लोकसभेत भाजपची सदस्य संख्या वाढवण्याइतके राजकीय ‘कर्तृत्व’ अडवाणी यांनी दाखवले होते, हे कोणीच अमान्य करणार नाही. परंतु त्यांच्या त्या कामगिरीचे आजच्या तरुण मतदारांना काहीही घेणेदेणे नाही. पक्षात नरेंद्र मोदींची पदोन्नती अपरिहार्य होती अन् नेमके हेच वास्तव अडवाणी व इतर काही पक्षनेते समजून घेताना दिसत नाही….
भूतकाळातील कर्तबगारी भविष्यातील उज्ज्वल कामगिरीची हमी देऊ शकत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आगामी निवडणुकांसाठी भाजपची प्रचारधुरा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हाती सुपूर्द करून लालकृष्ण अडवाणी यांना हाच संदेश दिला आहे. गोवा येथे पक्षाच्या सुरू असलेल्या कार्यकारिणीत मोदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणे हा केवळ उपचार होता आणि तो पार पाडतानाही भाजपच्या तोंडाला फेस आला. यावरून शिस्तीचे गोडवे गाणाऱ्या या पक्षाची काय अवस्था आहे, याचा अंदाज यावा. या अधिवेशनास अडवाणी, यशवंत सिन्हा, उमा भारती, शत्रुघ्न सिन्हा आदी नेते गैरहजर राहिले. पैकी उमा भारती आणि सिन्हा यांची दखल घेण्याचे काहीही कारण नाही. सिन्हा यांची राजकीय कामगिरी त्यांच्या अभिनयाप्रमाणेच पोकळ राहिलेली आहे आणि उमा भारती हे अपेक्षेपेक्षा जास्त हुशार समजले गेल्याने वाया गेलेले वाह्य़ात बाळ आहे. या बाईंना स्वत:च्या ताकदीचा भलताच गर्व होता. त्यातूनच त्यांनी भाजप सोडण्याचा आगाऊपणा केला, परंतु नंतर त्यांना स्वत:चा मतदारसंघही राखता आला नाही. अशा या व्यक्तीस खरे तर पुन्हा पक्षात थारा देण्याची काहीही गरज नव्हती. परंतु जे जे भगवे ते ते आदरणीय अशी स्वत:ची चुकीची समजूत भाजपने करून घेतलेली असल्याने भगवी वस्त्रे परिधान करणाऱ्या या बाई पुन्हा भाजपत आल्या. आल्यावरही आपल्याला नक्की मध्य प्रदेशात की उत्तर प्रदेशात दिवे लावावयाचे आहेत हे न कळल्याने दोन्ही राज्यांत त्यांच्या कर्तृत्वाचा अंधारच भरून राहिला आहे. मध्य प्रदेशात भाजपच्या आणि जनतेच्याही सुदैवाने शिवराजसिंह चौहान यांच्यासारखा मवाळ तरीही लोकप्रिय नेता मुख्यमंत्रिपदी असल्याने उमा भारती यांना आपले बस्तान बसवता आलेले नाही. तेव्हा त्या कार्यकारिणीत सामील झाल्या काय किंवा न झाल्या काय, भाजपसाठी काहीही फरक पडणार नाही ही वस्तुस्थिती आहे. यांच्याखेरीज माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा हेही गोव्यास गेले नाहीत. सिन्हा मुळात समाजवादी कंपूतील. राजकीय अपरिहार्यतेमुळे त्यांना भाजपत यावे लागले. अर्थमंत्री म्हणून त्यांची कामगिरी कितीही सरस असली तरी राजकीय पातळीवर त्यांना काही फार मोठे स्थान आहे, असेही नाही. त्यामुळे ते मधे मधे बऱ्याचदा पक्षनेतृत्वावर फुरंगटून बसतात. कालांतराने शांत होतात. तेव्हा आताही ते कार्यकारिणीत सामील झाले नाहीत म्हणून फार काही पोकळी निर्माण होणार असे नाही.
मुद्दा आहे तो लालकृष्ण अडवाणी यांचा. पुढील वर्षी जेव्हा निवडणुका होतील तेव्हा वयाची शंभरी अडवाणी यांच्यापासून जेमतेम १४ वर्षे दूर असेल. या वयात कोणाही व्यक्तीने मुख्य प्रवाहापासून दूर होऊन गोष्टी सांगेन युक्तीच्या चार.. अशी भूमिका बजावणे अपेक्षित असते. अडवाणी ज्या धर्माचा पुरस्कार करतात त्या हिंदू धर्माने तर वानप्रस्थाश्रमाचीच शिफारस केली आहे. पण तो तर दूर राहिला. अडवाणी अजून यौवनात मी.. असे म्हणत सत्तेच्या बोहल्यावर चढण्याची तयारी करताना दिसतात. सत्तासारीपाटात अजून पाच वर्षांची एक खेळी खेळण्याइतके तारुण्य आपल्या अंगी कायम आहे अशी त्यांची खात्री असली तरी त्यांच्या क्षमतेवर त्यांच्या सहकाऱ्यांचाच विश्वास नसावा आणि तसे असल्यास ते रास्तच म्हणावयास हवे. त्याचमुळे त्यांना हाताला धरून बाजूला करण्याची वेळ संघावर आली. यामागील साधे कारण असे की २००९ साली अडवाणींना जे जमले नाही ते वयाच्या ८६ वर्षी २०१४ साली जमेल असे मानण्यास अडवाणी यांचाच कोणी साथीदार तयार नाही. २००९ साली भाजप निवडणुकांना सामोरा गेला तो पंतप्रधानपदासाठी अडवाणी यांचाच चेहरा घेऊन. त्या वेळी अडवाणी आपल्याला विजय मिळणारच या भ्रमात होते. त्यातूनच त्यांनी मनमोहन सिंग यांच्यावर अश्लाघ्य आणि असभ्य टीका केली. अखेर मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. तरीही अडवाणी आपला काळ सरत असल्याचे मानण्यास तयार नाहीत. ही शोकांतिका आहे आणि हिंदू जीवनविचारावर श्रद्धा असल्याचा दावा करणाऱ्याच्या आयुष्यात घडत असल्याने अधिकच दु:खदायक आहे. वास्तविक गोव्यातील कार्यकारिणीत हजर राहण्याबाबत त्यांनी मोकळ्या मनाने तयारी दाखवावयास हवी होती. तेथे जाऊन तरुणांना आशीर्वाद देण्याइतका मोठेपणा त्यांनी दाखवला असता तर अडवाणी यांची उंची अधिकच वाढली असती. परंतु असे न करता आपण ज्याच्या पाठीशी इतका काळ राहिलो त्या नरेंद्र मोदी यांनाच विरोध करण्याचा क्षुद्रपणा त्यांनी दाखवला. असे करताना त्यांनी हे लक्षात घेतले नाही की २०१४च्या निवडणुकांत पहिल्यांदा वा दुसऱ्यांदा मतदान करणाऱ्या तरुण मतदारांस आपले काहीच कर्तृत्व माहीत असणार नाही. लोकसभेत पक्षाच्या दोन खासदारांवरून १८५ पर्यंत भाजपची सदस्य संख्या वाढवण्याइतके राजकीय ‘कर्तृत्व’ अडवाणी यांनी दाखवले होते, हे कोणीच अमान्य करणार नाही. परंतु त्यांच्या त्या कामगिरीचे आजच्या तरुण मतदारांना काहीही घेणेदेणे नाही हेदेखील कोणी अमान्य करणार नाही. या तरुण मतदारांसमोर गेला आहे तो नरेंद्र मोदी यांचा माध्यमांनी फुगवलेला का असेना पण विकासाभिमुख चेहरा. अनेक उद्योगपतींनी अकारण कौतुक करून मोदी यांचा फुगा अधिकच फुगवलेला आहे, हेही मान्य. परंतु प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडे दाखवण्यासारखे तेवढेही नाही. थकलेभागले निराकार मनमोहन सिंग आणि आपला नक्की आकार कोणता हेच माहीत नसलेले राहुल गांधी हे काँग्रेसचे भांडवल. यास नरेंद्र मोदी यांचा उतारा असू शकतो असे भाजपतील धुरिणांना वाटले असल्यास त्यात अयोग्य काही नाही. त्याचमुळे आगामी निवडणुकांत भाजपचे सारथ्य करण्याची संधी मोदी यांना दिली जाणार हे उघडच होते. अशा वेळी अडवाणी यांनी गोव्यातील कार्यकारिणीत हजर राहणे आवश्यक होते. तसे झाले असते तर काहीही न करता त्यांना आयताच मोठेपणा मिळाला असता. ती संधी त्यांनी गमावली आणि हात दाखवून अवलक्षण करून घेतले. काळ हा कोणासाठीच थांबत नसतो, याचे भान त्यांना राहिले नाही. कोणाच्याही कारकिर्दीचा अंत असा होणे दु:खदायकच. दुसरे असे की ज्या वेळी भाजपतील सर्वच नेते समवयस्क, समउंच आहेत त्या वेळी भाजपची सूत्रे हाती असलेल्या रा.स्व. संघास त्यातल्या त्यात अधिक उंच नेता निवडणे आवश्यक होते. ही उंची आपणाकडे आहे असा सुषमा स्वराज ते अरुण जेटली ते नितीन गडकरी अशा अनेकांचा दावा असला तरी या सर्वाना मोदी यांच्या आव्हानाकडे दुर्लक्ष करणे शक्य झाले नसणार हे उघड आहे.
या पाश्र्वभूमीवर मोदी यांची पदोन्नती होणार हे उघड होते. तशी ती झाली. तेव्हा भाजपतील अनेकांना आपल्या आजाराकडे दुर्लक्ष करावे लागणार हेही उघड आहे. आपल्याला कोणताही ‘नमो’निया झालेला नाही, आपण अन्य कोणत्या कारणासाठी गोव्यास गेलो नाही असे सांगत यशवंत सिन्हा यांनी आपल्या अनुपस्थितीचे समर्थन केले. अडवाणी यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण पुढे करीत या बैठकीस हजर राहण्याचे टाळले. आता मोदी यांच्या निवडीमुळे या दोघांसह अनेक भाजप नेत्यांनाही नमोनियापासून स्वत:चा बचाव करता येणार नाही. विद्यमान परिस्थितीत नरेंद्र मोदी यांच्याखेरीज भाजपस पर्याय नव्हता. हे जाणण्याचे शहाणपण गोव्यातील कार्यकारिणीने दाखवले.

Story img Loader