‘लंडन फूडी हब’चा पुरस्कार मुंबईतील मिसळीला मिळाला याचे कौतुक खवय्यांना खचितच असणार, परंतु विविधता टिकवून एकता साधणाऱ्या या पदार्थाचे महाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या उपाहारगृहांत अनुभवता येणारे वैविध्यही शाबूत राहावे, हे बरे!
मिसळ म्हणजे मराठी माणसाच्या रसनेला पडलेले झणझणीत स्वप्न, असे म्हटले तर ते फारच गुळगुळीत ललित वगरे होईल. परंतु हेही खरे की ती अगदीच कविकल्पना ठरणार नाही. वस्तुस्थितीच तशी आहे. मिसळ या पदार्थात अशी काही र्तीदार जादू आहे की तिच्या नुसत्या दर्शनमात्रेच त्याच्या मुखात पाचकरसाचे पाझरतलाव फुटतात. तसा हा काही फार थोर पदार्थ नाही. रूपरंगाने म्हणाल तर तो अस्सल मराठी माणसासारखाच. एक हजार २३७ वर्षांपूर्वी उद्योतनसुरी नावाचा एक साहित्यिक होऊन गेला. कुवलयमाला हा त्याचा ग्रंथ. त्यात त्याने मराठी माणसांचे वर्णन करताना त्यांची अत्यंत समर्पक अशी दोन वैशिष्टय़े सांगितली आहेत. तो म्हणतो, ते अहिमाण आणि कलहसील म्हणजे अभिमानी आणि भांडखोर असतात. मिसळ अगदी तशी आहे. गरम आणि भडक माथ्याची. उन्हात रापल्यासारख्या वर्णाची. गुळमाट, गुळचाट या शब्दांशी जन्माचे भांडण असणारी आणि कोल्हापुरी लवंगी मिरचीशी जन्माचे नाते असणारी. या नात्यामुळेही मिसळचा स्वभाव तसा बनला असेल कदाचित. पण नंतर पुढे पुण्यात वगरे जाऊन तशी तीही बऱ्यापकी मवाळ आणि बरीचशी ‘पुणेरी’सुद्धा झाली. मात्र तिची मूळ प्रवृत्ती पहिल्याच घासाला जिभेच्या माध्यमातून पंचेंद्रियांना ४४० व्होल्टचा झटका देण्याचीच. त्यामुळे मुंबईतील एका खाद्यगृहातील मिसळीने ‘जगातील सर्वोत्तम शाकाहारी खाद्यपदार्था’चा किताब पटकावला ही बातमीसुद्धा अनेकांना धक्का देऊन गेली. पण हा धक्का आनंदाचा होता. त्या आनंदाला पश्चात्तापाच्या भावनेची किंचित फोडणी होती की नाही ते सांगता येत नाही. पण नसेल तर ती असावयास हवी. आजवर अगदी मराठी माणसानेही मिसळीवर दर्जाच्या बाबतीत अन्यायच केला आहे. अनेक जण आजवर मिसळीला कदान्न असेच लेखत आले आहेत. एकीकडे ताटलीभर मिसळ, पाच-सहा पाव आणि त्या पावांसाठी र्तीच्या फैरीवर फैरी असा आडवा हात मारायचा. त्याने झालेला अंगजाळ शमविण्यासाठी वर ताकाचे दोन प्याले रिचवायचे आणि उदर तृप्त तृप्त झाले तरी मनाने मात्र मिसळीला मराठी खाद्यजगतात खालचाच मान द्यायचा हा अस्सल दुटप्पीपणा झाला. हा गुण त्या कवी उद्योतनसुरीला माहीत नव्हता म्हणून बरे. नाही तर मराठी माणसांच्या गुणदर्शनात त्याने याचीही भर टाकली असती. अर्थात आता मिसळीला विलायती प्रमाणपत्र मिळाले आहे आणि पाश्चात्त्यांनी नावाजल्याशिवाय सोन्यालाही सोने न म्हणण्याची आपली परंपराच असल्याने तिला जागून आता तरी मिसळीला मराठी खाद्यपदार्थाच्या पंक्तीत मानाचे पाट, खरे तर ताट, मिळेल यात शंका नाही.
येथे एक गोष्ट आवर्जून नमूद करायलाच हवी की मिसळीला मानाचे ताट, सणासुदीला करावयाच्या पदार्थाच्या पंक्तीत स्थान न मिळण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हा मुळात घरात करायचा पदार्थच नाही. म्हणजे तो घरात केला जात नाही असे नाही. पोरासोरांची खायखाय ‘बस, दोन मिनिटांत’ शमविण्यासाठीचे जे मॅगीपूर्व खाद्यपदार्थ आहेत त्यात मिसळीचेही नाव घेतले जाते. पण घरातील मिसळीला कडधान्याच्या रश्शाचा पायाच अधिक. तेथे र्तीनामक मिसळीला मिसळपण देणाऱ्या द्रव्याला फार भाव नसतो. अखेर घरगुती आमटीत कुठून येणार र्ती? हे विधान किंचित पुरुषी गंडाचे निदर्शक वाटेल, परंतु र्ती हे खास पुरुषी उत्पादनच. आज अनेकांना हे आश्चर्याचे वाटेल की, प्राचीन काळी शेती हे बाईचे आणि स्वैपाक हे पुरुषाचे काम होते. पूर्वी नवेद्याचे पदार्थ स्त्रियांनी करायचे नाहीत अशी धर्माज्ञा होती. कारण काय, तर स्त्रियांनी देवांकडचा अग्नी चोरून आणला. तर हे ऋग्वेद काळापासूनचे आहे आणि आजही सार्वजनिक कार्यातल्या स्वैपाकाची, नवेद्याची जबाबदारी पुरुषांच्याच खांद्यावर असते. सार्वजनिक उपाहारगृहांतही बहुतकरून पुरुष आचारीच असतात आणि म्हणूनच र्तीही सार्वजनिक उपाहारगृहांतच आढळते. परंतु अगदी काल-परवापर्यंत मराठीजनांत उपाहारगृहात जाऊन खाण्याबद्दल फार काही चांगली भावना नव्हती. उठवळपणाच मानला जायचा तो. अव्वल इंग्रजी अमदानीतही पाव खाल्ल्याने माणसे जेथे बाटत आणि चहा-बिस्कुटांच्या सेवनामुळे भल्या भल्यांनाही प्रायश्चित्त घेण्याची वेळ येत असे तेथे क्षुधाशांतीगृहांत जाणे हे सज्जनाचे लक्षण कसे मानले जाणार? पुढे कली बदलला. धर्मसुद्धा जरा कणखर झाला. त्याला पाव-बिस्कुटांनी बाट लागणे बंद झाले. हॉटेले आणि रेस्तराँत जाणे यालाही प्रतिष्ठा आली. तसे मिसळीचे दिवसही पालटले. आज तर काही गावे, काही ठिकाणे यांची नावे खास मिसळीसाठी मोठय़ा आदराने घेतली जातात. अस्सल खवय्यांच्या व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर अशा पन्नासेक ठिकाणांच्या याद्या फिरत असतात आणि कोणत्या मिसळीत काय अधिक-उणे याच्या चर्चा समाजमाध्यमांतूनही घडत असतात. यात अर्थातच आद्य मानाचे स्थान कोल्हापूरच्या मिसळीला. लोकमान्यतेनुसार अस्सल मिसळ कोल्हापूरचीच. हे अर्थातच सांगोवांगी प्रकरण आहे. मिसळ आली कोठून, तिचा उगम आणि इतिहास काय आहे यावर आजवर कोणी संशोधन केल्याचे ऐकिवात नाही.
एक मात्र खात्रीपूर्वक सांगता येईल की मिसळीचा उगम हा भारतीय परंपरेतूनच झालेला आहे. विविधतेतील एकता हे भारतीय परंपरेचे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्टय़. विविध वंश, धर्म, पंथ, जाती, भाषा, संस्कृती, रीतिरिवाज अशा मिसळीतूनच भारतीय परंपरा नावाचे जे घट्ट रसायन आहे ते तयार झाले आहे. मिसळीने तीच विविधतेची जिवंत, रसरशीत परंपरा अभिमानाने अगदी नावापासून जपली आहे. खाद्यपदार्थाच्या दुनियेत याबाबत स्पर्धा झालीच तर ती संक्रांतीनंतर केल्या जाणाऱ्या भोगीच्या कालवणाशीच होऊ शकेल. पण तो भाज्यांचा मामला असतो. वर्षांतून एकदाच होतो. मिसळ हा मूळ शेवेचा पदार्थ. त्यात नंतर काहीही, अगदी पोहे आणि उकडलेले बटाटेसुद्धा घालण्यात येतात. पण तिचा पाया रस्सा असेल, शिखरावर र्ती असेल, तर इमारतीत शेव येतेच. या शेवेचा इतिहासही अगदी प्राचीन आहे. महाराष्ट्रात यादवकाळात कोणते पदार्थ खाल्ले जात असत याची माहिती महानुभाव वाङ्मयातून मिळते. त्यात शेवेचा समावेश आहे. म्हणजे ज्ञानेश्वर, चक्रधरांच्या काळामध्ये मराठी माणसाच्या खाण्यात शेव होती. ती सोजीची असे. बेसनाची तिखट शेव हा त्यानंतरचा शोध असावा. या शेवेची भाजी हा उत्तर महाराष्ट्रातील एक आबालवृद्धप्रिय प्रकार आहे. हल्ली तोही मराठमोळ्या उपाहारगृहांतून मिळतो. या शेवेच्या भाजीमध्ये मिसळीचा पूर्वावतार शोधता येईल. अर्थात खाद्यपदार्थाचे मूळ शोधण्याऐवजी त्यांचा स्वाद चाखण्यातच खरी मौज असते.
खाद्यपदार्थातील उष्मांकाची गणिते मांडून जेवणारांना आणि आम्लपित्तशामक काढे हेच ज्यांचे रात्रभोजनातील ‘डेझर्ट’ अशा उदरदुर्बळांना कदाचित मिसळीच्या स्वाद-आस्वादाची मौज समजणार नाही. अस्सल खवय्यांना मात्र नक्कीच मिसळीचा स्वाद जगभर व्हावा असेच वाटत असणार. त्यांची ही अपेक्षा अजिबात वावगी नाही. ‘लंडन फूडी हब’चा पुरस्कार मुंबईतील मिसळीला मिळाला याचे कौतुक या खवय्यांना खचितच असणार. परंतु त्याचबरोबर त्यांच्या मनात आता शंकेची अशीही पाल चुकचुकू लागली असेल, की मिसळ हा खाद्यपदार्थ ब्रॅण्डबद्ध करण्याचा विचार तर यानिमित्ताने सुरू होणार नाही ना? कारण मिसळीचे मिसळपण तिच्या उन्मुक्त भिन्न स्वादामध्ये आहे. तो एकारला गेला तर मिसळीचे माहात्म्यच काही उरणारच नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा