होईलच की. पण थोडा वेळ गेला तरी तुम्ही जागचे हलत नाही, पण शेजारच्या रस्त्यावरून मात्र वाहने वेगात जात आहेत. थोडय़ा वेळाने तुम्हाला राग यायला लागतो आणि दुसऱ्या रस्त्यावरील लोकांबद्दल मत्सरदेखील वाटायला लागतो. आता तुम्हाला आणि तुमच्या रस्त्यावरील सर्वाना पुढे काही तरी आपल्यावर पक्षपात करणारे अन्याय्य घडते आहे असे वाटायला लागते. आपल्यावरील हा अन्याय तात्काळ आणि थेटपणे दूर करण्याची कृती मनात येऊ लागते. शेवटी तुम्ही असे करणे बेकायदा असतानादेखील आपला रस्ता सोडून दुसऱ्या रस्त्यात आपली गाडी घालता.
विकास जर सर्वसमावेशक नसेल तर समाजात स्फोटक परिस्थिती उद्भवू शकते, हा इशारा हर्षमन देतात.
आपल्या समाजातील आर्थिकदृष्टय़ा तळातील घटकाला आपण कोणत्या रस्त्यावर आहोत असे वाटते आहे? शेजारच्या रस्त्यावरील वाहतूक वेगात चालू आहे आणि म्हणून आपल्यालाही आशा बाळगायला जागा आहे असे त्यांना वाटते, की आपण आता खूप वाट पाहिली आणि म्हणून आपल्यावर मोठा अन्याय होतोय असे त्यांना आता वाटू लागले आहे?
आकांक्षांचा स्फोट
भाजप सत्तेवर येण्याआधी काँग्रेसप्रणीत यूपीए सरकार सलग दहा वर्षे सत्तेवर होते, पण गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला भारताच्या इतिहासातील सर्वात कमी जागा मिळाल्या. आश्चर्य म्हणजे हीच दहा वर्षे देशाचा सरासरी आर्थिक वृद्धिदर (ग्रोथ रेट) हा भारताच्या इतिहासातील सर्वात जास्त म्हणजे वर्षांला ७.६ टक्के इतका होता. (जिज्ञासूंनी मत्रीष घटक आणि त्यांच्या सहलेखकांचा ईपीडब्ल्यू ४९/१६ मधील शोधनिबंध वाचावा). पण तरीही यूपीएला जबर पराभव स्वीकारावा लागला. १.७६ लाख कोटी रुपयांचा स्पेक्ट्रम घोटाळा झाला असे लोकांना वाटले म्हणून हा पराभव झाला, हे स्पष्टीकरण पुरेसे नाही. मुळात लोकांमध्ये मोठा असंतोष होता आणि त्या असंतोषामुळे टू-जी घोटाळ्याच्या प्रचारावर लोकांचा विश्वास बसला.
जर यूपीएच्या दशकात देशाचा संपत्ती वृद्धीचा सरासरी दर आजवरचा सर्वात जास्त होता, तर मग या सरकारच्या दारुण पराभवाचे स्पष्टीकरण आपण कसे देणार ?
देशातील संपत्ती-निर्मितीचा वेग जेव्हा वाढतो तेव्हा नवीन गुंतवणूकदेखील वाढते. या काळात परकीय भांडवलदेखील मोठय़ा प्रमाणात भारतात येऊ लागले. दारिद्रय़निर्मूलनाचा वेग वाढला, सरकारकडे वाढलेल्या महसुलामुळे पायाभूत सेवांच्या निर्मितीकडे पसा मोठय़ा प्रमाणावर वळू लागला, पण त्याचबरोबर लोकांच्या आकांक्षांचादेखील स्फोट झाला आणि त्या पूर्ण करणे अर्थव्यवस्थेला शक्य होत नव्हते. यूपीएचा पराभव आर्थिक वृद्धिदर मंदावल्यामुळे नाही झाला, तर तो वाढल्यामुळे झाला! त्यांच्या आर्थिक यशातच त्यांच्या अपयशाची बीजे होती. कारण त्या वाढलेल्या आर्थिक वृद्धिदराने लोकांच्या आकांक्षावाढीचा दर खूप जास्त वाढवला. नरेंद्र मोदींचा राष्ट्रीय राजकारणातील उदय या पाश्र्वभूमीवर झाला. नरेंद्र मोदी यांनी आकांक्षांचा हा स्फोट आणि ही अस्वस्थता नेमकेपणाने हेरली. त्यांचे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिले गेलेले संदेश हे एकाच वेळी विकसनशील देशाच्या पातळीवरून प्रगत देशाच्या पंगतीत नेणारे बुलेट ट्रेनचे जसे होते तसेच तरुण आणि शेतकऱ्यांना अनुक्रमे वर्षांला दोन कोटी रोजगार आणि पन्नास टक्के नफ्याचे हमी भाव देणारे होते.
नवीन वर्ष मध्य प्रदेश, राजस्थान यांच्या निवडणुकीचे असेल आणि त्यापुढील वर्ष लोकसभेच्या निवडणुकीचे असेल आणि आर्थिक वृद्धिदराने तर गेल्या चार वर्षांतील नीचांक गाठला आहे. शेतकऱ्यांमधील असंतोष अनेक मार्गानी व्यक्त होतो आहे. तसाच तरुणांमधील असंतोषदेखील जिग्नेश मेवाणी आणि हार्दकि पटेलच्या स्वरूपात पाहायला मिळतो. या प्रक्रियांचे आर्थिक परिमाण नाकारता येणार नाहीत. या सर्वाला भारताचे आजच्या घडीचे सर्वात प्रभावशाली आणि सर्वात चाणाक्ष नेतृत्व कसे प्रतिसाद देईल? गालिब एका शेरमध्ये ईश्वराला विचारतो की, माझ्या तमन्नांचें (आकांक्षा) दुसरे पाऊल कुठे आहे? असे तर नाही ना, की संभाव्यतेच्या या वाळवंटात मला माझ्या आकांक्षांच्या फक्त पाऊलखुणाच दिसणार?
प्रगत देशांच्या पंगतीत बसण्यास अधीर झालेला मध्यमवर्ग आणि अस्वस्थ तरुण आणि शेतकरी यांना मोदी प्रतीकात्मक आणि आर्थिक धोरणात्मक कोणता प्रतिसाद देतील यावर या वर्षांतील राजकारण ठरणार आहे.
ही सर्व राजकीय गजबज, त्याचे आर्थिक पैलू, त्याचा तळातील माणसावर आणि मातीतील माणसावर म्हणजे शेतकऱ्यांवर होणारा परिणाम याचा वेध घेण्याचा प्रयत्न या सदराद्वारे केला जाईल.
लेखक आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांवर लेखन करतात.
ईमेल : milind.murugkar@gmail.com