भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना वादग्रस्तपणामुळे पदावरून पायउतार व्हावे लागताच, भाजपचे एकमेव आशास्थान असलेले गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे पक्षाच्या केंद्रस्थानी पुनरागमन झाले. मोदी हे पक्षाचे एकमेव आशास्थान आहेत किंवा नाहीत, याबद्दल भाजपमध्ये कदाचित मतांतरे असू शकतात, परंतु मोदी हे पक्षाचे पंतप्रधानपदाचे भावी उमेदवार नाहीत, असे नि:संदिग्धपणाने सांगण्याची हिंमत आजवर कुणी केली नाही, यातच त्यांचे महत्त्व अधोरेखित झाले. पक्षाचे भीष्माचार्य लालकृष्ण अडवाणी यांनीदेखील कधी काळी मोदीस्तुतीचा मोह आवरला नाही आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आपल्या गळ्यातील स्तुतिसुमनांच्या माळा मोदींच्या गळी घालण्याचा मोठेपणा राजनाथ सिंह यांना दाखवावा लागला. नितीन गडकरी आणि नरेंद्र मोदी या खरे तर एका म्यानातील दोन तलवारी नसतानाही, गडकरी अध्यक्षपदावर असेपर्यंत मोदींना दिल्लीची दारे दूरवरूनच पाहावी लागत होती. त्यामुळे गुजरातचा हा मुख्यमंत्री अहमदाबादेत बसूनच राष्ट्रीय राजकारणावरचे आपले वर्चस्व वेगवेगळ्या पद्धतींनी सिद्ध करू पाहत होता. गडकरी बाजूला झाले आणि अपेक्षेप्रमाणे मोदी यांना पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीत महत्त्वाचे स्थान मिळाले. नरेंद्र मोदी हे आगामी निवडणुकीनंतरचे भाजपचे आणि रालोआचेही पंतप्रधानपदाचे एकमेव निर्विवाद उमेदवार असतील यावर या नियुक्तीमुळे शिक्कामोर्तब झाले, असे लगेचच मानण्याचे काहीच कारण नाही. पण आगामी निवडणुकीतील भाजपच्या आणि रालोआच्या प्रचाराचा प्रमुख चेहरा मात्र नरेंद्र मोदींचाच असेल, ही मात्र काळ्या दगडावरची रेघ ठरणार आहे. गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय नेतृत्वाचे दावेदार म्हणून स्वत:चे नेतृत्व सिद्ध करण्याचे पद्धतशीर प्रयत्न नरेंद्र मोदी यांच्याकडून सुरू आहेत. देशात जिथे जिथे भाजप आहे, तिथे तिथे मोदी समर्थकांचे लहान-मोठे गट आहेत. त्यामुळे मोदींना आपला वरचष्मा प्रस्थापित करण्यासाठी राजनाथ सिंह यांनी दिलेल्या संधीचे पुरेपूर सोने करून घेणेही सोपे ठरणार आहे. असंख्य बाबींवरून वादग्रस्त ठरूनही, नरेंद्र मोदी कधीच पराभूतासारखे प्रसारमाध्यमांना सामोरे गेले नाहीत, ही त्यांची गेल्या काही वर्षांतील जमेची मोठी बाजू ठरली. आता पक्षाच्या धोरणात्मक निर्णयप्रक्रियेत मोदी यांचा शब्द महत्त्वाचा ठरेल. पक्षाची निवडणूक नीती आखण्यातही मोदी यांचा वाटा महत्त्वाचा असेल. नरेंद्र मोदी राष्ट्रीय राजकारणात पदार्पणास उत्सुक आहेत, हे गेल्या डिसेंबरातच स्पष्ट झाले होते. विधानसभा निवडणुकीत पक्षाला विजयाची हॅट्ट्रिक साधून देणारा एकमेव नेता असा मानाचा तुरा मोदींच्या शिरपेचात खोवला गेला, आणि मोदींच्या राजकीय ताकदीला आव्हान देणारे पक्षांतर्गत सूर आपोआप मवाळ होत गेले. भाजपच्या नव्या कार्यकारिणीच्या घोषणेनंतर लगेचच काँग्रेसमधून व्यक्त झालेल्या प्रतिक्रियेतही, मोदी नावाच्या संकटाचे सावट अंधूकसे उमटलेच होते. नरेंद्र मोदी हे पक्षापेक्षा मोठे होतील, असे भाकीत काँग्रेसने वर्तविले आहे. ते खरे ठरणार की खोटे हे आगामी काळ ठरवणार आहे. सध्यातरी, पक्षाचा आक्रमक आणि लोकप्रिय चेहरा म्हणून नरेंद्र मोदी हेच व्यक्तिमत्त्व भाजपकडे आहे, हे स्पष्ट आहे. म्हणूनच, गेल्या काही महिन्यांपासून पक्षात सुरू असलेल्या मोदीस्तुतीच्या स्तोत्रांची आता देशभरातील पक्षसंघटनेत पारायणे सुरू होतील. ‘नमस्ते सदा’चे सूर फक्त प्रभात किंवा सायंशाखांवर घुमतील. इतर वेळात ‘नमोस्तुते’चा गजर होतच राहील. कारण भाजपची ती अपरिहार्य गरजच आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा