काळ बदलला, तशी पत्रकारिताही. मूल्ये बदलली, तशी माणसेही. बातमी ही खरेदी-विक्री करता येणारी वस्तू झाली आणि त्यामुळे ती देणाऱ्याच्याही हेतूंबद्दल शंका निर्माण होऊ लागल्या. प्रश्न आहे बातमीचे व्यापारीकरण होण्याचा आणि त्याबाबतच्या तारतम्याचा. पत्रकारितेतले हे बदलते पदर भविष्याविषयी अधिक जागरूक होण्यासाठी चिंतनाचे आहेत.
तेव्हा पत्रकार परिषदा फार कमी व्हायच्या. पत्रकारांची संख्याही कमी असायची. साधं बॉलपेन मिळालं, तरी त्याचं केवढं अप्रूप वाटायचं. पत्रकारांना एकत्र बोलावून त्यांना माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या अशा परिषदांमध्ये लेखी स्वरूपात सारी माहिती आधीच दिली जाते. ती वाचून मग पत्रकारांनी त्याबद्दल प्रश्न विचारणं अपेक्षित असतं. प्रश्न विचारण्यासाठी तो विषय समजावून घ्यायला लागायचा किंवा गृहपाठ करावा लागायचा. वृत्तपत्रातील वार्ताहरांची संख्या कमी असल्यानं सगळे विषय हाताळायला लागायचे. गुन्हेगारीच्या बातम्या मिळवून झाल्यानंतर राजकारण, शिक्षण याही क्षेत्रांतल्या बातम्या मिळवायला लागायच्या. त्या सगळ्या बातम्या कागदावर लिहून उपसंपादकाकडे वाचायला द्याव्या लागायच्या. तो उपसंपादकही अगदी डोळ्यात तेल घालून त्या वाचायचा आणि त्याला जरा जरी शंका आली, तरी धारेवर धरायचा. वार्ताहराला बातमी कळली आहे की नाही, याचा तो खरा थर्मामीटर असायचा. एखादं बॉलपेन मिळालं, म्हणून बातमीत कौतुकाचे चार शब्द चुकून जास्त आले, तर तो ते कठोरपणे कापून काढायचा. दिवसाच्या आणि रात्रीच्या पत्रकार परिषदा असा एक सरळ फरक तेव्हा असे. दिवसाच्या अशा परिषदांना बहुधा नवशिक्या वार्ताहराला पाठवलं जायचं. त्याच्या ज्ञानात भर पडावी, तो बहुश्रुत व्हावा, असा उदात्त दृष्टिकोन त्यामागे असायचा. रात्रीच्या परिषदा क्वचित, पण रंगीबेरंगी असायच्या. आधीपासूनच त्याचे ढोल वाजत असले, तरी त्याबद्दल सगळे जण आपापसात दबक्या आवाजात बोलत. मग उशिरा घरी परतायच्या योजनाही आखल्या जायच्या. दुचाकी चालवता येईल किंवा नाही याची खात्री नसणारे, कुणाच्या तरी मागे बसण्याची व्यवस्था करायचे. वार्ताहराकडे मोटार वगैरे असण्याची शक्यता कल्पनेतही नसल्याने एखाद्या मालक संपादकाकडे किंवा इंग्रजी पत्रकाराकडे असलेल्या मोटारीतून वार्ताहर सुखरूप घरी परतायचे. पत्रकारांना दारू पाजून त्यांना खूश करायचं आणि आपल्याला हवं ते छापून आणायचं, असं हे षड्यंत्र आहे, याची जाम खात्री तिथे उपस्थित नसलेल्या अन्य पत्रकारांना वाटायची. त्यासंबंधीच्या बातम्यांवर लक्ष ठेवण्याच्या खास सूचना कुजक्या शब्दात उपसंपादकांपर्यंत पोहोचवल्या जायच्या. बहुतेक वेळा आयोजकांकडून थर्मास, पेनस्टँड, शोभेची तसबीर यांसारख्या कुचकामी वस्तू भेट म्हणून मिळायच्या. अनेकांच्या घरी असे इतके थर्मास जमा व्हायचे, की घरातले सगळे जण सतत आजारीच असतात की काय अशी कुणालाही शंका यावी. एरवी दोन खोल्यांच्या घरातल्या ‘दिवाणखान्यात’ देखणी तसबीर ठेवली की ती उठून दिसायची. त्यामुळे तिलाही लपवून ठेवावं लागे. आता थर्मासची जागा मोबाइल, आयपॅड, लॅपटॉप, उंची घडय़ाळांनी घेतल्याचं समजतं.
आठवतं, की एकदा धीरुभाई अंबानी यांनी पत्रकारांना सूट शिवण्यासाठी चक्क ‘सूटपीस’ भेट दिले. लग्नात शिवलेला सूट परत घालण्यासाठी संधीच नसल्यानं (आणि दरम्यानच्या काळात देहाचा आकारही बदलल्यानं) त्या सूटचं काय करायचं, अशा विवंचनेत असलेल्या सगळ्यांचे डोळे कसे लकाकले होते! सूपपासून ते डेझर्टपर्यंतचं जेवण घेतल्यानंतर बाहेर पडताना रांगेत उभं राहून प्रत्येकाला मिळणारी ही अनोखी भेट म्हणजे केवढी प्रचंड गोष्ट होती. आमच्यासारख्या नव्या दमाच्या चारदोन पत्रकारांनी अशी भेट घ्यायला विनम्रपणे नकार दिल्यानंतर उर्वरितांनी नंतर आमची केलेली ‘कानउघाडणी’ आजही कानात घुमते. भेटवस्तू घेण्यात फारसं काही गैर नाही. त्यामुळे आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला वगैरे पडत नाही. इतकी र्वष आम्ही बातमीदारी करतोय, आम्ही कधी कुणाला विकले गेलो नाही. अशा एखाद्या भेटीनं आपण आपलं शील घालवत नाही, असं बरंच मोठं व्याख्यान ऐकायला लागायचं. त्यातही न बोलून कृतीतून विरोध करणारे होतेच. काही काळानं जेव्हा त्यांचंच बहुमत झालं, तेव्हा बातमी देण्यासाठी कुणी काही देणं याबद्दलची चर्चाच थांबली. तोपर्यंत या भेटी बातमीदारांपर्यंतच पोहोचायच्या. नंतर त्या उपसंपादकांपर्यंतही पोहोचू लागल्या. त्यांनाही कधी तरी जेवणाचं निमंत्रण मिळायचं. बातमी देण्यासाठी मिळणाऱ्या पगाराव्यतिरिक्त कारण नसताना मिळणाऱ्या अशा लाभाचं इतरांना कौतुक वाटायचं. रांगेत उभं न राहता गॅस मिळणारा हा बातमीदार पॉवरफुल आहे, असं आजूबाजूच्यांना वाटायचं. बातमीदाराची खरी शक्ती काय असते, याची जाणीव नसल्यानं असेल कदाचित; पण त्या सगळ्यांना बातमीदार म्हणजे कुणी तरी फार मोठ्ठा असावा, असं जाणवत असावं, असं त्याच्या चेहऱ्यावरील हावभावांवरून दिसायचं. तीन आकडी पगारात कुटुंब चालवता चालवता मारामार होणारे हे सगळे पत्रकार तेव्हा घराबाहेर वाघ असायचे. सामान्यत: राजकारणी, समाजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याशी सततचा संबंध असल्याने अनेकदा मैत्री आणि व्यवसाय यातील सीमारेषा पुसट होत असे. व्यावसायिक संबंधांच्या पलीकडे मैत्र जुळावे, असे या क्षेत्रात फारच थोडे; परंतु अशी मैत्री सांभाळता सांभाळता त्या पत्रकाराला तारेवरची कसरत करावी लागत असे. आता पत्रकारांशी सतत संपर्क ठेवणारी व्यावसायिक यंत्रणा ‘पब्लिक रिलेशन्स’ या नावाने भरभराटीला आली आहे.
