चांगले, वाईट, कुरूप यांच्या भूमिका एखाद्या चित्रपटात ठरलेल्याच असणे ठीक; पण जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये चांगल्या-वाइटाचा तत्त्वाधिष्ठित निर्णय- किंवा ‘नीतिनिर्णय’ करणे हे मोठेच काम ठरते.. आजच्या नीतिशास्त्रात व्यक्तिस्वातंत्र्य आणि समाजशरणता हे दुमत दिसतेच, परंतु हे झगडे न वाढवता नीतिशास्त्राने स्वतचा शाखाविस्तार कसा केला, हेही दिसते!
भारतात धर्म हीच नीती मानली गेली. ती जीवनाची स्वतंत्र क्षेत्रे आहेत, हा फरक केला गेला नाही. त्यामुळे स्वतंत्र नीतिशास्त्र अस्तित्वात आले नाही. धार्मिक व्यक्ती हीच नतिक मानली गेली. आज समाजसेवा व धंदा हे अद्वैत मानून धर्म, मंदिरे, समाजसेवा, जात, लग्न यांचाही व्यवसाय झाला!    
 नीती, नतिकता, नीतिमत्ता या आणि अशा काही संकल्पना माणसाच्या आयुष्यात अतिशय वादग्रस्त ठरत आल्या आहेत. कर्तव्य, जबाबदारी, बंधन, बांधीलकी, त्याग, न्याय, समता, निष्ठा, देशप्रेम, धर्म, धार्मिकता, प्रेम, मत्री, करुणा या काही नतिक संकल्पना आहेत. त्यांच्याविषयी सुसंगत, ताíकक विचार करणे म्हणजे नीतिशास्त्र रचणे असते. नीती हा केवळ आचरणाचा विषय नाही, तो ज्ञानाचाही विषय असतो, याचे भान जागे करणे, ते विकसित करणे, त्याबद्दल सातत्याने चिंतन करणे, नीतिशास्त्रावर संशोधन करणे, हा समाज आणि ज्ञान या दोन्ही क्षेत्रांच्या विकासाचा पाया असतो.  
नीतीला इंग्रजीत Ethics किंवा Moral Philosophy असा शब्द आहे. Ethics हा प्राचीन ग्रीक भाषेतीली ethos या शब्दापासून बनतो.  Ethos म्हणजे सामाजिक चालीरीती, सर्वमान्य वर्तन. तोच Moras या लॅटिन शब्दाचा अर्थ आहे. त्यामुळे माणसाच्या समान वागण्याच्या नियमांना  moral म्हटले जाते. संस्कृत किंवा मराठीतील नीती म्हणजे नेणे, नेणारी. पर्यायाने, एका विशिष्ट मार्गाने घेऊन जाणारी नियमावली, असा होतो.  
नीतिशास्त्र ही तत्त्वज्ञानाची एक शाखा आहे, असे मानले जाते. चांगले (शिव) म्हणजे काय? ही नीतिशास्त्राची खूप मोठी मूलभूत समस्या आहे. नीतिशास्त्राचे स्वरूप आणि प्रयोजन याविषयी तत्त्ववेत्त्यांमध्ये मूलभूत मतभेद असतात.
माणसाचे कल्याण आणि त्याची कर्तव्ये यांच्यातील परस्परसंबंधाचे ज्ञान करून देणे हा नीतिशास्त्राचा हेतू आहे, असे पाश्चात्त्य परंपरेतील प्लेटो, अ‍ॅरिस्टॉटल, एपिक्यूरस, हॉब्ज, स्पिनोझा, बटलर, कांट, जॉन स्टुअर्ट मिल इत्यादी अभिजात तत्त्ववेत्ते मानतात. अर्थात याचा अर्थ असा नाही, की एखाद्या विशिष्ट माणसाने विशिष्ट प्रसंगी काय करावे याविषयीचा सल्ला देणे, उपदेश करणे हे नीतिशास्त्रज्ञाचे वा नतिक तत्त्ववेत्त्याचे काम असते, पण या प्रकारचे निर्णय ज्या मूलभूत सामान्य तत्त्वांना अनुसरून घेतले पाहिजेत ती विशिष्ट तत्त्वे स्पष्ट करणे आणि त्यांचे प्रामाण्य सिद्ध करणे, हे नीतिशास्त्राचे कार्य आहे. एखादा नीतिमान प्रेषित किंवा प्रतिभावंत कवी माणसाच्या नतिक समस्यांचे मर्म उघड करणारा दृष्टिकोन प्रभावी रीतीने मांडताना अनेकदा आढळतो. नीतिशास्त्रज्ञ तत्त्वांची व्यवस्था लावण्यासाठी पद्धतशीर ताíकक युक्तिवाद करतो, त्याचे समर्थन करतो. असे प्रेषित किंवा कवी करीत नाही. या फरकामुळे नीतिशास्त्रज्ञ प्रेषित किंवा कवी यांच्याहून वेगळा ठरतो. साहजिकच प्रेषिताचा संदेश किंवा कवीची नतिक शिकवण यापेक्षा तात्त्विक नीतिशास्त्राचे स्वरूप वेगळे ठरते. नतिक संकल्पनांचा इतिहास पाहता, नीतिशास्त्राचे चार प्रकार मानले गेले. वर्णनात्मक (डिस्क्रिप्टिव्ह) नीतिशास्त्र, आदर्शवादी (नॉम्रेटिव्ह किंवा प्रिस्क्रिप्टिव्ह) नीतिशास्त्र, अधिनीतिशास्त्र (मेटाएथिक्स), उपयोजित नीतिशास्त्र (अप्लाइड एथिक्स).
लोकांच्या नतिकतेच्या श्रद्धा, विश्वास व संकल्पना कोणत्या व कशा स्वरूपाच्या असतात, याचे वर्णन करणे ही वर्णनात्मक नीती. उदाहरणार्थ एखाद्या देशाची जीवनपद्धती पाहून त्यांची नतिकता स्पष्ट करणे. धर्मशास्त्र, धर्मग्रंथ अशा रेडिमेड श्रद्धा देतात. कोणती कृती केली असता लोक आपणास सज्जन म्हणतील, म्हणजेच चांगल्या जीवनाचे स्वरूप कसे असते, हे नीतिशास्त्र स्पष्ट करते. ही परंपरा बनते. यात व्यक्तिस्वातंत्र्य नसते.   
आता लोकांनी कसे वागले पाहिजे, जीवनात काय प्राप्त केले पाहिजे, याचे नियम बनविणे, त्यानुसार त्यांचे आचरण होते आहे हे पाहणे, ही आदर्शवादी नीती असते. हे नीतिशास्त्र, चांगल्या जीवनाचे स्वरूप कसे असते हे सांगताना, माणसाने कशा प्रकारे जगावे, त्याने काय साधावे, काय करावे हे सांगत असते. व्यवहाराचे मार्गदर्शन, नियमन करणे हे या नीतिशास्त्राचे उद्दिष्ट असते. उदाहरणार्थ स्वर्ग, सुख अथवा मोक्ष, निर्वाण, मुक्ती हे जीवनाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे माणसाने साधकाचे साधे जीवन अंगीकारावे, ते चांगले, आदर्श जीवन होय. आदर्श सांगणे, कुणी तरी सांगितलेली (प्रिस्क्रिप्शन) नीती पाळणे, हीच नीती. यातही व्यक्तिस्वातंत्र्य नसते.   
 पण आता, चांगले म्हणजे काय, असा प्रश्न उपस्थित केला तर त्याची चिकित्सा सुरू होते. तार्किक विश्लेषण करून नतिक संकल्पनांचे स्वरूप स्पष्ट करणे हे नीतिशास्त्राचे काम आहे, असे सांगते ते अधिनीतिशास्त्र. व्यवहारात नतिक निर्णय घेताना, स्वत:च्या व इतरांच्या वर्तनाचे मूल्यमापन करताना आपण ज्या संकल्पना वापरतो त्यांचे विश्लेषण व त्यांची व्याख्या करणे, त्यांचे परस्परांमधील संबंध स्पष्ट करणे, या संकल्पनांचे स्वरूप व प्रयोजन निश्चित करताना इतर क्षेत्रांतील (विज्ञान, कला)  संकल्पनांहून त्या भिन्न कशा आहेत, याचा शोध घेणे, हे अधिनीतिशास्त्राचे कार्य असते. थोडक्यात, नतिक व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या भाषेचे तर्कशास्त्र स्पष्ट करणे हे नीतिशास्त्राचे प्रयोजन असते, असे अधिनीतिशास्त्र सांगते. ते नीतीच्या पलीकडे (‘मेटा’ म्हणजे पलीकडे, ‘अधि’) जाते. ते केवळ नीती मानत नाही, तर ती नतिक तत्त्वे, नियम का मानावेत, याची त्यापलीकडे जाऊन चर्चा करते, म्हणून तिला अधिनीतिशास्त्र म्हणतात. यात व्यक्तिस्वातंत्र्य असते. जी. ई. मूर या तत्त्ववेत्त्याच्या प्रिन्सिपिया एथिका (१९०३) या ग्रंथाने अधिनीतिशास्त्रातील प्रश्नांकडे लक्ष वेधून घेतले. मूरच्या मते, ‘चांगले’ हे पद आदर्शवादी मानले तर ‘चांगले’ या पदाचा नेमका अर्थ काय आहे हे स्पष्ट केले पाहिजे.
या ग्रंथानंतर लगेचच अमेरिकेत आर्थर हॅडली (१८५६-१९३०) या अर्थशास्त्रज्ञ तत्त्ववेत्त्याच्या, १९०७ सालच्या ‘सार्वजनिक नीतीची पातळी’(The Standards of Public Morality) या ग्रंथाने उपयोजित नीतिशास्त्राचा पाया रचला. त्याने नतिक जीवनाचा विचार करताना व्यक्तीचे खासगी जीवन आणि सार्वजनिक जीवन यात फरक केला पाहिजे, त्यानुसार नतिक निकष बनविले पाहिजेत, असा सिद्धांत त्याने मांडला. १९७०च्या दशकात या उपयोजित नीतिशास्त्राला निश्चित आकार आला तो पीटर सिंगर (१९४६-) या तत्त्ववेत्त्याच्या ‘अप्लाइड एथिक्स’ (१९८६) या ग्रंथाने.
दुसऱ्या महायुद्धाने युद्ध, आंतरराष्ट्रीय संबंध, नववसाहतवाद, रासायनिक-आण्विक प्रकल्प आदी प्रश्नांना वाचा फोडली. या नीतिशास्त्राने जैववैद्यकीय नीतिशास्त्र, व्यावसायिक नीतिशास्त्र आणि पर्यावरण नीतिशास्त्र या नव्या तीन ज्ञानशाखांना जन्म दिला. गर्भपात, दयामरण, फाशी, आत्महत्या, कामसंबंध, विवाह, युद्ध, माहिती तंत्रज्ञान, संगणक, राजकारण, समाजकारण, प्राणिमुक्ती आंदोलन, मोठय़ा धरणाचे महाप्रकल्प, कामगार संघटना, रासायनिक-आण्विक प्रकल्प, तसेच वकिली, डॉक्टरी, पोलीस-लष्करी, सनदी सेवा, शिक्षण, मुख्य म्हणजे राजकारण ही सारी क्षेत्रे ही राष्ट्रसेवा की धंदा? जागल्या (व्हिसल ब्लोअर) का हवा, हे प्रश्न जास्त उग्र झाले. हे प्रश्न शुद्ध चारित्र्य, सद्हेतू, सदसद्विवेकबुद्धी, परोपकार, आत्मबुद्धी इत्यादींनी सोडविता येत नाहीत, हे उघडच आहे. त्यासाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व नीतीचे अभ्यासक, व्यावसायिक तत्त्ववेत्ते, तत्त्ववेत्ते यांच्या एकत्रित सहकार्याने सोडवावे लागतील, अशी जाणीव या नीतिशाखेने दिली. नीतिशास्त्र अशा तऱ्हेने ‘आंतरविद्याशाखीय ज्ञानशाखा’ बनले. यातून माध्यमांचे, उद्योगसमूहाचे, व्यवस्थापनाचे नीतिशास्त्र निर्माण झाले. अशा सगळ्यांना मिळून उपयोजित नीतिशास्त्र म्हटले जाते. तेच आज मूलभूत चिंतनक्षेत्र ठरले आहे, कारण जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राचे व्यावसायिकीकरण झाले आहे.
*लेखक संगमनेर महाविद्यालय, संगमनेर येथे तत्त्वज्ञान विभागप्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक आहेत.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा