इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया- इसीस या नावाने हिंसाचाराचे थमान घालत असलेल्या संघटनेचे जणू प्रवक्तेपणच आपल्याकडे आहे अशा थाटात ट्विटरचा वापर करणाऱ्या मेहदी मसरूर बिस्वास या तरुणाला अटक करण्यात आली असून त्यातून पुन्हा एकदा आधुनिक शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान आणि धार्मिक कट्टरता यांचे मिश्रण किती घातक असते याचाच प्रत्यय आला आहे. मेहदी हा मूळचा पश्चिम बंगालचा, इंग्रजी माध्यमातून शिकलेला, मदरशात न गेलेला. त्या अर्थाने त्याचे धार्मिक शिक्षण झालेले नाही. तो पाच वेळेचा नमाजी नव्हता; पण कुराण त्याला तोंडपाठ होते. धर्मावर त्याची श्रद्धा होती. मित्र दारू पितात म्हणून त्याने त्यांची संगत सोडली होती. अन्य धर्मीय इस्लामवर अन्याय करीत आहेत असा त्याचा विश्वास होता आणि आपलाच धर्म आणि संस्कृती जगात सर्वोत्तम असल्याचा त्याला गौरव होता. माहिती-तंत्रज्ञान नगरी असलेल्या बेंगळुरूमध्ये एका बडय़ा कंपनीत तो चांगल्या पगारावर काम करीत होता. धर्माची बाब अलाहिदा केल्यास कोणत्याही शहरातील तंत्रशिक्षित कमावत्या तरुणाईचा प्रतिनिधीच शोभावा असा हा तरुण. अशा या तरुणांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे. उच्च आणि आधुनिक शिक्षणाने माणूस किमान मध्ययुगीन अंधारापासून दूर जाईल, अशी अपेक्षा असताना उलटच घडताना दिसत आहे. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे हे नीट लक्षात घ्यायला हवे. आजवर दारिद्रय़, अडाणीपणा ही दहशतवादाची पाळणाघरे असल्याचे मानले जात होते. आज मात्र शिक्षित तरुणाईच त्या जाळ्यात सापडत आहे. ट्विटर वा फेसबुकमधील विविध खात्यांवर एक नजर टाकली तरी आजची पिढी किती धर्माधळी होऊन एकमेकांच्या धर्माचा, संस्कृतीचा द्वेष करीत आहे हे दिसून येईल. साधारण दोन वर्षांपर्यंत अनेकवार प्रयत्न करूनही भारतात अल्-काईदाला आपले अनुयायी मिळवता आले नाहीत. अयमान अल् जवाहिरी याने आपले पुढचे लक्ष्य भारत असेल, असे गेल्या सप्टेंबरमध्ये जाहीर करून एक प्रकारे याची कबुलीच दिली. त्याच अल्-काईदापासून फुटून निघालेल्या इसीसच्या नेत्यांना मात्र आता भारतातही अनुयायी मिळू लागले आहेत. कल्याणसारख्या शहरांतून तरुण मुले इसीसमध्ये सामील होण्यासाठी जात आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून ही भरती मोहीम राबविण्यात आली होती, हे आता उघड झाले आहे. त्यावर कडी म्हणजे इसीस समर्थकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेले ट्विटर खाते चालविणारा तरुण हा भारतीयच असल्याचे समोर आले आहे. समाजाला सरळ अंधारयुगाकडे नेऊ इच्छिणारी अशी ही संघटना. क्रूर, हिंसक, अत्याचारी, अन्य धर्मीयांना गुलाम करणारी, हाती सापडलेल्या महिला-मुलांना लैंगिक भोगाचे साधन मानणारी आणि वर पुन्हा ते किती धार्मिक परंपरांना धरूनच आहे याची पत्रके वाटणारी ही संघटना. आज ती मालदीवमध्ये फोफावत चालली आहे. पुढची बारी आपली आहे, हे पाहता मेहदीसारखा मुलगा समाजमाध्यमातून त्याचे समर्थन करीत होता या गोष्टीतील भयंकरता लक्षात येते. अशी अनेक मुले- त्यांचे धर्म कोणतेही असोत- व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटरवरून, ऑनलाइन वृत्तपत्रांतील बातम्यांखालील प्रतिक्रियांतून धार्मिक कट्टरतावादाचे, हिंसेचे, सुडाचे समर्थन करताना दिसतात. व्हॉट्सअ‍ॅपवर सध्या मजलिस-ए-इत्तेहदुल मुसलमीन आणि िहदू (वा मराठा) अतिरेकी संघटना यांचे युद्ध जुंपले आहे. ती भाषा, ते विचार हे सर्व पाहता आपण सगळेच जण जणू सोळाव्या शतकात जाण्यास आतुरच झालो आहोत असेच वाटावे. मेहदीच्या अटकेने आपल्या सगळ्यांच्याच झोपा उडविणारा एक मोठा गजर दिला आहे- उठा, काळोखाच्या सावल्या गडद होत चालल्या आहेत. आपण जागे होणार का? हा खरा सवाल आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा