वेदनांच्या कल्लोळातून मुक्त करणारा डॉक्टर हा त्या क्षणी त्या रुग्णासाठी अक्षरश: देवाचे रूप घेऊन उभा असतो. जगण्याची नवी ऊर्मी देणारा हा माणूस जेव्हा एका अतिशय मौल्यवान आणि प्रतिष्ठित व्यवसायाचे रूपांतर स्वार्थासाठी धंद्यात करतो, तेव्हा त्या व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. रायगड जिल्ह्य़ातील महाड येथे वैद्यकीय सेवा करणारे डॉ. हिम्मतराव बावस्कर यांना या संदर्भात आलेला अनुभव त्यांच्यासाठी आश्चर्यकारक असला, तरीही गेली अनेक वर्षे ‘कट प्रॅक्टिस’ची ही परंपरा अबाधितपणे सुरू आहे. रुग्ण एखाद्या डॉक्टरकडे जातो, तेव्हा त्याला काही चाचण्या करण्याच्या सूचना केल्या जातात. त्या चाचण्या कोणाकडून करून घ्याव्यात, याचा सल्लाही दिला जातो. त्यासाठी देण्यात येणारी चिठ्ठी घेऊन रुग्ण चाचण्या करायला गेला, की काही दिवसांनी त्या संबंधित डॉक्टरला त्याने चाचण्यांसाठी रुग्ण पाठवल्याबद्दल कमिशन पाठवले जाते. असे कमिशन मिळत असल्याने अनेकदा कारणाशिवाय चाचण्या करून घ्याव्या लागतात. अशा चाचण्या उपयुक्त असतात, हे खरे असले, तरीही त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या आशेने जेव्हा त्या करणे भाग पाडले जाते, तेव्हा ती रुग्णाची लुबाडणूक ठरते. गेली अनेक वर्षे महाड परिसरात आपल्या निरलस सेवेने सर्वपरिचित झालेले हिम्मतराव बावस्कर यांनी त्यांच्याकडे आलेल्या एका रुग्णाला एक सीटी स्कॅन करून घेण्यास सांगितले. ती चाचणी कोठेही करता येईल, असेही सांगितले. त्या रुग्णाने पुण्यातील संचेती रुग्णालयाच्या आवारातील एन. एम. मेडिकल सेंटर या संस्थेत ही चाचणी करून घेतली आणि काही दिवसांनी बावस्कर यांना रुग्ण पाठवल्याबद्दल बाराशे रुपयांचा धनादेशच त्या संस्थेकडून प्राप्त झाला. हा प्रकार पाहून त्यांनी त्वरित महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे तक्रार दाखल केली. वैद्यकीय व्यावसायिकांसाठी तयार करण्यात आलेल्या आचारसंहितेमध्ये डॉक्टरांनी अशा प्रकारे कमिशन घेणे गैर असल्याचे नमूद करण्यात आले आहे. एका डॉक्टरने दुसऱ्या डॉक्टरकडे रुग्णाला पाठवल्याबद्दल किंवा चाचण्या करून घेण्यास सांगितल्याबद्दल कमिशन घेणे हे व्यावसायिक नीतिमत्तेचे उल्लंघन आहे, हे खरे तर नियमाने सांगण्याचीही आवश्यकता नाही. परंतु अशा गोष्टी गेली अनेक वर्षे राजरोस घडत आहेत. आजवर त्याबाबत कुणीच आवाज उठवला नाही, तो डॉ. बावस्कर यांनी उठवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करायला हवे. जो व्यवसाय माणसाला दु:खमुक्त करतो, त्या व्यवसायात रुग्ण हा पैसे देणारे यंत्र आहे, अशी समजूत निर्माण करणे, वैद्यकीलाच काळिमा फासणारे आहे. डॉ. अरुण लिमये यांनी ऐंशीच्या दशकात वैद्यकीय व्यवसायातील गैरव्यवहारांवर  लिहिलेल्या ‘क्लोरोफॉर्म’ या पुस्तकाने मोठे वादळ निर्माण केले होते. काही काळ त्यावर चर्चा झाली. परंतु नंतरच्या काळात या व्यवसायाने व्यावसायिक सीमा ओलांडून त्याला सरळ धंद्याचे स्वरूप देऊ केले. वैद्यकीय शिक्षण मुक्त झाल्यानंतर भरमसाट शुल्क देऊन प्रवेश घेतलेल्या नव्या डॉक्टरांना ही गुंतवणूक वसूल करण्यासाठी रुग्णांच्या खिशावर डोळा ठेवावा लागला. या क्षेत्रातील रुग्णालयांच्या क्षेत्रात खासगी उद्योगांनी प्रवेश केल्यानंतर त्यासाठीचे प्रचंड भांडवल उभारले जाऊ लागले. निरलसपणे सेवा करून रुग्णाच्या आयुष्यात आनंदाचे मळे फुलवण्याऐवजी आपले खासगी जीवन सुखसमृद्धीने कसे भरून जाईल, याकडेच अधिक लक्ष दिले जाऊ लागले. त्यातून कमिशन आणि कट प्रॅक्टिसलाही मान्यता मिळू लागली. डॉ. बावस्करांनी दाखवलेली हिंमत या व्यवसायाला पुन्हा मूळ उच्च नीतिमत्तेच्या पायरीवर आणू शकेल का, हा आता प्रश्न आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा