प्रपंच हा व्यक्ती आणि वस्तूंनी भरलेला आहे. या प्रपंचात माणसांचा आधार आणि वस्तूंचा आधार, याचं मोल आपल्याला फार असतं. याहीपेक्षा आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट या प्रपंचाचा आधार असते ती म्हणजे पैसा! आज प्रपंचच कशाला, परमार्थाचं क्षेत्रही या पैशानंच व्यापून टाकलं आहे. पैशाचा आधार आज सगळ्यांनाच आहे आणि पैशाची ओढ सगळीकडेच आहे. पैसा नसला की सगळ्यांनाच निराधार झाल्यासारखं वाटतं. गंमत अशी की पैसा ही माणसाचीच निर्मिती आहे. व्यवहाराला नियमबद्ध आणि प्रमाणबद्ध रूप देण्यासाठी माणसानं पैशाला जन्म दिला आणि आज हाच पैसा माणसापेक्षा मोठा झाला आहे! याच पैशासाठी संबंध जोडले जात आहेत, संबंध तोडले जात आहेत. याच पैशासाठी नाती टिकवली जात आहेत किंवा नाती मोडली जात आहेत. याच पैशासाठी दुसऱ्याचा जीवही घ्यायला कुणी सरसावत आहेत. पैशामुळे माणसाच्या जीवनात संपन्नता, समृद्धी जशी आल्याचे दिसते तितकीच कुरूपताही याच पैशामुळे आली आहे. पैसा इतका मोठा झाला आहे की कशाचीही भरपाई पैशाने होऊ शकते, असे माणूस मानू लागला आहे. माणसाच्या भौतिक जीवनात वस्तूंमुळे सुखसोयी येतात. या वस्तू पैशाशिवाय मिळत नाहीत आणि म्हणूनच पैसा असेल तर वस्तू आणि त्यायोगे सुखसोयी मिळतात, असा माणसाचा अनुभव आहे. पैसा बक्कळ असेल तर आप्तस्वकीयच कशाला दूरचे नातेवाईकही जवळिकीने वागतात आणि पैसा नसेल तर कुणी कुणाचा नसतो, असाही माणसाचा अनुभव आहे. पैसा असेल तर मदतीसाठी दुसऱ्याचे श्रमही विकत घेता येतात. त्यामुळे कोणत्याही गोष्टीची गरज पैशानेच भागते, असे माणसाला वाटते. तेव्हा पैशाचा माणसाच्या जगण्यावर व्यापक प्रभाव आहे. त्यामुळेच संत जेव्हा पैशाला हीन लेखतात तेव्हा आपल्या मनाला चरे पडतात! आता काही आध्यात्मिक लेखक हे संतांनीही खरं तर पैशाचंच महत्त्व कसं सांगितलं होतं, असा दिव्यार्थ मांडण्यासाठी धडपडत आहेत त्यामुळे थोडं हायसं वाटतं. अनेक मठ, आश्रमांमध्ये धनवंतांना मान आणि कंगालाला लाथेचा प्रसाद मिळताना दिसतो तेव्हाही पूर्वीचे संत काही म्हणोत, पैशाचं स्थान अढळ आहे, हे पाहून पैशाच्या मोठेपणाला पुष्टी मिळाल्यानं आपल्याला हायसं वाटतं. आपल्या या हायसं वाटण्याला जोरदार हादरा बसतो जेव्हा श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात, ‘‘पैसा मिळवणे हे हलक्या माणसाचे काम आहे. आपले खरे काम भगवंत मिळवणे हे आहे’’(बोधवचने क्र. ४०८). श्रीमहाराजांच्या या वाक्याचा खरा रोख जर लक्षात आला नाही तर या वाक्यानं अंतर्मनाला बसणारा धक्का मोठाच असणार. स्वतला हलकं मानायला कुणाला आवडेल? पण या वाक्याचा नेमका रोख कुणाकडे आहे, हे जाणणं महत्त्वाचं आहे. श्रीमहाराजच सांगतात, ‘‘पैशाशिवाय चालत नाही. पण पैशाइतकी वाईट वस्तू नाही..’’ (बोधवचने, क्र. ३६०). तेव्हा भले वाईट का असेना पण पैशाशिवाय चालत नाही, हे श्रीमहाराजही मान्य करतात मग पैसा मिळविण्यासाठी धडपडणाऱ्याला हलकं का मानतात?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा