मुंबईच्या इतिहासावर व आजच्या स्थितीवर प्रकाश टाकणारे हे नवे पुस्तक. अनेक लेखकांनी लिहिलेले व वेगवेगळ्या विषयांची माहिती देणारे. २०११ साली वरळी येथील नेहरू सेंटरमध्ये झालेल्या एकदिवसीय चर्चासत्रात वाचल्या गेलेल्या शोधनिबंधांचे डॉ. मंजिरी कामत यांनी केलेले हे संपादन. याचा विषय जरी मुंबई असला तरी या विषयाला अनेक पैलू आहेत व हे सर्व पैलू एकदिवसीय चर्चासत्रात येणे अवघडच. चर्चासत्राच्या आयोजकांनी प्रयत्न केले तरी प्रत्येक संशोधकाचे स्वत:चे काम असते व त्यावर आधारित त्याचा निबंध असतो. त्यामुळे पुस्तकाचे स्वरूप थोडेसे विस्कळीत होणे साहजिक असते. तरीही त्यात वाचनीय बरेच असते व यात आहेही.
या पुस्तकातील सर्व लिखाणाचा सविस्तर परामर्श घेणे येथे शक्य नाही. परंतु जे काही लेख जुन्या कागदपत्रांवर आधारित आहेत ते, अथवा इतिहासलेखनात कुठकुठल्या कागदपत्रांचा उपयोग होऊ शकतो ते, अशा लेखांबद्दल मात्र जरूर लिहायचे आहे. अमर फारुकी यांची दोन-तीन पुस्तके अफूचा व्यापार, त्याचे अर्थकारण व त्याच्याभोवती फिरणारे राजकारण यावर आधारित आहेत. हे सर्व लिखाण अतिशय मनोरंजक आहे. त्यातीलच एका नव्या पैलूवर म्हणजे दमण व मुंबईतून निर्यात होणाऱ्या अफूच्या राजकारणावर त्यांनी आपल्या शोधनिबंधात प्रकाश टाकला आहे. हा निबंध वाचताना पोर्तुगीज व इंग्लिश यांच्यातील चढाओढीमुळे भारतीय भांडवलदारांना संधी मिळाली असावी का, हा प्रश्नही मनात येतो. कारण बंगालच्या अफू व्यापारावर इंग्रजांनी एकाधिकार स्थापित केला होता. साहजिकच माळव्याच्या अफूबाबतही त्यांचा हा प्रयत्न होता, पण पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी त्यांना तगडी स्पर्धा उभी केली व त्यात त्यांना साथ मिळाली स्थानिक गुजराती व कच्छी व्यापाऱ्यांची, तसेच नव्याने उदयास येणाऱ्या पारशी व्यापाऱ्यांची. ब्रिटिशपूर्व गुजराती व कच्छी व्यापाऱ्यांच्या निर्यात क्षमतेवर अधिक अभ्यास करण्याची आवश्यकता आहे याची जाणीव हा लेख वाचताना होते.
याच संदर्भात डग्लास हेन्स यांचा कापड गिरण्यांची अधोगती व लहान शहरातील भांडवलदार यावरील लेख आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, मुंबईच्या कापड गिरण्या नेहमीच पूर्ण निर्मितीक्षमतेने चालत नव्हत्या. त्याची त्यांच्या मते अनेक कारणे असू शकतात. त्यापैकी एक कारण म्हणजे या गिरण्यांना भांडवलाचा पुरवठा कायम कमी होता व दुसरे कारण म्हणजे या गिरण्यांच्या कापडाला पहिल्यापासूनच स्पर्धक होता. तो म्हणजे प्राचीन काळापासून परदेशी निर्यात करणारे कापड उत्पादक. युरोपचे उदाहरण लक्षात घेऊन आपण आपली मांडणीपण ‘यांत्रिक उत्पादनामुळे (गिरण्यांमुळे) स्थानिक भारतीय विणकर बुडाला’ अशीच करत होतो. परंतु पश्चिम भारतातून प्राचीन काळापासून तलम सुती कापड (कॅलिको) तसेच रेशमी कापड निर्यात होत होते. हे कापड गावागावांतून कौटुंबिक उत्पादन करणारे विणकर नव्हते, तर अनेक विणकरांना एकत्र एका जागी आणून निर्यातीसाठीच उत्पादन करणारे व्यावसायिक वा विणकरांचे गण (श्रेष्ठी संघ-गिल्ड) करत होते. हेन्सच्या मताप्रमाणे गिरण्या उदयास येण्याच्या आधीपासून कापडाचे व्यापारी तत्त्वावर उत्पादन होत होते व गिरण्यांचा जेव्हा सोनेरी काळ चालू होता त्या काळातही हे उत्पादन चालू होते. एवढेच नव्हे तर हे उत्पादक उत्पादनाच्या बाबतीत अतिशय लवचीक होते आणि बाजाराची त्यांची जाणही उत्तम होती. त्यामुळे गिरणीत उत्पादन झालेल्या कापडाशी ते स्पर्धा करू शकले. शिवाय हातमागाच्या जागी पॉवरलूम स्वस्तात आणून व कामगार कायद्यातून पळवाट काढत युनिट छोटे ठेवून त्यांनी आपली लवचीकता जपली. स्वातंत्र्यानंतरचे सरकारी धोरण लघुउद्योगांना सवलती देण्याचे होते. खरे म्हणजे या सवलती घरात कापड विणणाऱ्या विणकरांसाठी होत्या, परंतु त्याचा फायदा झाला या युनिट्सना. युरोपच्या चष्म्यातून आपल्या देशाची धोरणे आखली गेली का, हा विचार हा लेख वाचताना मनात येत राहतो. कापड उद्योगाकडे पाहण्याची एक वेगळीच दृष्टी हा लेख देतो.
‘सार्वजनिक आरोग्याचा इतिहास’ ही इतिहासाची नवीन शाखा आहे. यात डॉ. मृदुला रामण्णा यांचे खूप काम आहे. ज्या काळाबद्दल हा लेख आहे त्यात अनेक साथीच्या रोगांचा सामना ब्रिटिश सरकारला करावा लागला. प्लेगविषयी आपल्याला माहीत आहेच. त्याव्यतिरिक्तही अनेक साथींचे रोग मुंबईत धुमाकूळ घालत असायचे. अनेक रोगांविषयी माहिती पुरेशी नसायची. त्यात एकमेकांविषयी अविश्वास, गैरसमजुती, सोवळ्याओवळ्याच्या व स्वच्छतेच्या कल्पना यामुळेही सार्वजनिक आरोग्य राखणे परकीय सरकारला किती कठीण जात होते, याची चित्तरकथा या लेखात आहे. तसेच भारतीय नागरिकांच्या स्वास्थ्याची काळजी ब्रिटिश सरकारला माफकच होती. धनवान भारतीय नागरिकांनी सार्वजनिक इस्पितळे सुरू केली, परंतु ती चालवण्यात सरकारला रस नव्हता. हाही लेख माहितीपूर्ण व वाचनीय आहे.
डॉ. मरियम डोसल यांनी सरकारी धोरणे व राहत्या घरांच्या गरजा याचा आढावा घेतला आहे. हा लेख बराचसा आर्किटेक्ट्स असोसिएशनच्या चर्चाच्या नोंदी व इतर कागदपत्रांच्या साहय़ाने लिहिलेला आहे. बाहेरच्या राजकीय वातावरणाचा परिणाम आर्किटेक्चरसारख्या व्यवसायावर कसा होतो हे वाचणे मजेशीर आहे. ४०च्या दशकात जेव्हा स्वातंत्र्य चळवळ जोरात होती, तेव्हा त्या वेळचे आर्किटेक्ट्स गरिबांसाठी घर हवे याच्या चर्चा करत होते. लेखिका त्यांना ‘नॅशनॅलिस्ट आर्किटेक्ट््स’ म्हणते. स्वातंत्र्यानंतर लगेचच या चर्चाचा सूर बदलला. डोसल यांच्या टीकेचा सूर बराच मवाळ आहे. त्यांनी वापरलेल्या वेगळ्या कागदपत्रांमुळे इतिहासलेखनासाठी प्रत्येक कागद किती महत्त्वाचा असू शकतो याची जाणीव होते.
जिम मॅसॅलोस यांचा लेख विसाव्या शतकात बदलत जाणाऱ्या मुंबईवर आहे व त्यासाठी त्यांनी आधार घेतला आहे ‘टाइम्स ऑफ इंडिया’चा. त्यात आलेले लेख, बातम्या तसेच जाहिराती यांचे त्यांनी चिकित्सक पद्धतीने विश्लेषण केले आहे. काही मजेदार जाहिरातींबद्दलही लिहिले आहे. मुंबईच्या बदलत्या स्वरूपाबरोबर ‘टाइम्स’चे स्वरूपही या लेखातून समोर येते.
फ्रँक कोनलॅन यांचा लेख मुंबईत ट्राम केव्हा व कशी आली, त्याच्या बाजूने व विरुद्ध काय चर्चा झाल्या, त्याचे सरकारीकरण करायच्या मागे काय हेतू होते व त्या बंद करण्याची कारणे याची चर्चा करणारा आहे. तो सविस्तर चर्चेमुळे व ट्रामच्या नकाशामुळे लक्षणीय झाला आहे. टिमार रोदरमंड यांचा लेख कोळ्याच्या खेडय़ापासून मेट्रो शहरापर्यंतचा मुंबईचा प्रवास रेखाटतो. हा एक धावता आढावा आहे.
शेवटचा डॅरिल डिमाँटे यांचा लेख २०५०मध्ये मुंबई कशी असेल याचा भविष्यवेध घेणारा आणि पर्यावरणीय हानीबद्दल कळकळ व्यक्त करतो.
हे पुस्तक वाचताना इतिहासाकडे नव्याने पाहण्याची दृष्टी मिळते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा