‘मिसाइल मॅन’ अशी ओळख असलेले माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे ‘माय जर्नी’ हे पुस्तक त्यांच्या आयुष्यातील घटनांचा ओझरता प्रवास आहे. या पुस्तकातून त्यांच्या मोठेपणाची साक्ष ठायीठायी जाणवतेच, पण एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि किती कष्ट उपसावे लागतात हे समजते.
कलामांची ‘पीपल्स प्रेसिडेंट’ ही राष्ट्रपतिपदाच्या कारकिर्दीतील ओळखही यात छोटय़ा-छोटय़ा प्रसंगांतून अधोरेखित झाली आहे. कलाम यांनी गेल्या दोन दशकांमध्ये दीड कोटींहून अधिक युवकांशी संवाद साधला. त्यातून सतत नवनवीन शिकण्याचा त्यांचा ध्यास प्रतीत होतो.
आपल्याकडे सामाजिक सलोख्याची गरज भाषणापुरती किंवा लिखाणातून दिसते. मात्र उक्ती आणि कृतीत फरक दिसतो. वर्तन समाज आणि जात यापुरते मर्यादित राहते. कलामांनी त्यांचे जन्मगाव रामेश्वरम हे कसे सामाजिक सलोख्याचे सुंदर उदाहरण होते याविषयी लिहिले आहे. त्यांचे वडील जैनुलबदीन यांचा नौकाबांधणीचा व्यवसाय होता. याशिवाय नारळाच्या झाडांपासून त्यांना चांगले उत्पन्न मिळे. त्यामुळे कलाम यांचे बालपण फार सुखवस्तू नसले तरी ओढग्रस्तही नव्हते. जैनुलबदीन स्थानिक मशिदीत इमाम होते. त्यांचे गावातील जवळचे मित्र लक्ष्मणशास्त्री हे ऐतिहासिक रामनाथन मंदिराचे पुजारी होते तसेच फादर बोडेन यांच्याशी त्यांची मैत्री होती. अनेक विषयांवर या तिघांचा संवाद चाले. त्यामुळे गावात एखादी समस्या निर्माण झाली तर त्याचे तातडीने निराकरण होत असे, अशी आठवण सांगत गावांमध्ये सलोखा राहण्यासाठी संवादाची कशी गरज आहे हे कलाम यांनी अधोरेखित केले आहे.
बहीण झोराचे पती जलालउद्दीन हे कलाम यांच्या आयुष्यातले पहिले मार्गदर्शक. त्यांनी कलाम यांच्या जीवनाची दिशा बदलली. कलाम यांची तंत्रज्ञानातील रुची जलालउद्दीन यांनी हेरली. त्यावर ते तासन्तास चर्चा करू लागले. यातून कलाम यांची चौकस बुद्धी जागी होऊन पुढे त्यांच्यातील मिसाइल मॅन घडला. जलालउद्दीन आणि चुलतभाऊ समशुद्दीन यांनी प्रत्येक व्यक्तीमध्ये काही तरी गुण असतात हे बिंबवले.. सकारात्मक विचार करण्यास शिकवले. त्यातून आशावादी दृष्टी घडली. रामेश्वरम येथून शिक्षणासाठी शेजारच्या रामनाथपूरम येथे जाण्यास केलेली मदत किंवा अमेरिकेला जाताना मुंबईला विमानतळावर सोडताना केलेली साथ, या दोघांमुळे रामेश्वरमबाहेरच्या जगात कलामांना सहजतेने वावरता आले.
एखादा प्रकल्प हाती घेतल्यावर यश-अपयश आलेच. मात्र अपयशाने खचून न जाण्याची ताकद कलाम यांना अवकाश संशोधन कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांनी दिली. अपयशातून आपल्यातील क्षमतेचा शोध कसा घेता आला हे त्यांनी मद्रासमध्ये विमान अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना आलेल्या एका उदाहरणाने सांगितले आहे.
केरळमध्ये थुंबा येथे उपग्रह प्रक्षेपक केंद्रावर उपग्रह प्रक्षेपक तयार करताना जिवावर बेतलेल्या एका प्रसंगात स्वत:चा जीव धोक्यात घालून सहकारी सुधाकर याने कलामांना वाचवले. ‘इतरांसाठीही जगा’ हाच संदेश ही घटना आपल्याला देऊन गेल्याचे कलाम सांगतात.
संशोधकीय कारकिर्दीतील एक घटना कलाम यांच्या आयुष्यावर खोल परिणाम करून गेली. ११ जानेवारी १९९९ मध्ये एका मोहिमेवर दोन विमानांनी अर्कोनम-चेन्नईकडे उड्डाण केले. त्यातले एक विमान कोसळून त्यातील सर्व आठ तरुण वैज्ञानिक दगावले. त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनाच्या वेळी यातील काहींची नुकतीच जन्माला आलेली अपत्ये पाहून कलामांचे मन हेलावले. आता या मुलांकडे कोण पाहणार, असा प्रश्न एका मातेने विचारताच ते नि:शब्द झाले. ते शब्द आजही आठवले की काही सुचत नाही, असे ते लिहितात. या मोहिमेचा प्रमुख या नात्याने या तरुण वैज्ञानिकांच्या मृत्यूने अपराधीपणाची भावना निर्माण झाल्याची कबुली त्यांनी दिली आहे.
विक्रम साराभाईंसारख्या दूरदृष्टी असलेल्या व्यक्तिमत्त्वाच्या संपर्कात आल्यानेच आयुष्यात कीर्ती मिळवू शकलो हेही त्यांनी कृतज्ञतेने सांगितले. अणुऊर्जा आयोगातील नोकरीसाठी घेतलेली मुलाखत कलाम यांच्या आयुष्याला कलाटणी देऊन गेली. थुंबा येथे १९६२ मध्ये साराभाई यांनी प्रतिकूल परिस्थितीत कसे अंतरिक्ष संशोधन केंद्र सुरू केले याची रोचक माहिती दिली आहे. साराभाई तरुण वैज्ञानिकांशी संवाद साधायचे, त्यांचे म्हणणे ऐकून घ्यायचे. हा साराभाईंचा मोठेपणा कलाम यांनी नमूद केला आहे. योग्य कामासाठी योग्य व्यक्ती हेरण्याचे साराभाईंकडे कसब होते, हे कलामांनी अभिमानाने सांगितले आहे.
एखादा प्रकल्प हाती घेतल्यावर कोणत्याही लोकशाही देशात सत्ताधारी किंवा संबंधित खात्याच्या मंत्र्यांची साथ कशी गरजेची असते याचे एक उदाहरणही कलामांनी दिले आहे. अशा वेळी पदावर असलेल्या व्यक्तीला दूरदृष्टी असेल तर ठीक, अन्यथा राजकीय हस्तक्षेपामुळे एखादा प्रकल्प अर्धवट सोडल्यास पैसे तर वाया जातातच वर देशाचेही नुकसान होते. तत्कालीन संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्ण मेनन यांच्यानंतर एक प्रकल्प कसा गुंडाळला याची हकिकत त्यासंदर्भात पुरेशी बोलकी आहे. अग्निबाण संशोधन हा व्यवसाय किंवा चरितार्थाचे साधन न मानता तो ध्येय आणि धर्म मानून कलाम यांनी वाटचाल केली. पुढे राष्ट्रपतिपदासारखे सर्वोच्च पद भूषवताना २०२० पर्यंत भारत महासत्तांच्या पंक्तीत कसा जाऊन बसेल हेच ध्येय कलाम यांनी पाहिले. त्यासाठी सतत संवाद साधला. त्याच प्रवासाची ही रोचक कहाणी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा