मोबाइलमुळे स्वप्नांची दुनिया वास्तवात आली. ‘झीरो जी’ पासूनचा  हा विस्मयकारी प्रवास ‘फोर जी’चा टप्पा ओलांडत आहे. आणि केवळ संवादाचे नव्हे, तर खिशातला, सोबतीने चालताबोलता ‘ज्ञानकोश’ म्हणून हे आश्चर्य टप्प्यागणिक विकसित होतंय..
‘मन जाणणारं यंत्र’ कधी काळी अस्तित्वात येईल, असं भाकीत कुणी पन्नासेक वर्षांपूर्वी वर्तवलं असतं, तर एक तर ‘कविपंथा’चा किंवा ‘वेडगळ’ म्हणून त्याची संभावना झाली असती. पूर्वी, जे सूर्यालादेखील पाहता येत नाही, ते कवीला दिसायचं. पण गेल्या पाच दशकांत क्रांतीची पावलं जरा जास्तच वेगानं पडू लागली, आणि कवीच्या स्वप्नांच्या दुनियेतील वास्तवात मात्र खडबडाटच आहे, याचे भान जगाला येऊ लागले. क्रांतीची पावलं वेगानं पडल्याचा हा परिणाम असला, तरी तो बदल मात्र संथपणानंच जगात भिनत गेला. ते आजच्या जमान्याला कदाचित जाणवणारदेखील नाही. पण आता या अनुभवाने अस्वस्थता मात्र येणार नाही. कारण हा बदल आपण साऱ्यांनी सहजपणे स्वीकारला आहे. अवास्तवाच्या डोहात कविकल्पनांच्या नौका सोडून त्यामध्ये विहरत बसण्याइतका वेळ आजच्या वेगवान काळातील मनाला नाही. म्हणूनच, काहीतरी हरवलंय, अशी रुखरुख या बदलाच्या जाणिवांमधून उमटणार नाही. त्या काव्याच्या हिंदोळ्यांवर कधी काळी घेतलेल्या मनसोक्त झोक्यांमुळे कदाचित, मागे वळून पाहताना काही क्षणकालासाठी मन काहीसं कळवळेल, पण ते व्याकुळपण क्षणकाळापुरतंच असेल.  
त्या काळी, परगावी असलेल्या आपल्या एखाद्या सुहृदाशी संवाद साधण्याचे कष्ट आठवून आज कदाचित ओशाळेपणच येईल. त्या जगाच्या सपकपणाची आठवण नकोशीही वाटेल. खरं म्हणजे, त्या काळातही प्रेमाचे उत्कट रंग तरुणाईच्या दुनियेवर विखुरलेले होतेच. विरहाच्या व्यथाही असायच्या. दूरवर कुठे असलेल्या आपल्या जिवलगाजवळ या विरहव्यथा व्यक्त करण्यासाठी मनाचे पंख पसरले जायचे. त्याच कविकल्पनांवर स्वार होऊन मन भराऱ्या मारायचं, ‘पंख होते तो उड आती रे’.. म्हणत एखादी प्रियतमा आपल्या मनावरचा ओरखडा दाखवण्यासाठी तडफडू लागायची किंवा ‘चिठ्ठी ना कोई संदेश, जाने वो कौनसा देश, जहाँ तुम चले गये’, म्हणत विरहानं व्याकुळ व्हायची आणि प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर, कधीतरी अचानक दारी तो- ‘डाकिया’- जणू देवदूत होऊन उभा राहायचा.. एक गुलाबी लिफाफा हाती पडायचा आणि ‘चिठ्ठी आयी है’, म्हणत मन आनंदानं चीत्कारत सुटायचं.. मन आणि जाणिवांच्या ‘व्यक्तपणा’ला अशा मर्यादा असलेल्या त्या काळानं मग कल्पनांनाच आपल्या अभिव्यक्तीचे दूत केले. पण जगाच्या सीमा आकुंचित होऊ लागल्या आणि अभिव्यक्तीच्या गरजाही वाढत गेल्या. ‘टपाल’ अशा रूक्ष नावाच्या यंत्रणेनं हे ‘हळवं’ काम स्वीकारलं, आणि धीम्या गतीनं का होईना, भावनांची शब्दरूप देवाणघेवाण वास्तवात येऊ लागली. त्या काळात क्रांतीची पावलंही फारशी दमदार नसायचीच. शे-दोनशे वर्षांत एखादं नवं काहीतरी क्रांतिकारी जन्माला यायचं आणि ते जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचायला आणखी काही काळ लागायचा. आपल्या देशातील त्या काळातील दूरसंदेश यंत्रणा तर भावनांची सत्त्वपरीक्षा पाहणाऱ्याच ठरल्या. टेलिफोन नावाची यंत्रणा घरोघरी येण्यापूर्वी, आपल्या कुटुंबातल्या एखाद्या परगावी राहणाऱ्याशी टेलिफोनवरून संवाद होण्याकरिता संपूर्ण दिवसाची प्रतीक्षा अटळ असायची. पण कबुतरापासून सुरू झालेलं संदेशवहन टपाल आणि पुढे टेलिफोन अशा टप्प्यावर अखेर पोहोचलं. त्यालाही प्रदीर्घ काळ जावा लागला. स्वातंत्र्यानंतरही पहिली दोन-तीन दशके अशाच रूक्ष अवस्थेत गेली, पण व्यक्त होण्यासाठी जन्म घेणाऱ्या एका अचाट क्रांतीच्या स्वप्नांचीदेखील चाहूल लागलेली नसताना, त्या काळात भारताबाहेर मात्र, काही स्वप्ने प्रत्यक्ष साकारत होती.. गेल्या पाच दशकांतील विकासाच्या वाटांनी मन आणि भावनांच्या जिवंतपणालाही महत्त्व दिलं, क्रांतीच्या रूपानं घडलेल्या या बदलानं थेट मनाशी नातं जोडलं. आता दूरगावी राहणाऱ्या सुहृदाशी, एखाद्या प्रेमिकेला आपल्या प्रियकराशी, एखाद्या मातेला आपल्या दूरदेशी स्थिरावलेल्या मुलाशी किंवा सासरघरी गेलेल्या आपल्या नवपरिणिता मुलीशी संवाद साधण्यासाठी उंबरठय़ावर ताटकळत, ‘टपाला’ची वाट पाहावी लागत नाही. ‘पाखरा जा दूरदेशी’ म्हणत, ‘निरोप्या’चं काम एखाद्या पक्ष्यावर सोपवावं लागत नाही किंवा ‘माहेरचा वारा’ अंगणात आल्याच्या  भावात्मक आनंदात चिंब भिजून एखाद्या सासुरवाशिणीला आपल्या मनाची घालमेल संपवावी लागत नाही. ‘याचि देही’ भेटीचा योग साधणं शक्य नसेल, तर निदान ‘याचि डोळा’ भेटण्याचा आनंदही आगळा असतो, याची अनुभूती याच क्रांतीनं दिली.
.. ‘मोबाइल’ हे या विस्मयजनक क्रांतीचं नाव. आता ही क्रांती नवी राहिली नसली, तरी जेमतेम चार दशकांच्या वाटचालीत या क्रांतीनंही क्रांतीचे असंख्य पैलू अनुभवले आणि माणसाच्या जगण्याला नवे अर्थ प्राप्त करून दिले. जणू मानवी शरीराचे एक अपरिहार्य बाह्य़ांग असावे, अशी जवळीक या मोबाइलने माणसाशी साधली. संवादाचे साधन, विरंगुळ्याचे माध्यम, करमणुकीचे केंद्र, ज्ञानाचा खजिना, निरोप्या आणि त्याहीपुढे, थेट भेट घडविणारे माध्यम अशी अनेक रूपे घेऊन आजचा मोबाइल माणसाच्या सेवेला सज्ज झाला आणि अनेक समस्यांवरही एकमेव उपाय ठरला. या मोबाइलने दारिद्रय़ाच्या दु:खावर पांघरूण घातलं, मागासलेपणाच्या जाणिवा पुसून टाकल्या आणि वेदना विसरण्यासाठी मन मोकळं करण्याचं एक साधन म्हणून ‘सच्चा सोबत्या’ची भूमिकाही वठवली.
आपल्या एखाद्या जिवलगाशी मन मोकळं करण्याच्या आनंदात रिकाम्या खिशाची आणि पोटातल्या भुकेची वेदनादायक भावनाही हलकी होते, याची प्रचीतीही या साथीदारानं दिली, आणि कमावणाऱ्याबरोबरच, रिकाम्या हातातही मोबाइल दिसू लागला. आज घरात शौचालय नसेल, डोक्यावर छप्परही नसेल, पण मोबाइलने मात्र मनाचा कोपरा कोपरा व्यापून टाकला आहे. आजपासून बरोबर ४० वर्षांपूर्वी, ३ एप्रिल १९७३ रोजी, मोबाइल नावाच्या या जादूची कवाडे  माणसांसाठी खुली झाली. मोटोरोला नावाच्या कंपनीच्या मार्टिन कूपर नावाच्या अभियंत्याने मोबाइलच्या हॅण्डसेटवरून पहिला कॉल केला, आणि आजवरच्या असंख्य स्वप्नांची दुनिया वास्तवात आली. ‘झीरो जी’ पासून सुरू झालेला मोबाइलच्या दुनियेचा विस्मयकारी प्रवास ‘फोर जी’चा टप्पा ओलांडण्याच्या तयारीत आहे. आणि केवळ संवादाचे साधन नव्हे, तर खिशातला, सोबतीने चालताबोलता ‘ज्ञानकोश’ म्हणून हे आश्चर्य टप्प्यागणिक विकसित होतंय. पृथ्वीच्या कक्षेपलीकडच्या अस्तित्वाशी संवाद साधण्याच्या क्रांतीचा टप्पाही सॅटेलाइट टेलिफोनच्या रूपानं साध्य होतोय..
सध्याच्या इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल क्रांतीच्या या युगात चार-पाच दशकांपूर्वीचा एक इतिहास हरवणार आहे, हे वास्तव आहे. घराच्या एका हळव्या कोपऱ्यात, तारेला अडकवलेली जुनी पत्रे पुन:पुन्हा चाळण्याच्या आनंदाची अनुभूती यानंतरच्या पिढीला कधीच मिळणार नाही, हेही वास्तव आहे. प्रेमीजनांच्या आणि आप्तेष्टांच्या ख्यालीखुशालीच्या पत्राची वाट पाहण्यातील हुरहुरलेपण या क्रांतीने हरवले आहे, हेही वास्तव आहे. पण हा बदल अपरिहार्य आहे. आजच्या पिढय़ा मोठय़ा होतील, ‘आजचे नवे’ तेव्हा ‘जुने’ झालेले असेल. त्यामध्ये त्यांना त्यांच्या ‘जुन्या दिवसांचा’ आनंद सापडेलच!