सद्गुरूंच्या इच्छेनुरूप आम्ही घडावं, त्यांच्या बोधानुरूप आम्ही आचरण करावं, ही त्यांची खरी सेवा आहे. अहो, आपल्या आजूबाजूला दिसतं ना, की आई मुलाच्या हिताचं सांगत असते, पण त्याला ते पटत नसतं. तो हट्ट करत असतो, आपल्या मनासारखं वागायचा प्रयत्न करत असतो. आई समजावते, नाही तर शेवटी धपाटा घालते. तेव्हा जे खऱ्या हिताचं आहे ते मुलानं पटकन ऐकलं आणि तसा तो वागला तर समजावण्याचे किती श्रम वाचतील, आयांना किती आनंद वाटेल! फरक एकच, सद्गुरूंची समजावण्याची, वाट पाहण्याची क्षमता फार मोठी आहे. अनंत जन्म ते ही प्रक्रिया करूनही थांबत नाहीत. मग ते जसं सांगतील, तसं वागणं, ही त्यांची सेवा आहे. आता पुढची पायरी. ते ज्या स्थितीत मला ठेवतील, त्या स्थितीत राहूनही त्यांच्या बोधानुरूप जगण्याचा प्रयत्न करणं. पहा बरं, इथे स्थिती अनुकूल असो वा प्रतिकूल असो, मला त्यांची सेवा करायची आहे, त्यांच्या सांगण्यानुरूपच जगायचं आहे. माझी स्वत:ची इच्छा उरलेली नाही, माझ्यात अहंचा वासही नाही. अशी ही स्थिती. नाथांची की माउलींची उपमा आहे, कोणाची ते नेमकं आठवत नाही. फार सुरेख उपमा आहे. ते काय म्हणतात? कठपुतळीचा खेळ असतो ना? त्यात एक बाहुला राजा असतो आणि एक बाहुली राणी असते. तो खेळ बघण्यात लोक कसे दंग होऊन जातात. तो राजा आणि ती राणी हसतात, नाचतात, उडय़ा मारतात. प्रत्यक्षात त्या बाहुल्यांच्या आतमध्ये तो ‘राजाभाव’ किंवा ‘राणीभाव’ असतो का? ‘पुरुषभाव’ किंवा ‘स्त्रीभाव’ असतो का हो? आम्ही तो आरोपित करून त्यांना राजा आणि राणी मानतो. हसताना, रडताना, उडय़ा मारताना, नाचताना त्यांना पाहतो. प्रत्यक्षात त्यांच्या आत काहीच भाव नसतो. नाचवणारा जसा नाचवील, तशा त्या बाहुल्या नाचतात. ‘मला असंच का नाचवलं,’ अशी खंतही त्यांच्या मनात नसते. अगदी त्याप्रमाणे सद्गुरूंच्या हातची मी कठपुतळी आहे, ते जिथे ठेवतील तिथे मी राहीन. जसं नाचवतील, म्हणजे जे काही करायला सांगतील, ते करीन. हा भाव म्हणजेच खरा ‘प्रणिपात’ आहे हो! आपण शब्द वापरतो, पण त्यांचा खरा भाव जाणत नाही. स्वामी स्वरूपानंद ‘श्रीमत् संजीवनी गाथे’त (अभंग ११३) म्हणतात : खेळविसी तैसा खेळेन साचार। तूं चि सूत्र-धार बाहुलें मी।। १।। देवा तूं चि धनी मी तुझा चाकर। तुझा चि आधार मजलागीं।। २।। बोलविसी तैसें बोलेन वचन। मज अभिमान कासयाचा।। ३।। काया वाचा मन तुझ्या चि आधीन। तुझ्या पायीं लीन स्वामी म्हणे।। ४।। हे सद्गुरूदेवा, तू सूत्रधार आहेस, कठपुतळीचे दोर तुझ्या हाती आहेत आणि मी कठपुतळी आहे. तू धनी आहेस, मी चाकर आहे. तुझ्याशिवाय मला अन्य आधार नाही. अभिमान असेल तर ‘मी’भावानं ऊर्मी उठते आणि त्यानुरूप बोलणं-चालणं होतं. माझ्या अंत:करणात तुझ्याशिवाय दुसरा विषयच नाही. त्यामुळे तू बोलवशील तसं मी बोलतो. माझी काया, वाचा, मन ‘कायेनवाचामनसैंद्रियेवा’ हे सारं तुझ्या आधीन आहे. मी तुझ्या पायी लीन आहे. हा खरा प्रणिपात आहे!
२१२. खरा प्रणिपात
सद्गुरूंच्या इच्छेनुरूप आम्ही घडावं, त्यांच्या बोधानुरूप आम्ही आचरण करावं, ही त्यांची खरी सेवा आहे. अहो, आपल्या आजूबाजूला दिसतं ना, की आई मुलाच्या हिताचं सांगत असते, पण त्याला ते पटत नसतं.
First published on: 29-10-2014 at 12:26 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: My own desire