दलित असो वा अन्य जाती , त्यांचे नेते सत्तेत आले की आपल्या निकटवर्तीयांना सत्तेची फळे कायमस्वरूपी चाखण्याची तजवीज ते करून ठेवतात. तेव्हा त्यांना जात हवी असते ती फक्त शिडी म्हणून. नंतर मात्र जातीची शिडी ढकलून दिली जाते..
आपल्याकडे संपत्तीनिर्मितीचा सोपा-सहज मार्ग सत्तांगणातून जातो. त्यामुळे अनेकांचे रूप सत्तेवर आल्यावर आमूलाग्र बदलते. अशी अनेक उदाहरणे उजळ माथ्याने आसपास वावरताना दिसत असल्यामुळे सत्ता मिळवायची ती संपत्ती मिळवण्यासाठी इतकाच संदेश त्यातून जातो. सत्तासोपानापर्यंत पोहोचेपर्यंत त्यामुळे कोणाचीही भाषा काहीही असली तरी सत्ता मिळाल्यावर या सर्वाचे लक्ष्य एकच असते- संपत्तीनिर्मिती, तीही स्वत:साठी. सत्तेवर येईपर्यंत सामाजिक परिवर्तन, सामाजिक अभिसरण, पददलितांचे कल्याण, इतर मागासांना समान संधी वगैरे शब्द वापरून आपली सामाजिक बांधीलकी दाखवणारे जवळपास सर्वच जण सत्ता मिळाल्यावर फक्त आत्मकेंद्रित आर्थिक बांधीलकीचेच निर्लज्ज दर्शन घडवतात. बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती हे याचे ताजे उदाहरण. या पक्षाचे प्रवर्तक आणि मायावतींचे एके काळचे सर्वेसर्वा कांशीराम यांच्या निधनानंतर मायावतींनी या पक्षाला ठोस अशी राजकीय दिशा दिली. त्या पक्षाची वैचारिक चौकट कांशीराम यांनी आपल्या हयातीतच नक्की करून ठेवली होती, पण त्या चौकटीस सत्तेची वेलबुट्टी मायावतींनी चढवली. ‘दलित की बेटी’ ही बिरुदावली मिरवत मायावती यांनी उत्तर प्रदेशात सामाजिक अभियांत्रिकीचा भलताच आविष्कार घडवला आणि दलितांच्या नावाने पक्ष चालवताना उच्चवर्णीयांनाही जवळ करण्याचे चातुर्य दाखवले. मायावतींचे स्वीय सचिव, सल्लागार आणि त्या पक्षाचे राज्यसभा सदस्य सतीश चंद्र मिश्र हे याचे उदाहरण. पूर्वाश्रमीचा पंडित म्हणून
ओळखला जाणारा हा नोकरशहा नंतर मायावतींचा राजकीय भाष्यकारही बनला आणि बसपाचे निवडणूक चिन्ह असलेल्या हत्तीकडे पाहून ‘हाथी नहीं गणेश है, ब्रह्मा विष्णू महेश है’ अशी चटपटीत घोषणा देऊन तथाकथित उच्चवर्णीयांनाही आकृष्ट करू लागला. या कथित राजकीय चातुर्यामुळे मायावतींना उत्तर प्रदेशात राज्य करण्याची पुन्हा संधी मिळाली. तोपर्यंत सत्ता काय करू शकते याचा अंदाज त्यांना आलेला होता. त्यामुळे आपल्या सत्ताध्यायात मायावतींनी नक्की काय केले याचे तपशील आता बाहेर येऊ लागले आहेत. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने प्रसिद्ध केलेल्या तपशिलानुसार (‘लोकसत्ता’त अन्यत्र आज हे वृत्त प्रकाशित केले आहेच.) मायावतींचा सर्वात धाकटा भाऊ आनंद कुमार याने आपली बहीण सत्तेवर आल्यावर कंपन्या स्थापन करण्याचा सपाटा लावला. आनंद कुमार याची उद्यमशीलता बरोबर त्याची बहीण मुख्यमंत्रिपदी आल्यावरच फुलून यावी हा एक वेळ योगायोग मानायचे म्हटले तरी बडय़ा बडय़ा कंपन्यांना या आनंद कुमाराच्या अंगच्या गुणांचा साक्षात्कार मायावती मुख्यमंत्री झाल्यावरच कसा काय झाला, हा प्रश्न उरतोच. हे कमी म्हणून की काय मायावतींचे सल्लागार मिश्र याच्या चिरंजीवांनी स्थापन केलेल्या कंपन्यांनाही या कंपन्यांच्या औदार्याचा चांगलाच फायदा झाला. माझ्या भावाने जे काही केले त्यात बेकायदा काहीही नाही, असे मायावतींनी म्हटले आहे आणि या कंपन्यांनीही तसाच सूर लावला आहे. डीएलएफ, युनिटेक आदी अनेक बडय़ा कंपन्यांनी आनंद कुमार याच्या कंपन्यांत गुंतवणूक केली. यातील लक्षात घेण्याजोगी बाब ही की, जवळपास या सर्वच कंपन्या म्हणजे मोठमोठे बिल्डर आहेत आणि त्यांनी केलेल्या गुंतवणुकीच्या बदल्यात त्यांना काय मिळाले असेल याचा अंदाज बांधणे अवघड नाही. हे कसे आणि का होते हे आता आपल्याकडे शेंबडय़ा पोरासही माहीत असते. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांचा जावई रॉबर्ट वडेरा याच्या प्रेमातदेखील यातील काही कंपन्या पडलेल्या होत्या. त्याच्या कंपन्यांतही अशीच मोठी गुंतवणूक झालेली होती. सत्तेवरील मंडळींच्या भाऊ-बहीण, जावई यांच्या प्रेमात पडणे अनेक अर्थाने फलदायी असते याची जाणीव आता सगळ्यांनाच आहे. त्यामुळे रॉबर्ट वडेरा असो वा आनंद कुमार, दोघांवरील आरोपांची जातकुळी एकच असते आणि हा योगायोग नक्कीच नसतो.
काँग्रेस आणि भाजप हे सापनाथ आणि नागनाथ आहेत आणि त्यांच्याकडून ब्राह्मण आणि बनिया वर्गाचीच धन होईल अशा प्रकारची मांडणी मायावतींचे मार्गदर्शक कांशीराम यांनी केली होती. त्यास पर्याय म्हणून दलितांची ताकद उभी करायला हवी असे कांशीराम यांचे म्हणणे असे. मायावतींना सत्ता मिळाल्यामुळे ती ताकद खरोखरच उभी राहिली असे म्हणावयास हवे, परंतु त्याचा वापर करून सत्तेवर आलेल्या मायावती प्रत्यक्षात काँग्रेस आणि भाजप नेत्यांच्या मार्गाने जाताना दिसतात. तेव्हा त्या दलितांच्या कल्याणाचे काय झाले? की त्यांचे कल्याण म्हणजेच दलितांचे कल्याण? एखाद्या मायावती, एखादे रामदास आठवले, एखादे छगन भुजबळ, एखादे गोपीनाथ मुंडे.. अशा निवडक एखाद्यांचे भले झाले म्हणजे त्या त्या समाजाचे भले झाले असे मानावयाचे काय? वर उल्लेखलेली सर्व मंडळी सद्यस्थितीत राजकारणापेक्षा स्वत:च्याच अर्थकारणात मग्न आहेत, हे अमान्य करता येईल काय? भुजबळ यांनी ‘लोकसत्ता’स मुलाखत देताना इतर मागासवर्गीयांना धर्मात नव्हे तर राजकारणात जाच सहन करावा लागत आहे, असे विधान केले होते. बारा बलुतेदार महासंघाने त्याचा प्रतिवाद करताना भुजबळ सतत सत्तेच्या आश्रयाला राहिले, स्वत:च्या पोरापुतण्यांचे त्यांनी भले केले तेव्हा त्यांना कसला जाच सहन करावा लागतो, असा प्रश्न केला आहे आणि तो रास्त आहे. भुजबळ असो वा भाजपात तेच इतर मागासवर्गीयांचे राजकारण करणारे गोपीनाथ मुंडे असोत, आपण म्हणजेच इतर मागासवर्गीय आणि आपल्यावर अन्याय म्हणजे या ओबीसींवर अन्याय, असा दावा त्यांच्याकडून केला जातो. रामदास आठवले वा मायावती यांच्याबाबतही हेच दिसते. आपल्या तालावर नाचवून घेतल्यावर आधी काँग्रेसने आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने रामदास आठवले यांना शब्दश: अडगळीत सारले. मंत्रिपद तर सोडाच साधी खासदारकीदेखील आठवले यांना मिळू शकली नाही. तेव्हा आठवले यांना शिवसेनेच्या वळचणीस जाण्यावाचून पर्याय राहिला नाही. परंतु आठवले यांना खासदारकी दिली नाही तेव्हा त्यांचाही सूर काँग्रेसने दलितांवर अन्याय केला, असाच होता. मायावतींचा हात जेव्हा ताज महामार्ग आणि अन्य भ्रष्टाचार प्रकरणांत दिसू लागला तेव्हाही त्यांचीही ओरड तीच होती- दलित की बेटीवर अन्याय.
वास्तवात सध्या परिस्थिती अशी आहे की दलित असोत वा अन्य जाती-प्रजाती, नेतेमंडळी सत्तावर्तुळात घुसली की भले करीत असतात ते फक्त स्वत:चे. आपल्या जवळच्यांना कंत्राटे द्यावीत, त्यांना कायमस्वरूपी दलाली मिळेल अशी व्यवस्था करावी यातच ही मंडळी मग्न असतात. तेव्हा त्यांना जात हवी असते ती फक्त शिडी म्हणून. तिच्या आधारे सत्ताकेंद्र एकदा मिळाले की विचार होतो तो फक्त मी आणि माझे कुटुंबीय इतकाच. जातीची शिडी ढकलून दिली जाते आणि समाजही मागे पडतो. खरी माया कशात आहे आणि खरा आनंद कोठे आहे, हे या बहीण-भावांनी दाखवून दिले आहे. मायेचा आनंद आणि आनंदाची ही माया हेच कटू वास्तव अधोरेखित करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा