वाद राजकीय असोत, आर्थिक असोत वा कौटुंबिक. ते सोडविण्यासाठी बुद्धीची गरज असली तरी वाद घालताना ती झोपलेलीच असते. तर्कशुद्ध युक्तिवाद करूनही लोकांचे मतपरिवर्तन होत नाही ते यामुळे. कारण जुन्या मतांमागे भावनांचा जोर असतो..
तर्कशुद्ध युक्तिवाद माणसाचे मत बदलतो का? केवळ राजकारणातच नव्हे तर रोजच्या व्यवहारातही माणसावर प्रभाव कशाचा पडतो, भावनांचा की बुद्धीचा? निवडणुकीच्या मोसमात अशा संशोधनाला बहर येतो. नेत्यांची भाषणे, त्यातील युक्तिवाद मतदारांचे मतपरिवर्तन करतात काय याची चाचपणी त्यामध्ये करता येते. मतपरिवर्तन करण्यासाठी बुद्धीपेक्षा भावना उपयोगी पडते असा अनुभव आहे व शास्त्रानेही त्याला दुजोरा दिला आहे.
निवडणूक प्रचारात नेते बहुधा भावनिक आवाहन करतात. तर्कशुद्ध युक्तिवाद करणाऱ्याला सहसा यश मिळत नाही. भावनेच्या बळावर निवडणूक जिंकणाऱ्यांवर माध्यमांतून टीका केली जाते. तथापि, माध्यमांमध्येही तर्कशुद्ध युक्तिवादापेक्षा भावनांचा पदर असलेल्या लेखनाला जास्त प्रतिसाद मिळतो. बुद्धीचा प्रभाव पडत नाही असे नाही, पण तो फारच मर्यादित वर्गावर पडतो. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी घेतलेल्या निर्णयांचे स्पष्टीकरण बुद्धीने केले तर लोकांना फारसे पटत नाही. मनमोहन सिंग यांचे प्रत्येक भाषण हे अर्थशास्त्रीय कसोटय़ांवर सर्वोत्तम असते, पण त्यामुळे लोकांचे मत बदलत नाही. याउलट अत्यंत तर्कदुष्ट बोलणारे अनेक नेते अमाप लोकप्रियता मिळवितात. मात्र त्यांनाही विरोधी लोकांचे मत बदलताना अपयश येते. कारण माणसाचे मत बदलणे हे फारच कठीण काम असते. मेंदूची रचनाच अशी आहे की एकदा झटकन मत बनले की त्याला चिकटून राहातच पुढील सर्व कारभार चालतो. व्यावसायिक क्षेत्रातही वरिष्ठ पदावरील व्यक्ती पटकन मत बनवितात, त्याला चिकटून बसतात आणि त्याची मोठी किंमत पुढे कंपनीला चुकवावी लागते.
माणूस हा बुद्धिवान प्राणी खरा. पण त्याची बुद्धी फारच कमी काळ स्वतंत्रपणे काम करीत असते. माणूस जास्तीतजास्त वेळ भावनांच्या राज्यात वावरतो. या भावनांच्या प्रभावाखाली त्याच्या मनात जगाची प्रतिमा तयार होते. मग हीच प्रतिमा योग्य कशी आहे हे दुसऱ्यावर ठसविण्यासाठी माणूस बुद्धीची मदत घेतो. म्हणजे बुद्धी मार्गदर्शक ठरत नाही तर आधीच बनलेल्या मतासाठी वकिली युक्तिवाद करण्याचे दुय्यम काम बुद्धी करते. समोर ठेवलेल्या पुराव्यातून आपल्या मताला पुष्टी देणारा पुरावा बरोबर उचलण्याचे, विरोधी पुराव्यातील त्रुटी शोधण्याचे वा त्याकडे दुर्लक्ष करण्याचे काम बुद्धी करते. आपले मत पक्के करण्यासाठी व दुसऱ्याचे मत कच्चे ठरविण्यासाठी बुद्धीचा उपयोग होतो. नवीन दृष्टिकोन मिळविण्यासाठी नाही.
बुद्धीवर भावना कशी मात करते, हे मेंदूमध्ये प्रत्यक्ष तपासण्याचे काम अ‍ॅन्ड्र वेस्टन यांनी २००४मध्ये केले. चर्चासत्रात, वादविवादात, व्यावसायिक चर्चेत वा घरगुती गप्पांमध्ये आपला मेंदू कसा काम करतो ते या संशोधनात समजते. समोरच्या व्यक्तीला आपण समजून घेतो आहोत, त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत आहोत असे आपण मानतो. पण वस्तुस्थिती अगदी वेगळी असते. आपला मेंदू नवीन माहिती ऐकायला तयारच नसतो. तो फक्त जुने मत अधिक पक्के करीत असतो.
वेस्टन यांनी संशोधनासाठी निवडणुकीचा मोसम निवडला. २००४मध्ये जॉर्ज बुश व जॉन कॅरी यांच्यातील सामना रंगात आला होता. त्या वेळी एका गटावर वेस्टन यांनी संशोधन केले. या गटातील निम्मे लोक कडवे बुशसमर्थक होते तर निम्मे कडवे कॅरीसमर्थक होते. बुश आणि कॅरी यांनी प्रचारात केलेल्या भाषणांमध्ये अनेक विसंगती होत्या. तशा त्या प्रत्येक राजकीय नेत्याच्या भाषणात असतातच. वेस्टन यांनी या विसंगती शोधून काढल्या. त्यानंतर बुश यांच्या बोलण्यातील विसंगती बुशसमर्थकांना दाखविल्या तर कॅरीसमर्थकांना कॅरी यांची परस्परविरोधी विधाने ऐकविली. विसंगत बोलणाऱ्या आपल्या नेत्याबद्दलचे मत बदलले पाहिजे असे दोन्हीकडील समर्थकांना वाटते काय, हे यातून पाहायचे होते. अर्थातच तसे झाले नाही. बुशसमर्थकांनी कॅरी यांच्यातील विसंगतीवर तोंडसुख घेतले तर कॅरीसमर्थक बुश यांची खिल्ली उडवू लागले. मात्र दोन्ही गटांनी आपापल्या नेत्यांच्या विसंगतीकडे पूर्ण दुर्लक्ष केले.
असे होणार हे अपेक्षितच होते. पण असे होताना या दोन्ही समर्थकांचा मेंदू कसे काम करतो हे वेस्टन यांना तपासायचे होते. म्हणून हा प्रयोग सुरू असताना सर्व समर्थकांच्या मेंदूचा फंक्शनल मॅग्नेटिक रेझोनन्स इमेज (एफएमआरआय) घेण्यात आल्या. आपल्या नेत्याची तसेच विरोधी नेत्याची वक्तव्ये ऐकून वाद घालताना मेंदूचा कोणता भाग काम करतो हे यातून समजणार होते. यात दिसलेली सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे प्रयोगाच्या सर्व काळात मेंदूतील बुद्धीचे केंद्र, ज्याला डॉर्सोलॅटरल प्रीफ्रन्टल कॉर्टेक्स म्हणतात, पूर्णपणे शांत होते. म्हणजे बुद्धी कामच करीत नव्हती. तरीही युक्तिवाद सुरू होता. हा युक्तिवाद पूर्णपणे भावनेच्या प्रांतात सुरू होता. भावना उचळंबिवणारी केंद्रे उत्तेजित झालेली होती. भावनिक तंटा सोडविताना उपयोगी पडणारे केंद्र, अ‍ॅन्टीलिअर सिंग्युलेट, नैतिक मुद्दय़ावर मत बनविणारे पॉस्टिरिअर सिंग्युलेट तसेच बक्षिसाची वा दुसऱ्यावर मात केल्याची सुखसंवेदना जागृत करणारे व्हेंटरल स्ट्रियाटम हे केंद्र, असा सर्व भाग काम करीत होता. या सर्व भागाला ‘ऑरबिटल फ्रन्टल कॉर्टेक्स’ असे म्हणतात.
आपल्याला पटणारी भूमिका शोधण्याचा मेंदू जोरदार प्रयत्न करतो. एकदा ही भूमिका गवसली की ती स्थिर करण्यासाठी योग्य ते पुरावे गोळा करण्याच्या मागे लागतो. असे पुरावे मिळाले की त्याला समाधान मिळते. या सर्व काळात मेंदूतील बुद्धीचा प्रांत कार्यान्वित झालेला नव्हता हे वेस्टन यांच्या मते फार महत्त्वाचे आहे.
माणसाच्या बुद्धीचा डोळा बहुतांश वेळा कसा बंद असतो हे या प्रयोगातून दिसते. टीव्हीवरील वादविवाद पाहताना नकळत आपण कोणाची तरी बाजू घेतलेली असते. भावनिक शब्दांचा वापर करून ती बाजू मांडणाऱ्या व भावनांचा आधार घेऊन प्रतिपक्षावर हल्ला चढविणाऱ्या व्यक्तीचे आपल्याला कौतुक वाटते. त्याच वेळी दुसऱ्या पक्षाला हे कळत कसे नाही, ‘त्याची बुद्धी काम करीत नाही का’, असा प्रश्नही आपण शहाजोगपणे करतो. वस्तुत: त्याच्याप्रमाणे आपलीही बुद्धी स्वस्थ बसलेली असते.
बुद्धीला आवाहन करून माणसे बदलत नाहीत आणि म्हणूनच मानवजात शहाणी होत नाही. सामाजिक बदल मंदगतीने होण्यासही मेंदूची ही कार्यपद्धती कारणीभूत आहे. बुद्धीला आवाहन करून अंधश्रद्धा संपत नाहीत. जातव्यवस्था दूर होत नाही. भ्रष्टाचार संपत नाही. महिलांना समान हक्क मिळत नाहीत. बालविवाह थांबत नाहीत. बुद्धीतील समज जोपर्यंत भावनेच्या प्रांतात उतरत नाही तोपर्यंत मेंदू त्यानुसार कृती करीत नाही. कधी कायद्याच्या धाकाने कृती होतात, माणसे बदलली असे वाटते. पण हा बदल संभाव्य शिक्षेच्या भीतीपोटी, म्हणजे पुन्हा भावनेच्याच प्रांतातून झालेला असतो. भावनेच्या रेटय़ाशिवाय बुद्धी आपला प्रभाव टाकूच शकत नाही. ‘बुद्धी डोळस असली तरी तिला हातपाय नाहीत’, असे भारतीय तत्त्वज्ञानात म्हटले आहे. त्याची सिद्धता अ‍ॅन्ड्र वेस्टन याच्या प्रयोगातून होते.
तरीही माणूस बदलतो. समाज बदलतो. काम करणाऱ्या पद्धतीचा मूळ साचा कायम असला तरी समाजात बदल झालेले दिसतात. हे कसे होते? भावना उत्तेजित नसताना बुद्धीचा डोळा उघडलेला असतो. भावना शांत झालेल्या असतील तर बुद्धीचे केंद्र कार्यान्वित होते. अशा वेळी माणूस वेगळे मत ऐकू शकतो. समजावून घेऊ शकतो. असे क्षण फारच क्वचित येतात. पण अशा क्षणात बुद्धी आपला प्रभाव दाखविते व मेंदूतील भावनांचे सर्किट बदलवून टाकते. बुद्धीला आपले वर्चस्व गाजविण्याची संधी तेवढय़ा अल्प काळापुरतीच मिळते. कारण बुद्धीने सोडलेला विचार एकदा भावनांच्या प्रांतात गेला की मग त्या विचाराचे समर्थन करीत राहण्याचे दुय्यम काम पुन्हा बुद्धीला करावे लागते. मात्र बुद्धी शुद्ध असेल तर त्यापासून निर्माण होणाऱ्या भावनाही शुद्ध असतात आणि त्यांचे समर्थन करणेही योग्य असते. आपली बुद्धी क्वचित कार्यान्वित होते ही पहिली समस्या आणि ती शुद्ध नसते ही दुसरी समस्या.
या समस्या दूर करण्याचा उपाय म्हणजे बुद्धीला डोळा उघडण्याची संधी वारंवार देणे. अमेरिकेतील काही राज्यांत असे प्रयोग सुरू झाले आहेत. मुख्य म्हणजे समाजशास्त्रज्ञ त्यासाठी पुढाकार घेत आहेत. परस्परविरोधी राजकीय मते असलेल्या नेत्यांना निरनिराळ्या कारणांनी एकत्र आणून किमान कार्यक्रमावर सहमती मिळविण्याचे प्रयत्न केले जातात. मात्र सहमतीचा अट्टहास नसतो व मतपरिवर्तनाची धडपड नसते. ही सहमती लोककल्याणासाठी असते. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी नाही. व्यावहारिक तोडगा काढणे एवढाच उद्देश असतो. एकत्र जेवण घेणे हा यासाठी सर्वोत्तम मार्ग असतो. कारण जेवताना भावना हलक्या होतात व बुद्धीची खिडकी उघडू शकते. फ्लोरिडा राज्यातील अशा प्रयोगांचा सध्या बराच अभ्यास सुरू आहे.
भावनांना थोडे बाजूला ठेवून बुद्धीचा डोळा उघडणे हा जगण्याचा रास्त मार्ग आहे. राजकारणाप्रमाणे व्यवसायात व कुटुंबातही तोच उपयोगी पडतो. त्यासाठी थोडी धडपड करावी लागते इतकेच.

Manikrao Kokate , Manikrao Kokate Chhagan Bhujbal,
छगन भुजबळ यांची समजूत काढण्याचा प्रश्नच नाही, माणिक कोकाटे यांची भावना
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Loksatta kutuhal Artificial Intelligence and Power Supply
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि विद्युत पुरवठा
Loksatta editorial Dr Babasaheb Ambedkar Lok Sabha Elections Constitution Convention
अग्रलेख: कोणते आंबेडकर?
29 559 sarees are still pending in saree distribution scheme of Mahayuti
आचारसंहिता संपूनही मोफत साडी वाटपास मुहूर्त लागेना, उत्तर महाराष्ट्रात २९ हजार साड्या पडून
importance of stability in life
सांधा बदलताना : मैत्र जीवांचे…
treatment personality disorders
स्वभाव-विभाव : विकारांतून मुक्ती
Loksatta kutuhal Artificial omnidirectional intelligence
कुतूहल: कृत्रिम सर्वसमावेशक बुद्धिमत्ता
Story img Loader