राज्याच्या माजी शिक्षण सचिव कुमुद बन्सल यांचे जीवन, कार्य आणि त्यांच्या आठवणी याविषयीच्या लेखांचा समावेश असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई येथे २८ नोव्हेंबर रोजी होत आहे. या पुस्तकातील हा लेख..
सुमारे २८ र्वष मी आकाशवाणीत काम केलं. माध्यमात काम करताना सरकारी यंत्रणेशी संबंध येतोच. आकाशवाणीखेरीज अनेक स्वयंसेवी संस्थांना मदत करण्याचं कामही मी करत आले. त्या वेळीही सरकारी यंत्रणेशी संबंध आला. या सर्व काळात जे मोजके अधिकारी त्यांची संवेदनशीलता, कार्यनिष्ठा आणि कार्यक्षमता यामुळे लक्षात राहिले; कुमुद बन्सल या त्यातल्या ज्येष्ठतम अधिकारी! रुबाबदार व्यक्तिमत्त्व आणि देखणं सौंदर्य यामुळे तर त्या लक्षात राहिल्याच. पण त्याहीपेक्षा कामाबद्दलची कळकळ आणि ठरावीक चौकटीच्या पलीकडे जाणाऱ्यांना मदत करण्याची त्यांची धडपड यामुळे त्या जास्त लक्षात राहिल्या. त्या महाराष्ट्रात शिक्षण सचिव होत्या तेव्हा दोन कारणाने त्यांच्याशी माझा संबंध आला. एक – मी विद्यार्थी-शिक्षकांसाठी प्रसारित होणारे आकाशवाणीचे शैक्षणिक कार्यक्रम बघत होते. दोन – तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ‘राष्ट्रीय साक्षरता मिशन’ला लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आकाशवाणीने ‘लोकजागर’  हा कार्यक्रम १९८८-८९ मध्ये सुरू केला होता. या नव्या कार्यक्रमाला आकार द्यायची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. या दोन्ही कार्यक्रमांची आखणी करताना शिक्षण मंत्रालयातल्या विविध विभाग सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांशी संबंध येत असे. त्यांच्याकडून बन्सल मॅडमचं भरभरून कौतुक ऐकायला मिळत असे. क्व चित एखाद्या मिटिंगमध्ये त्यांची भेटही होत असे. अधिकारी करत असलेलं कौतुक किती खरं आणि योग्य आहे; याचा प्रत्यय कुमुद बन्सल यांची भेट झाली की यायचा. आकाशवाणी माध्यमाबद्दल त्यांना खूप आपुलकी वाटत असे. सुरुवातीला मुलाखत द्यायला संकोचणाऱ्या बन्सल मॅडम नंतर हक्काने आकाशवाणीची मदत घेऊ लागल्या. माझ्याशी त्या एखाद्या मत्रिणीसारख्या वागत असत. मुलाखतीसाठी एखादा मराठी शब्द अडला; तर मोकळेपणे विचारत असत. हळूहळू त्या आमच्या माध्यमात चांगल्याच रुळून गेल्या.
साक्षरता चळवळीला मदत करणाऱ्या लोकजागर या कार्यक्रमात मी भरपूर प्रयोग करू शकले. आकाशवाणीतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेलं प्रोत्साहन हे जसं त्याचं कारण ठरलं, तितकंच राज्य सरकारच्या वतीने कुमुद बन्सल यांनी माध्यम आणि प्रयोग हे दोन्ही समजून घेणं हेदेखील कारण ठरलं. या कार्यक्रमाचा अगदी नावापासून आम्ही विचार केला होता. प्रौढ शिक्षण, साक्षरता हे वापरून गुळगुळीत झालेले शब्द. कार्यक्रमाच्या शीर्षकात हे शब्द मुळीच नको होते. साक्षरता म्हणजे काहीतरी ‘सरकारी’ असं म्हणून टीका करण्याची किंवा सोडून देण्याची आपली शिक्षित माणसांची वृत्ती. तेव्हा लोकजागर कार्यक्रम ‘सरकारी’ छापाचा असायला नकोच होता. कुमुद बन्सल सरकारी अधिकारी असल्या; तरी माध्यमाची ही सरकारी छाप नसण्याची गरज त्यांना नेमकी समजत असे. काम करताना एकूणच इनोव्हेशनला पर्याय नसतो; हे त्यांना उमगलं होतं. त्यामुळे त्या नव्या प्रयोगांची नेहमीच पाठराखण करत असत.
त्या वेळी साक्षरता प्रसाराचं वारं होतं. अगदी आकाशवाणीलाही श्रोत्यांची पत्रं यायची की आम्हाला नवसाक्षरांना शिकवण्याचं काम करायला आवडेल. त्यांना शिकवण्याची एखादी शास्त्रीय पद्धत आहे का अशी विचारणाही व्हायची. तशी पद्धत जरूर होती. आणि त्याचा प्रशिक्षण कार्यक्रमही होता. ‘कोरो’ संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून मीही ते अवगत करून घेतलं होतं आणि त्यांच्यासोबत मीही अनेकदा ते प्रशिक्षण द्यायला जात असे. अक्षरं, शब्द ही चित्रं किंवा खुणांची भाषाच असते. आपण पहिल्यांदा जेव्हा वाचायला शिकतो, तेव्हा खरं तर चित्रंच ओळखायला शिकतो. मग विशिष्ट चित्राला विशिष्ट अर्थ चिकटवणं आपल्याला समजू लागतं.
निरक्षराला प्रथम त्याचं नाव वाचायला शिकवायचं. मग नावाच्या शब्दातल्या अक्षरांमधून वेगवेगळे शब्द बनवायचे वगरे. तरीही निरक्षरांना शिकवायचं कसं हे रंजकपणे सांगणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमाची गरज होतीच. नवसाक्षर स्त्रियांच्या या मुलाखतींमधूनच असा ऑडिओ प्रशिक्षण कार्यक्रम बनवण्याची कल्पना सुचली. हे ट्रेिनग ऑफ ट्रेनर्स, प्रशिक्षक तयार करण्यासाठीचं प्रशिक्षण होतं. शिकण्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरच्या नवसाक्षरांना शोधून स्टुडिओत आणलं आणि त्यांना प्रत्यक्ष वाचायला आणि लिहायला शिकवलं आणि ते सगळं संपादित करून त्याला सूचनांची जोड देऊन ‘शाळेबाहेरची शाळा’ या दहा भागांच्या कार्यक्रमाची निर्मिती केली. प्रथम संस्थेचे संस्थापक डॉ. माधव चव्हाण त्या वेळी साक्षरतेच्या कामात होते. ते आणि ‘कोरो’चे कार्यकत्रे यांनी या कार्यक्रमात मोठी मदत केली होती.
मला आठवतं, या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात गणपत दादु कोंडिक्रे हे नवसाक्षर आले होते. गणपतराव देवनारच्या कत्तलखान्यात खाटीक म्हणून काम करत होते. सुमारे तासाभरात ते स्वतची सही करायला शिकले होते. ‘शाळेबाहेरची शाळा’ प्रसारित झाल्या झाल्या. महाराष्ट्र सरकारने त्या दहा भागांच्या कॅसेट्स आकाशवाणीकडून मागवल्या आणि प्रथम सिंधुदुर्ग आणि नंतर अन्य जिल्ह्य़ांतल्या साक्षरता कार्यक्रमातल्या ट्रेिनग ऑफ ट्रेनर्ससाठी वापरल्या. त्या काळात वसंत काळपांडे, बसंती रॉय यांच्यासारखे अनेक सरकारी अधिकारी चळवळीच्या स्पिरिटने काम करताना पाहिले. या सर्वाचा प्रेरणास्रोत कुमुद बन्सल होत्या.
आपल्याकडची प्रशासकीय यंत्रणा ही खरं तर धोरणांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे. पण अधिकारी वर्गाची मानसिकता अनेकदा सरंजामीच असते. धोरण राबवण्याच्या सर्व नाडय़ा त्यांच्या हातात असल्याने काही सन्माननीय अपवाद वगळता ते स्वतला देशाचे सेवक नाही; तर मालकच समजतात. कुमुद बन्सल अशा सन्माननीय अपवादांपकी होत्या. त्या वेळी आतासारखी माध्यमांची गर्दी नव्हती आणि कोणत्याही चांगल्या-वाईट कामाला झटकन प्रसिद्धी मिळण्याचे ते दिवस नव्हते. आता जाणवतं की बन्सलबाईंनी कितीतरी चांगले निर्णय घेतले; ज्यांचं श्रेय त्यांना मिळायचं कदाचित राहून गेलं असेल. त्यांचा कार्यालयातला वावर, संवाद, कार्यपद्धती पाहताना जाणवत असे की त्या आधी अधिकारी होत्या; आणि त्यानंतर त्या स्त्री होत्या. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातली चमक अधिकारपदातून आलेली नव्हती. त्यांच्या वागण्या-बोलण्यातला अंगभूत डौल त्यांच्या सहकाऱ्यांना आणि अगदी वरिष्ठांनाही आकर्षति करत असे. निवृत्तीनंतरही त्याच डौलाने आणि शांतपणे त्या काम करत होत्या आणि अचानक काळजाला चटका लावून निघूनही गेल्या..

Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Kal ho naa ho
“तिथे उपस्थित असलेल्या…”, ‘त्या’ सिनेमातील शाहरुख खानच्या मृत्यूच्या सीनबद्दल अभिनेत्रीचा मोठा खुलासा
Deputy Commissioner Bhagyashree Navtake refusal to investigate multi-state credit union scam
बहुराज्यीय पतसंस्था घोटाळ्याच्या चौकशीला उपायुक्त नवटके यांच्याकडून सुरुवातीला नकार
passenger two-wheeler died, dumper hit Bopodi,
डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडीत अपघात
sana malik
Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!
DY Chandrachud on euthanasia case
Ex CJI DY Chandrachud: शेवटच्या दिवशी न्या. चंद्रचूड यांचा महत्त्वाचा निकाल; मुलाच्या इच्छामरणाची मागणी करणाऱ्या पालकांना दिला दिलासा