भारतीय उद्योगक्षेत्र अजूनही भारताच्या म्हणून ज्या सांस्कृतिक मर्यादा असतात त्यावर मात करू शकलेले नाही, हे इन्फोसिसमधील नारायण मूर्ती यांचे पुनरागमन आणि त्यांचे चिरंजीव रोहन यांचे आरोहण या निमित्ताने दिसले.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने भारतात संपत्तीचे लोकशाहीकरण केले. या क्षेत्राच्या उदयाआधी भारतात संपत्तिनिर्मितीचे अधिकार काही उद्योग घराण्यांपुरतेच मर्यादित होते आणि त्यांच्यात्यांच्यातील रोटीबेटी व्यवहाराने लक्ष्मी त्यांच्यात्यांच्यातच फिरत होती. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा उदय झाला आणि अनेक नवनवीन उद्योग आकारास आले. छोटे उद्योग म्हणून स्थापन झालेल्या अनेक कंपन्यांनी या क्षेत्रात मोठे होऊन अर्थविकासाच्या नवनव्या वाटा दाखवल्या. यातील सर्वात मोठे नाव म्हणजे इन्फोसिस. नारायण मूर्ती, नंदन निलेकणी, गोपालकृष्णन आदी तरुणांनी पुण्यात लावलेले हे रोपटे पुढे सर्वार्थाने गगनावर गेले आणि भारतीय उद्योगजगताचा डंका त्यामुळे जगभर पिटला गेला. त्यात या कंपनीचे प्रवर्तक नारायण मूर्ती यांचे सात्त्विक वागणे हे पारंपरिक उद्योगपतींच्या बनेलपणावर उठून दिसले आणि आपल्यातलाच एक इतका मोठा उद्योगपती होऊ शकला यामुळे मध्यमवर्गीयांनाही आनंद झाला. ते सर्वच योग्य होते. इन्फोसिसने इतिहास घडवला आणि तेलकट तुपकट लाचार उद्योगजगतास प्रसन्न चेहरा दिला. या कंपनीचा बंगलोर येथील परिसर हा विकासाभिमुख स्वप्निल भारताचे तीर्थस्थान बनला. परंतु तीर्थस्थानांचे म्हणून सुद्धा एक फायद्यातोटय़ाचे चक्र असते. तेव्हा इन्फोसिससारख्या मर्त्य मानवांच्या कंपनीस त्यातून जावे लागत असल्यास आश्चर्य वाटायचे कारण नाही. कोणाही कर्तृत्ववानाचे मोजमाप प्रतिकूल काळातच होत असते. त्या अर्थाने सध्याचा काळ हा इन्फोसिसच्या नेतृत्व कसोटीचा होता. परंतु कंपनीने शनिवारी जे काही निर्णय घेतले त्यावरून या कसोटीस इन्फोसिसचे नेतृत्व उतरले असे म्हणता येणार नाही. कंपनीचा डळमळता डोलारा सावरण्यासाठी नवीन, कल्पक काही करून दाखवण्याऐवजी इन्फोसिसने जुन्या गल्लाभरू कुटुंबवत्सल कंपन्यांचाच मार्ग चोखाळला आणि कंपनीचे प्रवर्तक म्हणून नारायण मूर्ती यांनीही इन्फोसिस संकटात असल्याचे कारण दाखवीत आपली संन्याशाची वस्त्रे वानप्रस्थाश्रमातच सोडून पुन्हा एकदा मैदानात उडी घेतली. हे सगळे इन्फोसिस आणि खुद्द मूर्ती यांच्याविषयी आदर वाढवणारे आहे, असे म्हणता येणार नाही. यामुळे भारतीय उद्योगांच्या दीर्घकालीन क्षमतेविषयी, जागतिकीकरणात टिकून राहण्याच्या ताकदीविषयी शंका निर्माण करणारे आहे.
उच्च आर्थिक आणि व्यावसायिक मूल्यांचा घोष नारायण मूर्ती यांनी आयुष्यभर केला. अशी मूल्ये पाळणाऱ्यांचे आदर्श या नात्यानेच मूर्ती यांच्याकडे पाहिले गेले आणि त्याच आधारावर त्यांचे प्रतिमासंवर्धन झाले. परंतु हे मूर्ती आपलीच तत्त्वे पायदळी तुडवताना दिसतात. या त्यांच्या मूल्यपालनात दोन मुद्दे महत्त्वाचे होते. एक निवृत्तीचे वय आणि दुसरे म्हणजे घराणेशाही. वयाची पासष्टी झाल्यानंतर आपण कंपनीत कार्यकारी भूमिका बजावणार नाही आणि घराणेशाही तयार होऊ देणार नाही, असे मूर्ती सांगत. आता हे दोन्ही होणार आहे. गेल्या आठ तिमाहींत इन्फोसिसची कामगिरी वाईट झालेली आहे. भांडवली बाजारात जवळपास १२ टक्क्यांनी इन्फोसिसचे समभाग घसरलेले आहेत आणि कंपनीतील बडे गुंतवणूकदार कंपनीच्या दिशाहीनतेबाबत प्रश्न निर्माण करू लागले आहेत. अशा संकट काळात नवीन नेतृत्व घडवण्याऐवजी या कंपनीने पारंपरिक भारतीय उद्योग घराण्यांचाच मार्ग चोखाळला आणि नारायण मूर्ती यांना पाचारण केले. हे पुनरागमन करताना कंपनीने दोन आक्षेपार्ह गोष्टी केल्या. कंपनीच्या संचालकांना कार्यकारी पदावर राहण्याची वयोमर्यादा थेट ७५ इतकी वाढवली आणि मूर्ती यांचे सुविद्य चिरंजीव रोहन यांना कंपनीत वरिष्ठ पदावर नियुक्त केले. आता नारायण मूर्ती हे कंपनीचे अध्यक्ष होतील आणि रोहन त्यांचे मुख्य कार्यकारी साहाय्यक होतील. रोहन हे उच्चविद्याविभूषित आहेत आणि मायक्रोसॉफ्ट आदी कंपन्यांतील कामाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांच्या नेमणुकीचे समर्थन करताना थोरले मूर्ती म्हणाले की त्यांना तरुणांशी संवाद साधण्याची गरज वाटत होती म्हणून त्यांनी रोहन यांना मदतीस घेतले. त्यांच्या मते ही नेमणूक फक्त पाच वर्षांसाठीच आहे आणि रोहन यांना काहीही प्रशासकीय अधिकार देण्यात आलेले नाहीत. परंतु प्रश्न असा की रोहन यांच्याखेरीज अन्य कोणी उच्चविद्याविभूषित आणि लायक तरुण नारायण मूर्ती यांना मिळाला नाही काय? तरुणांशी संवाद साधण्याची, त्यांच्या नजरेतून कंपनी चालवण्याची गरज फक्त चिरंजीवाशीच संवाद साधून पूर्ण होईल असे थोरले मूर्ती यांना वाटते काय? रोहन यांच्याकडे प्रशासकीय अधिकार नाहीत हे कबूल. ते अधिकृतपणे देण्याची गरजही नाही. कारण रोहन हे नारायण मूर्ती यांचे सुपुत्र आहेत ही एकच बाब त्यांना हवे ते अधिकार मिळण्यासाठी पुरेशी आहे. तेव्हा रोहन मूर्ती यांनी एक रुपया मानधन घेतले काय किंवा फुकट काम केले काय, तो देखावाच राहतो. रोहन हे तीर्थरूपांच्या कार्यालयाचे नेतृत्व करणार आहेत. तेव्हा त्यांच्याकडून आलेली सूचना वा विनंती ही कोणत्याही प्रशासकीय अधिकाराशिवायदेखील अन्य कर्मचाऱ्यांसाठी शिरसावंद्य असेल, हे उघड आहे. तेव्हा चि. रोहन यांना प्रशासकीय अधिकार नाहीत हा दावा दांभिकपणाचा झाला आणि तो मूर्ती यांच्याकडून अपेक्षित नाही. कंपनीचे विद्यमान प्रमुख शिबुलाल यांचे नेतृत्व अगदीच सपक आहे हे आता सर्वानीच मान्य केले आहे. ते २०१५ साली निवृत्त होतील. तेव्हा त्यांच्यानंतर कंपनीची धुरा पेलण्यासाठी रोहन यांना तयार करण्याचा डाव यामागे नाही, हे कसे मान्य करणार? या पाश्र्वभूमीवर विप्रोचे अझीम प्रेमजी यांना प्रामाणिकपणाचे अधिक गुण द्यावयास हवेत. त्यांनी आपला मुलगा रिषभ यास अधिकृतपणे कंपनीत मुख्य धोरणाधिकारी असे पद देऊन आणले आणि आपला उत्तराधिकारी कोण राहील हे स्पष्ट केले. दुसरीकडे टाटा समूहातील टीसीएसचे उदाहरणदेखील कौतुकास्पद आहे. ही कंपनी जन्मापासून कोणत्याही टाटा घराणेदाराच्या पाठिंब्याशिवाय उभी आहे आणि तिने इन्फोसिसला कधीच मागे टाकले आहे.
या पाश्र्वभूमीवर इन्फोसिसने मात्र निराशा केली असे म्हणावयास हवे. भारतीय उद्योगक्षेत्र अजूनही भारताच्या म्हणून ज्या सांस्कृतिक मर्यादा असतात त्यावर मात करू शकलेले नाही, हे यानिमित्ताने दिसले. प्रवर्तकास वा संस्थापकास कंपनी सार्वजनिक मालकीची झाली तरी ती खासगी मालमत्ताच वाटत असते आणि तिचा मोह सुटत नाही, ही वस्तुस्थिती आहे. परिणामी आपले उद्योग वाढत नाहीत आणि त्यांचे मैदान लहानच राहते. म्हणूनच भारत हा माहिती उद्योगातील जगातील सर्वात मोठा खेळाडू असला तरी एकही उत्पादन भारतीयाच्या नावावर नाही. मग ते विकिपीडिया असेल वा गुगल असेल वा ट्विटर वा फेसबुक. भारताने या क्षेत्रात फक्त सुविद्य कारकून निर्माण केले आणि आपल्या सर्व माहिती कंपन्या फक्त सेवादाय क्षेत्रापुरत्याच उरल्या. त्याचमुळे चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांनी इंग्रजी शिक्षणाचा प्रसार करून बीपीओ क्षेत्रात आघाडी घेतल्यापासून भारतीय कंपन्यांना जागतिक बाजारपेठेत आव्हान निर्माण झाले आणि त्यामुळेच इन्फोसिस आदी कंपन्यांच्या तोंडी फेस आला आहे.
अशा वेळी या कंपन्या अधिक मुक्त करून नावीन्याचे आव्हान नावीन्याने पेलण्याचे धैर्य दिसणे गरजेचे होते. परंतु ते न करता पुन्हा एकदा चोखाळलेल्या वृद्ध मार्गानेच माहिती तंत्रज्ञान हे तरुणांचे क्षेत्र जाणार असेल तर ते दुर्दैवी आहे. नारायण मूर्ती यांच्या पुनरागमनाच्या निर्णयामुळे एका अर्थाने या क्षेत्राचेच ‘मूर्ती’भंजन झाले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा