मराठी माणसांची परप्रांतीयांमुळे महाराष्ट्रात राज्यात होत असलेली पीछेहाट आपण सर्वजण पाहतच आहोत. त्यासाठी वेळोवेळी मनसेकडून जी पावले उचलण्यात येतात ती स्वागतार्ह आहेत, पण आजकाल महाराष्ट्रभर ‘कंत्राटी कामगार’ (टेम्पररी/ कॉन्ट्रॅक्ट जॉब) या पद्धतीच्या नोकऱ्यांनी धुमाकूळ घातला आहे. खासगी कंपन्यांतील या भरतीच्या वेळी होणाऱ्या मुलाखतीत तुम्हाला सहा महिन्यांत, वर्षभरात कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेऊ अशी आमिषे दाखवली जातात, परंतु नंतर साधा पगारही वाढवत नाहीत. कोणत्याही सुविधा नाहीत, वर नोकरी कधीही जाण्याची भीती आणि गाजर फक्त आश्वासनांचे, अशा तिहेरी ताणाखाली अनेक तरुण आहेत. त्यांना आठ तासांऐवजी दहा ते बारा तसा कामावर राबवून घेतले जाते. परिणामी घरात भांडणे, महागाईत घर चालवण्याची चिंता, स्वप्ने पाहूच नयेत अशी स्थिती या कात्रीत हे तरुण सापडत आहेत.
यासाठी मनसेसारख्या पक्षांनी कंत्राटी कर्मचारी/ कामगार हा मुद्दा उचलून धरत ही कुप्रथा मुंबई-महाराष्ट्रातून बंद करण्यास भाग पाडावे. मराठी तरुण, अग्रेसर कामगार नेते, उद्योगपती यांनीही या समस्येचा गांभीर्याने विचार करावा.

महादेवशास्त्रींची पुस्तके
पंडित महादेवशास्त्री जोशी यांची पुस्तके बऱ्याच वर्षांपासून पुस्तकांच्या दुकानांत वा प्रदर्शनांतून उपलब्ध नाहीत. पुण्यातल्या एका वितरकांकडे शास्त्रीबुवांचं ‘आत्मपुराण’ हे आत्मचरित्र आणि भारतीय संस्कृती कोशाच्या प्रती उपब्लध आहेत, परंतु ‘भारती उपकथा’, ‘भारत-दर्शन’, ‘जनपदमाला’ अशी अनेक पुस्तकं जिथे शोध घेतला, तिथे कुठेही उपलब्ध नाहीत. उपलब्ध असलेल्या बहुतेक प्रतींची छपाई १९९० मध्ये वा त्यापूर्वी झाली आहे. भारतीय संस्कृतीवरील विपुल, उत्कृष्ट वाङ्मयासंदर्भात काही करता येईल का?
आसावरी आयचित, वाशी

धनिकांच्या  ‘भस्म्या’ रोगावर उपाय काय?
राजकीय नेत्यांनी विवाह सोहळय़ांनिमित्त केलेल्या उधळपट्टीच्या आणि दुष्काळाच्या बातम्या गेल्या आठवडय़ाभरात वारंवार येत आहेत. अर्थात, उधळण्याइतका पैसा फक्त एखाद्या राजकीय पक्षाच्याच लोकांकडे आहे, असेही नाही. संपत्तीचे ओंगळ प्रदर्शन अन्यत्रही सुरूच असते आणि अगदी वृत्तपत्रे वा नियतकालिके आणि चित्रवाणी यांवरील जाहिरातींतूनही कितीजणांकडे असा जादा पैसा आहे, याची कल्पना येते.
मोठे व्यावसायिक, राजकारणी लोक, बिल्डर ज्यांच्याकडे कित्येक एकर जमिनी आहेत, कित्येक बंगले आणि काही लोक बऱ्याच गोष्टीतले बरेच सम्राट बनले आहेत, आणि असेही लोक आहेत ज्यांना दोन वेळेला खायला मिळत नाही, जे लोक फुटपाथवर, पुलाखाली आपला संसार मांडतात.
पसे मिळवण्याचा अधिकार सगळ्यांना आहे पण थोडेतरी सामाजिक भान ठेवून लोकांनी आपली प्रोपर्टी करावी असे मला वाटते. हे सगळे समजूनही काही मोठय़ा लोकांची भूक अजूनही  भागत नाही म्हणून याला ‘भूक’ नव्हे तर  पैशासाठी झालेला ‘भस्म्या’  रोगच म्हणावा वाटतो. असे लोक आहेत, तोवर भल्याभल्यांना या रोगावरील उपाय सापडणार नाही! श्रीमंत आणि गरीब यांच्यामधल्या वाढत्या दरीचे कार्ल मार्क्‍सने मात्र खूप अभ्यास करून आधीच वर्णन करून ठेवले आहे, आणि त्यानंतर त्याने होणाऱ्या क्रांतीबद्दलही वर्णन केले आहे. आपल्या देशाची आजची स्थिती पाहता मला असे वाटते कि तो दिवस दूर नाही ज्या दिवशी आपल्या देशात मालमत्तेचे केंद्रीकरण होईल आणि मग १२० कोटी लोकांच्या देशात ठराविक लोकांच्या हातात भरपूर मालमत्ता आणि गरीब लोक गरिबीच्या खाईत लोटले जातील पशाला किंमत उरणार नाही, आणि मग एकच पर्याय राहील तो म्हणजे रक्तरंजित क्रांतीचा.. पण तो मार्ग आपल्यलाला अभिप्रेत नाही आणि असूही नये.  
समीर कुलकर्णी, इचलकरंजी.

सलाम रणरागिणींनो!
म्हाडाच्या मैदानावर यज्ञाचे आयोजन करणाऱ्या, राजकीय लागेबांधे असलेल्या धार्मिक संस्थेला शिवधाम संकुलातील महिला योग्य रीतीने आणि धैर्याने विरोध करीत आहेत (लोकमानस, १२ फेब्रु.) ही गोष्टच अभिमानाची आहे. विज्ञानाच्या झालेल्या प्रगतीचे फायदे आपण घेतो, पण त्याचवेळी असे अवैज्ञानिक यज्ञ करून शेकडो किलो तूप, धान्य, अन्न अग्नीत स्वाहा करतो. आज महाराष्ट्रात दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे. यज्ञाच्या अग्नीत धान्याची आहुती देणाऱ्या धार्मिक भावनांना गरिबांची उपाशी तोंडे कशी दिसत नाहीत? भक्तांनी दिलेले पैसे, दागिने हे घेणाऱ्या यज्ञ आयोजकांकडे भक्ती आहे की फक्त धंदा? यज्ञामुळे आसपासच्या विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिक, आाजारी व्यक्तींना त्रास होतो तसेच यज्ञकाळा विविध प्रकारचे प्रदूषण व अस्वच्छता वाढत असते. अशा तक्रारींमध्ये राजकीय पुढाऱ्यांनी वेळीच लक्ष घातले पाहिजे पण ते मतांचे राजकारण खेळतात व सामान्य माणसाला वेठीला धरतात.
एवढे असूनही आवाज उठवणाऱ्या या रणरागिणी महिलांना सलाम! मागे हटू नका, आमचा तुम्हाला नैतिक पाठिंबा आहे.. ढोंगी बुवाबाबांच्या आत्मदहनाच्या धमकीचा मुळीच विचार करू नका, आपल्या निर्णयावर ठाम राहा.
– अलका चाफेकर, गोरेगाव.
( विरार येथून अनिल पाठक यांनीही  या विषयावर, गोरेगाव येथील महिलांना पाठिंबा देणारे पत्र पाठविले आहे.)

गांधीविचारांबाबत मतभेद : काही प्रामाणिक, काही मतलबी!
गांधीविचारांचे ज्येष्ठ अनुयायी दिवंगत ठाकुरदास बंग यांच्या ‘गांधीविचार’ या पुस्तकातील अत्यंत महत्त्वाचा भाग ‘लोकसत्ता’ने गांधीजींच्या स्मृतिदिनी (३० जाने.) प्रसिद्ध केल्यानंतर, त्यावर वादही ‘लोकमानस’मधून झडू लागले आहेत.
बंग यांच्या अत्यंत स्पष्ट विवेचनानंतरही होणाऱ्या या वादांसंदर्भात एक मुद्दा लक्षात घेण्याजोगा आहे तो असा की, सर्वसाधारणपणे राजकीय- सामाजिक स्तरावरील कोणत्याही बाबतीत सदसद्विवेकबुद्धीने मत बनविण्याची मानसिकताच मुळी जनमानसात रुळलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. बहुसंख्य माणसे याबाबतीत नकारात्मक भूमिकेतूनच वाचत असतात. परिणामी जे काही तर्कदुष्ट विचार पेरले जातात, ते सामान्यजनांवर नकळतपणे परिणाम करीत असतात. गांधीजींबद्दल काही लोकांनी- विशेषत हिंदुत्ववाद्यांनी आपल्या राजकीय हेतूंसाठी जाणूनबुजून काही गैरसमज पेरले आहेत, ते समाजमनावर बिंबले असल्याची प्रचिती येते ती त्याच मानसिकतेमुळे.
कम्युनिस्टांचेही काही मतभेद गांधीजींशी होते. भारतीय उद्योजकांनी आपल्या कर्मचारीवर्गाला मुलांसमान मानून, त्यांच्याशी पालकत्वाचे नाते निर्माण करावे, असा संदेश गांधींनी दिला होता. तो संदेश म्हणजे गांधीजींच्या एकूण भावनाप्रधान विचारसरणीचा द्योतक होता. मात्र त्यांचा तो संदेश मालकवर्गाच्या आणि कामगारवर्गाच्याही दृष्टीने हास्यास्पद ठरला. ‘माणसाची माणसाकडून होणारी पिळवणूक’ याच पायाभूत सिद्धांतावर भांडवलशाहीचा डोलारा उभारला जातो, हे गांधीजींना कधी उमगलेच नाही.
अर्थात, विचारांचा सामना विचारांनीच व्हायला हवा, गैरसमजांची राळ उडविण्याच्या अप-प्रचारकी रीतीने नव्हे. मतभेद मतलबी असू शकतात, तसे प्रामाणिकही असू शकतात.  
विजयानंद हडकर, डोंबिवली (पूर्व).

शाब्दिक अपघात टाळा!
‘हा वैज्ञानिक दृष्टिकोन नाही’ हे शुभा परांजपे यांचे पत्र (लोकमानस, १२ फेब्रु.) हा एक वैचारिक अपघात वाटला! ‘महामार्गाच्या कडेला असलेली दारूची दुकाने हलवली तर अपघातांचे प्रमाण कमी होईल’ हे ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे म्हणणे पत्रलेखिकेला पटले नाही, हे त्यांचे वैयक्तिक मत झाले. मात्र ते व्यक्त करताना त्यांची शाब्दिक गाडी डॉ. दाभोलकरांवर इतक्या तीव्रतेने का घसरावी हे समजत नाही.
केंद्रीय स्तरावर केलेल्या एका पाहणीत असे आढळून आले की, ९७ टक्के वाहन अपघात मद्यपान व अतिवेगाने वाहन चालवण्यामुळे होत असतात. महामार्गावर सहजासहजी मिळणारी दारू मिळेनाशी झाली तर अनेकांचे नाहक जाणारे प्राण वाचतील, या म्हणण्यामागे विज्ञानापेक्षा इतरांबद्दलची काळजी, आपुलकी असू शकत नाही का?  एकवेळ महामार्गावरील अपघात योग्य खबरदारी घेतली तर टाळले जातील पण दुसऱ्याच्या चुका काढताना केलेले असे शाब्दिक अपघातही टाळायला हवेत.
– सूर्यकांत भोसले, मुलुंड (पूर्व).

Story img Loader