विज्ञानाविषयी कुतूहल असणाऱ्या ठाण्यातील एका विद्यार्थ्यांने एका टोमॅटोच्या दोन्ही बाजूला दोन मोबाइल फोन ठेवले आणि काही तासांनंतर त्याच्या लक्षात आले की, टोमॅटो फुटून त्यातून रस बाहेर येऊ लागला आहे! मोबाइलच्या अतिरेकी वापराने काय होऊ शकते, याचे हे एक उदाहरण आहे. गेल्या दशकभरात जगातील मोबाइलधारकांच्या संख्येत झालेली अफाट वाढ माणसाच्या अनारोग्यालाही आमंत्रण देते आहे का, याबद्दल जगातले अनेक संशोधक सध्या विविध प्रयोग करत आहेत. उपग्रह दळणवळण तंत्रज्ञानातील केवळ ध्वनिलहरींच्या साह्य़ाने साऱ्या जगाला कवेत घेणाऱ्या या नव्या तंत्रज्ञानाने अनेकांची झोप अक्षरश: उडालेली आहे. कर्णाच्या कवचकुंडलाप्रमाणे शरीराचा अविभाज्य भाग बनलेल्या या मोबाइल फोनची ग्राहक संख्या आता पाच अब्जच्या घरात गेली आहे. सारे जग या नव्या यंत्रामुळे अनेक प्रकारच्या आरोग्यविषयक समस्यांना तोंड देत राहील, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. मोबाइल वापराने मेंदूवर परिणाम होतात, असे संशोधन प्रसिद्ध होताच इंटरफोन स्टडीज या नावाने जगातील मोबाइल फोनधारकांची सर्वात मोठी पाहणी करण्यात आली. मोबाइलमधील रेडिओ लहरींमुळे कर्करोग होण्याची शक्यता नसल्याचे मत या पाहणीतून व्यक्त करण्यात आले. इंटरनेटमुळे माणसाच्या रोजच्या जगण्यात फरक पडू लागला, हा फरक लक्षात घेऊन मोबाइल कंपन्यांनी आपल्या फोनमध्येच इंटरनेटची जलद आणि तत्पर सेवा देणारे टू जी, थ्री जीसारखे तंत्रज्ञान समाविष्ट केले. परिणामी जे काम टेबलावरील संगणक किंवा लॅपटॉप करतो, तेच काम मोबाइल करू लागला. हाताळायला सोपे आणि वापरायला सुकर असे हे यंत्र पोस्ट, रेडिओ, ध्वनिमुद्रण, संगणक, कॅमेरा या वेगवेगळ्या उपकरणांची कामे एकहाती करू लागले. स्टीव्ह जॉब्जने त्याच्या आयफोनमध्ये कोणत्याही अवघड आणि अशक्य प्रश्नांची उत्तरे देणारी ‘सीरी’ नावाच्या स्त्री सहायकाचीही नेमणूक  केली. या एवढय़ाशा यंत्रात सारीच कामे सहजरीत्या सामावली जाऊ लागल्याने त्याचे माणसाशी असलेले साहचर्य वाढणेही साहजिक बनले. त्यावरील अवलंबित्व वाढीस लागल्याने, त्याचा परिणाम त्याच्या मनाच्या एकाग्रतेशी होऊ लागला. शरीरातील मेलाटोनिन या हार्मोन्सची पातळी कमी होऊन, त्याचा परिणाम झोप कमी होण्यावर होतो, असेही संशोधन शास्त्रज्ञांनी सिद्ध केले. मोबाइलबद्दलच्या प्रत्येक संशोधनाच्या निष्कर्षांच्या बरोबर विरुद्ध निष्कर्ष असणारे संशोधन त्वरेने केले जाते. त्यामुळे मोबाइल वापरणाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि त्याचे हाताळणे कमी होत नाही. सतत नव्या तंत्रज्ञानाने मढवलेले हे यंत्र दर आठवडय़ाला कात टाकत असते. तंत्रज्ञानाच्या विकासाचा वेग आणि त्याचे प्रत्यक्ष यंत्रात अवतरणे यामध्ये फार तफावत राहू नये, यासाठी जगातील मोबाइल उत्पादक कंपन्यांना असे करण्यावाचून पर्याय उरला नाही. एखादे तंत्रज्ञान आणि यंत्र माणसाच्या मनाचा किती मोठा भाग व्यापून टाकते, याचे मोबाइल हे उदाहरण म्हटले पाहिजे. मोबाइलच्या वापराने झोपेवर परिणाम होतो आणि त्यामुळे अनारोग्याला निमंत्रण मिळते, असे नवे संशोधनही आता बाहेर आले आहे. एकेकाळी प्रतिष्ठेचे लक्षण मानल्या गेलेल्या मोबाइलला आता अंगावरील किमान कपडय़ांच्या आवश्यकतेएवढे महत्त्व प्राप्त झाले आहे. अशी विविध प्रकारची संशोधने माणसाला मोबाइलपासून परावृत्त करू शकतील, अशी स्थिती नाही. घाबरून जाण्याऐवजी सामोरे जाण्याची हिंमत दाखवणाऱ्या माणसाला या यंत्राचे दुष्परिणाम आणि फायदे यामध्ये फायदेच अधिक दिसत असावेत.