थोर समाजवादी ‘नेता’जी मुलायमसिंह यादव हे सध्या सुधारकाच्या भूमिकेत गेले असून त्यावर अनेकांची स्थिती संभ्रमित झाली असेल यात काही शंका नाही. आजवर हेच मुलायमसिंह उत्तर प्रदेशच नव्हे, तर त्रिभुवनातील मुस्लिमांचे त्राते म्हणून ओळखले जात. ते यादवकुलभूषण तर होतेच, पण त्याचबरोबर अन्य पिछडय़ा जातींची मोट बांधून त्यांनी राजकीय जात्योद्धाराची मोठीच मोहीम उत्तर प्रदेशात चालविली होती. बसपचे संस्थापक कांशीराम यांनी त्यास खीळ घातली आणि बहन मायावती यांनी सामाजिक अभियांत्रिकीचा सुधारित प्रयोग राबवून मुलायम यांची सायकल पंक्चर केली. असे असले तरी नेताजींची भूमिका नेहमीच समाजवादी आणि म्हणून सुधारकी राहिलेली आहे. येथे मुलायम यांच्या समाजवादाबाबतचे काही ग्रह दूर करणे क्रमप्राप्त आहे. ते समाजवादी नसून माजवादी आहेत असे काही मंडळी मानतात. परंतु त्यात काही तथ्य नाही. एक तर मुलायम यांच्या पक्षाचे नावच समाजवादी पार्टी असे स्वच्छ आहे. त्यांच्या घराच्या भिंतीवर मान्यवर समाजवादी नेत्यांची छायाचित्रेही चितारून घेण्यात आली आहेत. आदर नसेल तर कोण कोणाची छायाचित्रे काढून घेईल? तेव्हा नेताजी हे समाजवादी आणि त्यातही लोहियावादी समाजवादी आहेत हे या पुराव्यांनीच सिद्ध झाले आहे. ‘काँग्रेसविरोधवाद’ असे दुसरे नाम असलेल्या लोहियावादात अधूनमधून काँग्रेसला पाठिंबा देणे हे कसे बसते अशी शंका कोणी विचारील. परंतु हा मुलायम यांचा सुधारित लोहियावाद आहे. कारण ते मुळातूनच सुधारक आहेत. याचे ताजे उदाहरण म्हणून त्यांच्या ताज्या फडफडीत महिला धोरणाकडे पाहता येईल. परवा लखनऊमध्ये त्यांच्या समाजवादी पक्षाचा महिला मेळावा झाला. त्यात नेताजींनी थेट पडदा पद्धतीलाच हात घातला. ते म्हणाले, या प्रथेला कोणीही प्रोत्साहन देता कामा नये. तसे जो करील त्याला तुरुंगातच टाकले पाहिजे. नेताजींचे हे वक्तव्य ऐकून त्यांच्यात कोणाला साक्षात राममोहन रॉय दिसले तर नवल नाही. पडदा संस्कृती ही सामंती व्यवस्थेची देणगी. ज्या नेताजींनी उत्तर प्रदेशात नवसामंती व्यवस्था निर्माण केली त्यांनीच तिचा धिक्कार करावा ही असामान्यच बाब म्हणावयास हवी. नेताजींच्या नवसामंती संस्कृतीमध्ये महिलांना किती मान मिळतो हे त्यांच्या पक्षातील अनेक मान्यवर नेतेमंडळींनी महिलांबाबत उधळलेल्या उद्गारांतून आपण पाहिलेच आहे. उत्तर प्रदेशात नेताजींच्या कुटुंबीयांची सत्ता. तेथील बलात्काराच्या घटनांबाबतच्या सरकारी दृष्टिकोनातूनही ते दिसले आहे. असे असतानाही नेताजींना महिलांच्या सबलीकरणाची ओढ लागावी, एका सामाजिक कुप्रथेविरोधात एल्गार पुकारण्याची आस लागावी हे कौतुकास्पदच म्हटले पाहिजे. पडदा पद्धतीप्रमाणेच बुरखा हीसुद्धा एक कुप्रथा असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. परंतु एकदा पडदा फेकून द्या म्हटले की त्यात बुरखा आलाच. खरे तर या धाडसाबद्दलही मुलायमसिंह यांचा गौरवच करावयास हवा. घुंघट घेऊ नका, तो पडदा फेकून द्या म्हटले की जसा अनेकांना तो हिंदूू पुरुषप्रधान संस्कृतीवरील घाला वाटतो तसाच बुरख्याला हात घातला की कट्टरतावाद्यांच्या दाढीला झिणझिण्या येतात. पण नेताजींनी त्याची अजिबात पर्वा केलेली नाही. याला कोणी भारतीय राजकारणातील नवी ताजी हवा कारणीभूत आहे असे म्हणेल, तर कोणी पक्षाला आधुनिक चेहरा देण्याचा प्रयत्न म्हणून याकडे पाहील. कोणास यात महिला मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्नही दिसेल. ते खरेच आहे. एकीकडे िहदू अस्मितांना नवी धार देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जुने ते सोने म्हणून मुलाम्याची पितळही विकली जाऊ लागली आहे. अशा काळात आधुनिक तरुणाईला आपल्या दिशेने वळविण्यासाठी विविध पक्ष प्रयत्न करताना दिसतील. मुलायम यांचा सुधारकाचा बुरखा हे त्यातीलच एक उदाहरण.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा