तालाशी लयीचा  सतारसंवाद घडवून आणताना रविशंकरांनी जागतिक रसिक डोळय़ांपुढे ठेवला.. पुढे विषयांतरं झाली, तरीही श्रोते समोर होतेच..
पंडित रविशंकर हे ग्रॅमी पुरस्कारापेक्षाही वरच्या दर्जाचे कलावंत होते. जगातल्या सगळय़ा रसिकांना मोहिनी घालण्याची अचाट क्षमता वादनात साठवलेल्या या प्रतिभावान कलावंताला सतार हे वाद्य असं कळलं, की त्यानं त्या वाद्याबरोबर एक अतिशय सुमधुर असा स्वरांचा खेळ खेळला. गेली ऐंशी र्वष हा कलावंत जगभर हिंडत होता आणि नवनवे प्रयोग करत होता. जगातल्या अनेक संगीतपरंपरा समजून घेत होता. त्यांचा अभ्यास करत होता आणि त्याचवेळी आपली अशी एक संपन्न परंपरा कसोशीनं जपतही होता. काळाच्या हिशोबात अलीकडेच निर्माण झालेल्या विदेशी परंपरांमध्ये भारतीय अभिजातता कशी मिसळवता येईल, याचा विचार करत होता. असं करणं त्यांना शक्य झालं, याचं कारण फार लहान वयात ते परदेशात गेले तिथंच शिकले. संस्कारक्षम वयातले ते स्वरसंस्कार नंतरच्या काळात त्यांना खूपच उपयोगाला आले. गुलाबजाम पाकात घोळवतात, तसे स्वर लयीत घोळवण्याची एक अपूर्व कला त्यांना वश झाली होती.
संगीतातली लय हे एक अद्भुत प्रकरण आहे. माणसाच्या उत्क्रांत काळात त्याला गळय़ातून स्वर निघू शकतात, याचा ‘शोध’ लागला. त्या स्वरांच्या आकृत्या आणि नंतर आकृतिबंध तयार करण्यासाठी त्या काळातील माणसाला बराच काळ घालवावा लागला असणार. जगण्यासाठीचं अन्न मिळवल्यानंतरचा सर्व वेळ अशा जगण्याच्याच नव्या शोधासाठी व्यतीत करणं हेच तर माणूसपणाचं लक्षण होतं. त्यानं स्वर निर्मिले. त्यांची स्थानं पक्की केली. त्या स्वरांचे परस्पर संबंध शोधले. त्या संबंधांमधून एक एकजिनसी आकृती शोधली. त्याला राग असं नाव दिलं. त्या रागांचे समूह तयार केले. हे सारं कोणत्याही प्रयोगशाळेविना आणि उपकरणाशिवाय करण्याएवढी प्रखर बुद्धिमत्ता त्याच्यापाशी आली, तेव्हाच घडलं. त्यामुळेच गायन ही कला म्हणून प्रस्थापित होणं ही मानवाच्या कोटी वर्षांच्या जीवनातील एक अतिशय अनन्यसाधारण अशी घटना होती. गळय़ातून निघणारे स्वर मनाला वेगळा अशारीर असा अनुभव देतात. त्यानं चित्तवृत्ती उल्हसित होतात आणि चिद्विलासाचा अतींद्रीय अनुभव येतो.
याच दरम्यान माणसाला ‘लय’ या एका नव्याच तत्त्वाचाही शोध लागला. हा शोध स्वरांच्या शोधाएवढाच महत्त्वाचा म्हणायला हवा. निसर्ग न्याहाळताना सर्वत्र भरून राहिलेली ही लय त्याला सूक्ष्मतेनं जाणवत असली, तरी तिचा पुनरुच्चार कसा करायचा, ते कळणं अधिक आवश्यक होतं. गायन करताना अनिच्छेनंही असेल कदाचित, पण ही लय तिथं सावलीसारखी सोबत करत असल्याचं जाणवणं हाही एक मोठा शोधच की! नंतर समजलं असणार की हे सारं अनिच्छेनं होत नसून आपोआप होतं, कारण ते सारं काही सेंद्रिय म्हणजे पुरेपूर नैसर्गिक आहे. झाडांच्या पानांच्या आकारापासून ते फुलांच्या पाकळय़ांपर्यंत आणि चंद्र-सूर्याच्या विशिष्ट गोलाईपासून ते डोंगरकपाऱ्यांमधील विविध आकारांपर्यंत सर्वत्र भरून राहिलेली आकृतीची स्पष्टता समजणं ही केवढी तरी मोलाची गोष्ट होती. स्वर कुणी शोधले, त्यांची स्थानं कुणी पक्की केली, स्वर सातच का, त्या स्वरांच्या सांदीसापटीत सापडलेल्या श्रुतीही बावीसच का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं नंतरच्या कित्येक वर्षांनी शोधली जातील, म्हणून कुणी लिहून ठेवली नाहीत. ही सारी माणसं अफाट बौद्धिक क्षमतेची असणार यात तर वादच नाही. पण त्यांनी आपलं नामोनिशाण न ठेवणं यात त्यांचं मोठेपण अधिक आहे.
लय जाणवते आहे आणि ती पकडायचं ठरवलं तरी कशामुळे पकडता येईल, ते समजत नाही. अशा वेळी लयनिर्मितीचं साधन शोधणं हा एक अजब असा प्रयोग होता. लय मोजण्याचं यंत्र निर्माण होण्याआधीच माणसानं ती मेंदूनं जाणली. त्यासाठी वाद्याची निर्मिती केली आणि मग त्यानं लयीचं एक अतिविशाल असं विश्व तयार केलं. त्याची एक ‘ताल’ नावाची स्वतंत्र भाषा केली, त्या भाषेचे अर्थ बनवले. नियम आणि कायदेकानू यांनी ती लय बांधून ठेवली. असं करताना त्यामध्ये सौंदर्याचीच जाणीव व्यक्त होईल, याची काळजी घेतली.
स्वरांनी तयार झालेल्या अवकाशात कुणी अज्ञातानं लयीचं विश्व मिसळलं आणि स्वराकृतींना एक अतिशय रेखीवपणा आला. त्याला आवर्तनाचं सौंदर्यपूर्ण बंधन आलं. चित्रातल्या चौकटीचं जे महत्त्व, तेच संगीतात तालाचं. तालाचे गोलाकार वेगवेगळय़ा आकाराचे, काही छोटे तर काही खूपच मोठे. त्या त्या आकाराचा संगीतनिर्मितीसाठी खुबीनं वापर करून एक नवं आकाश निर्माण करण्याचा प्रयत्न माणसाच्या सर्जनानं केला. हे सारं घडत असताना गळय़ातून व्यक्त होणारं संगीत आणि त्याआधी मेंदूत तयार होणारं संगीत यातील वेगात फरक पडू लागला. मेंदूत खूप काही संगीत तयार होतं आहे. ते व्यक्त करण्यासाठी गळय़ातील स्वरयंत्र नावाचा एकच अवयव हाताशी आहे. असंही लक्षात येऊ लागलं आहे, की स्वरयंत्रातून संगीत व्यक्त होण्यालाही काही नैसर्गिक मर्यादा पडू लागल्या आहेत. मग हे सारं मेंदूतलं संगीत कसं व्यक्त करायचं, असा गहन प्रश्न सर्जनशीलतेलाच हैराण करतो आहे. गरज ही शोधाची जननी असल्यानं माणसानं मग हे संगीत व्यक्त करण्यासाठी मार्ग शोधायला सुरुवात केली. त्यातून वाद्यं निर्माण झाली. निसर्गातल्याच वस्तूंनी तयार केलेल्या या वाद्यांमधून निर्माण होणाऱ्या संगीतानं स्वरविश्व आणखी समृद्ध होऊ लागलं. मग त्या वाद्यांसाठी तंत्रज्ञान आणि विज्ञानानं मदत केली. भोपळय़ापासून वाद्य बनवण्यापूर्वी बांबूचं वेणू हे वाद्य माणसानं तयार केलं. त्यातून संगीत व्यक्त करण्यासाठी त्यानं त्या वाद्यातही संशोधन केलं. नंतर वीणा आली, सतार आली, सरोद आलं, संतूर आलं. प्रत्येक वाद्यानं आपापला स्वभाव वेगळा ठेवला. त्यातून व्यक्त होणारं संगीत एकच असलं तरी त्याचं भावदर्शन वेगवेगळं. राग तोच. पण त्याचं दर्शन वेगळं!
सतारीनं मनातलं गाणं ऐकवायचं ठरवलं. जे गळय़ातून काढताच येणार नाही, अशा अतिशय कठीण आणि मृदुमुलायम स्वरलडी लीलया व्यक्त करण्याचं सामथ्र्य त्या वाद्यातच लपलेलं होतं. विशेष असा, की वाद्य वाजवताना त्याच्याकडे न पाहता, केवळ बुद्धीच्या जोरावर त्यातून संगीत निर्माण करण्याचं एक अनोखं आव्हान होतं. सतार वाजवताना त्या लाकडाच्या लांब पट्टीवर असलेल्या स्वरांचे पडदे डोळय़ांना दिसत नाहीत. बोटांना त्यांचा स्पर्शही वेगळा होत नाही. म्हणजे बोटांना स्वरांचे डोळे येईपर्यंत त्या वाद्यावर प्रभुत्व मिळवणंच कठीण. त्यासाठी प्रचंड मेहनत. एवढे कष्ट केल्यानंतर मनातलं गाणं वाजवण्यासाठी आवश्यक असलेल्या सृजनाची साधना आणि तपश्चर्या. नंतर मात्र स्वरविश्वातल्या साऱ्या आकाशगंगाच आपल्या वाटाव्यात अशा अपूर्वाईचा आनंद. रविशंकरांनी तो जगभर वाटला. स्वत: मिळवला आणि सगळय़ांना या स्वरांच्या दिवाळीत सहजपणे सामावून घेतलं. तालाच्या आवर्तनात बंदीश मांडताना तालाची भाषाही रसिकांना एक वेगळा आनंद देऊ शकते, हे त्यांना पाश्चात्त्य संगीतामुळे कळलं. तिथं ताल नाहीत केवळ ‘बीट्स’. आवर्तनं नाहीत, केवळ प्रत्येक मात्रेनं एकामागे एक असं पळत राहणं.
सतारवादनात तालाशी आणि त्याच्या मात्रांशी आडवळणानं आणि थेट झिम्मा खेळत एका नव्या संवादाची ही सुरुवात करताना रविशंकर यांच्यासमोर जगातला रसिक असला पाहिजे. त्यांना हे करण्यासाठी साथ मिळाली ती अल्लारखाँ यांच्यासारख्या लयसम्राटाची. ज्यांनी आयुष्यभर लयीची साधना केली, त्यातून एका नव्या संगीताचाच शोध लावला, अशा अनेक तबलानवाजांनी रविशंकर यांना या संवादात साथ दिली. सतारीमध्ये तबल्याची भाषाही व्यक्त करण्याचं सामथ्र्य आहे, हे लक्षात आल्यानंतर या दोन्ही वाद्यांनी एकमेकांच्या हद्दीत जायचं ठरवलं. त्यातूनच सवालजबाब आले. रविशंकरांनी त्यामध्येही अभिजातता टिकवून ठेवली होती. हा सवालजबाब टाळय़ांचा धनी होऊ लागल्यावर सगळय़ाच सतारवादकांना त्याचं गारुड पडलं आणि मग तो एक अनिवार्य घटक बनला. पुढे त्यातून एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रकार सुरू झाले. प्रभुत्व सिद्ध करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ लागला. मग संगीतानं हळूच एक पाऊल मागे जायचं ठरवलं. रसिकांना हेच चांगलं आहे, असं वाटू लागलं. ज्याअर्थी रविशंकर यांच्यासारख्या असामान्य प्रज्ञेचा कलावंत असं काही करतो आहे, त्याअर्थी ते आणि तेच योग्य असणार अशा भ्रमात जाणं सोपंच होतं. रविशंकरांनी त्यामध्ये सौंदर्याची जी जाणीव ठेवली, ती ठेवण्याची गरज इतरांना वाटेनाशी झाली आणि त्यातून गोंगाटाचं संगीत व्यक्त होऊ लागलं. गोंगाट आणि संगीत हे परस्परविरोधी शब्द असले, तरी मैफलीत ते एकत्र आणि समानार्थी होऊ लागले. मनातलं गाणं व्यक्त करण्यासाठी आलेल्या वाद्यांनी त्यांचा मूळचा स्वभाव सोडून आणखी काही करताना त्याच्या निर्मितीच्या वेणाही समजून घ्यायला नकोत का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा