रवींद्र माधव साठे ravisathe64@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जगभरात राष्ट्रीयता आणि आंतरराष्ट्रीयता या संकल्पनांमध्ये अंतर्विरोध नाही असे मानले जाते. अमेरिकेतील जर्मन- अँग्लो सैक्सनांसह तशी उदाहरणेही पहावयास मिळतात आणि आपल्याकडे मात्र राष्ट्रीयता आणि संमिश्र संस्कृतीच्या गोष्टी केल्या जातात.
सोव्हिएत संघ कोसळण्यास सुरुवात झाली होती, त्या वेळी म्हणजे १९९१ च्या सुमारास ब्रिटनमध्ये तेथील माजी उच्चायुक्त कुलदीप नय्यर हे ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांना एका कार्यक्रमात भेटले. सोव्हिएत संघावर भाष्य करताना नय्यर यांना त्या म्हणाल्या की, ‘तुम्हा भारतीयांचे आम्हाला आश्चर्य वाटते ते असे की एवढी विविध संकटे व समस्या असताना तुम्ही पाच हजार वर्षे टिकलात कसे काय? त्याचे रहस्य काय? गोर्बाचेव्ह यांना ते रहस्य सांगा म्हणजे सोव्हिएत संघ अंतर्गत तुटण्यापासून कदाचित वाचू शकेल.’ थॅचर यांची मार्मिक टिप्पणी बाजूला ठेवू, परंतु त्यांनी भारताच्या सहस्रो वर्षे टिकण्याबद्दलचा नय्यर यांना जो प्रश्न विचारला त्याबद्दल आपण समस्त भारतीयांनी चिंतन करणे गरजेचे आहे. (संदर्भ- दुबई येथील ‘गल्फ न्यूज’मध्ये ३ मे २००८ रोजी पृष्ठ क्रमांक ११ वर प्रसिद्ध झालेला कुलदीप नय्यर यांचा ‘व्हायोलन्स डझ नॉट पे’ हा लेख)
सांस्कृतिक राष्ट्र म्हणून अस्तित्व
जगाच्या इतिहासाकडे आपण दृष्टिक्षेप टाकला तर असे लक्षात येईल की काही राष्ट्रे निर्माण झाली, विकसित झाली, विकासाच्या शिखरावर पोहोचली आणि कालांतराने लोप पावली. खाल्दिया, बेबीलोनिया, असीरिया, युनान आणि जूलियस सिझरचा रोम आज कुठे आहेत? कधी काळी ही राष्ट्रे एवढी उन्नत होती तरी ती जगाच्या पटलावरून आज नष्ट झाली.
भारतावर अनेक बाह्य आक्रमणे झाली, परकीयांनी कित्येक वर्षे इथे राज्य केले तरी येथील समाजजीवन मात्र निरंतर चालू राहिले. आपल्या देशाचा इतिहास असा आहे की अनेक शतके इतक्या विस्तीर्ण भूभागावर आमच्या देशात आमचे सरकार (शासन) नव्हते, तांत्रिक भाषेत सार्वभौमत्व नव्हते, परंतु सांस्कृतिक राष्ट्र म्हणून आम्ही जिवंत होतो. राष्ट्र हे विशिष्ट भूमीवरील लोकांची जीवनपद्धती आणि संस्कृतीचे नाव आहे. राष्ट्राची विशिष्ट जीवनपद्धती आणि संस्कृती राष्ट्रास प्राणासारखी असते. प्रारंभापासून हिंदूस्थानचे राष्ट्रजीवन अखंडपणे चालत राहिले आहे.
अँग्लो-सैक्सन आंदोलन
परंतु काही विद्वानांनी, भारत स्वतंत्र झाल्यानंतर ब्रिटिशांच्या प्रभावाखाली येऊन भारतात संयुक्त राष्ट्रीयता आणि मिलीजुली किंवा संमिश्र संस्कृतीचा नारा सुरू केला. वास्तविक पाहता जगात असे एकही उदाहरण नाही की जिथे या दोन्ही संकल्पना टिकाव धरून राहिल्या. अमेरिकेचे उदाहरण याबाबतीत दिग्दर्शक ठरेल. युरोपमधून विभिन्न देशांतील जर्मन, फ्रेंच, डॅनिश, स्वीडिश आणि ब्रिटिश लोक अमेरिकेत जाऊन स्थायिक झाले. पहिल्या महायुद्धापर्यंत आपापल्या देशातील संस्कृतीचे ते प्रवक्ते राहिले व त्याबद्दल अभिमानी राहिले. यांत जर्मन लोकांची संख्या होती सुमारे ९० लाख. परंतु जेव्हा इंग्लंड आणि जर्मनी यांच्यात युद्ध सुरू झाले त्या वेळी तेथील जर्मन लोकांमध्ये अमेरिकेतील अँग्लो-सैक्सन लोकांच्या वर्चस्वाबद्दल खळबळ निर्माण झाली. त्यातून जर्मनांच्या मनात स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची कल्पना तेथे मूळ धरू लागली. त्या वेळी अमेरिकेत व्रुडो विल्सन हे राष्ट्राध्यक्ष होते. विल्सन यांनी जर्मन वंशाच्या सर्व प्रमुख नेत्यांना अटक केली. पहिल्या महायुद्धापर्यंत अमेरिकेस असा गर्व होता की इथे कोणीही आला तरी तो एकात्म होतो.
फ्रेंचांचे पृथक राष्ट्रीयत्व
त्या काळात ‘मेल्टिंग पॉट’ नावाचे एक नाटक अमेरिकेत रंगमंचावर आले होते. त्यात अमेरिकेच्या या गर्विष्ठ भावनांचे प्रतिबिंब पडले होते. परंतु जेव्हा जर्मन लोकांनीच विद्रोहाचा झेंडा उभा केला तेव्हा अमेरिकन लोकांचे डोळे उघडले. १९१८ ते १९३९ या काळात अँग्लो-सैक्सन लोकांनी तीन सांस्कृतिक आंदोलने चालवली. या आंदोलनांची प्रमुख भूमिका ही होती की अँग्लो-सैक्सन राष्ट्रीयता हीच आधारभूत मानून, बिगर अँग्लो-सैक्सन लोकांनी या संस्कृतीत एकात्म झाले पाहिजे. यानंतर तिथे बाहेरून येणाऱ्या बिगर अँग्लो-सैक्सन लोकांवर निर्बंध घालण्यात आले. अमेरिकेस याचे पुढे फळ मिळाले. ते असे की जेव्हा अमेरिकेने द्वितीय महायुद्धात सहभाग घेतला तेव्हा त्यांच्यापुढे पहिल्या महायुद्धावेळी जर्मन लोकांनी जी समस्या उभी केली होती ती पुन्हा उद्भवली नाही. दुसरे उदाहरण कॅनडाचे आहे. तिथे फ्रेंच आणि इंग्रज एकत्र राहात होते आणि कॅनडातही अँग्लो-सैक्सन लोकांचे बहुमत व वरचष्मा होता. सुरुवातीस मिलीजुली संस्कृतीची गोष्ट साहजिक पुढे आली. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात इंग्लंड आणि फ्रान्स एकत्र होते त्यामुळे कॅनडात ही समस्या आली नाही. परंतु द गॉल हे जेव्हा फ्रान्सचे राष्ट्रपती बनले त्या वेळी कॅनडातील फ्रेंच लोकांमध्ये पृथक राष्ट्रीयत्व आणि फ्रेंच राज्याची कल्पना पुढे येऊ लागली. नेपोलियनच्या महत्त्वाकांक्षेस अनुसरून द गॉल हे फ्रान्सला, युरोपातील सर्वोत्तम राष्ट्र बनवू इच्छित होते. त्याचाच परिणाम म्हणून कॅनडातील फ्रेंच लोकांमध्ये स्वतंत्रतेचे वारे वाहू लागले. द गॉल त्यानंतर कॅनडात एका दौऱ्यात गेले तेव्हा एका अभिनंदन सोहळय़ात ते सहभागी झाले. तेथे त्यांनी जाहीरपणे ‘पृथक फ्रांसीसी राष्ट्र आणि राज्याच्या मागणी’चे समर्थन केले. गॉल यांची ही भूमिका राजनैतिक शिष्टाचाराच्या विरोधात असल्यामुळे तेथे खळबळ माजली. परिणामत: गॉल यांना आपला दौरा अर्धवट सोडून फ्रान्सला परतावे लागले, असे इतिहास सांगतो.
आपल्याकडचा विरोधाभास
पुढेही काही काळ कॅनडामध्ये फ्रेंच लोकांचे पृथकतावादी आंदोलन चालू राहिले आणि तिथे सांस्कृतिक एकात्मीकरण मात्र होऊ शकले नाही. याउलट भारतात एकात्मीकरणाची प्रक्रिया पहिल्यापासून सुरू राहिली. परंतु जेव्हा भारत एकात्म आहे असे म्हटले जाते तेव्हा ते म्हणणाऱ्यांवर संकीर्णतेचा आरोप मात्र केला जातो. भारत एकात्म आहे असे म्हणणारी मंडळी राष्ट्रीयता व आंतरराष्ट्रीयता यामध्ये कोणताही भेदभाव व अंतर्विरोध नाही असे मानतात. परंतु ‘आपले हृदय विशाल आहे’ असे मिरवणारी मंडळी मात्र राष्ट्रीयता व आंतरराष्ट्रीयता या संकल्पनांमध्ये अंतर्विरोध मानतात.
उदाहरणार्थ – द्वितीय महायुद्धानंतर झेकोस्लोवाकियामध्ये स्लाव आणि झेक हे दोन वंशांचे लोक एकत्र नांदू लागले. परंतु या दोन्ही वंशांचे लोक कम्युनिस्ट असूनही विभिन्न संस्कृतींच्या कारणास्तव एकात्म होऊ शकले नाहीत आणि गंमत म्हणजे दोघेही आंतरराष्ट्रीयतावादी होते. या देशात रशियाने हस्तक्षेप करण्यापूर्वी वर्षभर अगोदर स्लाव लोकांनी आग्रह धरला होता की त्यांचे वेगळे राष्ट्र आहे. त्यामुळे त्यांचे स्वतंत्र राज्य हवे आणि रशिया हे करण्यास राजी नसेल तर स्लाव आणि झेक लोकांच्या स्वायत्त राज्यांना स्वीकृती देऊन दोघांचे संघ-राज्य बनवण्याची त्यांनी भूमिका मांडली. जिथे आंतरराष्ट्रीयतवादी लोकसुद्धा एकमेकांच्या संस्कृतीत एकात्म होण्यास तयार होत नाहीत, तेथे आपल्या देशातील ही मंडळी संयुक्त राष्ट्रीयता आणि संमिश्र संस्कृतीच्या गोष्टी करतात हे आश्चर्यजनक आहे.
एक देश, एक संस्कृती
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. स्वामी विवेकानंद एकदा म्हणाले होते की विश्वातील सर्व राष्ट्रांमध्ये भारताचा विशेष जन्म लक्ष्य (Raison deter) धर्म आहे. महर्षी अरिवद यांनी उत्तरपाडा येथील विख्यात भाषणांत याचा पुनरुच्चार केला होता. लोकमान्य टिळकांनी भारताच्या विशेष कर्मयोगाविषयी भूमिका मांडली होती. म. गांधींनीही ‘हिंद स्वराज’मध्ये म्हटले होते की इंग्रजांच्या आगमनापूर्वीपासून भारत आसेतु हिमाचल एक राष्ट्र होते.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण ‘सत्यमेव जयते’ या ब्रीदवाक्याचा स्वीकार केला. राजमुद्रा म्हणून सम्राट अशोकाचे चिन्ह स्वीकारले. संसदेत लोकसभा अध्यक्ष बसतात त्यांच्यामागे बोधवाक्य आहे ‘धर्मचक्र प्रवर्तनाय’, सरन्यायाधीशांच्या मागे वाक्य आहे ‘यतो धर्म स्ततो जय:’, नौसेनेचे बीजवाक्य ‘शंनो वरुण:’, वायुसेनेचे आहे ‘नम: स्पृशं दीप्तं’ आणि भारतीय सैन्यदलाचे आहे ‘युद्धाय कृतनिश्चय:’
एवढंच काय तर आपल्या पवित्र राज्यघटनेतही या प्राचीनत्वाचे प्रतििबब उमटले आहे. प्रसिद्ध चित्रकार नंदलाल बोस यांनी आपल्या सुंदर चित्रांच्या आधारे तिला अधिक देखणे बनविले आहे. त्यांत प्रभू श्रीरामचंद्रापासून नेताजी सुभाष बाबूपर्यंत २२ चित्रे आहेत. यांत इंग्रज राजवटीतील तीन – नेताजी, राणी लक्ष्मीबाई, टिपू सुलतान आणि मुघल राजवटीतील तीन – गुरू गोविंद सिंग, छत्रपती शिवाजी, अकबर. अशी सहा चित्रे सोडली तर उर्वरित चित्रे नालंदा विद्यापीठ, तथागत बुद्ध, महावीर जैन, वीर हनुमान, गीतोपदेश, प्रभू श्रीराम यांची आहेत. या चित्रांकडे बघताना आपणांस आपल्या अखंड राष्ट्रीयत्व आणि सांस्कृतिक प्रवाहाची अनुभूती येते.
मुद्दा हा की राष्ट्रउभारणीचा आपला मूळ पाया कोणता हे महत्त्वाचे ठरते. संमिश्र संस्कृती आणि संयुक्त राष्ट्रीयता या कल्पनांनी आपले राष्ट्र उभे राहू शकणार नाही. या देशात राहणाऱ्या प्रत्येकास उपासना स्वातंत्र्य आहे. ते अबाधित ठेवून राष्ट्र म्हणून आपण सर्व जण एक आहोत, एका परिवाराचे सदस्य आहोत, एकाच विराट राष्ट्रपुरुषांचे अंग आहोत. भारत ही आमची मातृभूमी आहे. इथे एक अति प्राचीन संस्कृती आणि सभ्यता आहे याची कायम जाणीव हवी. आपल्या देशात एक जन, एक राष्ट्र, एक संस्कृती आहे यावर सर्वाची श्रद्धा हवी आणि तसा सर्व भारतीयांचा व्यवहारही हवा.
लेखक रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक आहेत.