मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील एका डॉक्टरला डेंग्यूमुळे प्राण गमवावे लागल्याची घटना जितकी धक्कादायक आहे, तितकीच ती या महानगरीच्या आरोग्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. एकूण लोकसंख्येच्या ६२ टक्के लोक ज्या शहरात झोपडपट्टीत राहतात, तेथे सार्वजनिक आरोग्य ही चिंतेची बाब असणे स्वाभाविकच आहे. अस्वच्छता आणि प्रदूषण हे मुंबईकरांच्या पाचवीलाच पुजलेले आहे. त्याचबरोबर वैयक्तिक आरोग्याबाबतचीही अनास्था, आरोग्य निरक्षरता अशा गोष्टींमुळे गेल्या काही वर्षांत औषधांनाही दाद न देणाऱ्या विषाणूंच्या जाती मुंबईत फैलावल्या आहेत. क्षयरोगासारखा आजवर आटोक्यात आल्यासारखा वाटणारा आजार आज लोकांचे बळी घेऊ लागला आहे. प्रदूषणामुळे श्वसनविकारांत वाढ होत आहे आणि अस्वच्छतेमुळे मलेरिया, डेंग्यूचे रुग्ण गल्लोगल्ली आढळत आहेत. आजारावरील उपचारांपेक्षा ते मुळात होऊच नयेत यासाठीच्या उपायांवर भर देणाऱ्या वैद्यकशास्त्राची भारत ही भूमी, पण आज वैद्यकीय महाविद्यालयांतूनही हे वैद्यकभान अनास्थेचा बळी ठरलेले आहे. ‘प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन’ हा सर्वात महत्त्वाचा विषय जेथे आमचे भावी वैद्य ‘ऑप्शन’ला टाकतात तेथे सर्वसामान्य लोकांकडून कशाची अपेक्षा करणार? याचा भयावह परिणाम प्रामुख्याने नागरी, अर्धनागरी भागांतून प्रत्यही दिसतो. नागरी धावपळीच्या आणि स्पर्धात्मक जीवनशैलीमुळे येणारे आजार हा एक भाग झाला. त्याचे वाढते बळी ही चिंतेची बाब आहे. नायर रुग्णालयातील ज्या निवासी डॉक्टरचा दोन दिवसांपूर्वी डेंग्यूने मृत्यू झाला, तो गोवंडीतील चिता कॅम्प नामक वसाहतीमधील एका आरोग्यकेंद्रात कार्यरत होता. तेथे त्याचे प्रमुख कार्य डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांचा शोध घेणे हे होते. एका अर्थी या कामानेच किंवा भोवतीच्या वातावरणाने त्याचा बळी घेतला. अर्थात डेंग्यू आणि मलेरियाची पाळणाघरे झोपडपट्टीतच आहेत, असे मानण्याचे कारण नाही. हे आजार एडिस इजिप्ती नामक डासामुळे होतात आणि साठलेले पाणी ही या डासांची प्रसूतिगृहे आहेत आणि ही प्रसूतिगृहे उच्चभ्रूंच्या वस्तीतही आहेत. गतवर्षी प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक यश चोप्रा यांचे डेंग्यूमुळे निधन झाले. त्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत चोप्रा यांच्या घरात डासांची उत्पत्तिस्थाने सापडली होती. याला काय म्हणणार? यावर पालिकेच्या आरोग्यखात्याला दोष देणे सोपे आहे. २०१२ मध्ये अशा आजारांनी ७३ जणांचे बळी घेतले. २०१३ मध्ये ही संख्या ३३ वर गेली. हे आजार होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा वेळी पालिकेचे आरोग्य अधिकारी काय झोपा काढत आहेत काय, असा सवाल तर सहजच करता येईल. मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी वाहणे हे त्यांचे काम आहे आणि आरोग्यखात्याचा, पालिकेच्या १७ रुग्णालयांचा कारभार पाहता हे काम प्रचंड जबाबदारीने केले जाते असे नक्कीच म्हणता येणार नाही. अर्थात, आपल्या गच्चीवरील भंगारसामानामध्ये, गॅलऱ्यांमधील कुंडय़ांमध्ये पाणी साठून तेथे एडिस इजिप्तीची पिले सुखेनैव जन्मास येत असतील, तर तेथे पालिका काय करणार? एडिस इजिप्तीच्या फौजांविरुद्ध पालिकेने गेल्या काही महिन्यांत युद्धपातळीवर जनजागृती मोहीम राबविली होती. घरात हा डास सापडला, तर दंड ठोठावू असेही जाहीर केले. तशी कारवाईही काही जणांवर करण्यात आली. परंतु सगळ्या लढाया सरकारनेच करायच्या नसतात. निदान आपल्या जीवन-मरणाची लढाई असेल, तेव्हा तरी त्यात नागरिकांचा सहभाग असला पाहिजे. मुंबईकर नेमके तेथेच कमी पडताना दिसत आहेत. ‘नायर’मधील शिकाऊ डॉक्टरच्या मृत्यूला एका अर्थी हे सगळे शहरच जबाबदार आहे.