मी दुसरी-तिसरीत असतानाची गोष्ट. शाळेत आम्हाला बाईंनी  निबंध लिहायला दिला होता. विषय होता ‘माझे बाबा’. मी आपलं माझ्या वयाला साजेसं असं ‘बाबा लाड करतात, खेळतात’ वगरे  लिहिलं. त्यात एक वाक्य असं लिहिलं होतं की ‘माझे बाबा व्हायोलिनपण वाजवतात.’ आमच्या बाई संगीताच्या जाणकार होत्या. त्यांनी मला ‘समज’ दिली. तेव्हा मला पहिल्यांदा पंडित डी.  के.  दातार हे ‘माझे बाबा’ आहेत आणि संगीताच्या, विशेषत:  व्हायोलिनच्या दुनियेत ‘बाप’ कलाकार आहेत, याची जाणीव झाली.
तेव्हापासून वडील आणि संगीतकार अशा दोन्ही भूमिका अत्यंत समरसतेनं आणि सहजपणे हाताळणारे माझे बाबा मी गेली चाळीस र्वष पाहत आहे. पद्मश्री, संगीत नाटक कला अकादमीचा पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार या आणि अशा अनेक सन्मानांनी विभूषित असलेला सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक प्रत्यक्षात किती साधा, निरागस, सज्जन माणूस असू शकतो हे मी बघतो आहे.
एक व्यक्ती आणि त्या व्यक्तीची अभिव्यक्ती यात कसं गमतीशीर अंतर किंवा फरक असतो, ते माझ्या बाबांच्या बाबतीत अनुभवायला मिळतं. सगळेच जण बाबांना अबोल, मितभाषी आणि हळू आवाजात बोलणारे म्हणून ओळखतात. पण वाजवायला बसले की, त्यांचं वादन खणखणीत, व्हायोलिनचा स्वर अत्यंत लडिवाळ आणि मधुर! एकंदरीत त्यांचं वादन म्हणजे आकाशात फटाका फुटल्यावर आकाश झगझगीत होऊन जावं, तसं!
दररोजच्या जीवनात लहानसहान प्रश्नांना बाबा गुळमुळीत उत्तरं देतील; ‘उद्या बघू या म्हणतील’, छोटे छोटे फालतू निर्णय घ्यायला वेळ लावतील, पण वाजवायला बसले की सूर एकदम पक्का, बावनकशी सोन्यासारखा! एकदा मुंबईतच कुठे तरी कार्यक्रम होता. त्याआधी बाबा तानपुरे आणि वाद्यं मिळवत ग्रीन रूममध्ये बसले होते. बाजूच्या खोलीत कुमार गंधर्व होते. त्यांनी तंबोरा ऐकला आणि शिष्यांना म्हणाले ‘वाह! हा तानपुरा दामूने मिळवला असावा. बघ रे दामू आहे का बाजूच्या खोलीत. त्याला म्हणावं मी बोलावलंय’. कुमारजी तर बाबांना त्यांचा लहान भाऊ असल्यासारखंच वागवत. आमच्या घरी कधी कुमारजी आले तर आम्हा मुलांनाही घरातील वडीलधारा माणूस येणार आहे. त्यामुळे आवाज करायचा नाही वगरे ताकीद असे. बाबांचे मोठे बंधू म्हणजेच नारायण केशव दातार (बापूकाका) यांच्याविषयीसुद्धा असाच आदर बाबांच्या वागण्यातून जाणवायचा.
तेव्हा बाबा ‘फिल्म्स डिव्हिजन’मध्ये संगीतकार म्हणून काम करायचे. संध्याकाळी घरी आले की,  ते अनेकदा आमच्या बरोबर क्रिकेट खेळायला येत. लहान मुलांबरोबर इतका प्रख्यात माणूस खेळतो आहे म्हटल्यावर सोसायटीतील इतर बाबा मंडळी -पण यायची. बाबा अतिशय सुंदर स्पिन बोिलग करायचे. बहुतेक छोटय़ामोठय़ा मंडळींच्या ‘विकेट’ घ्यायचे. पण अंधार पडला की, एकदम गुल व्हायचे. कारण ती त्यांची रियाझाची वेळ असायची. आम्ही घरी जाईपर्यंत बाबा आंघोळ आटोपून व्हायोलिनच्या गजांना अगदी तन्मयतेनं राळ लावत बसलेले असायचे. बाबांनी आम्हाला कधी ‘अभ्यासाला बसा’ असं सांगितलं नाही, पण स्वत: मात्र ते नेमाने स्वत:च्या ‘अभ्यासाला’ बसलेले दिसायचे.
लहानपणी कधी बाहेर फिरायला जायचं ठरलं की, आम्ही दोघं भाऊ बाबांच्या मागे लागायचो ‘बाबा, तुम्ही गाडी चालवा. तुम्ही आईपेक्षा फास्ट चालवता’. मग ते गाडी चालवायला बसायचे. रस्ता रिकामा असला तरी असं लक्षात यायचं की, एका ठरावीक वेळाने बाबा गाडीचा हॉर्न वाजवत आहेत. कारण त्यांच्या डोक्यात कुठली तरी झपतालातील किंवा एकतालातील चीज असायची आणि त्या तालाच्या प्रत्येक आवर्तनाच्या समेवर तो हॉर्न वाजायचा. कधी डोक्यात द्रुत लय असली कि गाडी फास्ट! मग आई ताना मारायची (िहदीतील ‘ताने मारना’ या अर्थी). मग गाडीचा स्पीड कंट्रोलमध्ये यायचा.
बाबांना झोप लागली आहे की, नाही हे ओळखण्याची आम्हा मुलांची खूण असे. हाताची बोटं लयीवर हलत नसली की, समजायचं त्यांना झोप लागली. रात्री झोप लागेपर्यंत बाबांच्या डोक्यात फक्त गाणं असायचं. मी ‘संगीत’ असा शब्द जाणीवपूर्वक वापरला नाही, कारण बाबा उत्तम गातात. एक वाद्यकार, ज्याच्या वाद्यातून खरं तर शब्द कधीच येणार नाहीत, पण बाबांच्या डोक्यात नुसतेच सूर-ताल नाही तर बंदिशींचे शब्दपण असायचे. म्हणूनच त्यांच्या वादनात गजाची हालचाल शब्दाबरहुकूम होत असावी. म्हणूनच बाबांचं व्हायोलिन हे ‘गाणारं व्हायोलिन’ म्हणजे ‘शब्दप्रधान व्हायोलिन’ म्हणून ओळखलं जातं. कारण शब्दांचा डौल, अर्थ आणि त्या मागील भावना हे डोक्यात असे आणि मग ते हातातून उतरे.
बाबांना मिठाई, चॉकलेट खूप आवडतात.  खमंग साजूक तूप कढवून सर्वाना खायला घालणं आणि स्वत: खाणं हा कार्यक्रम आमच्या घरात आजतागायत चालू आहे. अनेकांना आश्चर्य वाटेल पण, जवळ जवळ गेली चाळीस र्वष बाबांना मधुमेह आहे. मात्र दररोज चालणं, व्यायाम, रात्री  पालेभाज्या आणि दही असा माफक आहार घेणं आणि अर्थातच औषधं घेणं या पथ्याने त्यांनी तो काबूत ठेवला आहे. सणवार असो की प-पाहुणा,  बाबांची चालायला जायची वेळ झाली की ते चालले. हे सगळं कशासाठी? तर व्हायोलिन वाजवण्यासाठी फिटनेस हवा हे एकच ध्येय!
आम्ही कित्येकदा बाबांच्या परदेश दौऱ्यांत सोबत जायचो. विशेषत: लंडन आणि युरोपमध्ये बाबांचे अनेकदा दौरे असायचे. मग आम्ही दोघं भाऊ आणि आई सगळीकडे स्थळदर्शनासाठी भटकायचो. बाबा आमच्या बरोबर बाहेर पडायचे, पण त्यांचं स्थळदर्शन वेगळंच असायचं. व्हिएन्ना ही तर व्हायोलिनची पंढरी. तिथं संपूर्ण दिवस ते व्हायोलिनची दुकानं पालथी घालत. व्हायोलिनवादकांना भेटत, त्यांच्याबरोबर चर्चा करत. शेकडो वर्षांपूर्वीची व्हायोलिन्स, त्यांच्या तारा, त्यांचे गज या दुनियेत ते दिवसभर रममाण होत. पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन घ्यायला गेलेला वारकरी तिथून पुढे ‘साइट सीइंग’ला जात नाही, असे म्हणतात तसा हा प्रकार .   
दर वर्षी आमच्याकडे गणपतीत कार्यक्रम असायचा. या वेळी सर्व हौश्यागवश्यांना देवासमोर सेवा करायला आमंत्रण असे. रात्रभर चालणाऱ्या या कार्यक्रमात नकला, काव्यवाचन, गाणं,  नृत्य असा कार्यक्रम असे. या कार्यक्रमात बाबा जाणीवपूर्वक तबला, पेटी वाजवत वा व्हायोलिनवर सिनेसंगीत किंवा वेस्टर्न टय़ून वाजवत. या कार्यक्रमात अनेक डॉक्टर, हौशी कलावंत, शिष्य सहभागी होत. एरवीही आमचं घर म्हणजे बाबांचे शिष्य, चाहते यांनी गजबजलेलं असायचं. त्यातील अनेकांनी आता संगीत क्षेत्रात स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. बाबांनी कधी कोणाला कानाला धरून असंच वाजव, माझ्या पद्धतीनेच वाजवलं पाहिजे असा आग्रह धरला नाही. त्यांनी ‘दिल खोल के’ आपली पोतडी उघडली. मग ज्याला जे आवडलं, मानवलं, पटलं आणि जमलं ते त्यानं घेतलं.
राजन माशेलकर आणि मििलद रायकर हे दोघं लहान वयात बाबांकडे गोव्याहून शिकायला आले.  पुण्याहून येणारे रत्नाकर गोखलेकाका आज कित्येक र्वष आमच्या घरी येत आहेत. अजून एक उल्लेखनीय शिष्य म्हणजे महाराष्ट्र शुगर इंडस्ट्रीचे डायरेक्टर  (कै.) अरुण डहाणूकर. माझ्या लहानपणापासून मी त्यांना बाबांकडे शिकताना बघितलं.  
बाबांच्या जगात सगळेच शिष्य म्हणजे व्हायोलिनच्या िदडीतील वारकरी! ही  सगळीच मंडळी गाणं बजावण्यापासून ते सतरंज्या घालण्यापर्यंत आणि गप्पांचे फड रंगवण्यापासून ते जेवण्यापर्यंत घरात असायची. अगदी स्वयंपाकघरात शिरून बाबांनी स्वत:साठी आणि शिष्यांसाठी चहा ठेवलेला मी पाहिला आहे. डहाणूकरकाका तर कित्येक वेळा माझ्या आईने केलेली पुरी-भाजी स्वयंपाकघरातील दाराजवळ उभे राहून मिटक्या मारत खायचे.  
माझी आईपण बाबांची शिष्या. साक्षात पु. ल . देशपांडे यांनी तिला बाबांकडे शिकायला पाठवलं होतं आणि मग आई-बाबांच्या लग्नाला भरभरून आशीर्वाद दिले. प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ असलेल्या माझ्या आईने आमच्या बाबतीत प्रसंगी बाबांचीही भूमिका बजावली. शिवाय बाबांना खंबीरपणे साथ दिली. बाबांचा अजून एक मनस्वी शिष्य म्हणजे दिल्लीचा कैलाश पात्रा. या गृहस्थाने बाबांचा फोटो समोर ठेवून आणि त्यांच्या ध्वनिमुद्रिका ऐकून ऐकून एकलव्यासारखं शिक्षण घेतलं. तो जवळ जवळ पंधरा वर्षांनी बाबांना पहिल्यांदा दिल्लीत भेटला आणि रस्त्यातच बाबांना साष्टांग लोटांगण घातलं. आता तो अधूनमधून घरी येतो, आमच्याकडेच राहतो आणि शिकतो. एकदा मी त्याला म्हटलं, ‘तू तर एकलव्य  आहेस.’ त्यावर तो म्हणाला ‘मला एकलव्य म्हणू नका. कारण मग माझे गुरुजी द्रोणाचार्य होतील. द्रोणाचार्यानी एकलव्याचा अंगठा मागितला होता. माझे गुरुजी तर त्याहून महान आहेत. त्यांनी माझ्याकडून काही मागितलं नाही. माझं वाजवणं ऐकलं आणि ज्या गोष्टी मला उलगडल्या नव्हत्या, त्या हाताचं काही न राखता मला दिल्या.’
बाबांना ‘पद्मश्री’ किताब जाहीर झाल्यानंतर आम्ही सगळे तो सोहळा बघायला राष्ट्रपती भवनात गेलो होतो. तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते बाबांना पुरस्कार मिळाला. सोहळ्यानंतर  एका मोठय़ा अधिकाऱ्याने आम्हाला त्यांच्या घरी नेलं आणि बघतो तर काय त्याच्या देवघरात बाबांचा फोटो होता. त्याची दररोज पूजा होत असे. आयुष्यभर सच्च्या सुरांची पूजा बांधणाऱ्या आमच्या कलंदर बाबांची त्याने पूजा बांधली होती..
drnikhil70@hotmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा