मिळालेली मते सत्ताकारणासाठी वापरावयाची तर टोकाच्या भूमिका सोडाव्या लागतात आणि सर्वसमावेशक व्हावे लागते, याची जाणीव मोदी यांना आता झालेली असल्याने मुसलमानांबद्दलचे त्यांचे ताजे विचार ग्राहय़ धरायला हरकत नाही.. प्रश्न इतकाच आहे की २५ टक्के मतांसाठी आज झालेली विश्लेषणे उद्या कायम राहतात का?
आगामी काळात मुसलमानांना आपलेसे करा असा संदेश भावी सत्ताधारी भाजपचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. मोदी यांचे विमान सध्या हवेत आहे आणि ते आणखी उंचच जाईल अशी त्यांना खात्री आहे. त्यामुळे सध्या भाषणे देणे, मार्गदर्शन करणे या कामांत त्यांनी स्वत:ला जुंपले आहे. खरे तर भाजपला मार्गदर्शकांची गरज नव्हती आणि नाहीही. रा. स्व. संघाची कृपा असल्याने त्याबाबत भाजप इतर पक्षांपेक्षा बराच श्रीमंत आहे. परंतु भाजपची पंचाईत होते ती संघ उघड राजकारण करण्याबाबत अंगचोरी करीत असल्याने. पक्षाच्या सगळ्याच चाव्या संघ मुख्यालयात अडकवलेल्या आणि तरीही संघ भाजपस तुमचे घर तुम्हीच सांभाळा, असे सांगणार. तेव्हा संघाकडे चाव्या द्याव्यात तरी पंचाईत आणि न देता घर चालवणे अवघड, अशी भाजपची अवस्था आहे. त्यामुळेच लालकृष्ण अडवाणी की आणखी कोणी असा पेच पडला असता संघाने नरेंद्र मोदी यांच्या पारडय़ात आपले वजन टाकले, तेव्हापासून मोदी यांच्या विमानाने जी झेप घेतली ती घेतलीच. परंतु मोदी यांची अडचण ही की संघाने निवडले तरी त्यांना, आणि अर्थातच भाजपलाही, जनतेनेही निवडून देणे आवश्यक आहे. ही एक छोटी अट ही मोदी आणि मंडळींसाठी अडचण असल्यामुळे त्यावर कशी मात करता येईल याच्या चर्चा, परिसंवाद, बौद्धिके आदी मार्ग भाजपने निवडले आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या आठवडय़ात मोदी यांनी भाजपच्या प्रवक्त्यांना मार्गदर्शन केले आणि दुसऱ्या दिवशी पक्षाच्या निवडणूक व्यूहरचनेसाठीच्या चर्चेतही त्यांची उपस्थिती मध्यवर्ती होती. भाजपचे बरेच प्रवक्ते संघसुसंस्कृत असल्याने त्यांना खरे तर वेगळ्या मार्गदर्शनाची गरज नव्हती. कोणत्याही प्रश्नावर अभ्यास आणि भाषाधार दोन्ही नसताना सुहास्य वदनाने कशी वेळ मारून न्यावी हे सांगायचे तर त्यासाठी प्रकाश जावडेकर पुरेसे आहेत. घटना कितीही गंभीर आणि दुर्दैवी असली तरी तीबाबत बोलताना चेहऱ्यावरचे हसू कसे अबाधित ठेवायचे यात जावडेकरांचा हात धरणारा संपूर्ण भारतीय राजकारणात अन्य कोणी नसेल. तेव्हा खरे तर देशभरातील, राज्य शाखांतील भाजपच्या प्रवक्त्यांना मार्गदर्शनासाठी हे नवे आचार्य जावडेकर पुरून उरले असते. परंतु तरीही मोदी यांनी त्यात लक्ष घातले. याचे कारण कदाचित या वेळेस पक्षप्रवक्त्यांकडून वेळ मारून नेण्याखेरीज अधिक काही अपेक्षित असल्याने आपणच मैदानात उतरण्याची गरज मोदी यांना वाटली असावी. या बैठकीत बोलताना मोदी यांनी मुसलमानांना आपलेसे करा, असा संदेश स्वपक्षीयांना दिला. प्रवक्तेवा पक्षाचे अन्य नेते यांना या वेळी मोदी यांना उलट प्रश्न विचारण्याची मुभा होती किंवा नाही, हे ठाऊक नाही. भाजपत पक्षांतर्गत लोकशाही असल्याने तशी मुभा नसेलही. अन्यथा मुसलमानांना आपलेसे करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून इस्लामी पद्धतीची टोपी घालण्याची वेळ आल्यास ती घालावयाची काय, असा प्रश्न मोदी यांना विचारला गेलाच नसता असे नाही. प्रसंगोपात्त अशी टोपी घालावी लागलीच तर त्या टोपीखालील असलेल्या मेंदूतील धर्मभावना भ्रष्ट होणार नाही ना, असेही मोदी यांना विचारण्याची गरज काहींना वाटली असती. याबाबत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनाही त्यांचे मत विचारण्याची संधी या बैठकीत पक्षप्रवक्त्यांना मिळाली किंवा काय, हे समजू शकले नाही. त्याच वेळी मुसलमानांना जिंकायचे असेल तर अयोध्येतील राम मंदिराचे काय करावयाचे याचेही मार्गदर्शन मोदी यांनी या बैठकीत स्वपक्षीयांना केलेच असेल. सत्तेच्या सोपानावर अधिक उंचीवर जायचे असेल तर सहिष्णू असावेच लागते. आक्रमक असहिष्णुतेमुळे प्रसिद्धी होते, मतेही मिळतात. पण मिळालेली मते सत्ताकारणासाठी वापरावयाची तर टोकाच्या भूमिका सोडाव्या लागतात आणि सर्वसमावेशक व्हावे लागते, याची जाणीव मोदी यांना आता झालेली असल्याने त्यांचे याबाबतचे ताजे विचार ग्राहय़ धरावयास हरकत नाही. मुसलमानांची २५ टक्के जरी मते मिळाली तरी भाजपस आगामी निवडणुकीत २७२ चा टप्पा सहज पार पाडता येईल, असा मोदी यांचा कयास आहे. या संदर्भात जाणीव करून द्यायची ती एवढीच की अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखा सुज्ञ आणि सात्त्विक नेता पूर्ण जोमात असतानासुद्धा भाजपला कधी २०० चा टप्पा पार करता आला नाही. तेव्हा त्यात सुमारे पाऊणशेची वाढ करून २७२ पर्यंत मजल मारण्याचे मोदी यांचे स्वप्न किती वास्तवास धरून आहे, असा प्रश्न अप्रस्तुत ठरणार नाही. अर्थात तरी त्यांच्या आशावादास दाद द्यावयास हवी.
भाजपच्या आणखी एका गुणाचे कौतुक या प्रसंगी करावयास हवे. ते म्हणजे विश्लेषण. अर्थतज्ज्ञ ज्या प्रकारे इतिहासाचे भाकीत अचूक वर्तवतात त्याप्रमाणे भाजपचे नेते भुतावरून भविष्य उत्तम मांडतात. कै. प्रमोद महाजन यांनी पक्षाला लावलेली ही सवय. ते हयात असताना त्यांचे आणि माजी प्रदेशाध्यक्ष नितीनभौ गडकरी यांचे फारसे पटले नाही. परंतु तरीही गडकरी यांनी महाजन यांची ही पॉवर पॉइंट सवय अचूक उचलली. त्यामुळे ते कोणत्याही प्रसंगी आकडेवारी समोरच्यावर फेकण्यास तयार असतात. त्याचप्रमाणे अन्य कोणताही भाजप नेता भेटला की अमुक मतदारसंघात अमुक अशी मते आहेत, तमुक तशी आहेत, त्यातील इतके टक्के याला मिळणार आणि तितके टक्के आपल्याला मिळणार याचे इतके रम्य चित्र रंगवतो की मतमोजणी होईपर्यंत त्या पक्षाच्या नेत्यांनाही ते खरे वाटू लागते. मोदी यांच्यासमोरही तेच झाले. त्यात त्यांनी माहिती क्षेत्रातील काही दिग्गजांना हाताशी धरलेले असल्याने त्यांची मांडणी अधिक माध्यमस्नेही झाली. तीनुसार एकूण १०० मतदारसंघांत भाजपचे उमेदवार केवळ लाख वा कमी मतांच्या फरकाने पराभूत झाले. त्यातील ५६ मतदारसंघांतील पराभव तर ५० हजार मतांपेक्षाही कमी मतांनी झालेला आहे. तेव्हा हा थोडा फरक भरून काढला तर भाजपस रोखणारे कोणी नाही असा निष्कर्ष या बैठकीत काढण्यात आला. इतके झाल्यावर मुद्दा राहता राहिला तो इतकाच की हा फरक भरून काढायचा कसा? त्यासाठीच तीन तीनदा विजय मिळवण्याचा अनुभव असणारे मोदी यांनी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार.. या भावनेने सहकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
एका अर्थी हे सगळे अतिउत्साहीपणाच्या पातळीवरील आहे. अद्याप निवडणुका आठ-नऊ महिने दूर आहेत आणि इतक्या लवकर हवा तापवणे धोक्याचे ठरू शकते याची भाजपस जाणीव नाही. मॅरेथॉन स्पर्धेत सुरुवातीलाच जे वेग घेतात ते निर्णायक टप्प्यांवर मंदावतात. राजकारण आणि निवडणुकांतही तसे होण्याचा धोका असतो. पाऊस, पूर, रस्त्यांवरील खड्डे, वाढती महागाई आणि समोर दिसणारे सणवार यात हातातोंडाची गाठ कशी घालायची या विवंचनेत सामान्य नागरिक सध्या आहे. त्यास पुढील वर्षीच्या निवडणुका आणि त्यानंतर पंतप्रधानपदी कोण येणार या प्रश्नात तूर्त कवडीचेही स्वारस्य नाही. हा सर्व इच्छुकांचा अतिउत्साही खेळ आहे. अशा वेळी कोंबडे एका दमात लवकर आरवले म्हणून सूर्योदय वेळेआधी होत नाही याचे भान पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणाऱ्यास तरी नक्कीच असावयास हवे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi view over muslim
Show comments