समाजातील वंचितांच्या, पददलितांच्या उद्धारासाठी आपण ‘अवतार’ घेतला असून या वर्गाचे आपणच एकमेव ‘मसीहा’ आहोत अशा थाटात वावरणाऱ्या नेत्यांची राजकारणात वानवा नाही. केवळ असे   वर्णन केले तरी अनेक नावे सहजपणे नजरेसमोर येऊ लागतात. त्याच नावांच्या मालिकेत, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा, बहन मायावती यांचे नाव अग्रक्रमावर असते. उत्तर प्रदेशातील दलितांच्या उद्धाराची जबाबदारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वारशातून आपल्याला मिळाली असल्याच्या थाटात १९८४ पासून बसपाचे राजकारण करणाऱ्या मायावती यांचे अनेक मुखवटे आणि त्यामागचे चेहरेही अनेकदा उघड झाले आहेत. पक्षाच्याच एका बठकीत नोटांचा अवजड असा हार गळ्यात मिरवणाऱ्या मायावतींचे छायाचित्र चार वर्षांनंतर आजही अनेकांच्या स्मृतीमध्ये ताजे असेल. दलित समाजाचा भक्कम पािठबा घेऊन बसपाचे नेते कांशीराम यांनी उत्तर प्रदेशात बांधलेल्या बहुजन समाज पार्टीचे नेतृत्व मायावतींकडे चालून आले. त्याआधी शिक्षिका असलेल्या या महिलेने पक्षात आणि राज्यातही, दलितांच्या तारणहाराची भूमिकाच जाणीवपूर्वक निवडली आणि त्याच्या आधारावरच उत्तर प्रदेशसारख्या बलाढय़ राज्याचे मुख्यमंत्रिपदही चार वेळा मिळवले. ‘दलित की बेटी’ अशी स्वत:ला बिरुदावली लावून घेतलेल्या मायावतींच्या राजकारणाभोवती आíथक गरव्यवहारांच्या आणि संपत्तीच्या वादाचे अनेक भोवरे सतत घोटाळत राहिले. राज्यसभा सदस्यत्वाच्या काळात शेकडो कोटींची संपत्ती जाहीर केलेल्या मायावतींची वाटचाल ‘दौलत की बेटी’ या दिशेने सुरू झाल्याचे कधीपासूनच दिसू लागले होते. पददलितांच्या, वंचितांच्या नावाने राजकारण  करणाऱ्या नेत्यांकडून जी नैतिक अपेक्षा असते, ती अशा संपत्तीवाढीने धुळीला मिळते. दलितांच्या पािठब्यावर नेते बनायचे, त्या ताकदीवरच राजकीय सौदेबाजी करावयाची, प्रसंगी लाचारीही करायची आणि आपल्यापुरता उत्कर्ष साधावयाचा, ही अनेक नेत्यांची सवय झाली आहे. या नेतृत्वाच्या जोरावरच अनेक नेते स्वत:चे उखळ पांढरे करून घेतात आणि त्यांच्या पाठीशी उभा राहिलेला मतदार मात्र होता तेथेच राहतो, अशी अनेक उदाहरणे आसपासदेखील आहेत. मायावतींनीदेखील जेव्हा जेव्हा थेट किंवा अप्रत्यक्ष राजकीय तडजोडी केल्या, तेव्हा त्यांच्या पाठीशी असलेल्या मतदारांना काय मिळाले, हा प्रश्नच आहे. त्यांच्या अशा राजकारणाचे आता उघड वाभाडे निघू लागले आहेत. त्यांच्याच पक्षाचे एक राज्यसभा सदस्य असलेल्या जुगल किशोर यांनी मायावतींच्या संपत्तीकारणाचे गूढ चव्हाटय़ावर आणणारे आरोप  केले आहेत. अर्थात, असे आरोप कधी तरी होणारच, हे बहुधा सर्वाना अपेक्षितच असावेत. त्यामुळेच पसे घेऊन निवडणुकीची उमेदवारी विकल्याचा  आरोप मायावतींवर होऊनही राजकीय क्षेत्रात तशी खळबळ वगरे माजलीच नाही. जुगल किशोर यांच्याअगोदर बहुजन समाज पक्षाचेच अखिलेश दास या खासदारानेदेखील हाच आरोप मायावतींवर केला होता. जुगल किशोर यांनी तर या पक्षाच्या स्थापनेपासून कांशीराम यांना साथ दिली असल्याने त्यांचे आरोप अधिक गंभीर ठरतात. मायावती या दलित की बेटी नव्हे, तर दौलत की बेटी आहेत,  असा आरोप २०१० मध्ये काँग्रेसचे दिग्विजय सिंह यांनीही केला होता. चार वर्षांनंतर तोच आरोप स्वपक्षातून होऊ लागला आहे. तरीही दरम्यानच्या काळात मायावतींचे बहुजन समाजाच्या नावाने राजकारण सुरूच आहे आणि वर्षांगणिक त्यांच्या संपत्तीत वाढही होतच आहे. सामान्यजनांसाठी ते गूढच राहणार, हेच खरे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा