प्रेरणा, मानसिकता आणि ताणाचा यशावर नेमका कसा परिणाम होतो, याचा आलेख डेरेक ओ ब्रायन संपादित ‘माय वे : सक्सेस मंत्राज ऑफ १२ अचीव्हर्स’ या पुस्तकातून जाणून घेता येतो.
या पुस्तकात अभिनव बिंद्रा, अकिओ मोरिता, अँड्रय़ू कार्नेगी, ए.पी.जे अब्दुल कलाम, अझीम प्रेमजी, देवी शेट्टी, डोनाल्ड ट्रम्प, लिएंडर पेस, एम. एस. धोनी, एन. आर. नारायण मूर्ती, सायना नेहवाल आणि सल खान अशा विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांचा समावेश आहे. या सर्व व्यक्तींमधील एक समान दुवा म्हणजे त्यांच्या कामगिरीतील सातत्यपूर्ण सुधारणा अर्थात एक्सलन्स साधण्याची त्यांची तयारी आणि ते साधण्याचे त्यांचे अंगभूत कसब!
नारायण मूर्ती यांनी इन्फोसिस ही अब्जावधी रुपयांची कंपनी आकारास येताना घडलेल्या काही महत्त्वाच्या घडामोडी विशद केल्या आहेत, तर इतिहासातील सर्वाधिक वित्तीय उलाढालीसाठी १९९०मध्ये ‘गिनिज बुका’त नोंद झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी करिअरला अत्यंत हादरा बसला तरीही तसूभरही न ढळलेल्या आत्मविश्वासामुळे आपण अपयशाचा अडथळा पार केला, हे सांगितले आहे. विजेता होण्यासाठी शारीरिक आणि मानसिक घडण महत्त्वाची कशी ठरते, हे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेन्द्रसिंग धोनी यांनी स्पष्ट केले आहे. मदर टेरेसा यांच्याकडून शिकलेले कठोर वाटाघाटी आणि स्पर्धात्मकतेचे (व्यापारविषयक कौशल्ये) धडे याबाबत डेरेक ओ ब्रायन यांनी लिहिले आहे.
एकात्मकता, दूरदृष्टी, यश संपादन करण्याची तयारी, आसक्ती अशा विविध गोष्टींना असणारे मूल्य आणि महत्त्व या पुस्तकातील प्रत्येक व्यक्तीच्या विचारांतून अधोरेखित झाले आहे. यशाच्या मागे दडलेल्या विविध गोष्टींची माहिती स्वारस्यपूर्ण तर आहेच, त्याचबरोबर स्फूर्ती जागवणारीही आहे.
आज ज्या व्यक्ती अत्यंत यशस्वी ठरल्या आहेत, त्यांचा हा प्रवास अत्यंत सुकर, न अडखळता झाला, असे नाही. जगभरात अत्यंत यशस्वी ठरलेल्या व्यक्तींना त्यांच्या आयुष्याच्या पहिल्या ३० वर्षांत त्यांनी अनुभवलेल्या अपयशाचा परिचयही आपल्याला होतो. एखाद्या मोठय़ा प्रवासाच्या सुरुवातीला आलेले अपयश तुम्हाला शारीरिकदृष्टय़ा आणि मानसिकदृष्टय़ा त्यातून बाहेर पडण्यासाठी अवधी कसा देते आणि तरुणपणी अपयशातून पुन्हा उसळी मारून वर येणे तुलनेने सोपे असल्याने आवश्यक ते बदल करत पुढे सरकणे कसे महत्त्वाचे, याचे धडेही या पुस्तकातून मिळतात.
यशाचा संबंध आपण सहजतेने बुद्धीशी, अभ्यासातील मिळकतीशी आणि कष्टाशी लावतो. हे खरे आहे, पण काही अंशीच. अझीम प्रेमजी यांनी यश संपादन करण्यासंदर्भात म्हटलंय की ‘स्वप्नांचा पाठलाग करण्याच्या आसक्तीने- कामातील सातत्याने जादू घडते,’ तर ‘यशाची मूळं ही अनुभवात दडलेली असतात,’ ती कशी हे डोनाल्ड ट्रम्प यांनी उलगडून सांगितले आहे. यशाच्या बांधणीबद्दल लिहिताना त्यांनी अत्यंत रसातळाचा बिंदू, टर्निग पॉइंट आणि अपयश हे कसे कायमस्वरूपी नसते, हे स्पष्ट केले आहे. तर यश मिळण्यासाठी चिकित्सक मेंदू आणि इतरांशी हृद्य वागणं अत्यावश्यक असतं, असं डॉ. देवी शेट्टी सांगतात. ‘जर तुम्ही विजय आणि दु:ख हाताळू शकता आणि या दोन्हीही बाजूंना सारखीच वर्तणूक देता, तर मग चला तर जगण्याचा खेळ खेळूया.. आणि अत्यंत उमेदीने खेळूया,’ असं लिएंडर पेस सांगून जातो. अभिनव बिंद्रा यांच्या मते, ‘जिंकणं हे महत्त्वाचं आहे, पण प्रवास हा अधिक अर्थपूर्ण असतो. आपल्या मर्यादांच्या पलीकडे झेपावण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणं आणि मी जिंकू शकत नाही, या आपल्यातल्याच एक आवाजाला सारखं आव्हान देत राहणं.. हा प्रवास एन्जॉय करायला हवा.’
युद्धाने बेचिराख झालेल्या टोकियोमध्ये मोरिता यांनी रेडिओ दुरुस्तीचे दुकान घेऊन त्याचे रूपांतर बलाढय़ सोनी कॉर्पोरेशनमध्ये कालांतराने केले. ‘इच्छाशक्तीतूनच यश मिळते,’ असे मोरिता यांचे सांगणे आहे. जर तुम्हाला आनंदी व्हायचं असेल तर उद्दिष्ट ठरवा जे तुमच्या विचारांचे नियमन करेल, तुमची शक्ती मुक्त करेल आणि तुमच्या आशेला प्रेरित करेल, असं अॅण्ड्रय़ू कार्नेगी यांचं सांगणं आहे.
ए.पी.जे. अब्दुल कलाम म्हणतात, ‘जोपर्यंत तुमच्याकडे साध्य करण्याजोगे स्वप्न असते, तोपर्यंत समस्येला तुमच्यावर स्वार होऊ न देण्याची क्षमता तुमच्यात असते. मला अपयश मिळालं, म्हणूनच मी यशस्वी झालो..’ बँडमिंटनपटू सायना नेहवाल हिने ‘यश हे कष्टातून साध्य होते. अपयशातून परत उभे राहणे आणि प्रयत्न करत राहिल्यानेच यशप्राप्ती होते,’ असे म्हटले आहे.
सल खान यांनी २००६ साली सुरू केलेली खान अॅकेडमी ही ‘ना नफा’ तत्त्वावर सुरू केलेली ऑनलाइन एज्युकेशनल वेबसाइट आहे. या वेबसाइटचे एक कोटीहून अधिक ग्राहक आहेत. खान सांगतात- ‘पैसा आणि पत यांची गल्लत करू नका. सुरक्षितपणे साहस करा. विचारांमध्ये प्रायोगिकता असू द्या.’
अशा यशाच्या अनेक व्याख्या हे पुस्तक वाचताना आपल्या मनात तयार होतात. प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्यातरी संदर्भात अपयशी ठरत असतो, मात्र जी व्यक्ती अपयशाला वेगळ्या पद्धतीने सामोरी जाते ती अंतिमत: यशस्वी ठरते, हे या पुस्तकातून सुस्पष्ट होते.
*माय वे- सक्सेस मंत्राज ऑफ १२ अचीव्हर्स : संपादन – डेरेक ओ ब्रायन, रूपा पब्लिकेशन, नवी दिल्ली, पाने : १४२, किंमत : १९५ रुपये.
कशासाठी? यशासाठी..
प्रेरणा, मानसिकता आणि ताणाचा यशावर नेमका कसा परिणाम होतो, याचा आलेख डेरेक ओ ब्रायन संपादित ‘माय वे : सक्सेस मंत्राज ऑफ १२ अचीव्हर्स’ या पुस्तकातून जाणून घेता येतो.
First published on: 28-06-2014 at 01:05 IST
मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: My way success mantras from 12 achievers