धनशक्ती आणि बाहुबल ही सध्याच्या राजकारणाची नेमकी बलस्थाने आहेत. निवडणुकीचे राजकारण या बळांवरच चालते, हे उघड असे छुपे सत्य असल्याचा सर्वसाधारण समज आहे. दोन निवडणुकांच्या मधील काळात, राज्यकर्त्यांकडून किंवा निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडून मतदारांच्या अपेक्षा असतात, काही स्वप्ने असतात आणि विकास हे त्या स्वप्नांचे केंद्रस्थान असते. त्यांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधीदेखील विकासाच्याच गप्पा मारतात. पण पाच वर्षांनंतर जेव्हा नव्या निवडणुका येतात, तेव्हा विकासाचा लेखाजोखा मांडताना या शब्दाचा त्यांचा आपला-आपला नेमका अर्थ स्पष्ट दिसू लागतो. मतदारांना अपेक्षित असलेला विकास आणि लोकप्रतिनिधींना अपेक्षित असलेली समृद्धी ही दोन भिन्न टोके असावीत, असे जाणवू लागते. मतदारांना अपेक्षित असलेली, मतदारसंघातील विकासाची कामे कासवाच्या गतीने पुढे सरकत असली तरी लोकप्रतिनिधींच्या स्वयंविकासाची कामे मात्र वायुवेगाने धावत असतात, हे असंख्य उमेदवारांच्या मालमत्तांच्या प्रतिज्ञापत्रावरून उघड होते. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या संपत्तीचे आकडे पाहता, स्वयंविकासाचा ध्यास घेऊन लोकप्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वपक्षीय उमेदवारांनी सत्ताबलाचा कसा वापर केला असावा, याचे अंधूकसे दर्शन घडते. राजकारण हे धनशक्तीच्या संचयाचे साधन असते, या सर्वसाधारण समजुतीला यामुळे पुष्टीदेखील मिळू शकते. गंमत म्हणजे, राजकारणाचे गुन्हेगारीकरण किंवा भ्रष्टाचार अशा मुद्दय़ांवर जनतेच्या विवेकबुद्धीला साद घालत मतांचा जोगवा मागणाऱ्या राजकीय पक्षांचाही या संचयवृत्तीला अपवाद नाही, हे दिल्लीतही स्पष्ट होत आहे. पाच वर्षांपूर्वीच्या निवडणुकीत निवडून आलेले ६६ सर्वपक्षीय आमदार दिल्लीत पुन्हा मतदारांचा कौल अजमावत आहेत. त्यांच्या मालमत्तांमध्ये सरासरी तिपटीहून अधिक वाढ झाल्याचे स्पष्ट झाल्याने, धनशक्ती संचयाचे स्वप्न राजकारणातून साकार होते या समजुतीला सबळ पुष्टी मिळाली आहे. भाजपचे सत्प्रकाश राणा पाच वर्षांपूर्वी ६.३८ कोटींचे धनी होते, त्यांची माया आता १११ कोटींवर गेल्याने ही सरासरी वाढली म्हणावे, तर सत्ताधारी काँग्रेसच्या आमदारांनी केलेल्या धनसंचयावर अन्याय केल्यासारखे ठरेल. धनशक्तीचा संचय जसजसा वाढत जातो, तसतसा राजकारणातील प्रभावही वाढू लागतो आणि एकदा असा प्रभाव प्रस्थापित झाला, की बाहुबल आपोआपच प्राप्त होते, असाही एक सर्वसाधारण समज प्रबळ होऊ लागला आहे. धनशक्ती आणि बाहुबलाचा संगम साधणाऱ्या उमेदवाराच्या राजकारणास पक्षभेदाची कुंपणे रोखू शकत नाहीत, उलट सर्वपक्षीय स्वागताच्या पायघडय़ा त्याच्यासाठी तयार असतात, असाही समज वाढू लागला आहे. बिहारमधील पप्पू यादव या गुन्हेगारी पाश्वर्भूमी असलेल्या राजकीय नेत्याचे ‘द्रोहकाल का पथिक’ नावाचे एक आत्मचरित्र नुकतेच प्रकाशित झाले. वस्तुत: आत्मचरित्रे ही नव्या पिढय़ांची प्रेरणास्थाने असल्याचे मानले जाते. पण आता प्रेरणास्थानेदेखील बदलू लागली असावीत. बाहुबलींचे समर्थन मिळावे यासाठी त्यांच्यासमोर धनशक्तीच्या पायघडय़ा कशा घातल्या जातात, याची खुमासदार चुणूक पप्पू यादवच्या या आत्मचरित्रात आढळणार आहे. अर्थात, त्याच्या प्रश्नचिन्हांकित विश्वासार्हतेमुळे त्याच्या सत्यासत्यतेवरही प्रश्नचिन्हे उमटविता येणार असल्याने, बचावाची संधीदेखील संबंधितांना मिळेल. दिल्लीच्या निवडणुकीत धनशक्तीबरोबरच, बाहुबलाचा वापर करणाऱ्यांचाही सर्वपक्षीय संचार दिसतो. मतांचा जोगवा मागण्यासाठी रस्त्यावर उतरणारे असे पांथस्थ यापुढेही दिसणारच आहेत. पण हे सारे समजुतीला धरूनच असल्याने, गोंधळून जाण्याचे कारण नाही.
द्रोहकालाचे असेही पांथस्थ..
धनशक्ती आणि बाहुबल ही सध्याच्या राजकारणाची नेमकी बलस्थाने आहेत. निवडणुकीचे राजकारण या बळांवरच चालते, हे उघड असे छुपे सत्य असल्याचा सर्वसाधारण समज आहे.
First published on: 28-11-2013 at 12:32 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Muscle strength and wealth