गेल्या सुमारे सहा दशकांतील भारतीय राजकारण आणि समाजजीवनाशी चांगला संपर्क असलेले राम जेठमलानी हे तसे वादग्रस्त ठरलेले व्यक्तिमत्त्व. भाजप या राजकीय पक्षाशी त्यांची बांधीलकी असल्याने त्यांच्या लेखनात समतोल आणि तटस्थता पाहायला मिळत नाही. प्रस्तुत पुस्तकही त्याला अपवाद ठरत नाही.
स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील आक्रमक व वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणून बॅ. राम जेठमलानी सुपरिचित आहेत. फाळणीच्या झळा सोसून भारतात आलेल्या तत्कालीन हिंदू कुटुंबांपैकी असलेले जेठमलानी गेली सुमारे चार दशकं देशाच्या सार्वजनिक जीवनात विविध पातळ्यांवर आपलं अस्तित्व आणि वेगळेपण वेळोवेळी दाखवून देत आले आहेत. या काळातील अनेक राजकीय घटनांचे ते साक्षीदार आहेतच, शिवाय आणीबाणीनंतर आजतागायत निरनिराळ्या काळातील राजसत्तांना ते आव्हान देत राहिले आहेत. देशापुढील राजकीय-सामाजिक प्रश्नांबाबत जेठमलानी परखडपणे बोलत-लिहीत असतात आणि त्यामुळेच अनेकदा वादाचेही धनी होत असतात. ‘मव्हेरिक अनचेंज्ड, अनरिपेन्टन्ट’ हा त्यांनी वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचा संग्रह. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा गेल्या सुमारे सहा दशकांमध्ये देशात झालेल्या राजकीय घडामोडींना उजाळा देत त्यावरील त्यांचं भाष्य वाचकांपुढे आलं आहे.
विषयांच्या संदर्भानुसार चार प्रकरणांमध्ये हे लेख संकलित केलेले आहेत. त्यापैकी पहिलं प्रकरण जेठमलानींच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा, भारत-पाकिस्तान व भारत-चीन संबंधांवरील लेखांचं आहे. स्वाभाविकपणे त्यात काश्मीरलाही स्वतंत्र स्थान देऊन चर्चा केलेली आहे. देशाच्या स्वातंत्र्याबरोबर फाळणीचं विष पचवावं लागलेले अनेक जण त्याबाबत कटुतेने, काहीशा विषादाने बोलताना दिसतात. पण जेठमलानी त्याला अपवाद आहेत. ‘पाकिस्तान : इन द श्ॉडो ऑफ जिहाद’ या लेखात या दोन देशांचा इतिहास आणि भविष्यातील आव्हानांबाबत त्यांनी ऊहापोह केला आहे. पाकिस्तानातील सद्य:स्थितीचा आढावा घेताना दहशतवाद हा त्या देशाच्या लोकशाहीला धोका ठरू शकतो, असा इशारा ते देतात. अशा परिस्थितीत नव्या शतकाची आव्हानं पेलताना ऐक्य, सहृदयता आणि प्रेम हाच उपाय ठरू शकतो, असं सांगून त्यासाठी दोन्ही बाजूंनी उच्च दर्जाच्या मुत्सद्देगिरीची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे.
याच लेखाचा काहीसा विस्तारित भाग म्हणजे ‘काश्मीर- टाइम टू मूव्ह ऑन’ हा लेख. १९४७-४८च्या बंडखोरीपासून अगदी अलीकडच्या काळात सध्याच्या फुटीरतावादी गटांबरोबर समझोत्यासाठी झालेल्या प्रयत्नांचा त्यामध्ये आढावा आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी २००२मध्ये अब्बास अन्सारी यांच्या नेतृत्वाखालील हुरियत कॉन्फरन्सशी चर्चा करण्यासाठी नियुक्त केलेल्या काश्मीर समितीचे जेठमलानी सदस्य होते. त्या वेळी झालेल्या काही सकारात्मक घडामोडींचा स्वाभाविकपणे या लेखात उल्लेख आहे. २००४मध्ये वाजपेयी सरकारच्या पराभवामुळे या प्रक्रियेला मोठा फटका बसला. काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीने २०१०मध्ये नव्याने समिती नेमली. पण त्यातून फारसं काही निष्पन्न होऊ शकलेलं नाही, असं जेठमलानींनी आवर्जून नमूद केलेलं आहे. लेखात जागोजागी अपेक्षेनुसार पाकिस्तानचे आणि तिथल्या राज्यकर्त्यांच्या उचापतींचे संदर्भ आले आहेत. इथे पाकिस्तान आता तालिबानवादी होण्याच्या सीमेपर्यंत पोचला असल्याचा निर्वाळा जेठमलानींनी दिला आहे.
बॅ. जेठमलानी यांच्याबद्दल पूर्ण आदर राखूनही हे दोन लेख वाचल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध सलोख्याचे होण्यासाठी त्यांनी सुचवलेले उपाय म्हणजे भाबडा आशावाद आहे, असं खेदाने नमूद करावंसं वाटतं.
या प्रकरणातील तिसरा, ‘चायना- काऊंटर द ड्रॅगन बीफोर इट इज टू लेट’ हाही लेख भारत-चीन संबंध आणि त्यातही जागतिक पाश्र्वभूमीवर चीनच्या चाललेल्या डावपेचांचं, या उपखंडातील भू-राजकीय परिस्थितीचं अतिसुलभीकरण वाटतो.
पुस्तकातील ‘द मेकॅनिक्स ऑफ पॉवर’ या दुसऱ्या प्रकरणामध्ये देशांतर्गत राजकीय घटना-घडामोडींवरील लेखांचं संकलन आहे आणि इथे जेठमलानी नेहरू-गांधी घराण्यावर तुटून पडले आहेत. समाजवादी विचारांवरील नेहरूंचं प्रेम, त्यांचं देशाच्या अर्थव्यवस्थेबाबतचं भान, भाबडेपणापायी पाकिस्तान व त्याहीपेक्षा जास्त चीनच्या प्रश्नाचा त्यांनी केलेला विचका, अलिप्ततावादी चळवळ-पंचशील तत्त्वांमागचा भोंगळपणा, गुंगी गुडिया ते देशावर आणीबाणी लादणाऱ्या हुकूमशाहीवादी इंदिरा गांधी, उडाणटप्पू संजय गांधी, ‘मिस्टर क्लीन’ राजीवची बोफोर्स घोटाळ्यामुळे झपाटय़ाने ढासळत गेलेली प्रतिमा, जबाबदारीविना सत्ता भोगणाऱ्या सोनिया गांधी ते युवराज राहुल इथपर्यंतचा प्रवास या लेखांमध्ये आहे. स्वाभाविकपणे त्यात घराणेशाहीची सातत्याने चर्चा आहे. मात्र केवळ आपल्या राजकीय व आर्थिक भानगडी बाहेर येऊ नयेत, या हेतूने ते सत्ता आपल्या घराण्यातच ठेवण्याची धडपड करतात, हा जेठमलानींनी काढलेला निष्कर्ष म्हणजे, राजकीय व्यक्तिमत्त्वांबाबतचं आकलन आणि विश्लेषणातील तोकडेपणा म्हणावा लागेल. पंतप्रधान मनमोहन सिंग यांची सध्याची अवस्था, कुणीही यावं टपली मारून जावं, अशी झाली आहे. जेठमलानींसारखा आक्रमक विधिज्ञ ही संधी कशी सोडेल? संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (संपुआ) कारकिर्दीत उघडकीला आलेले घोटाळे, दहशतवाद रोखण्यात आलेलं अपयश, आर्थिक आघाडीवरील पीछेहाट अशा बाजूंवर त्यांनी जोरदार हल्ले चढवले आहेत आणि या सर्व प्रकारांना सोनिया गांधी, डॉ. सिंग व राहुल या त्रिकुटाला जबाबदार धरलं आहे. त्याचबरोबर भाजपचं हिंदुत्व आणि धर्मनिरपेक्षतेचीही चर्चा करत उत्तम प्रशासन ही सध्याच्या काळाची गरज असल्याचं आग्रहाने मांडलं आहे.
याच प्रकरणातील एका लेखात जेठमलानी यांनी देशाची न्यायसंस्था आणि प्रशासनात भ्रष्टाचारासह निर्माण झालेल्या विविध दोषांची चर्चा केली आहे. सध्याच्या केंद्र सरकारच्या कारकिर्दीत राजकारणी व नोकरशहा यांची अभद्र युती झाली असल्याची टीका स्वाभाविक म्हणावी लागेल. पण पंतप्रधान कार्यालयात ‘केरलाइट माफिया’ने बस्तान बसवलं असल्याचा सनसनाटी आरोपही त्यांनी केला आहे. मात्र अशा तऱ्हेने संपुआला धारेवर धरत असतानाच ‘पोलिटिकल लाइफ’ या लेखात नरेंद्र मोदींची मात्र व्यवस्थित भलावण केली आहे.
‘व्हेन कॉन्शन्स प्लीज’ या तिसऱ्या प्रकरणामध्ये जेठमलानींनी माहितीचा अधिकार आणि लोकपाल विधेयकाच्या अनुषंगाने झालेली आंदोलने आणि सत्ताधारांच्या डावपेचांचा तपशील देत सरकारी कारभारातील पारदर्शीपणाची गरज प्रतिपादन केली आहे. पण त्याबद्दल एकटय़ा काँग्रेसला जबाबदार धरता येणार नाही, हे ते सोयीस्करपणे विसरतात.
चौथ्या प्रकरणात खरं तर एकच महत्त्वाचा लेख आहे. सध्याच्या युगात धर्म आणि माथेफिरूपणाचा असलेल्या प्रभावाबद्दल त्यामध्ये चर्चा आहे. त्यातही मुख्यत्वे मुस्लिमांना सद्वर्तनाचे धडे दिले आहेत.
गेल्या सुमारे सहा दशकांच्या भारतीय राजकारण आणि समाजजीवनाच्या मोजक्या साक्षीदारांपैकी जेठमलानी आहेत. त्यांची विद्वत्ता ही निर्विवाद आहे. त्यामुळे त्यांच्याकडून जास्त सखोल चिंतनाची अपेक्षा आहे. पण दुर्दैवाने या पुस्तकातील लेखनाला राजकीय विचारांचं कुंपण पडलेलं पानोपानी जाणवतं. वृत्तपत्रीय लेखनाच्या काही मर्यादा असतात, हे मान्य केलं तरी राजकीय वैचारिक मर्यादा इथे जास्त प्रभावी ठरल्या आहेत.
मव्हेरिक अनचेंज्ड, अनरिपेन्टन्ट : राम जेठमलानी,
रूपा पब्लिकेशन्स, नवी दिल्ली,
पाने : २७४, किंमत : ४९५ रुपये.
राजकारणाचे कुंपण पडलेले लेखन
गेल्या सुमारे सहा दशकांतील भारतीय राजकारण आणि समाजजीवनाशी चांगला संपर्क असलेले राम जेठमलानी हे तसे वादग्रस्त ठरलेले व्यक्तिमत्त्व.
First published on: 08-03-2014 at 12:24 IST
मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maverick unchanged unrepentant ram jethmalani