केवळ महाश्वेतादेवी यांचा मुलगा एवढीच नभारुण यांची ओळख नव्हती. ते एक समर्थ कादंबरीकार-कवीही होते. त्यांच्या जादूई वास्तववादाने बंगाली आणि भारतीय वाचकांच्या मनाची पकड घेतली होती.
नभारुण भट्टाचार्य हे बंगालमधील प्रसिद्ध लेखक. त्यांच्या ‘हर्बर्ट’ कादंबरीला १९९७ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. योगायोगामुळे त्यांची भेट झाली. नभारुण यांचा मुलगा तथागत आणि निलंजना दिल्लीत राहतात. व्यावसायिक कारणांसाठी माझा निलंजना यांच्याशी अनेकदा संपर्क होत असे. एक दिवस तिचा फोन आला की, तिचे सासरे नभारुणजी यांच्यावर टाटा इस्पितळात कॅन्सरवर उपचार होत आहेत. काही महिने त्यांना मुंबईत राहावे लागणार आहे. तेव्हा मुंबईत त्यांच्यासाठी फ्लॅट शोधण्याचे काम माझ्यावर आले. काही काळ नभारुणजी कॉटनग्रीनच्या एका हॉटेलमध्ये आपल्या पत्नीसह राहात होते. पांढरा झब्बा-लेंगा, करडय़ा पांढऱ्या रंगाची दाढी आणि केस, बारीक शरीरयष्टी यामुळे ते लेखक-कवीच्या पारंपरिक चित्रात फिट बसणारे होते. मुंबईत त्यांना फारसे मित्र किंवा नातेवाईक नव्हते. त्यामुळे मी आणि माझा पूर्वीचा सहकारी अमित कुंभार त्यांना भेटायला गेल्यावर त्यांना बराच आनंद झाला. परेलहून कॉटनग्रीन जवळ होते म्हणून त्यांनी चर्चगेटला असलेला मुक्काम इथे हलवला होता. तो हलवताना अमितने त्यांना बरीच मदत केली. ते बराच वेळ वाचन आणि टीव्ही बघण्यात घालवत. कलकत्त्यात त्यांना रेडिओ ऐकायची सवय होती. त्यामुळे त्यांनी अमितला एक रेडिओ विकत आणायला सांगितला.
नभारुणजी एकेकाळी कडवे कम्युनिस्ट होते आणि डाव्या विचारसरणीवरचे त्यांचे प्रेमही कायम होते. त्यामुळे त्यांनी कॉटनग्रीनच्या कोपऱ्यावर असलेले भाकपचे कार्यालयसुद्धा शोधून काढले. त्यांच्याशी होणाऱ्या गप्पांतून सतत कलकत्त्यातील साहित्यिक जग, सिनेमा सृष्टी, नाटक यांबद्दल ऐकायला मिळायचे. त्यांची आई महाश्वेतादेवी यांच्याप्रमाणे त्यांच्या आयुष्याचा बराचसा भाग सिनेसृष्टीत गेल्याने त्यांनी सिनेमाचे मायावी जग जवळून पाहिले होते. त्यांचे वडील बिजोन भट्टाचार्य राज कपूरसाठी लिहीत असल्याने पन्नासच्या दशकात काही काळ ते मुंबईत राहिले होते. ‘धरती के लाल’ या प्रसिद्ध चित्रपटाचे ते सहलेखक आहेत. त्या वेळच्या गोष्टी ते सांगत तेव्हा मी त्यांना म्हटलं, तुम्ही हे सगळे लिहायला हवे. त्यांना असलेला कॅन्सर बराच पुढच्या स्टेजचा होता, पण जगण्याबद्दल ते बरेच आशावादी होते. एकेकाळी कलंदर लेखक-कवीप्रमाणे सिगारेट-दारूपायी आपली प्रकृती बिघडवली, याची खंतही त्यांना जाणवे. बरेचसे पथ्य असल्याने त्यांना साधे जेवण जेवावे लागे. पण कुठल्याही बंगाली माणसाप्रमाणे त्यांनी मुंबईत आल्यावर चांगले मासे कुठे मिळतात याची चौकशी केली. ते राहात होते त्या हॉटेलातही मासे चांगले मिळायचे. त्यांचा मुलगा तथागत नंतर हॉटेलात राहायला आल्यावर आम्ही एकत्र जेवण केले. या दोघांच्याही बोलण्यात ऋत्विक घटक यांच्या सहवासाबद्दलचे उल्लेख येत.
नभारुण यांची ‘हर्बर्ट’ कादंबरी ही बरीचशी लॅटिन अमेरिकन धाटणीची आहे. तिचा नायक हर्बर्ट हा मृत माणसांचे संदेश त्यांच्या प्रियजनांकडे पोचवण्याचा उद्योग करत असतो, पण अंधश्रद्धाविरोधी संघटना त्याच्या मागे लागतात. रात्री मित्रांसोबत भरपूर दारू पिऊन नंतर हर्बर्ट आत्महत्या करतो. त्याचे दहन करताना विद्युतदाहिनीत स्फोट होतो. या कादंबरीचे कौतुक ‘नवी वाट चोखाळणारी कादंबरी’ म्हणून झाले. २००५ मध्ये तिच्यावर सिनेमाही निघाला. सुमन मुखोपाध्याय यांनी तो दिग्दर्शित केला. त्याचेही बरेच कौतुक झाले.
मुंबईत फ्लॅट शोधणे ही किती कठीण गोष्ट आहे हे त्यांच्याबरोबर फिरताना लक्षात यायचे. आजारी माणसाला फ्लॅट द्यायला घरमालक नाखूश असत. शिवाय फ्रीज-फर्निचर, टीव्ही असलेला फ्लॅट हवा होता. असा एक फ्लॅट आम्ही बुक केला. दरम्यान, एकदा आम्ही लोअर परळला असलेल्या मॉलमध्ये जाऊन प्रभाकर बर्वे यांचे प्रदर्शनही पाहिले. तिथेच बर्वेच्या ‘कोरा कॅनव्हास’च्या इंग्रजी प्रती ठेवलेल्या होत्या. त्यातील काही पाने वाचून ते म्हणाले, ‘क्रिएटिव्ह प्रोसेसबद्दल लिहिणे अतिशय कठीण असते. बर्वे यांना ते साधले आहे.’ मराठी लेखकांबद्दल आणि मराठी लेखनाबद्दल ते आस्थेने चौकशी करत. वरेरकरांपासून अशोक शहाणेपर्यंत असलेल्या मराठी बंगाली नात्याबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यांना बरे वाटलेले दिसले.
   अगदी काल-परवापर्यंत भट्टाचार्य स्वत:चे नियतकालिक प्रसिद्ध करत. बराच काळ त्यांनी ‘सोव्हिएत लॅण्ड’ मासिकासाठी काम केले. हे मासिक अनेक भाषांतून प्रसिद्ध होते. त्याच्या बंगाली आवृत्तीसाठी ते काम करत. कदाचित तेव्हाच्या सवयीमुळे असेल ते रशियन चॅनेल पाहात. त्यांचा रशियन भाषेशी थोडा परिचयही होता. अलीकडे ते अद्वैत तत्त्वज्ञान वाचत होते. कोझीन्स्कीचा किंग लिअर त्यांना पाहायचा होता. एखादा महिना असा गेल्यानंतर फ्लॅट पसंत करून त्याची कागदपत्रे पूर्ण केली. तितक्यात अचानक मुंबईत राहायचे नाही असा त्यांचा निर्णय झाला. ते दिल्लीला गेल्यावर कधीमधी फोनवर बोलणे व्हायचे. त्यांच्याकडून काही पुस्तके मिळतील, अशी मला आशा होती.. पण त्यानंतर बातमी आली ती त्यांच्या मृत्यूचीच.

Story img Loader