या पुस्तकाचा सगळा भर इराकवरील हल्ल्याचा बनाव कसा रचला गेला यावर आहे. त्यामुळे हे पुस्तक ऐतिहासिकदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाचं दस्तावेज ठरतं आणि म्हणूनच ते वाचणं हे आपलंही कर्तव्य होऊन जातं. कारण याच आठवडय़ात अमेरिकेच्या इराकवरील हल्ल्याला दहा र्वष पूर्ण होतायत. महासत्तादेखील किती आणि कसा महामूर्खपणा करतात ते समजून घ्यायलाच हवं..
सत्ता आणि अमर्याद आर्थिक ताकद हातात असली तर काहीही करता येतं. हे असं का केलं, म्हणून कोणीही विचारत नाही. पश्चिम आशियाच्या तेलसंपन्न वाळूत अमेरिकेने गेल्या चार-पाच दशकांत जे काही उद्योग केलेत, ते पाहिलं की हे विधान खरं वाटेल. मुळात जेव्हा १९७९ साली अयातोल्ला रूहल्ला खोमेनी हे फ्रान्समधला विजनवास संपवून इराणात परत आले तेव्हा ते अमेरिकेच्या दृष्टीने अत्यंत निधर्मी आणि मैत्री करावे असे नेते होते, परंतु तेहरानमधल्या अमेरिकी दूतावासावर हल्ला चढवून अयातोल्लांनी अमेरिकेच्या राजकारणात चांगलीच पाचर मारली. (या प्रकरणावर आधारित ‘अगरे’ या सिनेमाला यंदाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. इराणचं राजकारण अमेरिकेसाठी इतकं महत्त्वाचं आहे की, या सिनेमाचं ऑस्कर अध्यक्षपत्नी मिशेल ओबामा यांच्या हस्ते देण्यात आलं. त्याची काहीच गरज नव्हती. खरं तर कलेच्या आडून केलेलं ते शुद्ध आणि क्षुद्र राजकारण होतं. असो. त्याबाबत नंतर कधी तरी.) ती पूर्णपणे काढायला अमेरिकेला ४४४ दिवस लागले, पण तोपर्यंत अयातोल्लांच्या इराणनं सद्दाम हुसेन याच्या खऱ्या निधर्मी इराकवर हल्ला केला होता.
त्या वेळी १९८१ च्या जानेवारी महिन्यात बगदादमध्ये सद्दाम हुसेन याच्या हाती एक खोकं दिलं गेलं. ते खोकं देण्यासाठी खास जातीनं बगदादला गेलेल्या त्या व्यक्तीचं नाव डोनाल्ड रम्सफेल्ड. ते त्या वेळी कोणी नव्हते, पण त्या खोक्यात बरंच काही होतं. त्यात होती जैविक अस्त्रं. काळपुळी, प्लेग वगैरे आजार पसरवणारी. ती वापरून सद्दामनं आपल्याच देशातल्या हजारो शिया आणि कुर्दीश बंडखोरांची नृशंस हत्या केली. नंतर सद्दाम मोठा मोठा होत गेला..
इतका की त्याला पदच्युत करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांना खास मोहीम हाती घ्यावी लागली, पण नाही म्हटलं तरी सद्दाम हा देशप्रमुख होता. त्याला काढायचं तर तितकंच सबळ कारण देता यायला हवं. बुश यांनी ते दिलं. सद्दामकडे अमानुष नरसंहार करणारी जैविक आणि रासायनिक अस्त्रं आहेत, म्हणून. मग ती शोधण्यासाठी म्हणून अमेरिकेच्या प्रचंड फौजांनी इराकवर चढाई केली. वास्तविक जी अस्त्रं अमेरिकेला सद्दामकडून काढून घ्यायची होती, ती मुळात त्याला दिली होती अमेरिकेनंच, पण हे असं होतंच राजकारणात. आजचा मित्र उद्याचा शत्रू असतो.. किंवा कालचा शत्रू आजचा गळेपडू मित्र बनतो. त्यामुळे एकेकाळचा आपणच पालनपोषण केलेला सद्दाम आता अमेरिकेचा शत्रू झाला होता. कारण ९/११ घडलेलं होतं आणि ते घडवणारा अल कईदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन आणि सद्दाम यांचं साटंलोटं आहे असा शोध अमेरिकेनं लावला होता. वास्तविक ओसामाच्या नजरेतनं सद्दाम पाखंडी होता. कारण त्याच्या देशात महिलांना बुरख्यात राहावं लागायचं नाही, त्यांना शिक्षणाची संधी होती वगैरे, पण तरी अमेरिकेला आता सद्दाम नकोसा झाला होता आणि ओसामा हाती लागत नव्हता. म्हणून हे दोघे एकमेकांचे सांगाती आहेत असं कुभांड रचलं गेलं आणि सद्दामच्या विरोधात युद्धच छेडण्यात आलं.
त्या युद्धामागचा इतिहास म्हणजे थॉमस रिक्स याचं ‘फियास्को : द अमेरिकन मिलिटरी अ‍ॅडव्हेंचर इन इराक’ हे पुस्तक. थॉमस हा ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या वर्तमानपत्राचा संरक्षणविषयक लिखाण करणारा पत्रकार. त्यामुळे त्याची संरक्षण मंत्रालयात, पेंटागॉनमध्ये चांगलीच ऊठबस.  शेकडो अधिकाऱ्यांच्या मुलाखती, काही हजारांतली कागदपत्रं, पत्रव्यवहार आदींच्या आधारानं त्यानं इराकवरच्या या हल्ल्यामागची कथा मांडलेली आहे. या युद्धाची चविष्टं वर्णन करणारी वगैरे अनेक पुस्तकं आहेत. लोकप्रियही आहेत ती, परंतु हे त्यातलं नाही. या पुस्तकाचा सगळा भर इराकवरील हल्ल्याचा बनाव कसा रचला गेला यावर आहे. त्यामुळे हे पुस्तक ऐतिहासिकदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाचं दस्तावेज ठरतं आणि म्हणूनच ते वाचणं हे आपलंही कर्तव्य होऊन जातं. वास्तविक ‘न्यूयॉर्क टाइम्स’ आणि ‘वॉशिंग्टन पोस्ट’ ही दोन दैनिकं अमेरिकी बाजारपेठेत एकमेकांची कडवी स्पर्धक, पण रिक्स याच्या या पुस्तकाची अफाट स्तुती केली ती ‘न्यूयॉर्क टाइम्स’नं. त्या वर्तमानपत्रात ती वाचली आणि अमेरिकेतल्या मित्राकरवी हे पुस्तक हाती पडण्याची व्यवस्था केली. तसं ते पडलं आणि जाणवलं की, दैनंदिन बातमीदारी करता करतादेखील ही माणसं किती काम करतात आणि त्यात सत्त्व असेल तर स्पर्धकसुद्धा किती मोकळ्या मनानं दाद देतात. खरं तर ही जाणीव होणं हेदेखील तसं त्रासदायकच ठरतं.. आपल्या आसपासचं किरटं आणि खुरटं वास्तव नको इतकं टोचायला लागतं.. असो.
तर मुद्दा हा की, बुश आणि त्यांच्या तीन साथीदारांनी हे इराक युद्धाचं कुभांड किती सफाईनं रचलं त्याची साद्यंत, पाचशे पानांत पसरलेली कहाणी म्हणजे हे पुस्तक. बुश यांचे उपाध्यक्ष डिक चेनी, संरक्षणमंत्री डोनाल्ड रम्सफेल्ड, माजी संरक्षण उपमंत्री पॉल वुल्फोविट्झ हे या युद्धाचे जनक. यात सर्वात मोठा वाटा हा वुल्फोविट्झ यांचा. ९/११ घडल्या घडल्या त्याचा संबंध या वुल्फोविट्झ यांनी सद्दामशी जोडला आणि त्याला कसं हुसकवायला हवं हे सांगायला सुरुवात केली. (याचीच बक्षिशी अध्यक्ष बुश यांनी त्यांना २००५ साली वर्ल्ड बँकेचं अध्यक्ष नेमून दिली. तिथं हे वुल्फोविट्झ महाशय शहा अली रझा या ब्रिटिश लिबियन अभ्यासिकेच्या प्रेमात पडले. ते एक वेळ ठीक, पण त्यानंतर वर्ल्ड बँकेच्या पैशानं तिला बरीच कामं मिळायला लागली. हा भ्रष्टाचारच. त्याचा बभ्रा झाल्यावर वुल्फोविट्झ यांना पायउतार व्हावं लागलं. आता ते प्राध्यापकी करतात. असो.) वास्तविक अनेक लष्करी तज्ज्ञ आणि प. आशियाचे अभ्यासक या सगळ्यांनी बुश यांना सल्ला दिला होता. २००२ साली तब्बल ७० संरक्षण तज्ज्ञ, प. आशियाचे अभ्यासक आदी अमेरिकेच्या राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठात चर्चेसाठी जमले होते. चर्चेचा निष्कर्ष एकच. इराकवर हल्ला करण्याच्या फंदात पडू नका. जनरल अँथनी झिनी आणि जनरल नॉर्मन श्वार्झकॉफ हे तर उघडपणे म्हणाले होते, इराकमध्ये एकदा का अमेरिकी सेना घुसली की माघारी जाता येणं अवघड आहे. पण तरीही बुश आणि कंपनीनं हा अव्यापारेषुव्यापार करण्याचा निर्णय घेतला. युद्धखोरीची नशा और असते. ती चढली की काही सुचत नाही.
 पण त्याची भारी किंमत चुकवावी लागते. अमेरिकेच्या या वेडपटपणाची किंमत त्या देशानं आणि नंतर साऱ्या जगानं चुकवली. महिन्याला तब्बल ५०० कोटी डॉलर्स (भारतीय चलनात २७० अब्ज ४९ कोटी रु.) इतका वेडय़ासारखा खर्च अमेरिका या युद्धावर करत गेली. त्यातूनच पुढे ही महासत्ता प्रचंड आर्थिक संकटात सापडली आणि मग तिनं सगळ्या जगालाच मंदीच्या खाईत लोटून दिलं.
इतका वेडपटपणा करायलादेखील धैर्य लागतं. त्या धैर्याच्या चित्तचक्षुचमत्कारिक म्हणता येतील अशा शेकडो सत्यकथा या पुस्तकाच्या पानापानांत विखुरलेल्या आहेत. म्हणजे इराकमध्ये गेल्यावर वुल्फोविट्झ यांना कशी खात्री होती की तिथल्या तेलाच्या विक्रीतनंच सगळा युद्धाचा खर्च निघेल, तिथले अमेरिकेचे प्रमुख पॉल ब्रेमर यांनी इराकी लष्कराची, पोलिसांची कशी मोडतोड करून टाकली आणि त्यामुळे वाहतूक नियमन ते दहशतवादी निर्मूलन सगळीच जबाबदारी अमेरिकी लष्करावर पडली.. यासाठी ते जराही तयार नव्हते.. आणि नंतर नंतर दहशतवादी कोणत्या दिशेने कोणत्या रूपात येतील हेच अमेरिकी जवानांना कळेनासं झालं इतके ते भंजाळले होते.. इराकचा प्रश्न अमेरिकेला वाटतोय तसा चार-आठ दिवसांत सुटणार नाही.. तिथे वर्षांनुर्वष अडकून पडावं लागेल.. दुसऱ्या महायुद्धानंतर इतकी मोठी डोकेदुखी जगानं दुसरी कोणती पाहिलेली नाही.. इतका तपशील या पुस्तकात भरलाय.
तो मुळातच वाचायला हवा.
का?
कारण याच आठवडय़ात अमेरिकेच्या इराकवरील हल्ल्याला दहा र्वष पूर्ण होतायत. महासत्तादेखील किती आणि कसा महामूर्खपणा करतात ते समजून घ्यायलाच हवं. त्यासाठी हे पुस्तक.
आणि ते हेही शिकवतं की, तो महामूर्खपणा जगासमोर मांडण्यासाठी कसा अभ्यास करायचा.

Story img Loader