जर संघर्ष पोसणाऱ्या प्रवृत्ती वरचढ राहिल्या तर उत्क्रान्तियात्रेच्या वर्तमान अंकाचा अंत सगळ्या प्रगत जीवसृष्टीच्या विध्वंसाने होईल आणि मग ही यात्रा बॅक्टेरियांपासून पुन्हा एकदा सुरू होईल!
उत्क्रान्तिप्रक्रियेचा अर्थ लावून दाखवू शकणारी मानवजात ही त्या प्रक्रियेची एक अफलातून निर्मिती आहे. मनुष्यप्राणी अनेक परस्परविरोधी प्रवृत्तींचा अजब गुंतावळा आहे. इतर साऱ्या जीवजातींप्रमाणेच मानवप्राणी स्वार्थी आहे. पण मुंग्या-मधमाश्या- हत्तींसारख्या काही निवडक प्राणिजातींसारखा मानव समाजप्रियही आहे. हे प्राणिसमाज टिकतात सहकारातून, संघांसाठी केलेल्या स्वार्थत्यागातूनही. मानवाच्या स्वभावात हय़ाही सहकाराच्या, नि:स्वार्थीपणाच्या प्रवृत्ती आढळतात. पण समाजप्रिय प्राण्यांच्या वेगवेगळ्या संघांत जोरदार संघर्षही दिसतात; स्वत:च्या समाजाच्या सदस्यांबद्दल आपुलकी, स्वजातीयच पण स्वत:च्या समाजाबाहेरच्या प्राण्यांबद्दल बेफिकिरी, किंबहुना शत्रुत्व, द्वेषही आढळतात. मानवाच्या स्वभावातही असेच आपपरभाव, स्वकीयांबद्दल प्रेम, परकीयांबद्दल द्वेष दिसून येतात. म्हणूनच मानवसमाजांत स्वसमाजांतर्गत सहकाराला मानमान्यता दिसते, तसेच परकीयांशी दुर्वर्तनाला, क्रौर्यालाही उत्तेजन मिळते. समाजप्रिय प्राण्यांच्यात समाजांतर्गत स्पर्धाही चालू असते आणि हय़ा स्पध्रेत दुसऱ्यावर कुरघोडी करण्यासाठी मोरासारखे पक्षी पिसाऱ्याचे मोठे लोढणे बाळगत दिमाख मिरवतात. आपण जितका निष्कारण व्यय करू शकतो, तितके आपण शक्तिशाली असा हय़ा भपक्याचा संदेश असतो. माणसाने आपल्या बुद्धीच्या बळावर कृत्रिम वस्तूंचा प्रचंड साठा निर्माण करीत हय़ा दिमाखाला वेगळाच अर्थ निर्माण करून दिला आहे. इजिप्तच्या राजांचा दिमाख त्यांच्या मरणोत्तरही टिकून राहावा म्हणून पिरॅमिड बांधले गेले; त्यातला गिज़ाचा भव्य पिरॅमिड बांधायला तब्बल तीस वष्रे एका वेळी दहा-दहा हजार मजूर खपत होते. पण हय़ाच बुद्धीच्या बळावर मनुष्यप्राणी जगात काय चालले आहे हे समजावूनही घेऊ शकतो, विवेकाने, दूरदृष्टीने वागूही शकतो. तेव्हा मनुष्यस्वभावात अद्वातद्वा खर्च करीत दिमाख दाखवावा हय़ा प्रवृत्तीच्या जोडीला साधेपणे राहावे, जगावर उगीच जास्त भार टाकू नये अशाही प्रवृत्ती आढळतात.
हय़ांतल्या नेमक्या कोणत्या प्रवृत्ती केव्हा प्रकट होतात हे व्यक्ती-व्यक्तीनुसार, संदर्भा-संदर्भानुसार बदलत राहते. मानवी समाजांच्या धारणेत जसे बदल होत गेले आहेत, तसे हे संदर्भ बदलत राहिले आहेत. दहा हजार वर्षांपूर्वीपर्यंत मनुष्यप्राणी विखुरलेल्या छोटय़ा-छोटय़ा टोळ्यांत राहात होता, टोळीच्या सदस्यांच्यात सहकाराला महत्त्वाची भूमिका होती, मानवाचा निसर्गावर काही खास प्रभाव पडलेला नव्हता, त्याच्यापाशी मोठय़ा प्रमाणात वस्तुसंचय करून तोरा मिरवायची कुवत नव्हती. उलट आज अब्जावधी मानवांचा एक जागतिक समूह निर्माण झाला आहे, परस्परांशी सहकाराचे महत्त्व घटले आहे, स्पध्रेचा कळस झाला आहे, वस्तुसंचयाला काहीही मर्यादा राहिलेली नाही, दुसऱ्यांपुढे श्रीमंतीचे प्रदर्शन करणे हेच आयुष्याचे महत्त्वाचे ध्येय बनले आहे. हय़ा सगळ्या अब्जावधी मानवांच्या संख्येचा आणि त्यांच्या बेसुमार वस्तुसंचयाचा निसर्गावर प्रचंड प्रभाव पडतो आहे आणि तोच जीवसृष्टीच्या उत्क्रान्तीच्या पुढच्या दिशा ठरवणार आहे.
एका बाजूने बेछूट आíथक उत्पादन, अर्निबध स्पर्धा हय़ांचे गोडवे गायले जात आहेत, तर दुसरीकडून ओपन सोर्स सॉफ्टवेअर, माहिती स्वातंत्र्य, प्रत्यक्ष लोकशाही अशा सहकारावर भर देणाऱ्या चळवळीही उभ्या राहात आहेत. शेवटी मानवाचा निसर्गावर किती व कसा भार पडेल, उत्क्रान्तीला आपण काय वळणावर नेऊ हे हय़ा दोन विरोधी प्रवृत्तींतील कोणत्या, केव्हा वरचढ ठरतील हय़ावर अवलंबून आहे. आज तरी गळेकापी स्पर्धा आणि निसर्गाची बेदरकार लूट हय़ांचे पारडे जड होताना दिसत आहे. हा मार्ग आपल्याला साऱ्या प्रगत जीवसृष्टीच्या विध्वंसाकडे नेत आहे; तर दुसरा सहकाराचा, संयमाचा मार्ग आपल्याला उत्क्रान्तीच्या पुढच्या, अधिक प्रगत टप्प्याला नेऊन पोचवेल. हय़ा लेखात आपण अधोगतीच्या संभावनेचे विवेचन करू, पुढच्या व हय़ा मालिकेतील शेवटच्या लेखात उन्नतीच्या संभावनांचे.
नसíगक संसाधनांसाठी चालणारी गटा-गटांतील स्पर्धा आणि त्यातून घडणारा निसर्गाचा विध्वंस मानवेतिहासात वेळोवेळी नजरेस येतो. पंचाहत्तर वर्षांपूर्वी आशिया-आफ्रिकेच्या नसíगक संसाधनांवर कब्जा करण्याच्या प्रयत्नांत इंग्लंड-अमेरिका-फ्रान्स-रशिया विरुद्ध जर्मनी-इटली-जपान हय़ांच्या अशाच संघर्षांतून दुसरे महायुद्ध पेटले. िवदा करंदीकर म्हणतात : विज्ञान ज्ञान देई, घडवी कितीक किमया। देई न प्रेम शान्ती, त्याला इलाज नाही! म्हणूनच महायुद्धाच्या अखेर जपान्यांवर अणुबॉम्ब पडले. पण मानवजात आज नसíगक संसाधनांची भूक कधीच शमणार नाही अशा रीतीने तिला खतपाणी घालते आहे, तेव्हा एका महायुद्धाने संघर्ष संपणे शक्यच नव्हते. म्हणून उपटले इंग्लंड-अमेरिका-फ्रान्स विरुद्ध रशिया-चीन संघर्षांतून व्हिएटनामचे युद्ध. हय़ा युद्धात मोठय़ा प्रमाणात जैविक शस्त्रास्त्रांचा वापर होऊन व्हिएटनामच्या समृद्ध जीवसृष्टीवर आघात झाले. हय़ा युद्धानंतर मानवाने निसर्गाशी संयमाने वागावे अशी विचारधारा मूळ धरू लागली. पण बेछूट आíथक उत्पादन हेच ज्यांचे सर्वश्रेष्ठ जीवनमूल्य त्या अमेरिकी धनदांडग्यांना हे रुचणारे नव्हते. तेव्हा रियो डी जानिरोच्या जागतिक शिखर परिषदेत अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बुश हय़ांनी बजावले : अमेरिकी जीवनप्रणालीशी कोणतीही तडजोड सहन करणार नाही. मग हय़ाचाच पाठपुरावा करीत इराकच्या तेलसाठय़ांवरची आपली पकड मजबूत करण्यासाठी त्या राष्ट्रावर खोटेनाटे आरोप करीत हल्ला केला. हय़ाच वेळी ऊर्जेच्या भरमसाट वापरामुळे जगाचे तापमान वाढते आहे हय़ाचा स्पष्ट पुरावा पुढे येत होता. पण इराकच्या युद्धात तेलसाठय़ांना प्रचंड आगी लागून जगाच्या वातावरणातील ग्रीनहाऊस गॅसेसमध्ये आणखीच मोठी भर घातली गेली.
रशियाचा विरोध कोलमडल्यावर अमेरिकेचे वर्चस्व चिरकाल टिकणार हय़ा खुशीत आलेल्या अमेरिकी धनदांडग्यांना आज चीन खडबडून जागे करीत आहे. अमेरिकेइतक्याच बेदरकारपणे निसर्गावर हल्ला चढवत चीनही बेछूट आíथक उत्पादनाच्या प्रयत्नांत गर्क आहे. दक्षिण अमेरिका, आफ्रिका ही केवळ अमेरिका व इतर पाश्चात्त्य देशांची चरायची कुरणे नाहीत, आपणही त्यांच्या निसर्गाच्या शोषणात सक्रिय होऊ शकतो हे दाखवून देत आहे. चिनी अर्थव्यवस्था अमेरिकी अर्थव्यवस्थेच्या तुल्यबल बनण्याच्या मार्गावर आहे. चीनपाशीही भरपूर शस्त्रबळ आहे, अणुबॉम्ब आहेत. आज ना उद्या जगाच्या नसíगक संसाधनांवर कुणाची पकड राहणार हय़ा स्पध्रेत अमेरिका व चीनमध्ये संघर्ष पेटणे अटळ आहे. संयम हा हय़ा दोनही राष्ट्रांच्या जीवनमूल्यांचा भाग नाही, तेव्हा दाट शक्यता आहे की अशा युद्धात अद्वातद्वा अणुबॉम्ब वापरले जातील आणि जगाची जळून राख होईल.
असे झाल्यास सारी प्रगत जीवसृष्टी लयाला जाईल. पण म्हणून पुरा जीवतरूच वठून जाईल का? नाही. आपल्याला जाणवत नसेल तरी आजसुद्धा पृथ्वीतलावरच्या जीवसृष्टीचे खरे राजे आहेत साधेसुधे बॅक्टेरिया. ते अत्यंत सोशीक आहेत. इतर प्रगत जीवांना असहय़ अशा अनेक परिस्थितींत खुशीने फोफावताहेत. पृथ्वीच्या खोल पोटात शिळांच्या भेगाभेगांत रासायनिक ऊर्जेवर जगताहेत. अणुयुद्धानंतर जग जरी किरणोत्सर्गानी भरले तरी अशा अनेक आसऱ्या-निवाऱ्यांत ते सुरक्षित राहतील. कदाचित काही कोटी वष्रे पृथ्वीतल निर्जीव भासेलही. पण मग पुन्हा एकदा संथपणे उत्क्रान्तीची यात्रा सुरू होईल. हळूहळू प्रगत जीव डोकावू पाहतील. कदाचित काही अब्ज वर्षांनी आत्मभान असलेले चिम्पान्झी- माणसांसारखे पशूही पुन्हा बागडू लागतील!
*लेखक  ज्येष्ठ परिसर्ग-अभ्यासक आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा