सद्गुरूंच्या मार्गावर चालत असतानाही, सद्गुरूंचं सान्निध्य लाभूनही आपल्या मनाची घडण तात्काळ बदलत नाही. माझ्या मनाचा, बुद्धीचा, वृत्तीचा संकुचितपणा काढून टाकून माझं मन, बुद्धी, वृत्ती व्यापक बनवण्याचं काम सद्गुरूच अहोरात्र करीत असतात. जो आपला आहे तो आपल्यासारखा व्हावा, हीच एकमेव आस त्यांना असते. या शिकवणीच्या प्रसंगांतून पुढील अनंत पिढय़ांनाही खूप काही शिकायला मिळतं. त्यामुळे स्वामींच्या चरित्रातील कोणत्याही प्रसंगाकडे आपण कधीही व्यक्तिसापेक्ष दृष्टीनं पाहू नये, ते स्वामींचंच व्यापक चरित्र आहे, आपल्याला बोध मिळावा यासाठीच हे प्रसंग घडले आहेत, या दृष्टीनंच आपण त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे. सहृदयता हा अध्यात्म पथिकाच्या जीवनातला मोठा विशेष आहे. एक प्रसंग ‘स्वामी कृपांकित : कर्मयोगी भाऊ’ या भाऊराव देसाईंवर स्वामी स्वरूपानंद मंडळाने अलीकडेच काढलेल्या पुस्तकात आहे. भाऊरावांचे सुपुत्र अनंतराव देसाई यांनी तो सांगितला आहे. ते लिहितात : गोळपच्या जोशी नावाच्या गरजूंना गाय घेण्यासाठी भाऊरावांनी माझ्यादेखत पाचशे रुपये दिले व मला सांगितले की हे तुम्हास पंधरा दिवसांनी पैसे आणून देतील ते घ्या. भाऊ पुण्याला गेले. पंधरा दिवस झाले, वीस दिवस झाले. जोशींचे पैसे आले नाहीत. मी त्यांना निरोप पाठविला, पण उपयोग झाला नाही. म्हणून मी गडय़ाला त्यांना घेऊन यायला पाठविले. गडी त्यांना घेऊन आला, मी त्यांना बजावले, ‘‘आठ दिवसांत पैसे मिळाले नाहीत तर गाय सोडून आणीन.’’ अप्पांनी (स्वामी स्वरूपानंद यांनी) माझा एकूण रागरंग पाहिला व थोडय़ा उपरोधाने, थोडे हसून म्हणाले, ‘‘अंतूशेठ भाऊरावांनी तुम्हाला जोशींकडून पैसे मिळाले तर घ्यायला सांगितले आहे बरं का! वसूल करण्याचा ठेका दिलेला नाही. निदान समक्ष जाऊन जोशी यांची परिस्थिती तरी बघून यायची होती.’’ मी खरोखरच तावातावाने जोशी यांचे गोळपला गेलो व त्यांच्याकडचे अठराविशे दारिद्रय़ बघून खजीलही झालो. मला पैशाचा तगादा लावावासा वाटलाच नाही. आता वाटतं की भाऊंनी आणि स्वामींनी ठरवूनच अशा प्रकारे माझे डोळे उघडविले की काय? (पृ. ५५). जो सेवाभाव, जी सहृदयता स्वामी आपल्या माणसांत बिंबवू पाहात होते तिचा हा परिपाठ आहे. तेव्हा ‘तूं मन हें मीचि करीं’ म्हणजे तुझं मन माझ्यासारखंच व्यापक कर, याचा अनंतरावांना मिळालेला हा वस्तुपाठच आहे. आता एक गोष्ट खरी की कुणाची खरी परिस्थिती काय आहे, हे सद्गुरूच जाणतात. व्यवहारी विचार करता आपणही अनंतरावांसारखंच वागू. मग सहृदयतेनं प्रत्येक प्रसंगात कसं वागता येईल? यासाठी आधी सहृदयता म्हणजे नेमकं काय, याचाही थोडा विचार केला पाहिजे. सहृदयता म्हणजे अव्यवहार्य भोळसटपणा नव्हे! सहृदयता म्हणजे दुसऱ्याच्या परिस्थितीची जाणीव ठेवून त्याला शक्य तर साह्य़ करणं किंवा मानसिक आधार देणं आणि तेही शक्य नसेल तर निदान त्याच्या दु:खात आपल्या बाजूनं भर न घालणं आणि त्याचं मन दुखावेल असं काही न बोलणं. हे सहजतेनं तेव्हाच साधेल जेव्हा मनाचा केंद्रबिंदू ‘मी’च्या ऐवजी सद्गुरू होईल!

Story img Loader