जे काही घडते ते उत्तम असते असे सध्याच्या क्षणी तरी आपण कदाचित खरे मानणार नाही. कारण आपण अज्ञानी आणि आंधळेही असतो. शिवाय घटनांचे परिणाम किंवा नंतर काय घडणार आहे हे आपल्याला दिसत नाही. पण आपण श्रद्धा ठेवली पाहिजे. जर आपण भगवंतावर भरवसा टाकलेला असेल, जर आपली पूर्ण जबाबदारी आपण त्याच्यावर सोपविलेली असेल, जर आपल्या बाबतीतील सर्वकाही आपण त्याला ठरवू देत असू तर आपल्या बाबतीत जे काय घडते ते नेहमी उत्तमच असते हे आपण लक्षात घेतले पाहिजे. तुम्ही जितक्या प्रमाणात समर्पण करता तितक्या प्रमाणात तुमच्या बाबतीत उत्तम तेच घडते. तुमची इच्छा, पसंती-नापसंती किंवा कामना-वासना यांना धरून कदाचित ते नसेलही. कारण या गोष्टी अज्ञानावर आधारित असतात. आध्यात्मिक दृष्टीने ते उत्तम असते. तुमची प्रगती, तुमचा विकास, तुमची आध्यात्मिक वाढ, तुमचे खरे जीवन, या दृष्टीने ते नेहमी उत्तमच असते. तुम्ही तशी श्रद्धा राखली पाहिजे. कारण तुमचा भगवंतावर जो विश्वास असतो आणि भगवंताला तुम्ही जे संपूर्ण आत्मदान केलेले असते, त्याची अभिव्यक्ति म्हणजे तुमची श्रद्धा ही असते. तुम्ही जेव्हा अशी श्रद्धा ठेवू शकता तेव्हा ती एक अगदी अद्भुत अशी गोष्ट असते. ही खरी वस्तुस्थिती आहे. हे केवळ शब्द नाहीत. जेव्हा तुम्ही मागे वळून बघता तेव्हा तुमच्या असे लक्षात येते की पुष्कळशा गोष्टी की ज्या प्रत्यक्ष घडल्या तेव्हा तुम्हाला त्यांचा अर्थ समजलेला नव्हता पण त्या सर्व गोष्टी म्हणजे आवश्यक ती प्रगती करण्यास तुम्हाला भाग पडावे म्हणून जरुर असलेल्या नेमक्या गोष्टीच होत्या.
जेव्हा कोणी भगवंताकडे वळतो, तेव्हा तो प्रत्येकजण भगवंताकडून अशी मागणी करतो की त्याला जसे पाहिजे असेल तसेच भगवंताने करावे. पण भगवंत मात्र प्रत्येकाच्या बाबतीत सर्व दृष्टीने जे काही उत्तम असेल ते करतो. परंतु मनुष्याची इच्छा, वासना पुरी झाली नाही म्हणजे तो अज्ञानामुळे भगवंताविरुद्ध बंड करतो आणि म्हणतो की, भगवंताचे माझ्यावर प्रेम नाही. भगवंतावरील खरे प्रेम हे स्वतला देऊन टाकणारे, मागणी न करणारे आणि शरणभाव व समर्पणाने परिपूर्ण असते. ते हक्क सांगत नाही, अटी घालत नाही, मोबदल्याची अपेक्षा करीत नाही. त्यात मत्सर, दुराभिमान आणि क्रोधाचा उद्दामपणा नसतो.
आपल्या श्रद्धेला आपण घट्ट चिकटून राहिले पाहिजे; तिच्यासाठी दृढ इच्छा बाळगली पाहिजे. तिची प्राप्ति करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तिचे संवर्धन केले पाहिजे आणि तिचे रक्षण केले पाहिजे. मानवी मनाला शंका घेण्याची, तर्क-वितर्क करण्याची आणि संशय घेण्याची एक विकृत आणि शोचनीय सवय असते. या ठिकाणीच तर व्यक्तिगत प्रयत्न करण्याची गरज असते. शंका, तर्कवितर्क इत्यादिंना आंत येऊ देता कामा नये. शंका, संशय आणि अविश्वास यांच्याशी मनाने खेळत बसणे यापेक्षा अधिक धोक्याचा दुसरा खेळ नाही. (संकलित)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा