उद्योगमंत्री नारायण राणे यांचे स्वाभिमानी सुपुत्र नीतेश राणे यांनी गोव्यातील टोलनाक्यावर केलेला हाणामारीचा उद्योग हा केवळ मंत्रिपुत्राची गुंडगिरी एवढय़ापुरता मर्यादित विषय नाही, तर ती राज्याच्या राजकीय संस्कृतीशी निगडित अशी बाब आहे. मस्तवाल राजकीय नेते, त्यांचे दिवटे चिरंजीव आणि टुकार कार्यकर्ते यांनी कायदा हातात घेण्याच्या, सर्वसामान्य नागरिकांना, कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना मारहाण करण्याच्या अनेक घटना महाराष्ट्राने आजवर पाहिल्या आहेत. अशा प्रकारच्या गुंडगिरीने सर्वच राजकीय पक्षांचे हात बरबटलेले आहेत. तेव्हा याबाबत तरी पक्षापक्षांमध्ये भेदाभेद करता येणार नाही. किंबहुना सर्वच पक्षांनी अशा प्रकारच्या वर्तणुकीला प्रोत्साहन दिले आहे आणि त्या प्रत्येक वेळी त्या कृत्यावर लोकहिताचे म्हणून पांघरूण घालण्याचे प्रयत्न केले आहेत. आम्ही अधिकाऱ्यांना मारहाण केली, कारण तो जनतेचे काम करीत नाही. आम्ही टोलनाक्यावर तोडफोड केली, कारण तेथे भरमसाट पथकर आकारला जातो. असे हे सर्व चाललेले असते. एकंदर राडेबाजी म्हणजेच जनहिताची कामे असे एक विकृत समीकरण महाराष्ट्रात निर्माण करण्यात आले आहे. याचा पाया कम्युनिस्टांच्या कामगार संघटना आणि त्यानंतर शिवसेनेने रचला. ते कळसाला नेण्याचे काम आज सगळेच राजकीय पक्ष समरसून करीत आहेत. या प्रकारची राजकीय गुंडगिरी वाढण्याचे कारण बऱ्याच अंशी आजच्या राजकीय पक्षांच्या रचना आणि स्वरूपातही आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असो वा भाजप किंवा शिवसेना, हे सगळे पक्ष आज कमालीचे व्यक्तिकेंद्री बनले आहेत. निवडून येण्याच्या अशा सर्व क्षमता असलेले बाहुबली नेते त्या त्या मतदारसंघातील संस्थानिक आणि राजकीय पक्ष म्हणजे अशा विविध संस्थानिकांचे ‘फेडरेशन’ असा हा सगळा प्रकार आहे. त्यामुळे आपण लोकप्रतिनिधी किंवा जनसेवक आहोत, ही भावनाच नष्ट झाली असून, आपण म्हणजे महाराजे असा बहुसंख्य नेत्यांचा समज झालेला आहे. हे राज्य आमचे वा आमच्या पिताश्रींचे. तेव्हा येथे आम्हांस सारे सवलतीत, जमल्यास फुकटच मिळाले पाहिजे, अशी हक्कभावना या नव्या महाराजांमध्ये रुजलेली आहे. अशा परिस्थितीत टोलनाक्यावर फडतूस पथकर भरावा लागणे ही त्यांच्या स्वाभिमानास लागलेली भलीमोठी ठेचच ठरते. म्हणजे एसटीच्या गाडय़ांना पथकर भरावा लागला तर त्यास त्यांची हरकत नसते. त्यांच्या चारचाकी वाहनांना त्यासाठी थांबावे लागले, तर त्याने मात्र त्यांना अपमानाच्या इंगळ्या डसतात. राणेपुत्राने टोलनाक्यावर घातलेला धुडगूस ही त्या स्वाभिमानभंगाची प्रतिक्रिया होती. ती साधी गुंडगिरी म्हणून सोडून देता येणार नाही. ते राजकीय सत्तेचा मद चढल्याचे लक्षण आहे आणि म्हणून ते अधिक घातक आहे. तो मद उतरविण्यास कायदे समर्थ आहेत. त्यांची अंमलबजावणी तेवढी नीट झाली पाहिजे. राणे यांना गोवा पोलिसांनी अटक केली. ही कारवाई भाजपने राजकीय आकसातून केली असल्याचा कांगावा राणे कंपनीकडून करण्यात येत आहे. यास शुद्ध मराठीत ‘उलटय़ा बोंबा’ असे म्हटले जाते. हा प्रकारही आजच्या राजकीय संस्कृतीचा अविभाज्य भाग झालेला आहे. कायदे आणि नियम हे आपल्यासाठी नाहीच, असे मानण्याची जी प्रवृत्ती महाराष्ट्राच्या राजकारणात बोकाळली आहे, तिच्यामुळेच राजकीय टोळीकरणाला वाव मिळत आहे.

Story img Loader