एके काळी निवड समितीला ‘विदूषकांचा जथा’ असे संबोधणारे माजी क्रिकेटपटू मोहिंदर अमरनाथ यांनी ओढलेले ताजे ताशेरे एन. श्रीनिवासन अ‍ॅण्ड कंपनीच्या (मालकीच्या) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) मुळीच मानवले नसणार. भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदासाठी महेंद्रसिंग धोनीला पर्याय शोधण्याची वेळ आली आहे, असे अमरनाथने न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर खडसावून सांगितले. अर्थात जागतिक क्रिकेटच्या तिजोरीच्या किल्ल्या ज्यांच्या कमरेला आहेत, त्या श्रीनिवासन यांना याचे अजिबात सोयरसुतक असणार नाही. २०११ मध्ये भारतीय संघाने विश्वचषक जिंकण्याची किमया साधली. त्या वेळी के. श्रीकांत यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीत अमरनाथही होते. परंतु त्यांची रोखठोक विचारसरणी श्रीनिवासन यांना मानवली नाही. त्यामुळेच त्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले. श्रीनिवासन हे चेन्नई सुपर किंग्ज मालक. त्यामुळेच या संघाशी निगडित धोनी, रवींद्र जडेजा, सुरेश रैना, आर. अश्विन आदी खेळाडूंचे हितसंबंध जपणे, हा त्यांचा एककलमी कार्यक्रम दिसतो आहे. हे गृहस्थ महाराजकारणी. त्यामुळे गुरुनाथ मयप्पन मॅच-फिक्सिंग आणि सट्टेबाजीत अडकल्यावर जे वादळ उठले, त्या परिस्थितीतही त्यांनी आपले सिंहासन डळमळू दिले नाही. आता तर त्यांनी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाशी संधान बांधून आयसीसीलाही आर्थिक गुलामगिरीत जेरबंद केले. आयपीएलनामक फुगा तर दरवर्षी अधिक मोठा करून फुगवला जात आहे. त्यामुळे ‘श्रीनी तारी त्याला कोण मारी?’ अशीच अनेक खेळाडूंची स्थिती आहे. धोनीही यामुळेच सुरक्षित आहे. त्याची हुशारी ही, की भारतात फिरकीचा चक्रव्यूह निर्माण करून जगातील कोणत्याही संघाला हरवता येते, हे हेरून संघाची कामगिरी किती छान होते आहे, याचे मनमोहक चित्र त्याने उभे केले. २०११-१२ मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाकडून ४-० अशा फरकाने सपाटून मार खाल्ल्यानंतर परदेशात मोठी कसोटी मालिका खेळण्याचे धारिष्टय़ भारतीय क्रिकेटधुरिणांनी दाखवले नाही. त्यामुळेच गतवर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेलाही कात्री लावण्यात आली होती. मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या ताज्या पराभवामुळे परदेशात भारतीय संघ जिंकणे कठीण आहे, यावर आता शिक्कामोर्तबच झाले आहे. २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध मिळवलेल्या कसोटी विजयानंतर भारताला विजयाचे सूर्यदर्शन कधीही घडलेले नाही. परदेशातील मागील १५ सामन्यांपैकी फक्त एक विजय, ही आकडेवारी त्यामुळेच सच्च्या क्रिकेटरसिकाला जिव्हारी लागणारी आहे. परंतु ‘कॅप्टन कुल’ मात्र शांतच आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचे पराभव आणि या पराभवांमध्ये फरक आहे, हेच तो सातत्याने सांगत आहे. ते भारतीय क्रिकेट संघ होते. परंतु आता माझ्या संकल्पनेतील संघ खेळत आहेत. त्यांना खेळण्याची आणि सावरण्याची तुम्ही थोडी संधी द्या, अशी त्याची विनंती आहे. राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकर म्हणजे भारताच्या कसोटी संघाचे वैभव होते. परंतु भविष्यकाळ उज्ज्वल करण्यासाठी या सर्वाना हलकेच दूर करण्याची संक्रमण योजना धोनीच्याच सुपीक मेंदूतील. त्यामुळेच दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या ताज्या पराभवांनंतरही कामगिरीत सुधारणा झाल्याचा दावा केल्याशिवाय त्याला गत्यंतर नाही ते याचमुळे. गोलंदाजांनी गोलंदाजी करताना डोकेही वापरावे, असे कडवे बोल काही दिवसांपूर्वी धोनीने सुनावले होते. मात्र मंगळवारी मालिका संपल्यावर त्याने गोलंदाजांचे कौतुक केले. वाट चुकलेल्या माणसाचे वागणे, हे असेच दुटप्पी असते. असे असले, तरी सध्या श्रीनी त्याचे आश्रयदाते असल्याने त्याला काळजीचे काही कारण दिसत नाही..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा