मुंबई. कोणासाठी प्रगतीच्या असंख्य संधींचे शहर. या ना त्या कारणाने आपला प्रदेश सोडावा लागलेल्यांसाठी अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करणारे शहर. प्रचंड गर्दीचे-उंचच उंच इमारतींचे शहर. देशाची आर्थिक सूत्रे हलवणारे शहर. असे असंख्य चेहरे या शहराला आहेत. या मायानगरीचा वेध घेण्याचा मोह अनेक लेखकांना झाला आहे. पण अशा या स्वप्ननगरीचे सध्याचे प्रश्न आहेत तरी काय, ते कसे निर्माण झाले, त्यावर उत्तर काय, हे जाणून घ्यायचे असेल तर ‘मुंबई रीडर १३’ हे पुस्तक वाचायला हरकत नाही. यात विविध क्षेत्रांतील जाणकारांनी प्रामुख्याने समकालीन नागरी प्रश्नांचा, पायाभूत सुविधांचा वेध घेतला आहे. त्यामुळे हे पुस्तक एक प्रकारे मुंबईच्या प्रश्नांवरचे चर्चासत्र आहे. तक्ते, सांख्यिकी माहिती, तुलनात्मक आकडेवारी अशा गोष्टींमुळे आपण एका सभागृहात हे चर्चासत्र ऐकत बसलो आहोत की काय असे वाटत राहते.
‘अर्बन डिझाइन रीसर्च इन्स्टिटय़ूट’ (यूडीआरआय) या मुंबईच्या विकासासाठी सुधारणा सुचवणाऱ्या, संशोधन करणाऱ्या संस्थेने पत्रकार, अर्थतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, गृहनिर्माण-वाहतूक, नगर नियोजन अशा क्षेत्रातील तज्ज्ञांचे चर्चा, विश्लेषण आणि भाष्य करणारे लेख संकलित करत हे पुस्तक साकारले आहे. मुंबईतील वाहतूक कोंडी आगामी काळात सोडवता येईल काय, मुंबईतील गिरण जमिनींच्या विक्रीचा प्रश्न, ‘एफएसआय’चा वापर आणि दुरुपयोग, तिवरांच्या जंगलांचे संरक्षण अशा चर्चेतल्या विषयांवर सुमारे ३२ लेख आहेत.
मुंबईचा नवीन विकास आराखडा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे, पण या शहरातील ६० टक्के लोकसंख्या सामावून घेणाऱ्या झोपडपट्टय़ांचा विचारही नियोजनात झाला नव्हता..३६ कोळीवाडय़ांनाही योग्य महत्त्व दिले गेले नव्हते..दुसऱ्या विकास आराखडय़ाचे काम १९८१मध्ये सुरू झाले आणि संपले थेट १९९४ मध्ये. अशी डोळ्यांत अंजन घालणारी आणि या प्रक्रियांचा फोलपणा दाखवणारी उदाहरणे यात सापडतात.
मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि वाहतूक जलद होण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करून पूर्वमुक्त मार्ग, वांद्रे-वरळी सागरी सेतू, मोनोरेल-मेट्रो रेल्वे असे प्रकल्प हाती घेण्यात आले. या प्रकल्पांकडे मुंबईकर आशाळभूतपणे आणि अभिमानाने पाहतात. पण हे प्रकल्प फारसे उपयोगाचे नाहीत असे म्हटले तर अनेकांना, निदान काहींना तरी धक्का बसेल. पण त्याचे परखड आणि प्रचलित समजांना, प्रचाराला हादरवणारे विश्लेषण अशोक दातार यांच्या लेखात वाचायला मिळते. मग हजारो कोटींचा चुराडा नेमका कशासाठी असा प्रश्न पडतो. दातार केवळ फुगा फोडत नाहीत, तर प्रश्न सोडवण्यासाठी काय करता येईल हेही सांगतात.
मुंबईतील झोपडपट्टय़ांमध्ये होणारी अनधिकृत बांधकामांची कथाही अशीच मोजक्या रंजक भागांपैकी आहे. अनधिकृत बांधकाम सुरू झाले की महानगरपालिकेचे अधिकारी मोक्याच्या वेळी हजर होतात. कंत्राटदारासह संगनमत करून बांधकाम पाडल्याची कागदपत्रे तयार केली जातात. हे पांढऱ्यावर काळे करण्याचे काम झाले की, अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांचा वाटा मिळतो. मग ते अनधिकृत बांधकाम पूर्ण करण्याची मोकळीक कंत्राटदाराला दिली जाते. बांधकाम झाले की हे नवीन बांधकाम जुने दिसेल अशा रीतीने अखेरचा हात फिरवला जातो.
हे कंत्राटदार स्थानिक राजकीय नेते व पक्षांचे ‘फंड मॅनेजर’ असतात. असाच एक कंत्राटदार काँग्रेससाठी काम करायचा. पण महानगरपालिका निवडणुकीत ती जागा युतीने जिंकली. नंतर लागलीच या कंत्राटदाराचे दहा लाखांचे बांधकाम प्रशासनाने जमीनदोस्त केले. शिवाजीनगर भागातील ही कहाणी. असेच दुसरे एक उदाहरण. त्यातून ईशान्य मुंबईत सेना-मनसेच्या आशीर्वादाने कसे काम चालते याचीही माहिती मिळते. झोपडपट्टय़ा राजकीय मंडळींकडून प्रशासनाच्या संगनमताने नंतर कोटय़वधींची झोपु योजना राबवण्यासाठी जाणीवपूर्वक जोपासल्या जातात.
एरवी मुंबईतील गिरण्यांची विक्री आणि तुमच्या आमच्या घराचा संबंधच काय? पण मुंबई महानगराच्या प्रदेशातील घरांच्या दराच्या दृष्टीने २००५ साल हे खूपच कलाटणी देणारे ठरले. या वर्षी शहरातील चार गिरण्यांची विक्री झाली आणि घरांच्या दरवाढीचा सरासरी आठ टक्क्यांचा दर हा थेट २१ टक्क्यांवर कसा गेला, हा सारा इतिहास या पुस्तकातून आपल्यासमोर येतो.
मुंबईचा विचार करायचा तर शिवसेना आणि दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय तो होऊ शकत नाही. ज्येष्ठ पत्रकार विद्याधर दाते यांचा ‘ठाकरे क्लोज अलाय ऑफ कॅपिटलिस्ट’ हा लेख एक वेगळी दृष्टी देणारा आहे. शिवसेनेसारख्या आक्रमक संघटना या भांडवलदार, उद्योगपतींना प्रिय असतात हे निरीक्षण नोंदवत त्याचे विश्लेषण दाते यांनी केले आहे. आर. के. लक्ष्मण यांच्यासारख्या देशातील नामवंत व्यंगचित्रकारालाही ‘आपला एकेकाळचा सहकारी ठाकरे हा कुठच्या कुठे निघून गेला आणि आपण कसे व्यंगचित्रच काढत राहिलो’ याची खंत वाटते, हा चकित करणारा प्रसंगही दाते यांच्या मार्मिक लेखात वाचायला मिळतो.
नेहमीप्रमाणे सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचत जायचे ही पद्धत हे पुस्तक वाचताना उपयोगाची नाही. तसे करायला गेलो तर लगेचच पुस्तक हातावेगळे होण्याची शक्यता दाट. त्याऐवजी एकदा चाळले की मग ते वाचण्याचे सूत्र डोक्यात बसवायचे ही पद्धत जास्त सोयीची. भरपूर छायाचित्रे, तक्ते, वृत्तपत्रांमधील बातम्यांची कात्रणे यांनी या पुस्तकातील पाने भरली आहेत. त्यामुळे पुस्तक वाचणे खूप सोपे जाते. आपल्याला रस असलेले तक्ते-आकडेवारी पाहायची, नाही तर सरळ पाने उलटत जायचे ही सोय असल्याने ४९७ पानांचे हे पुस्तक दिसायला मोठे असले तरी वाचायला सुलभ आहे. (अर्थात न कंटाळता अनेक पाने उलटण्याची मानसिक तयारी हवी.)
नगर नियोजनाशी संबंधित अनेक अहवाल, माहिती-आकडेवारी पानोपानी पसरली आहे. ती सर्व विषयांची मूलभूत माहिती होण्यासाठी उपयुक्त ठरते. पण याच कारणामुळे बऱ्याचदा हे पुस्तक कोरडे वाटते, हेही खरे. सलग पुस्तक वाचणे ही संयमाची परीक्षा घेणारे आहे. पण काय वाचायचे आहे व काय टाळायचे याचे सूत्र डोक्यात ठेवले की, मग मात्र फटाफट पाने उलटून आपल्याला रस असणाऱ्या विषयाचा पटकन धांडोळा घेणे सोपे जाते. नागरी प्रश्नांवरील चर्चासत्रांना जाणाऱ्या मंडळींना वक्ता बोलू लागला, काही सादरीकरण करू लागला की किती लक्ष द्यायचे व कधी पाय मोकळे करायला बाहेर जायचे, याचा एक अंदाज येत असतो. या पुस्तकाचेही तसेच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई रीडर १३ : संपादक मंडळ – राहुल मेहरोत्रा,
पंकज जोशी,
अर्बन डिझाइन रीसर्च इन्स्टिटय़ूट, मुंबई,
पाने : ४९७, किंमत : दिलेली नाही.

मुंबई रीडर १३ : संपादक मंडळ – राहुल मेहरोत्रा,
पंकज जोशी,
अर्बन डिझाइन रीसर्च इन्स्टिटय़ूट, मुंबई,
पाने : ४९७, किंमत : दिलेली नाही.