जोवर शरीर आणि मनाच्या आसक्तीपलीकडे माणूस जाऊ शकत नाही तोवर खरं मौन शक्य नाही, तोवर ‘हृदयी देवाचे चिंतन’ही शक्य नाही, असं नमूद करून हृदयेंद्र पुढे म्हणाला..
हृदयेंद्र – तेव्हा प्रथम शरीर आणि मनाला एकमेकांच्या जोखडातून मुक्त करणं आणि नंतर शरीर आणि मनाच्या जोखडातून स्वत: मुक्त होणं, हाच आंतरिक मौनावस्थेचा एकमात्र अभ्यास आहे!
ज्ञानेंद्र – वरकरणी हा अभ्यास पटतो, पण तो साधायचा कसा? तो सोपा नाहीच..
हृदयेंद्र – तो सोपा नाहीच, पण अत्यावश्यक आहे.. आता असं पहा. आपण सर्वचजण काळाच्या आधीन आहोत. काळाची साथ आहे म्हणूनच आपण आज इथे एकत्र आहोत, बोलत आहोत.. उद्या काळाची साथ नसेल, तर हा संगही नसेल. अगदी त्याचप्रमाणे काळ म्हणजे मृत्यूच. काळाची मुदत संपली की जगणं संपलं. काळाच्या या प्रवाहात आपण जन्मापासून वहात आहोत. या काळाचा प्रभाव क्षणोक्षणी आपल्यावर पडत आहे. काळ काय करतो? तो प्रत्येक वस्तुमात्रांत परिवर्तन करीत राहातो आणि अखेरीस ती नष्ट करतो! हे शरीरसुद्धा या काळाच्याच आधीन आहे. क्षणोक्षणी ते मृत्यूकडेच अग्रेसर होत आहे. त्यामुळे पीडा, रोग या शरीराला चिकटलेलेच आहेत. मन मात्र काळाच्या प्रभावापासून स्वत:ला वेगळं ठेवू शकतं!
योगेंद्र – कसं काय?
हृदयेंद्र -काळ विपरीत असला तरीही मन स्थिर राहू शकतंच ना? म्हणजेच काळानुसार मन वाहतच असं नाही! पण शरीराचा संबंध येतो तिथे मन लटकं पडतं. त्यामुळे काळाच्या प्रभावातून शरीर रोगग्रस्त होतं तेव्हा मनही त्या रोगाचं दु:खं भोगू लागतं! त्यामुळे उलट शारीरिक व्याधीचा प्रभावच अधिक वाढतो, हे आपल्या लक्षात येत नाही. तेव्हा या अभ्यासाची पहिली पायरी म्हणजे शरीर आजारी असेल, शरीर रोगग्रस्त असेल तरी मन प्रसन्न अर्थात सद्गुरुचिंतनात मग्न ठेवणं!
कर्मेद्र – किती कठीण आहे हे..
हृदयेंद्र – म्हणून तर हा अभ्यास आहे, म्हटलं. कधी चुकणं कधी साधणं, यालाच तर अभ्यास म्हणतात.. पण हा अभ्यास अखंड सुरू मात्र पाहिजे.. मग जेव्हा शरीर आणि मनाला अलग करू शकू, म्हणजेच ना शरीराचा प्रभाव मनावर पडेल ना मनाचा प्रभाव शरीरावर पडेल, अशी स्थिती येईल तेव्हा पुढची पायरी ही की या दोहोंपासून आपण अलिप्त होणं! म्हणजे सुरुवातीला शरीराच्या त्रासांच्या प्रभावातून मनाला वेगळं केलं, आता मनाच्या सवयी, मनाच्या आवडी, मनाची ओढ यापासून मुक्त होणं!
कर्मेद्र – म्हणजे?
हृदयेंद्र – आपलं मन हे सतत देहबुद्धीच्या खोडय़ातच आपल्याला अडकवत असतं.. जे करू नये ते करण्याची ओढ या मनात असते.. ‘हरिपाठा’त माउलीही म्हणतात ना? ‘मनोमार्गे गेला तो येथे गुंतला, हरिपाठी स्थिरावला तोचि धन्य!’ या मनाच्या वाटेनं जो जाईल तो अधिकाधिक गुंततच जाईल.. हरि म्हणजे सद्गुरू, या सद्गुरुनं जो पाठ दिला आहे, त्याचा जो बोध आहे त्यानुसार जो जगेल तोच कोणत्याही गुंत्यात न अडकता ध्येयशिखराकडे अग्रेसर होत राहील..
योगेंद्र – नवनाथांमधील एक नाथही केवळ याच साधनेनं उच्चपदाला गेले होते.. मनात येईल ते करायचं नाही, असं व्रत गोरक्षनाथांनी त्यांना सांगितलं होतं!
कर्मेद्र – पण अनेकदा मन आपल्याला सावधही करतं, योग्य सल्ला देतं.. त्याचं का ऐकायचं नाही?
हृदयेंद्र – प्रत्यक्षात आपण मनाचे असे सल्ले ऐकतो का? तेवढं अवधान आपण देतो का? गोत्यात आलो की नंतर म्हणतो, तरी मला एकदा वाटलं होतं की हे करू नये.. मन सावध करत असेल तर जरुर ऐका, पण मन बेसावधच असतं, त्यावर मात करायचा प्रयत्न केला पाहिजे.. मग एकदा का या मनाला कळलं ना, की आपण त्याच्या हट्टानुसार वागत नाही तेव्हा तेच मन आपोआप तुम्हाला मदत करू लागतं.. साधनेचा कंटाळा हा पहिल्या काही मिनिटांचा असतो.. त्या वेळात मन बराच गोंधळ घालत असतं, पण एकदा मनाला कळलं की, नाही! एवढी साधना झाल्याशिवाय काही खरं नाही, तर मन साधना पूर्ण होण्यासाठी साह्य़कारीही होतं! तेव्हा मनाच्या हट्टापेक्षा आपला साधनेचा हट्ट अधिक असला पाहिजे!
चैतन्य प्रेम
८३. मौनाभ्यास -४ / हट्ट.. मनाचा आणि साधनेचा
जोवर शरीर आणि मनाच्या आसक्तीपलीकडे माणूस जाऊ शकत नाही तोवर खरं मौन शक्य नाही, तोवर ‘हृदयी देवाचे चिंतन’ही शक्य नाही, असं नमूद करून हृदयेंद्र पुढे म्हणाला..
First published on: 29-04-2015 at 01:01 IST
मराठीतील सर्व अभंगधारा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mental and spiritual obstinacy