तुळजापूरपासून जवळच असणाऱ्या तेर गावात ‘लज्जागौरी’च्या मूर्ती सापडतात. तेर या गावचे रोम या देशाशी व्यापारी संबंध होते, अशा नोंदी इतिहासात आहेत. येथील लज्जागौरीच्या मूर्तीचा उल्लेख अभ्यासक राज कुलकर्णी यांच्या ‘तेर-दक्षिणेची मथुरा’पुस्तकात आहे. त्याचा निर्मितिप्रक्रियेशी असणारा संबंध रा. चिं. ढेरे यांनी ‘तुळजाभवानी’ आणि ‘लज्जागौरी’ या पुस्तकांत विस्ताराने केला आहे. महाराष्ट्रासह भारतात अनेक ठिकाणी या मूर्ती सापडतात. अहमदनगरमधील नेवासा येथील उत्खननात योनिमूर्ती मिळाली. आंध्र प्रदेशातील नागार्जुन, कर्नाटकातील विजापूरमधील बदामी, उत्तर कर्नाटकातील सिद्धनकोट येथील गुफेत योनिमूर्ती आढळून आल्या आहेत. अर्थ एवढाच की देशभरात लज्जागौरीचा संबंध निर्मितिमूल्याशी जोडून त्याची उपासना करणाऱ्यांचा मोठा संप्रदाय आहे. तथापि  श्लील-अश्लीलतेचे संदर्भ विकृत अंगाने समाजात घुसले आणि पूजाविधीचा अर्थच लपून राहिला.
समाज एवढा प्रगत होता, की योनी आकाराची कवडी गळय़ात मिरविण्याची पद्धत होती. अगदी जपानमध्येसुद्धा कवडय़ांची पूजा केली जाते. कवडी मिळाली नाही तर योनिचित्रांची पूजा होते. भारतात तर सर्व राज्यांत कवडय़ांचे पूजन होते. आई भवानीच्या भक्तांच्या गळय़ात कवडय़ांची माळ हे मातृत्वाचे पूजन मानले जाते. घटस्थापनेचा हा विधी त्याचे प्रतिनिधित्व करणारा. कोल्हापूरमध्ये घटस्थापनेच्या वेळी तोफा उडविल्या जातात.
बीज अंकुरण्याच्या प्रक्रियेचा जल्लोष राज्यातील साडेतीन शक्तिपीठांत नाथ, शाक्त आणि कापालिक पंथांतील भाविक मनोभावे करतात.  
वैज्ञानिक अंगानेही या विधीकडे पाहता येऊ शकेल. बहुतेक वेळा खरिपाचे पीक हाती आलेले असते. रब्बीची पेरणी करायची असते, अशा कालावधीत नवरात्र येते. नव्या पेरणीसाठी कोणते बीज अंकुरते हे पाहण्याची प्रक्रिया म्हणूनही या पूजाविधीकडे पाहिले जाते. हा विधी या वर्षी दुष्काळात साजरा होत आहे. इतिहास आणि जलसंस्कृतीचे अभ्यासक डॉ. मोरवंचीकर म्हणतात, ‘नवरात्र ही आनंदाची पर्वणी. कारण हा काळ जलपातळीचा उच्चांकबिंदू असतो. हे पाणी पुरवून अक्षय्यतृतीयेपर्यंत वापरायचे असते, हे सांगणारा हा विधी आहे. घट बसविताना डेऱ्याला हळदकुंकू लावले जाते आणि त्यात पाणी असते. पाण्याच्या पूजनाचादेखील हा विधी आहे. ‘डेरा’ या शब्दाचा अर्थ ‘उदर’ असा आहे. म्हणूनच ते गर्भगृहाचे प्रतिनिधित्व करते.’ या विधीचा अर्थ सांगताना इतिहासाचे प्रा. ए. डी. जाधव म्हणतात, ‘हा भाग दुष्काळी असल्याने राजाच्या दरबारी सैनिकाची नोकरी करणे अथवा संपन्न प्रदेशातून लूट करून आणणे, हाच जगण्याचा मार्ग असे. त्यामुळे सैनिक अधिक शक्ती मिळावी, यासाठी तुळजापूरला येत. कारण जिच्याकडे निर्मितीची शक्ती असते, तीच ‘आदिशक्ती’ ती देऊ शकेल, असा विश्वास असल्यानेच देवीची ठाणी शक्तिपीठे झाली. देशभरात ५१ शक्तिपीठे आहेत. येथील पूजाविधींना नवनिर्माणाच्या अंगाने बघायला हवे.’
पूजेचा अर्थच माहीत नसल्याने स्त्रीशक्तीची अवहेलना आता या पातळीवर आली आहे, की एका बाजूला आई- राजाचा उदोकार करायचा आणि दुसऱ्या बाजूला स्त्री-भ्रूणहत्या करत सुटायचे. हे बदलायला हवे ना? नवनिर्माणाची ही पूजा सुरू असतानाच कोल्हापुरात विटाळ आणि पावित्र्यावरून सुरू असणारा वाद किती निर्थक आहे, हे सहजपणे
लक्षात येईल. पण पूजाविधीचे अर्थ कोण समजून घेणार?   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा