भारतासारख्या अर्थव्यवस्थेत कायदे खुंटीला टांगून ठेवले जाताहेत, निसर्गाची नासाडी होते आहे, आíथक, सामाजिक विषमता भडकते आहे. मात्र आजचे विज्ञान बुद्धिवादाच्या व समसमा परस्पर सहाय्याच्या पायावर उभारले गेले आहे. हाच लोकशाही शासनव्यवस्थेचाही पाया असून निसर्गाला सांभाळून चालावे या तत्त्वप्रणालीचाही हाच आधार आहे.

लहानपणची माझी खास आठवण आहे विठ्ठलराव विखे पाटलांची. डोकीला भले मोठे मुंडासे, पायात जोडे, जाडाभरडा सुती कोट, गुडघ्याच्या किंचितच खाली गेलेले धोतर, एक भारदस्त व्यक्तिमत्त्व. अचानक अवतरायचे. बाबा मोठय़ा अगत्याने स्वागत करायचे. दिवाणखान्यात बसून खलबते चालायची. महाराष्ट्रातला पहिला सहकारी साखर कारखाना उभारण्याचा बेत शिजत असायचा. विठ्ठलराव शेतकऱ्यांच्या संघटनांत गुंतले होते; बाबा-धनंजयराव गाडगीळ, पशाची, यंत्रसामुग्रीची व्यवस्था लावण्यात. बाबांबरोबर कधीमधी मी पण गावांत जायचो. खुशीत शेतकऱ्यांबरोबरच्या चर्चा ऐकायचो.
अशा वातावरणात वाढलो असल्यामुळे जेव्हा उत्क्रांतीशास्त्राचा अभ्यास करायला लागलो तेव्हा साहजिकच माझे लक्ष संघर्ष-सहकारवादाकडे वेधले गेले. इलियडमध्ये होमर म्हणतो : ‘जन्मापासून मृत्यूपर्यंत एकमेकांना रक्तबंबाळ करत मानवाची यातनामय जीवनयात्रा उलगडत राहावी ही तर ईश्वरेच्छा आहे.’ जीवन म्हणजे एक संघर्ष आहे, बळी तो कान पिळी हा तर जगाचा न्याय आहे, हे सारे नसíगक आहे, हा तर उत्क्रांतीचा परिपाक आहे, अशी एक विचारधारा आहे. पण सगळेच हे मानत नाहीत; क्रोपॉट्किन या रशियन शास्त्रज्ञाच्या मते जीवन हा एक सहकाराचा, सहयोगाचा प्रवास आहे. जीवनात जबरदस्त संघर्ष आहे, तसाच सहकारही. जीवशास्त्राचे ज्ञान जसे जसे सखोल होत चालले आहे, तसे तसे सहकाराचे महत्त्व अधिकाधिक जाणवू लागले आहे.
मनुष्य एक अफलातून समाजप्रिय पशू आहे. मानवी संघांच्या प्रभावाचे रहस्य अतिशय परिणामकारी सहकारात आहे. मुंग्या- मधमाश्या नात्या-गोत्यातल्या प्राण्यांचे संघ स्थापतात. त्यांची सगळी सहकारी वर्तणूक साचेबंद असते. पण मानव केवळ आप्तांशी नाही, तर अनेक मित्र-मत्रिणींशी वैयक्तिक ओळखीच्या आधारावर हातमिळवणी करतात आणि नानाविध युक्त्या-प्रयुक्त्या लढवत आपला कार्यभाग साधतात. अर्थातच अशा सहकारी कंपूंत कोण कोणाला किती मदत करते आणि अशा मदतीचा फायदा उठवल्यावर त्याची व्यवस्थित परतफेड केली जाते की नाही, हे जिव्हाळ्याचे विषय बनतात. नि:स्वार्थीपणे जो दुसऱ्याला मदत करेल त्याचा आदर केला जातो; जो केवळ दुसऱ्याकडून ओरबाडून घेतो, तो कृतघ्न ठरवला जातो, त्याच्यावर सूड उगवला जाऊ शकतो. अशा देवाण-घेवाणीतून मानवाच्या समाजात वागण्याच्या पद्धती, नतिक मूल्ये घडवली जातात. मनुष्य कितीही स्वार्थी असला तरीही दुसऱ्यासाठी काहीतरी केले पाहिजे, आपल्याला काही ना काही सामाजिक बांधीलकी आहे अशा भावनाही प्रत्येकाच्या मनात आणि समाजमनात कमी-जास्ती प्रमाणात बळ धरून असतात.
भगवान बुद्धही हेच सांगतो. जगात निश्चितच दु:ख आहे. जो तो आपले दु:ख कसे नष्ट होईल याच विचारांत असतो. त्याचा परिणाम असा होतो की, दुसऱ्याचा घातपात करूनदेखील प्रत्येकजण आपण सुखी होऊ इच्छितो. त्यांत जे िहसक असून बुद्धिमान असतात, ते पुढारी बनतात व इतरांना त्यांचे ताबेदार व्हावे लागते. िहसक बुद्धीमुळे या पुढाऱ्यांतदेखील एकोपा राहत नाही आणि त्यांच्यातही िहसेची चढाओढ चालू राहते. अशा प्रकारची मनुष्यांना आणि उपद्रवकारक समाजरचना नष्ट करून तिच्या जागी दुसरी हितसुखकर संघटना उभारावयाची असेल, तर प्रत्येकाने इतरांचे दु:ख समजावून घेतले पाहिजे, उचित असे परस्पर सहाय्य हा समाजजीवनाचा पाया बनला पाहिजे. ही बांधीलकी मानवी समाजाची मर्यादा ओलांडून तिने साऱ्या निसर्गसृष्टीला सामावून घेतले पाहिजे. समाजात असे सामंजस्य नांदायचे असेल तर कोणीही मी सांगतो तेच इतरांनी मानले पाहिजे असा आग्रह धरता कामा नये. म्हणून भगवान बुद्ध सांगतात की मी हा जो मध्यम मार्ग सुचवतो आहे तो तुम्ही केवळ मी सांगतो म्हणून मान्य करू नका. माझे विवेचन तावून-सुलाखून पाहा, तुमच्या प्रत्यक्ष अनुभवाशी पडताळून पाहा. मग पटेल तरच अंगीकारा.
उत्क्रांतीशास्त्र सांगते आहे की न्याय्य, उचित, समसमा परस्पर सहाय्य हाच मानवी समाजांचा मूलाधार आहे. बौद्ध तत्त्वज्ञान हेच सूत्र पुढे नेत बुद्धिवादावर अधिष्ठित सामंजस्यपूर्ण, अिहसक समाजरचना कशी रचावी हे सुचवते. आजचे विज्ञान हे याच बुद्धिवादाच्या व समसमा परस्पर सहाय्याच्या पायावर उभारले गेले आहे. हाच लोकशाही शासनव्यवस्थेचाही पाया आहे. निसर्गाला सांभाळून चालावे या तत्त्वप्रणालीचाही हाच आधार आहे. आजचे जग हे विज्ञान आणि विज्ञानाधारित तंत्रज्ञानाच्या आधारावर उभे आहे, लोकशाही राज्यव्यवस्था अधिकाधिक प्रमाणात स्वीकारते आहे, निसर्गाला जपू पाहात आहे. हे सारे मानवाच्या नसíगक प्रवृत्तींशी सुसंगत आहे, भारताची जगाला महत्त्वाची देणगी असलेल्या बौद्ध तत्त्वप्रणालीला धरून आहे. तेव्हा भारताची विकासप्रक्रिया ही विज्ञानाची कास धरून, लोकांच्या साथीने आणि निसर्गाच्या कलानेच राबवली पाहिजे हा आग्रह मानवी प्रवृत्तींशी, भारतीय परंपरेशी सुसंगत आहेच आहे, पण आधुनिक कालालाही साजेसा आहे.
पण आज एक अगदी वेगळेच तत्त्वज्ञान एका विज्ञानाचाच-अर्थविज्ञानाचा दाखला देत जगाला भलतीकडेच नेऊ पाहत आहे. हे सांगते की मुक्त बाजारहाट अतिशय कार्यक्षम असते, नेटाने संपत्ती निर्माण करते आणि मग ही संपत्ती झिरपून सर्व समाजाची भरभराट होते. शासनाचे हस्तक्षेप ही बाजारहाटात केलेली फाजील ढवळाढवळ ठरते. ती टाळावी. पर्यावरणाच्या हानीकडे दुर्लक्ष करावे, अकिंचनांना काय हवे आहे याचा विचार करू नये. श्रीमंतांना सवलती द्याव्यात, कारण जास्त प्राप्तीतून धनिक अधिक बचत करतील, ती उत्पादनात गुंतवतील, परिणामी अर्थव्यवस्था भरभराटीस येईल आणि सर्व थरावरचा समाज समृद्ध होईल.
नोबेल पारितोषिक विजेते,  दिग्गज अर्थतज्ज्ञ जोसेफ स्टिग्लिट्झ ही मांडणी किती अशास्त्रीय, किती भ्रामक आहे हे दाखवून देतात. ते सांगतात की जर बाजारहाटाच्या माध्यमातून बळकट अर्थव्यवस्था निर्माण व्हायची असेल तर त्यासाठी सच्ची खुली स्पर्धा पाहिजे. ग्राहकांना एकमेकांशी चढाओढ करणाऱ्या अनेक उत्पादकांपकीच्या कोण्या एकाचे उत्पादन विकत घेण्याची मुभा पाहिजे. जनतेला काय चालले आहे याची परिपूर्ण माहिती पाहिजे. म्हणजे उत्पादकांना अद्वातद्वा फायदा उकळता येणार नाही, ते कसोशीने, काटकसरीने उत्पादन करतील. पण समाजधारणेसाठी केवळ अशी खुली स्पर्धा पुरेशी नाही. सगळ्या समाजाला, पुढच्या पिढीला चुकवावी लागणारी किंमत बाजारपेठेच्या माध्यमातून लक्षात घेतली जाणार नाही. शिवाय ज्यांची प्राप्ती कमी आहे अशा बहुसंख्य नागरिकांना काय हवे आहे ते बाजारपेठ लक्षात घेणार नाही. यासाठी शासनाने नेटका हस्तक्षेप करून प्रदूषणाचा बोजा उद्योजक नििश्चतपणे सगळ्या समाजावर लादत नाहीत ना, नसíगक संसाधने उचित मोल देऊन वापरली जात आहेत ना, यांची खात्री करून घेतली पाहिजे. एवंच मक्तेदारीला वाव नसेल, शासन डोळ्यात तेल घालून नसíगक संसाधने जपत असेल, समाजाच्या सर्व थरांचे हितसंबंध सांभाळत असेल, दूरदृष्टीने धोरणे राबवत असेल, तरच खुल्या बाजारपेठेच्या माध्यमातून टिकाऊ आíथक विकास होऊन सर्व समाजाची भरभराट होईल.
पण प्रत्यक्षात काय घडते आहे? हे समजून घेण्यासाठी उद्योजकांना, व्यापाऱ्यांना ते समाजासाठी जे योगदान करताहेत त्याला समर्पक एवढाच प्रमाणबद्ध आíथक लाभ होतो आहे, का भरमसाट प्राप्ती होते आहे, हे नीट तपासून पाहिले पाहिजे. जर योगदानाच्या मानाने अयोग्य, अवाच्या सव्वा नफा होत असेल, तर अर्थशास्त्रज्ञ त्याला ही खंड वसुली (रेन्ट  सीकिंग ) चालली आहे असे म्हणतात. अशी जबरदस्त खंड वसुली पोसणाऱ्या भारतासारख्या अर्थव्यवस्थेत सत्ताधीश मूठभर लोकांचे हितसंबंध जपताहेत, कायदे खुंटीला टांगून ठेवले जाताहेत, निसर्गाची नासाडी होते आहे, आíथक, सामाजिक विषमता भडकते आहे. आपण चुकीच्या दिशेने धावत आहोत.
 या दौडीचा वेग वाढवणे मूर्खपणा आहे, जरूर आहे दिशा बदलून विज्ञानाची कास धरून, लोकांच्या साथीने आणि निसर्गाच्या कलाने विकासपथावर धावण्याची.

Loksatta editorial Dr Babasaheb Ambedkar Lok Sabha Elections Constitution Convention
अग्रलेख: कोणते आंबेडकर?
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
29 559 sarees are still pending in saree distribution scheme of Mahayuti
आचारसंहिता संपूनही मोफत साडी वाटपास मुहूर्त लागेना, उत्तर महाराष्ट्रात २९ हजार साड्या पडून
Pankaja Munde and Dhananjay Munde vs Suresh Dhas new controversy on political stage after elections
मुंडे बहीण-भाऊ विरुद्ध सुरेश धस, निवडणुकीनंतर राजकीय पटलावर नवा वाद
Inquiry into cases in Beed Parbhani through retired judges Nagpur news
बीड, परभणीतील प्रकरणांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
importance of stability in life
सांधा बदलताना : मैत्र जीवांचे…
bjp mla sudhir mungantiwar
लोकजागर : मुनगंटीवार कुणाचे ‘बळी’?
Sanjeev Abhyankar, Sanjeevan Samadhi Sohala, Mahasadhu Shree Moraya Gosavi Maharaj Sanjivan Samadhi Mandir, pimpari,
पं. संजीव अभ्यंकर यांच्या ‘स्वररंजन भक्तिरसात’ रसिकश्रोते तल्लीन
Story img Loader