एकीकडे इंडियातील आपल्याला सोयीचे तेवढे घ्यायचे आणि गुणगान मात्र भारतात सगळेच कसे चांगले आहे याचे करायचे हा दुटप्पीपणा झाला. तो सरसंघचालकांस शोभणारा नाही. विशेषत: आपला संप्रदाय लक्षात घेता डॉ. मोहन भागवत यांनी अधिक जबाबदारीने बोलायला हवे होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत हे भाष्यकार आहेत की कीर्तनकार? गेल्या आठवडय़ात दोन वेळा त्यांनी जी विधाने केली त्यावरून सरसंघचालकांच्या भाष्यकारपणाविषयी संशय निर्माण होऊ शकतो. कीर्तनकाराचे तसे नाही. त्याचे काम तुलनेने तसे सोपे असते. आपल्याला संस्कृतीचा जो पदर माहीत आहे त्याचेच गुणगान गायचे आणि या उदात्तीकरणास नामस्मरणाची जोड देऊन श्रोत्यांना श्रवणानंद देता देता पुण्यजोडणीचा आनंद द्यायचा. भाष्यकाराने या सगळय़ाच्या वर जाऊन आपल्या बुद्धिसामर्थ्यांने भविष्याचा वेध घेत संस्कृतीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करणे अपेक्षित असते. रास्व संघाचे प्रमुख या नात्याने भागवत यांच्याकडून ती अपेक्षा होती. परंतु गेल्या आठवडय़ातील त्यांची विधाने पाहता त्यांना या भूमिकेचा विसर पडला असे म्हणावयास हवे. ते जे बोलले तेच बोलायचे असेल तर संघाच्या मुशीत वक्त्यांची कमी नाही. एखादा प्रवीण तोगाडिया वा साध्वी ऋतंभरा वा तत्सम अन्य कोणी हे काम अधिक परिणामकारकपणे केले असते. त्यास रास्व संघप्रमुख असण्याची गरज नाही. असेही म्हणता येईल की चौथी वा सातवी ब वा अन्य कोणा इयत्तेतील विद्यार्थ्यांने आणि मुख्याध्यापकाने करावयाच्या कामात फरक असणे आवश्यक असते. किंबहुना तसा तो आहे हे अध्याहृतच धरले जाते. विद्यार्थी मुख्याध्यापकाच्या भूमिकेत शिरणे जितके गैर त्याहूनही अधिक मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांच्या गणवेशात जाणे अयोग्य. सरसंघचालकांच्या हातून तो प्रमाद घडला. प्रथम ते भारत आणि इंडिया या भेदाबद्दल बोलले आणि नंतर पत्नीची कर्तव्ये त्यांनी विशद केली. त्यावर अपेक्षेप्रमाणे गहजब उडाल्यावर भागवत यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला अशा स्वरूपाचा खुलासा संघ कार्यकर्ते आणि भाजप नेत्यांनी केला. अन्य अनेकजण भागवत यांच्या बचावासाठी पुढे आले आहेत. त्यातील एक वर्ग असा आहे की जो भागवत काहीही बोलले नाहीत तरी त्यांच्या न बोललेल्या विधानास दुजोरा देईल. त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियेची दखल न घेतली तरी चालण्यासारखे आहे. भाजपतील काही नेतेही सरसंघचालकांच्या बचावार्थ पुढे सरसावले आहेत. त्यांच्या दृष्टीने ते योग्यच आहे. एखाद्या कंपनीच्या मालकाची तळी त्या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने उचलली तर त्यात वावगे ते काय? तेव्हा या संदर्भात भाजपच्या प्रतिक्रियाही अदखलपात्रच आहेत.
राहता राहिला संघ परिवाराचा भागवत यांच्या भाषणाचा प्रसिद्धीमाध्यमांनी विपर्यास केला हा दावा. तो खोडून काढायचा तर त्यांचे पूर्ण भाषण वाचायला हवे. तो उद्योग केल्यास प्रश्न पडतो तो हाच की माध्यमांनी त्यांचा विपर्यास नक्की केला कोठे? भारत आणि इंडिया या वर्गवारीविषयी ते बोललेच आणि या दोन ठिकाणांत मूल्यसंदर्भ कसे बदलतात हेही त्यांनी नमूद केले. सर्वसाधारणपणे त्यांचा रोख भारताचे इंडियात रूपांतर होत असताना मधल्या टप्प्यात जो.. त्यांच्या मते.. मूल्यक्षय होतो या विषयी आहे, असे दिसते. मुळात अशी मांडणी करण्यात नवे बुद्धिकौशल्य नाही. शरद जोशी यांनी दोन दशकांहून अधिक वर्षांमागे अशी मांडणी केली होती. त्याच्या अनेक आवृत्त्या अनेकांनी आपापल्या सोय आणि कुवतीप्रमाणे काढल्या. सरसंघचालकांनी त्यात एकाची भर घातली इतकेच. आणि दुसरे असे की नवे रूप घेत असताना संघाने नवनव्या माध्यमांचा स्वीकार केला, माहिती महाजालाचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला आणि आज या नव्या साधनांमुळे जगात संघाचा प्रसार मोठय़ा प्रमाणावर झालेला आहे अशी माहिती दस्तुरखुद्द भागवत यांनीच ‘लोकसत्ता’ कार्यालयात अभिमानाने दिली होती. या नव्या तांत्रिक सुधारणा सगळय़ा इंडियाकेंद्रित आहेत, हे त्यांनाही मान्य आहे. म्हणजे चांगले जे काही आहे ते फक्त भारतात आणि इंडियात मात्र फक्त बाजारूपणाच आहे असे नाही. तेव्हा इंडियातील आपल्याला सोयीचे तेवढे घ्यायचे आणि गुणगान मात्र भारतात सगळेच कसे चांगले आहे याचे करायचे हा दुटप्पीपणा झाला. तो भाजप वा अन्य कोणत्याही पक्षाच्या राजकीय नेत्यास शोभतो. सरसंघचालकांस नाही. यातील आणखी एक मुद्दा असा की संघाने उत्तम असे भारतपण जपले असे गृहीत धरले तरी संघस्वयंसेवकांत इंडियातील लोकांचे काही दुर्गुण शिरलेले दिसतात, ते कसे? संघाच्या एका ज्येष्ठ प्रचारकास काही अश्लाघ्य कृत्य केल्याच्या आरोपामुळे गुजरातेतून हलवावे लागले होते. त्यातील आरोप करणारा हादेखील संघाच्याच मुशीतून घडलेला. तेव्हा इंडियातील जनता जी गैरकृत्य करते ते भारतातील संघाच्या कार्यकर्त्यांनी कसे काय केले? याची सांगड सरसंघचालक कशी घालणार? दुसऱ्या प्रसंगात सरसंघचालकांनी विवाह हा करार असतो आणि पत्नीने घर सांभाळावे वगैरेही मुद्दे मांडले. त्यावर संघाची मखलाशी अशी की त्यांचे हे मत हे पाश्चात्त्य विवाहास अनुलक्षून होते. पण ते फसवे आहे. कारण सरसंघचालकांचा युक्तिवाद भारताला लागूच होत नाही. याचे कारण आपल्याकडे वधुवर पृथ्वीतलावर येतानाच विवाहाच्या गाठी बांधून येतात. तेव्हा करार हा क्षुद्र शब्द पवित्र वगैरे भारतीय विवाहांना लावण्याचे औद्धत्य निदान सरसंघचालकांकडून तरी होणार नाही, याची जनसामान्यांना जाणीव आहेच. विवाह हा करार इस्लाम धर्मात मानला जातो. संघाच्या मते पाश्चात्त्य जगात तो करार असतो. काहीही असो. व्यावहारिक पातळीवर विचार केल्यास पाश्चात्त्य देशांत तो करार म्हणून असेल तर महिलांना आनंदच वाटेल. याचे कारण असे की भारतीय इतिहासात विवाहाचे जे प्रकार आहेत त्यात कोणतीही नोंद नसलेला गांधर्व विवाहदेखील आहे. या गांधर्व विवाहांतून निपजलेले अनौरस इतिहासभर पसरलेले आहेत. त्यांना जन्माला घालणाऱ्या स्त्रिया आणि पुरुष दोघांनीही या गांधर्वविवाही संततीस वाऱ्यावर सोडले. पाश्चात्त्य संस्कृतीत तो करार असेल तर त्याची जबाबदारी नक्की केली जाते आणि असे काही घडलेच तर पोराच्या आणि वाऱ्यावर सोडल्या गेलेल्या पत्नीच्या पालनपोषणाची जबाबदारी पुरुषास उचलावी लागते. परदेशांत विवाह खर्चिक असतात ते यामुळे. तेव्हा पाश्चात्त्य देशातील विवाह करार वाईट आणि भारतातील चांगला असे त्यांना म्हणावयाचे असेल तर ते म्हणणेही चुकीचेच ठरते. याच संदर्भात भागवत यांनी स्त्रियांना संसार करण्याचा सल्ला दिला आहे. या बाबतीतही त्यांना भारताच्या इतिहासाचा सोयीस्कर विसर पडला असे म्हणता येईल. भारतीय स्त्रियांसाठी चूल आणि मूल हेच जगण्याचे ईप्सित असेल तर या भूमीला असलेल्या गार्गी, मैत्रेयी आदींच्या उदात्त वारशाकडे भागवत डोळेझाक करणार का?
तेव्हा कशाही अर्थाने विचार केला तरी भागवत यांची विधाने ही अव्यापारेषु व्यापारच ठरतात यात संदेह नाही. खेरीज यासंदर्भात दुसरा धोका असा की सरसंघचालकच अशा लोकप्रिय कीर्तनाला लागले की त्यांचे अनुयायी वा पाईक थेट मनोरंजनाची बारीच लावतात, याचा अंदाज त्यांना असायला हवा. या संदर्भात भाजपच्या अन्य नेत्यांनी जे काही तारे तोडले यामुळे हा मुद्दा अधोरेखित होऊ शकेल. याच संप्रदायाला जवळचे आसाराम बापू यांनी आज जी अक्कल पाजळली ती पाहता मौनाचे महत्त्व भागवत यांनाही आता लक्षात आले असेल. तेव्हा आपला संप्रदाय लक्षात घेता भागवत यांनी अधिक जबाबदारीने बोलायला हवे होते.
भागवत संप्रदाय
एकीकडे इंडियातील आपल्याला सोयीचे तेवढे घ्यायचे आणि गुणगान मात्र भारतात सगळेच कसे चांगले आहे याचे करायचे हा दुटप्पीपणा झाला. तो सरसंघचालकांस शोभणारा नाही. विशेषत: आपला संप्रदाय लक्षात घेता डॉ. मोहन भागवत यांनी अधिक जबाबदारीने बोलायला हवे होते.
आणखी वाचा
First published on: 08-01-2013 at 12:05 IST
मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohan bhagwats remarks about women