स्थितीवादी आणि प्रतिगामी पत्रकारितेच्या उत्थानासाठीच आपले अवतारकार्य आहे असे तेजपालांचे आतापर्यंतचे वागणे होते. ही मंडळी आपापला व्यवसाय करीत राहिली असती तरी त्यांना प्रामाणिकपणाचे तरी काही गुण देता आले असते. परंतु माध्यमातून नाव कमवावे आणि त्याचा वापर हा असा भलत्याच उद्योगासाठी करावा ही कोणती नैतिकता?
आपापल्या व्यवसायाची चौकट सोडून समाजाचे नेतृत्व करावयास निघालेल्यांचे पाय मातीचे असले की काय होते ते तरुण तेजपाल या पत्रकाराच्या सध्याच्या अवस्थेवरून समजून घेता येईल. एकेकाळच्या सहकाऱ्याची कन्या आणि आपल्या पोटच्या कन्येची मैत्रीण असलेल्या तरुणीवर जबरदस्ती करण्यापर्यंत या तेजपालाची मजल गेली. हे घृणास्पद कृत्य उघडकीस आणण्याचे धैर्य या तरुणीने दाखविल्यानंतरही तेजपालाने जे उद्योग केले ते त्याचा सराईतपणा दाखवणारे आहे. वास्तविक अध्यात्माच्या क्षेत्रात बुवाबाजी करणाऱ्या आसारामबापू या बदमाशाच्या उचापतींत आणि पुरोगामी बुवाबाजी करणाऱ्या तेजपालाच्या उद्योगांत काहीही फरक नाही. तेव्हा प्रतिगामी आसारामबापूची जी गत झाली आहे तशीच अवस्था या पुरोगामी तेजपालबाबाचीदेखील व्हावयास हवी. परंतु प्रतिगामी आसारामाप्रमाणे हा पुरोगामी तेजपालही कायद्याला घाबरून पळताना दिसतो. स्थितीवादी आणि प्रतिगामी पत्रकारितेच्या उत्थानासाठीच आपले अवतारकार्य आहे असे त्याचे आतापर्यंतचे वागणे होते. पत्रकारितेच्या क्षितिजावरील हा तरुण तारा उगवला तो भाजपचे माजी अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांच्या वस्त्रहरणनाटय़ाने. नोटांची पुडकी स्वीकारतानाचे त्यांचे चित्रीकरण करून या तरुणाने त्या वेळी बराच धुरळा उडवून दिला होता. वास्तविक बंगारूलक्ष्मण यांच्याही आधी राजकीय नेते पैसे घेत नव्हते असे नाही आणि त्यांच्यानंतर ते घेणे बंद झाले आहे असेही नाही. परंतु लक्ष्मण यांना उघडे पाडून आपण मोठे काही थोर कार्य केले असा या तरुण कंपूचा दावा होता. या प्रकरणातून फार फार तर उघड झाला तो बंगारू लक्ष्मण यांचा बावळटपणा. किंबहुना ते इतके बावळट आहेत याची खात्री असल्यामुळेच तरुण आणि मंडळींनी हा उद्योग केला. अन्यथा या तेजपालास नैतिकतेची इतकी चाड असती तर       पी व्ही नरसिंह राव यांचे अल्पमतातील सरकार बहुमतात कसे आले किंवा विद्यमान पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अणुकराराच्या मुद्दय़ावर सरकार टिकविण्यासाठी कोणत्या मायेने अमरसिंग, मुलायमसिंग मंडळींना जिंकले ते उघड करण्याचे धैर्य या तरुण तेजपालाने दाखवले असते. परंतु अशी निवडक नैतिकता हे या पुरोगामी म्हणवून घेणाऱ्यांचे वैशिष्टय़. आपल्याकडे पुरोगामी म्हणवून घेणाऱ्यांचे शील हे या तेजपालाइतकेच कचकडय़ाचे आहे. या मंडळींची नैतिकताही सापेक्ष असते. म्हणजे भाजपच्या नेत्याने काही गैरकृत्य केल्यास हे बेंबीच्या देठापासून चॅनेला चॅनेलांवर ओरडणार आणि तेच किंवा त्याहूनही अधिक गैर असे काँग्रेसजनाने केले की मौन बाळगणार. अशा सुमार लबाडांची आपल्या समाजात कमतरता कधीच नव्हती. हाच वर्ग या तेजपालास खांद्यावर घेऊन नाचत होता. असे करताना आपण नक्की काय करीत आहोत याचे भान तेजपाल गुणगान करणाऱ्यांना राहिले नाही आणि खुद्द तेजपालासही याचा विसर पडला. खरे तर राजकारण्यांच्या पैशावर अनेक ‘महानगरां’तून असे तेजपाल सोकावले आहेत. काहींनी कपिल सिबल आदींच्या पैशावर आपले पुरोगामीपण मिरवले तर काहींनी स्थानिक बिल्डर वा भुजबळांना हाताशी धरले. दोघांनीही आपली लेखणी सुपारी घेऊनच चालवली. वास्तविक यांच्या तुलनेत तरुण भारत वा सामना अधिक प्रामाणिक. कारण त्यांनी आपण कोणाचे मुखपत्र आहोत हे कधीही लपवले नाही. परंतु आपल्याकडील या अशा महानगरी तेजपालांनी खरी पत्रकारिता करीत असल्याचा आव आणला आणि लेखणीचे इमान विकले. काही तेजपालांचा हा पुरोगामित्वाचा बुरखा तहलकाच्या निमित्ताने फाटला. काहींचा तो अद्याप तसाच आहे, इतकेच. यानंतरही ही मंडळी आपापला व्यवसाय करीत राहिली असती तरी त्यांना प्रामाणिकपणाचे तरी काही गुण देता आले असते. परंतु यांची लबाडी इतकी की असले उद्योग करून वर हे पुन्हा समाजास उपदेशामृत पाजत राहिले. खरे तर राजकारण्यांनादेखील इतका कोडगेपणा जमत नाही. तो या माध्यमवीरांनी करून दाखवला. आता हे सगळेच अंगाशी आले आहे.
या निमित्ताने आणखी एका मुद्दय़ाचा समाचार घ्यावयास हवा. तेजपाल वा तत्सम मंडळी आपल्या उद्योगांच्या समर्थनार्थ साखळी उद्योगांवर आगपाखड करीत असतात आणि या साखळी वर्तमानपत्रांमुळे पत्रकारितेसमोर आव्हान निर्माण झाल्याचा दावा करतात. प्रत्यक्षात वस्तुस्थिती बरोबर उलटी आहे. आजमितीला मालक संपादक असलेली अनेक नियतकालिके प्रत्यक्षात खंडणीखोरीसाठी ओळखली जातात, ही वस्तुस्थिती आहे. अशा नियतकालिकांचा दुरुपयोग दुहेरी होतो. एका बाजूला ती पत्रकारितेच्या नावाखाली खंडणीखोरी करीत असतात तर दुसरीकडे त्याच्या जोरावर त्यांचे संपादक म्हणवून घेणारे मालक आपले पुढारीपण जपत असतात. या दोन्हीच्या बेचक्यातून आर्थिक गैरव्यवहार होतात ते वेगळेच. त्याबद्दल सर्वच सोयीस्कर मौन बाळगतात कारण तसे करण्यातच एकमेकांचे हित जपले जात असते. वास्तविक परिस्थिती अशी आहे की ज्या साखळी वर्तमानपत्रांवर या अशा स्वयंभू तेजपालांचा राग असतो त्या साखळी वर्तमानपत्रांनी वर्तमानपत्रांची व्यावसायिकता शाबूत राखली आहे.
त्यामुळे तेजपालाच्या उद्योगाचा आर्थिक आणि नैतिक अशा दोन्ही अंगांनी विचार करावयास हवा. या तेजपालाच्या उद्योगांत कपिल सिबल, तृणमूलचे खासदार केडी सिंग, राम जेठमलानी आदींची गुंतवणूक होती. याचा अर्थ त्याचा कथित निष्पक्ष आणि नि:स्पृह पत्रकारितेचा दिवा हा अशा राजकारण्यांच्या पैशावर मिणमिणत होता. इतकेच काय गुजरात दंगलीबाबतच्या त्याच्या भूमिकेमुळे वॉक्हार्ट कंपनीचे फक्रुद्दिन खोराकीवाला, अभिनेता अमीर खान यांनीही त्यात पैसे गुंतवले होते. हे कमी म्हणून पाँटी छड्डा या अत्यंत वादग्रस्त व्यावसायिकाच्या गुंतवणुकीतून तेजपालास उच्चभ्रूंसाठी क्लबदेखील काढावयाचा होता. देशातील विद्वान आणि पुरोगाम्यांना मुक्तमोकळ्या वातावरणात परस्परांच्या शारीर सलगीत बौद्धिक आनंद लुटता यावा असा या क्लबमागील हेतू. याचा अर्थ काय असू शकतो त्याचा अंदाज तेजपाल गोव्यात जे करू पाहत होता, त्यावरून बांधता येईल. परंतु त्याही पलीकडे मुद्दा असा की, हे असे क्लब आदी सुरू करणे हे पत्रकारितेच्या कोणत्या व्याख्येत बसते? माध्यमातून नाव कमवावे आणि त्याचा वापर हा असा भलत्याच उद्योगासाठी करावा ही कोणती नैतिकता? ज्या वेळी तहलकाच्या कर्मचाऱ्यांना पगारही देता येत नव्हता त्या वेळी या तेजपाल, व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी आणि मंडळींच्या तिजोऱ्या भरभरून वाहत होत्या, ही यांची व्यवसाय बांधीलकी म्हणावयाची काय? तेजपालाच्या तहलकाची सर्व मिजास त्याच्या साधुहूनही सज्जन मिरवण्यात होती. परंतु या प्रकरणातून जी काही लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत, ती पाहता हेच का या तरुणाचे साधुत्व, असा प्रश्न पडावा. अशा वेळी या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तेजपालाच्या खांद्याला खांदा लावून आपले पुरोगामित्व मिरवणाऱ्या मंडळींनी पुढे यावयास हवे. परंतु त्या सर्वाना एकाच वेळी याचा विसर पडला असावा.
अलीकडे सर्वच संस्था आपापले नियत कर्तव्य सोडून भलत्याच उचापती करू लागल्या आहेत. या तेजपालाच्या वागण्यामुळे ही बाब पुन्हा उघड झाली. असे केल्यास सर्वसामान्यांस सहन करावे लागतात तसे कायद्याचे रट्टे तेजपालासही मिळायला हवेत. त्याच्या बेशरम उद्योगांमुळे पत्रकारिता करुण आणि पत्रकार निस्तेजपाल होता कामा नयेत.

Story img Loader