लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर उदयाला येऊ घातलेली तिसरी आघाडी देशाला ‘तिसऱ्या दर्जा’वर घेऊन जाईल, अशी टीका करणाऱ्या नरेंद्र मोदी यांना प्रत्युत्तर देण्यासाठी या तिसऱ्या आघाडीतील डाव्या नेत्यांनी कोलकात्याच्या ब्रिगेड ग्राऊंडवरच अधिक मोठी सभा घेऊन रणशिंग फुंकल्याचा आव तरी आणला. पण त्यामुळे काही नव्याच गोष्टी उजेडात येऊ लागल्या आहेत. काँग्रेस आणि भाजपला पर्याय देण्यासाठी तिसऱ्या आघाडीची मोट बांधण्याच्या प्रयत्नात सहभागी असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी- म्हणजे दीदी- यांच्या राजकीय भूमिकेवर या नेत्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे. भाजप आणि काँग्रेसला पर्याय देण्यासाठी तिसरी आघाडी अस्तित्वात यावी याकरिता ममता बॅनर्जी यांनीही गेल्या वर्षभरापासून पुढाकार घेतला होता. पंतप्रधानपदाची सुप्त स्वप्ने पाहणाऱ्या अनेकांना एकत्र आणण्याचा प्रयोग मुळातच सोपा नसतो. ममता, जयललिता, मुलायमसिंग यादव अशा प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांची नावे पंतप्रधानपदाच्या चर्चेत राहावीत, यासाठी अनेक राजकीय फळ्या कार्यरत झाल्या आहेत. याच नेत्यांना एकत्र आणून तिसरी आघाडी निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू झाले तेव्हाच, कोणत्याही बिघाडीविना अशी आघाडी उभी राहील का, या शंकेची पाल अनेकांच्या मनात चुकचुकली होती. बिघाडीची बीजे केव्हा रुजणार आणि त्यासाठी कोणते निमित्त होणार, हाच एक मुद्दा यानंतर बाकी होता. नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवडय़ातील कोलकात्याच्या सभेत तिसऱ्या आघाडीची संभावना करून ही बीजे रोवली. त्याअगोदर जानेवारीत कोलकात्यातच झालेल्या सभेत ममता बॅनर्जी यांनी मोदी यांच्या गुजरात सरकारवर ‘दंगलखोर सरकार’ असा ठपका ठेवला होता. मोदी यांनी मात्र ममता बॅनर्जी यांना प्रत्युत्तर देण्याऐवजी, तिसऱ्या आघाडीच्याच मुळावर घाव घातला. मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर राजकीय प्रहार करण्यासाठी आवेशात तलवार उचलली, पण लगेचच ती हलकेच म्यान करून टाकल्याचे निरीक्षण त्याच वेळी जाणकारांनी नोंदविले होते. ‘दिल्लीत मोदी आणि पश्चिम बंगालमध्ये दीदी’ अशी घोषणा देऊन मोदी यांनी तिसऱ्या आघाडीत बिघाडीची आणि संशयाची बीजे रोवून टाकली आहेत. वाजपेयी सरकारच्या कारकिर्दीत रालोआसोबत असलेल्या आणि केंद्रात मंत्रिपदही उपभोगलेल्या ममता बॅनर्जी यांना मोदी यांच्या भाजपचा पुळका होताच, अशा निष्कर्षांचा सूर तिसऱ्या आघाडीतील डाव्या नेत्यांमध्ये उमटू लागला आहे. तोच कोलकात्यातील सभेत प्रकट झाला. ज्या मैदानावरून ममता बॅनर्जी मोदी यांच्यावर बरसल्या, त्याच मैदानावर मोदी यांनी ‘ममता स्तोत्र’ सुरू केले आणि त्याच मैदानावर आता तिसऱ्या आघाडीने ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केले. भाजप आणि काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असा आरोप करीत देशाला पर्याय देण्याची ग्वाही देणाऱ्या तिसऱ्या आघाडीतील हा बिघाडीचा सूर पाहता, या नाण्याला ‘तिसरी बाजू’देखील आहे आणि तिसऱ्या बाजूलाही अनेक कंगोरे आहेत, असे दिसू लागले आहे. गेले वर्षभर तिसऱ्या आघाडीच्या उभारणीसाठी भेटीगाठी आणि समविचारी नेत्यांशी विचारविनिमय करणाऱ्या ममता बॅनर्जी या भाजपच्या तंबूत जाणार, असा निष्कर्ष डाव्या नेत्यांनी अचानक मोदी यांनी आळविलेल्या मवाळ सुरांमुळे काढला आहे. राजकारणात केव्हाही काहीही घडू शकते, याचे अनेक पुरावे गेल्या काही महिन्यांपासून मिळू लागलेदेखील आहेत. ममता आणि मोदी यांच्यावर डाव्या नेत्यांनी केलेली टीका आणि त्याच सभेत काँग्रेसबाबत घेतलेल्या मवाळ भूमिकेमुळे नाण्याची ही तिसरी बाजू अधिक रंजक ठरणार, असे संकेत मिळू लागले आहेत. निवडणुका होईपर्यंतच्या काळात, नाण्याच्या आणखी किती बाजू उघड होणार हे पाहणे मनोरंजक होईल, यात शंका नाही.

Story img Loader