मलेशियन एअरलाइन्सचे बोइंग विमान शनिवारी समुद्रात कोसळल्यानंतर तीन पूर्ण दिवस उलटले तरी विमानाचा पत्ताच लागू नये हे चक्रावून टाकणारेच आहे.. मलाक्काच्या सामुद्रधुनीत विमान नक्की सापडणार, असे अंदाज तिसऱ्या दिवशी बांधले गेले आणि कदाचित चौथ्या दिवशी, बुधवारी, विमानाचे अवशेष सापडलेलेही असतील. परंतु त्याआधी रविवारपासून, सात देशांची मिळून ३४ विमाने व ४० जहाजे या विमानाचे अवशेष शोधण्याचे काम करत होती. तरीदेखील विमानाचा एक तुकडाही हाती लागू नये, हे भयशंकांमध्ये भर घालणारेच होते. त्यामुळे दुर्घटनेचे कारणही अनाकलनीयच झाले. साधारणपणे कोणतीही हवाई दुर्घटना घडली की पहिल्याप्रथम दुर्घटनाग्रस्त विमानाच्या ब्लॅकबॉक्सचा शोध घेतला जातो. ब्लॅकबॉक्समधून दुर्घटनेचे कारण समजून पुढील कार्यवाहीचा मार्ग मोकळा होतो. मात्र, मलेशियन एअरलाइन्सच्या विमानाबाबत तशीही शक्यता कमीच दिसते, कारण विमान समुद्रात कोसळल्याने त्याचा ब्लॅक बॉक्स सापडायला आणखी किती काळ वाट पाहावी लागेल याची शाश्वती नाही. यापूर्वी एअर फ्रान्सचे रिओ दि जानिरो येथून पॅरिसकडे झेपावलेले एअरबस विमान अटलांटिक महासागरात कोसळले होते. हे विमानही १ जून २००९ रोजी असेच गूढरीत्या रडारवरून गायब झाल होते. २२८ जणांचा बळी त्यात गेला होता. पाच दिवसांच्या अथक शोध मोहिमेनंतर या विमानाचे अवशेष तरी हाती लागले. मात्र, फारच कमी प्रवाशांचे मृतदेह शोधपथकांना मिळाले. त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स आणि व्हॉइस डेटा रेकॉर्डर मिळवायला शोधपथकांना आणखी एक-दीड वर्ष लागले. तपास पूर्ण होऊन २०१२ मध्ये त्या दुर्घटनेची कारणमीमांसा करण्यात आली. अचानक आलेले वादळ आणि परिस्थितीचे आकलन करून त्यावर नियंत्रण मिळवण्यात वैमानिकाला आलेले अपयश यामुळे ही दुर्घटना घडल्याचे त्यात सांगण्यात आले. या अपघाताशी मलेशियन एअरलाइन्सच्या बोइंग अपघाताचे काही प्रमाणात साम्य आहे. या दोन्ही विमानांच्या वैमानिकांनी जमिनीवर असलेल्या त्यांच्या नियंत्रकांना विमानात काही अघटित घडल्याचे संकेत दिलेले नव्हते. अगदी विमान कोसळतानाही एसओएस (दुर्घटना होत असल्याचा) संकेत न मिळाल्याने अपघाताचे गूढ वाढले आहे. विमान अपहरणापासून ते दहशतवाद्यांनी विमान स्फोटांनी उडवून देण्यापर्यंत सर्व शक्यता गृहीत धरल्या गेल्या, परंतु एक एक करून त्यावर फुलीही मारली जात आहे. दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला असता तर विमानाचे अवशेष समुद्रावर तरंगताना नक्कीच दिसले असते आणि दहशतवादी गटांनीही त्याची जबाबदारी तातडीने स्वीकारली असती. विमानात तांत्रिक दोष होता असेही म्हणायला वाव नाही, कारण बोइंगच्या सर्व विमानांनी तांत्रिक कसोटय़ा पार केलेल्या असतात, उड्डाणापूर्वीही चाचण्या केल्याच जातात आणि तो हवेत तांत्रिक दोष निर्माण झाला असता तर वैमानिकाने तसे नियंत्रकांना कळवले असते. असेही झालेले नसल्यानेच नेमक्या कोणत्या कारणांनी हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. परंतु हे मात्र खरे की मानवनिर्मित असो वा निसर्गनिर्मित, आपत्ती आली की त्याकडे पाहण्याचा आपापला दृष्टिकोन प्रत्येकाचा असतो आणि तो दृष्टिकोन त्या त्या भूप्रदेशातील विचारांचा अर्क असतो. त्यामुळेच या पाश्र्वभूमीवर मलेशियातील विरोधी पक्षनेत्याने केलेली एक ट्विप्पणी लक्षणीय ठरते. मोहम्मद निझार जमालुद्दिन असे या विरोधी पक्षनेत्याचे नाव असून व्हिएतनामी समुद्रात बम्र्युडा ट्रँगल तयार झाला असल्याची ट्विप्पणी त्याने केली आहे. आपत्तीच्या वेळी आपल्याला सवंग लोकप्रियता मिळेल असे विधान करणारे नेते केवळ आपल्याकडेच नाहीत तर इतरत्रही आहेत, हेच या ट्विप्पणीवरून अधोरेखित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा