नरेंद्र मोदी हे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर माध्यमांनी त्यांचे सुरुवातीपासून दैत्यीकरण केले आणि आता निकालानंतर मात्र माध्यमांचा प्रवास जे जे मंगल, मानवी आणि भद्र म्हणजे मोदी, या टप्प्यावर येऊन ठेपला आहे. विशेष म्हणजे यात पाश्चात्त्यही मागे नाहीत. माध्यमांनी असे प्रवाहपतित होणे समाजाच्या अपरिपक्वतेचे लक्षण असून ते लवकर संपणेच इष्ट ठरेल.
या नरेंद्र मोदी यांचे करायचे काय या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात माध्यमे गुरफटलेली दिसतात. त्यास तसेच कारण आहे. ते म्हणजे मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचा विजय हा जसा काँग्रेससाठी लाजिरवाणा आहे त्यापेक्षा अधिक माध्यमांना तोंडावर आपटवणारा आहे. १६ मे २०१४ या दिवसापर्यंत माध्यमे नरेंद्र मोदी यांच्या मागे हात धुऊन लागली होती. त्यातही विशेषत: जमिनीवरील वास्तवापासून तुटलेली आणि स्टुडिओ म्हणजेच देश असे समजून वर्तन करणारी आंग्लभाषिक माध्यमे आणि त्यातील वाचाळवीर आपणास जणू अंतिम सत्यच गवसले आहे अशा थाटात बोलणारे भाष्यकार यांनी मोदी हा एककलमी कार्यक्रम करून प्रेक्षकांचे डोके उठवले होते. त्यांच्या एकाही अंदाजाकडे मतदारांनी ढुंकूनदेखील पाहिले नाही. आतापर्यंत मोदींची अध्यक्षीय निवडणुकांसारखी प्रचार पद्धत आपल्याकडे चालणार नाही, मोदी यांना आघाडीसाठी पक्ष मिळणार नाहीत, उत्तर प्रदेशातील जातीप्रजाती राजकारण मोदींचा विजयरथ रोखेल, अल्पसंख्याकांच्या पाठिंब्याच्या अभावी भाजप गुदमरेल आणि त्यावर काँग्रेस आदी वाचतील, मोदींचा ताठ कणा आणि बाणा त्यांना अडचणीत आणेल, मोदींच्या विरोधात भाजपतील ज्येष्ठच आडकाठी आणतील अशी अनेक भाकिते या माध्यमवीरांनी वर्तविली होती. ती सगळीच्या सगळी मातीत गेली आणि एकही खरे झाले नाही वा त्याच्या जवळपासदेखील आले नाही. तेव्हा या निवडणूक निकालातून ज्याप्रमाणे काँग्रेसचे समाजापासूनचे तुटलेपण ढळढळीतपणे उघड झाले, त्याचप्रमाणे माध्यमांचा डोलारादेखील वास्तवाचे भान असण्याबाबत किती पोकळ आहे, हे दिसून आले. माध्यमांची ही अशी बौद्धिक वाताहत झाली कारण आपले मत हीच समाजाची इच्छा, असे ते मानू लागले. जोपर्यंत ही मंडळी समाजात वावरत होती, तोपर्यंत तसे मानणे रास्त होतेही. परंतु सुखवस्तूपणातून आलेल्या बुद्धिमांद्याने माध्यमांना सध्या ग्रासलेले असून त्यातील अनेकांचा जमिनीशी संपर्क तुटलेला आहे. याच्या जोडीला आपल्या वैचारिक बांधीलकीशी आपल्या दर्शकांना बांधण्याचा त्यांचा अट्टहासदेखील अंगाशी आला. आपली विचारधारादेखील कालबाह्य़ असू शकते याचे भान माध्यमांना राहिले नाही. ही बाबही त्यांच्या विरोधात गेली. या आणि अशा कारणांमुळे या माध्यमांनी सुरुवातीच्या काळात नरेंद्र मोदी यांचे दैत्यीकरण केले. आता बरोबर उलटे सुरू आहे. मोदी यांचे दैत्यीकरण ही एक राजकीय पक्ष म्हणून तसे ते करणे ही काँग्रेसची गरज होती आणि ती एक वेळ क्षम्य म्हणता येईल. परंतु त्या तालावर माध्यमांनी नाचायची काहीच गरज नव्हती. सर्वसामान्य मतदारांनी या सगळ्याकडे पाठ फिरवली. या माध्यमवीरांना त्यांनी कवडीमोल ठरवले आणि सणसणीत मताधिक्याने मोदी यांना विजयी केले. या विजयाच्या वास्तवाने माध्यमांतील कार्यकारणभावाचा लंबक एकदम दुसऱ्या बाजूला गेला असून त्यामुळेही पुन्हा माध्यमेच हास्यास्पद ठरतील की काय असा प्रश्न दर्शकांना पडल्यास आश्चर्य वाटावयास नको. या ताज्या विजयामुळे मोदी यांना काय, किती आणि कसे दाखवावे याचे माध्यमांचे भान हरपलेले दिसते. जणू मोदी यांच्याबाबत इतिहासात ज्या काही चुका केल्या त्या दुरुस्त करण्यासाठी त्यांना जास्तीत जास्त वेळ दर्शकांपुढे ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असावा. हे असे अति मोदी मोदी करून पापक्षालन करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल तर तो हास्यास्पद म्हणावा लागेल. जे जे अमंगल, अमानवी आणि अभद्र म्हणजे मोदी येथून सुरू झालेला माध्यमांचा प्रवास आता अचानक जे जे मंगल, मानवी आणि भद्र म्हणजे मोदी या टप्प्यावर येऊन ठेपला आहे. परंतु हे योग्य नव्हे. माध्यमांची तेव्हाची कृती जितकी अव्यावसायिक होती तेवढेच आताचे वर्तनही अव्यावसायिक म्हणावे लागेल. मोदी यांची कैसी गंगापूजा, मोदी यांचे कैसे वक्तृत्व, मोदी यांचे कैसे दिसणे, मोदी यांचे कैसे चालणे, मोदी यांचे कैसे हसणे आणि इतकेच काय मोदी यांचे कैसे रडणे इतके म्हणणे तेवढे काय ते माध्यमांनी बाकी ठेवलेले आहे.    
या माध्यमझोक्यात पाश्चात्त्यही मागे नाहीत. भारतीय माध्यमांप्रमाणे पाश्चात्त्य माध्यमांनीही इतके दिवस मोदी यांना खलनायक करून टाकले होते. आता ते या महान लोकशाहीतील नायक असल्याचा साक्षात्कार त्यांना होताना दिसतो. द गार्डियन हे ब्रिटनमधील पोक्त वर्तमानपत्र हे एक याचे उदाहरण. हे वर्तमानपत्र डावीकडे झुकलेले आहे आणि आपल्या तडाखेबंद बातमीदारीसाठी ते ओळखले जाते. मोदी यांच्या विजयाआधी कधी या वर्तमानपत्राने मोदी यांच्याविषयी चार बरे शब्द लिहिल्याचे वाचनात नाही. परंतु मोदी विजयी झाले आणि या वर्तमानपत्राने मोदी यांच्या निवडीवर संपादकीय लिहिताना ताळतंत्रच सोडला. १६ मे २०१४ या दिवसापर्यंत भारतात ब्रिटिशांचेच राज्य होते आणि मोदी यांच्या निवडीमुळे भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला, असे द गार्डियन म्हणते. या दैनिकाच्या दीडशहाण्या संपादकाच्या मते इतके दिवस भारतात फक्त उच्चभ्रू, आंग्लभाषा प्रेमिकांचे राज्य होते आणि मोदी यांच्या निवडीमुळे ते खालसा झाले. मोदी सत्तेवर येईपर्यंत बहुतांश काळ भारतातील सत्ताधारी हे ब्रिटिशकालीन राजवटीप्रमाणेच वागणारे होते, असे या वर्तमानपत्रास वाटते. इतके बेजबाबदार संपादकीय लिहिण्यासाठी भारतातील लंगोटीपत्रांनाही विशेष प्रयत्न करावे लागतील. परंतु द गार्डियनने हे लीलया केले असून भारतीय स्वातंत्र्य चळवळ, महात्मा गांधी आदींचे योगदान अशा अनेक गोष्टींवर पाणी ओतले आहे. तेव्हा हे पाहिल्यावर प्रश्न निर्माण होतो की माध्यमे इतके झोके का खातात?    
याचे उत्तर बहुधा माध्यमांच्या मर्यादाभंगात असावे. आपण समाजाचा भाग असलो तरी समाजापासून अलिप्त राहून समोरील घटनांचा अन्वयार्थ लावणे हे माध्यमांचे मूलभूत काम आहे. ते करावयाचे तर वाहत्या गंगेपासून दूर राहणे गरजेचे असते. याचा विसर अलीकडे माध्यमांना पडलेला दिसतो. आसपास जे काही चालले आहे ते मनोरंजन आहे आणि आपण या सगळ्याचे वाजंत्री आहोत असे अलीकडे माध्यमांचे वर्तन असते. मग ते अण्णा हजारे यांचे फसणारे आंदोलन असो, आम आदमी पक्षाचा अस्थानी उन्माद असो वा मोदी यांच्याशी संबंधित जयपराजय असोत. या सर्व प्रश्नांना हाताळताना माध्यमांनी ताळतंत्र सोडला आणि या सर्व घटनांत गुंतलेल्यांप्रमाणे माध्यमेही कमरेचे सोडून डोक्याला बांधून नाचू-गाऊ लागली. वास्तविक या तीनही बाबतींत पुढे काय वाढून ठेवले आहे, ते डोके ताळ्यावर असणाऱ्या कोणालाही समजले असते. अण्णा हजारे यांचा शालेय फुगा फुटणार, आपमध्ये मारूनमुटकून भरलेली हवा निघून जाणार आणि मोदी यांना मताधिक्य मिळणार हे बुद्धी शाबूत असणाऱ्यास जाणवणारे होते. परंतु ते जाणवले नाही. कारण या सगळ्यांत माध्यमांनी आपली तटस्थ भूमिका सोडली आणि त्या घटनांतील नायक/ खलनायकांच्या तालांवर ती नाचू लागली.     
हे असे होणे धोक्याचे आहे. माध्यमांनी प्रवाहपतित होणे समाजाच्या अपरिपक्वतेचे लक्षण असते. ती लवकरात लवकर संपायला हवी. नपेक्षा चक्रधर स्वामींनी इतिहासात ज्याप्रमाणे हत्ती आणि त्यास चाचपडून अर्थ लावणाऱ्या दृष्टिहिनांचा दृष्टान्त दिला तसा प्रकार वर्तमानात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चक्रधर स्वामींच्या दृष्टान्ताचा आधार वर्तमानात स्वामी नरेंद्रांनी घेऊन माध्यमांना दृष्टिहीन ठरवणे, हे खचितच भूषणावह म्हणता येणार नाही.

Story img Loader