भेटवस्तूंच्या स्वरूपात काळागणिक फरक होत गेला. अशा वस्तू घेणाऱ्यांचे आणि न घेणाऱ्यांचे प्रमाणही बदलत राहिले. हल्लीच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या जगात अशा पत्रकार परिषदा हाही एक ‘इव्हेन्ट’ बनून गेल्याने त्याकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं जाऊ लागलं. कॉर्पोरेट जग गेल्या पंचवीस वर्षांत माध्यमांच्या बाबतीत अधिक सक्रिय झालं आणि त्यातून नवी समीकरणं निर्माण झाली. बातमीदारांना बातम्या देण्यापेक्षा जाहिराती आणण्याची सक्ती माध्यमांमधूनच करण्यात येऊ लागली. वार्ताहरांना मिळणारी पैशाची पाकिटं थेट कंपनीलाच का मिळू नयेत, असा विचार केला जाऊ लागला आणि त्यातून बातमी ही एक खरेदी-विक्री करता येऊ शकणारी वस्तू झाली. आपोआप काही निवडक माध्यमांनी सामाजिक बांधीलकीची भाषा करणं बंद केलं आणि लोकमान्य टिळकांचा वारसा सांगणंही. ‘लोकसत्ता’सारखी अगदी थोडी वृत्तपत्रं वगळता सर्वत्र हे असं अगदी जाहीरपणे आणि विनासंकोच सुरू आहे. आता मालकांच्या वतीनं उद्योगपतींची बोलणी करण्याचं कामही पत्रकारांवर सोपवण्यात येतं. एकदा एका प्रसिद्धीपत्रकाबरोबर चक्क शंभर रुपयाची नोट टाचणीनं जोडली गेली होती. (घटना अर्थातच जुनीपुराणी, कारण तेव्हा शंभर रुपयांना चांगलाच भाव होता!) त्या वार्ताहरानं ते पत्रक पाठवणाऱ्याला झाप झाप झापलं आणि ताबडतोब पत्रक नेलं नाही तर उलट बातमी देण्याची धमकी दिली. कंपनीचा तो अधिकारी धावत आला. क्षमायाचना करू लागला. सगळीकडे असंच चालतं, असंही सांगत राहिला, पण शेवटी त्याची ती बातमी आली नाहीच. हितसंबंध आणि मैत्री, व्यावसायिकता आणि धंदेवाईकपणा, नैतिकता आणि नियम यांच्या सीमारेषा किती पुसट झाल्या आहेत आता.
तेव्हा कार्यालयात कोण येतं, कोणाशी बोलतं, काय बोलतं, यावर वरिष्ठांची बारीक नजर असायची. वृत्तपत्रात येणारा सगळा मजकूर जास्तीत जास्त ‘शुद्ध’ असावा, असा कटाक्ष तेव्हाही होता. समाजात काही चांगलं, भलं घडावं, यासाठी माध्यमाचा उपयोग करण्याची वृत्ती अधिक प्रमाणात होती. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत गावभरच्या बातम्या गोळा करून त्या लिहीत बसणारे वार्ताहर आणि त्यांच्या बातम्यांवर संपादकीय संस्कार करणारे उपसंपादक यांना आपण काही वेगळं करतो आहोत, याचा आनंद असायचा. चैन हा शब्द तेव्हा फक्त शब्दकोशातच असायचा. स्पर्धा वाढली तसे पगार वाढले, पण खर्चही वाढला. सततच्या ताणाखाली राहायची नवी सवय जडवून घ्यावी लागली. साहजिकच अभ्यास केव्हा करणार आणि त्याचा उपयोग केव्हा करणार, असं स्वत:ला समजावण्याची नवी रीतही लोकमान्य होऊ लागली. जमिनीपासून चार सहा इंच वर चालण्याची सवय अंगी बाणवली जाऊ लागली. त्याचा परिणाम असा होऊ लागला की, सगळं काही उंचावरून पाहण्याची सवय जडली आणि जमिनीवर काय आहे आणि समोर काय दिसतं आहे, याची काळजी घेण्याचं कसबच विसरलं जाऊ लागलं. आपणच वेगळे का, याचं उत्तर शोधत बसण्याचे कष्ट घेण्याचीही गरज वाटेनाशी झाली. आपल्याला कुणी उपकृत करतो आहे, यापेक्षा आपण किती जणांना उपकृत करू शकतो, याची जाणीव हरवली आणि व्यावसायिकतेच्या नावावर फक्त नोकरी शिल्लक राहिली. दररोज सकाळ- संध्याकाळ चमचमीत जेवणाची निमंत्रणं नित्याची झाली. ती देणाऱ्याचे हेतू समजावून घेण्याची आवश्यकताही उरली नाही. तारतम्यच हरवत चाललं.
मूठभरांसाठी का होईना, सगळ्या विश्वाला कवेत घेण्यासाठी ज्ञानाच्या मार्गानं जाण्याचे दिवस अजूनही संपले नाहीत. सारेच दीप काही मंदावलेले नाहीत. समुद्रात नाव हाकताना दिसणारे दूरचे दिवे अजूनही प्रकाशमान आहेत. निष्ठा, समर्पण या शब्दांचे अर्थही बदललेले नाहीत अजून. प्रश्न आहे तो हे सारं समजून घेण्याची क्षमता वाढवण्याचा आणि टिकवण्याचा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा