हिमालयातील एका शिखरास पुण्याच्या विद्या व्हॅली स्कूलच्या प्राचार्या असलेल्या गिर्यारोहक नलिनी सेनगुप्ता यांचे नाव दिले जाणार आहे. जेव्हा त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल तेव्हा हे शिखर ‘माऊंट नलिनी’ नावाने ओळखले जाईल. एखाद्या शिखरास आपले नाव हे काही सहजासहजी मिळत नसते, तर त्याची एक विशिष्ट पद्धत आहे. शिवाय त्याला दोन संस्थांची मान्यता लागते, त्या म्हणजे ‘सव्र्हे ऑफ इंडिया’ व ‘द इंडियन माऊंटेनीअरिंग फाऊंडेशन’. पुण्याच्या गिरिप्रेमी या संस्थेने नलिनी सेनगुप्ता यांचे नाव ५२६० क्रमांकाच्या शिखराला देण्याची शिफारस करताना समन्वयक उमेश झिरपे यांनी दाखवलेली कल्पकताही महत्त्वाची आहे. कारण त्यामुळे अधिकाधिक तरुण-तरुणींना या क्षेत्राकडे वळण्याची प्रेरणाही मिळणार आहे. ५२६० क्रमांकाचे शिखर पहिल्यांदा सर करण्याच्या गिरिप्रेमींच्या मोहिमेत ज्यांनी ४० जणांच्या पथकासह भाग घेऊन साहस दाखवले त्या नलिनी सेनगुप्ता यांचे नाव संबंधित शिखराला देणे हा त्यांच्या या क्षेत्रातील कार्याचा गौरव आहे.
गिर्यारोहण हा केवळ छंद म्हणून त्यांनी पहिल्यांदा जोपासला, पण नंतर ती त्यांची कर्तृत्वभूमीच बनली. ज्या काळात गिर्यारोहण हा शब्दच भारतीयांना माहीत नव्हता, तेव्हापासून म्हणजे १९७० पासून अनेक वर्षे त्या अशा साहसी मोहिमांत सहभागी होत आहेत. सेनगुप्ता यांनी त्यांच्या शाळेतही गिर्यारोहणासाठी एक ट्रेकिंग क्लब स्थापन केला आहे. पैशाची व साधनांची कमतरता असतानाही त्यांनी मोठय़ा हिमतीने गिर्यारोहणात नाव कमावले आहे. नेहरू इन्स्टिटय़ूट ऑफ माऊंटेनीअरिंग या उत्तर काशीतील संस्थेचा गिर्यारोहणाचा मूलभूत अभ्यासक्रम त्यांनी पहिल्यांदा पूर्ण केला. नंतर तीस छात्रांच्या संघाला प्रशिक्षण देण्यासाठी त्यांची निवड झाली. त्यानंतर त्यांची गिर्यारोहणाची आवड वाढतच गेली. नलिनी सेनगुप्ता यांनी त्यांचे नाव हिमालयातील एका शिखराला देण्याच्या या शिफारशीबाबत आनंदच व्यक्त केला आहे. प्रथम थोडे अवघडल्यासारखे वाटले, पण नंतर आनंदच वाटला असे त्या नम्रपणे सांगतात. या सन्मानानंतर त्या हिमालयाच्या बेस कॅम्पपर्यंत जाणार आहेत. आता वय झाल्याने परत त्या शिखरावर जाणे अवघड आहे, पण दुरूनच हा सन्मान मिळवून देणाऱ्या शिखराला त्या सलाम करणार आहेत. मूळ दार्जिलिंगच्या असलेल्या नलिनी सेनगुप्ता आता पुण्यात स्थायिक आहेत, पण गिर्यारोहण त्यांच्या रक्तातच आहे. त्या लष्करात सेवा करणाऱ्या कुटुंबातील असल्याने साहसही त्यांच्या अंगी आहे. त्यांचा मुलगा व मुलीनेही आईचा वारसा पुढे चालवला आहे. त्यांच्या मुलाने अलीकडेच मांचू-पिचू व किलिमांजारो या मोहिमा पूर्ण केल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा